महत्त्वाचं काय? खेळ, खेळाडू की खेळवणारे?

>> Monday, July 21, 2008

वाचोस्की बंधू करत असलेली प्रत्येक गोष्ट ही एखादा विशिष्ट प्रेक्षक वर्ग डोक्‍यात ठेवूनच केलेली असते. आजवरच्या त्यांच्या पाच चित्रपटांमध्ये सरसकट सर्व प्रेक्षकांना चालेलसा एकही चित्रपट नाही, असं म्हणणं ही अतिशयोक्ती नाही. मात्र हे सर्व चित्रपट लक्षवेधी, नेमक्‍या प्रेक्षकांना खेचून घेणारे आणि आपापल्या पार्श्‍वभूमीला टोकाच्या तपशिलात जाऊन जिवंत करणारे आहेत. हे चित्रपट घडतात एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या तीन जगांमध्ये. १९९६ च्या "बाउन्ड'चं जग आहे गुन्हेगारीचं. शेजारशेजारच्या घरांमध्ये घडणाऱ्या या लो बजेट, पण अत्यंत चलाख थ्रिलरमध्ये या प्रकारचे चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी अनेक गोष्टी होत्या; मात्र केवळ १८ वर्षांपुढील प्रेक्षकांसाठी. वाचोस्की हे नाव लक्षात आलं, ते मात्र पुढच्या तीन चित्रपटांमुळे. तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान यांची जगावेगळी सांगड घालणारी त्यांची मेट्रिक्‍स चित्रत्रयी लोकप्रिय जरूर झाली; मात्र तीदेखील सर्वांपर्यंत पोचली नाही. संगणकीय प्रणालीशी फार ओळख नसलेला वर्ग तर तिच्यापासून दूरच राहिला, वर पाहणाऱ्या अनेकांनीही सर्व पैलूंकडे न पाहता स्पेशल इफेक्‍टससारख्या मर्यादित गोष्टीवरच समाधान मानलं. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या "स्पीड रेसर'ची गोष्टही फार वेगळी नाही. वाचोस्की जपानी ऍनिमेशनमधल्या ऍनिमे शैलीने प्रभावित आहेत, हे मेट्रिक्‍सदरम्यानच लक्षात आलं होतं. इथल्या ऍक्‍शन प्रसंगामध्ये हा प्रभाव जाणवण्यासारखा होता. "स्पीड रेसर' या आवडीचंच नवं रूप आहे. ऍनिमे शैलीतलीच सुरवातीच्या काळातली एक मालिका त्यांनी इथं रूपांत रित केली आहे. डिस्नेसारख्या सहज ऍनिमेशनची सवय असलेल्या प्रेक्षकांना ऍनिमे नेहमीच तुटक वाटतं. त्रिमितीपेक्षा द्विमितीसारखी वाटणारी शैली, मोजक्‍या अन्‌ जर्की हालचाली, समोरच्या व्यक्तिरेखांपेक्षा अधिक गतीने बदलणारी पार्श्‍वभूमी या साऱ्या गोष्टी अनेकांना आपल्या वाटल्या नाहीत, तरी गेली अनेक वर्षं हा प्रकार चांगलाच लोकप्रिय आहे आणि वाचोस्कीबरोबरच क्वेन्टीन टेरेन्टीनोसारखे इतरही अनेक चाहते हॉलिवूडमधली त्याची सद्दी टिकवून आहेत. "स्पीड रेसर'मध्ये या शैलीचे गुणधर्म जरूर आढळतात. मात्र हा काही पूर्णपणे ऍनिमेटेड चित्रपट किंवा कार्टून फिल्म नाही. इथे "पूर्णपणे' हा शब्द कळीचा आहे. कारण चित्रपट पूर्णपणे लाईव्ह ऍक्‍शनदेखील नाही. इथल्या व्यक्तिरेखा उत्तमोत्तम नटमंडळींनी साकारलेल्या आहेत, तर काही सेट्‌स वगळता इतर सर्व काही ऍनिमेटेड आहे. भव्य स्टेडियम्स, मोठाली ऑफिसेस, स्वप्नदृश्‍य, निसर्ग आणि चित्रपटाचा सर्वाधिक भाग व्यापून राहणाऱ्या रेसेससुद्धा. "स्पीड रेसर'ची पहिली पंधरा-वीस मिनिटं ही खास पाहण्यासारखी आहेत. याला कारणं दोन. एक