हॉलिवूड रिमेक

>> Monday, July 28, 2008

हॉलिवूड चित्रपटांच्या चोखंदळ चाहत्यांसाठी मार्टिन स्कोर्सेसी हे नाव काही नवीन नाही.गुणवत्तेसाठी नावाजलेला हा दिग्दर्शक 1973 च्या मीन स्ट्रीट्सपासून जगभरच्या प्रेक्षकांना परिचित आहे. टॅक्सी ड्रायव्हर, रेजिंग बुल, गुडफेलाज यांसारख्या त्याच्या चित्रपटांनी त्याची वेगळी ओळख बनवली आहे. हिंसाचार, माफिया किंवा तत्सम नावाखाली बोकाळलेली गुंडगिरी, विश्वासघात आणि त्याकडे होणारी वाटचाल ही काही कथासूत्रे स्कोर्सेसीच्या चित्रपटांमध्ये नेमाने येताना दिसतात. 2006 मधील त्याचा "द डिपार्टेड' हादेखील याच सूत्रांच्या आगेमागे गुंफलेला आहे. आपण "द डिपार्टेड'कडे स्वतंत्रपणे पाहिले, तर हे आजच्या अमेरिकेतल्या वाढत्या गुन्हेगारीचे आणि त्यावर ताबा मिळवू न शकणाऱ्या पोलिस यंत्रणेच्या अपयशाचे चित्रण आहे. ही कथावस्तू मुळात अस्सल अमेरिकन नसेल, अशी शंकाही आपल्याला येण्याचे काहीच कारण नाही, इतकी मेहनत चित्रकर्त्यांनी या चित्रपटावर घेतलेली आहे. "इन्फर्नल अफेअर्स' या हॉंगकॉंगमधल्या चित्रपटाचा त्या संहितेच्या आधारेच बनवलेला हा रिमेक असल्याचे चित्रपटात कुठेही जाणवत नाही, हेच त्याचे यश. उत्तम रिमेक कसा असावा, याचा हा वस्तुपाठच म्हणावा लागेल. सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारा थ्रिलर, असे "डिपार्टेड'चे थोडक्यात वर्णन केले तरी "थ्रिलर' हा शब्द त्यातल्या कारागिरीचे वर्णन करण्यासाठी अपुरा आहे. कथेतली वाढती गुंतागुंत, तिच्यामागच्या वास्तवाची सततची जाणीव, संहितेने उभ्या केलेल्या आणि सध्या सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या अभिनेत्यांनी वठवलेल्या जिवंत व्यक्तिरेखा या सगळ्यांचा परिणाम केवळ थ्रिलर या एका शब्दात पकडण्यासारखा नाही. "डिपार्टेड' हा चोर आणि पोलिसांमधला खेळ आहे. त्याला पार्श्वभूमी आहे ती बॉस्टनच्या आयरिश अमेरिकन समाजाची. त्याचे नायक आहेत बिली कॉस्टिगन (लिओनार्दो डी काप्रिओ) आणि कॉलिन सलायवन (मॅट डेमोन). बिली आणि कॉलिन हे दोघेही खरे तर पोलिस आहेत; पण त्यांचे मार्ग एकमेकांहून फारच वेगळे आहेत. आपल्या कुटुंबातले गुन्हेगारी पाश तोडून बिली पोलिसात भरती होतो; पण कॅप्टन क्विनान (मार्टिन शीन) आणि सार्जंट डिगनॅम (मार्क वॉल्बर्ग) त्याची निवड एका अत्यंत धोकादायक कामगिरीसाठी करतात. फ्रॅन्क कॉस्टेलो (जॅक निकोलसन) या कुप्रसिद्ध गॅंगस्टरच्या आतल्या गोटात घुसून त्याने कॉस्टेलीचे साम्राज्य धुळीला मिळवायचे असते. याच्या बरोबर उलट कामगिरी असते ती कॉलिनची. हा कॉस्टेलोचा खास माणूस असतो आणि कॉस्टेलोच्या आशीर्वादानेच तो पोलिसात आलेला असतो, अंडरवर्ल्डचा खबऱ्या म्हणून. जसजसा दोघांचा जम बसत जातो, तसतसा खेळ रंगायला लागतो. कॉलिन पोलिसांच्या चालींची माहिती कॉस्टेलोला पुरवतो, तर बिली कॉस्टेलोचे उद्योग उलट पोलिसांना. लवकरच अशी परिस्थिती येते, की आपल्या विरुद्ध बाजूचा खबऱ्या असल्याचे दोन्ही बाजूंच्या लक्षात येते; मात्र, तो कोण, हे कळू शकत नाही. जिवावरच्या संकटात अडकलेले दोघे आता अधिकच सावध होतात. खेळ सुरू राहतो. "डिपार्टेड' आपल्याला गुंतवून ठेवतो, त्याचे एक कारण म्हणजे त्याची लय. यातला पुढल्या भागात रंगणारा बुद्धिबळाचा डाव हे चित्रपटाचे मूळ शक्तिस्थान असले तरी हलक्या हातांनी रचत नेलेला सुरवातीचा भाग, त्यातली वाढत जाणारी गती आणि गुंतागुंत, सेट पिसेस म्हणण्याजोग्या दोन-तीन उत्कंठावर्धक प्रसंगमालिका आणि अनपेक्षित वळणावळणांनी येणारा परिणामकारक शेवट, या सगळ्याला एक चढत जाणारी लय आहे. चित्रपट जर एकदम गोष्टीतल्या कळीच्या भागावर सुरू होता, तर कदाचित त्यातले रहस्य परिणामकारक वाटले असते; पण एकूण परिणामात तो कमी पडला असता. त्याऐवजी "डिपार्टेड' सुरू होतो तो कॉस्टेलोच्या स्वगताने (आय डोन्ट वॉन्ट टू बी ए प्रॉडक्ट ऑफ माय एन्वायर्न्मेंट, आय वॉन्ट माय एन्वायर्न्मेंट टू बी ए प्रॉडक्ट ऑफ मी!) ज्यात तो आपल्या भोवतालच्या समाजाविषयीची त्याची मते मांडतो. त्याच्या साम्राज्याच्या या बहुधा सुरवातीच्या काळातच तो शाळकरी कॉलिनला आपल्या गॅंगमध्ये सामील करून घेतो. कॉलिनची हुशारी थोडीफार दाखवून चित्रपट कॉलिनच्या पोलिस भरतीपर्यंत येतो आणि बिलीला आपल्यापुढे आणून त्याचाही भूतकाळ तुकड्या-तुकड्यांत मांडतो, या खेपेस क्विनान आणि डिगनॅमने घेतलेल्या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं. दोघे आपापल्या कामावर रुजू झाल्यावरही तो लगेच संघर्षाकडे वळत नाही, तर त्यांचे वरिष्ठांचा विश्žवास संपादन करणे, त्यांच्या जवळ पोचणे, यावरही वेळ घेतो. हा सर्व भाग जरी काहीशी लांबण लावणारा असला, तरी तो आवश्यक आहे आणि चित्रपट केवळ रंजक न वाटता त्यापलीकडे जाऊ शकतो तो या भागामुळेच. मूळ चित्रपटातले अनेक भाग स्कोर्सेसीने जसेच्या तसे वापरले असले, तरी हॉलिवूडीकरणाने दोन व्यक्तिरेखांच्या आवाक्यात ठळक फरक पडलेला आहे. जॅक निकोलसनसारख्या दिग्गजाची निवड झाल्याने कॉस्टेलोची भूमिका वाढली, हे तर उघड आहे; पण केवळ नावाने भूमिकेची लांबी जस्टीफाय झाली नसती. निकोलसनने आपल्या कामगिरीने आपला दर्जा दाखवून दिला आहे. हा अभिनेता "अबाऊट श्मिड्ट'सारख्या संयत अभिनयापासून टिम बर्टनच्या "बॅटमॅन'मधल्या माथेफिरू जोकरच्या भडक उठवळ अभिनयापर्यंत काही करू शकतो. कॉस्टेलो भीतिदायक खलनायक वाटणे चित्रपटाला गरजेचे होते; पण अतिरंजित झाल्याने ही भूमिका किंवा कदाचित चित्रपटही फसण्याची शक्यता होती. निकोलसनने कॉस्टेलोचे वास्तवाशी असलेले नाते कायम डोक्यात ठेवले आहे, ज्यामुळे ही व्यक्तिरेखा उथळ वाटत नाही. रूपांतराचा लाभ घेणारी दुसरी व्यक्तिरेखा आहे ती बिली आणि कॉलिन दोघांबरोबर संबंध असलेल्या मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर नायिकेची (व्हेरा फार्मिंगा). दोन्ही नायकांच्या भूमिका या एक-दोन प्रसंग सोडता आमनेसामने कधीच येत नसल्याने नायिकेला या दोघांमधल्या भावनिक दुव्यासारखे वापरण्यात आले आहे. तिसरी कॅप्टन क्विनानची भूमिकाही वाढण्याची शक्यता होती. कारण मूळ योजनेनुसार मार्टिन शीनऐवजी स्कोर्सेसीच्या अनेक चित्रपटांतून चमकलेला रॉबर्ट डी निरो तिथे दिसणार होता. मात्र, तारखा फिस्कटल्याने या पंचतारांकित चित्रपटातला एक तारा कमी झाला. "डिपार्टेड'चा भर आहे तो व्यक्तिभिमुख आणि मानसिक संघर्षावर. केवळ ऍक्शन इथे दिसणार नाही. बहुतेक प्रसंग हे मोजक्žया व्यक्तींमध्ये घडणारे आणि त्यांच्या बाजू स्पष्ट मांडणारे आहेत. गॅंगस्टर कंपनीला पकडण्याकरिता पोलिसांनी रचलेल्या सापळ्यासारख्या प्रसंगांनाही त्यातल्या पात्रांच्या सतत विचार करण्याने वेगळे बनवले आहे. एका अशा प्रसंगात कॉस्टेलोची माणसे काही माल चायनीज स्मगलर्सना विकण्याकरिता एका रिकाम्या वेअरहाऊसवर पोचतात. कॉलिनला शेवटच्या क्षणी विश्žवासात घेतल्याने, तो कॉस्टेलोला सावध करू शकणार नसतो. आता कॉस्टेलो पकडला जाणार, असे वातावरण तयार होते; मात्र, कॉलिन आपले डोके आणि मोबाईल फोन यांच्या वापराने प्रसंगातून मार्ग काढतो. घटनास्थळी असणारा बिली पोलिसांना जेवढी मदत करता येईल ती करतो; पण अमुक एका गोष्टीपलीकडे तो काही करू शकत नाही. हा पूर्ण प्रसंग अनेक लोकांना सहभागी करून घेतो; पण यातल्या घटना केवळ डोकयाच्या वापरातून पुढे जातात; हात चालवत नाहीत. या प्रकारची रचना हा "डिपार्टेड'चा विशेष आहे. हा चित्रपट सहजपणे जसाच्या तसा हिंदीत आणण्यासारखा आहे आणि त्या दृष्टीने तयारी सुरू झाली असल्यास आश्चर्य वाटू नये. मात्र, रूपांतर करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी- मूळ चित्रपटावर वन अप करण्याच्या उद्देशाने आपल्या लोकांनी जर ऍक्शनचे प्रमाण वाढवले, तर त्या चित्रपटाचा नाजूक तोल हा सहजपणे जाऊ शकतो. मात्र, आपल्याकडच्या रूपांतरात हे निश्चितच अपेक्षित आहे. जमलेल्या कलाकृतीच्या कर्त्यांच्या बुद्धीची कीव करत ती अधिक सुधारून घेण्याचा आव आणण्याची हिंमत आपल्या चित्रकर्त्यांमध्ये कुठून येते कोण जाणे; पण येते एवढे खरे.

-गणेश मतकरी
(साप्ताहिक स‌काळच्या 2006 मधील लेखांमधून)
--------------------------------------------
राम गोपाल वर्माचा काँन्ट्रँक्ट हा चित्रपट पाहिल्यानंतर "डिपार्टेड'चा हिंदी अवतार चांगला झाला की वाईट याबद्दल तुम्हाला कळू शकेल.

1 comments:

किरण क्षीरसागर February 2, 2013 at 4:23 AM  

चित्रपटाचा थरार अॅक्‍शनपेक्षा त्‍याच्‍या चाली-प्रतिचालींमध्‍येच आहे. मात्र चित्रपटाचा नेमका प्रोटॅगनिस्‍ट कोण हा प्रश्‍न पडला आहे.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP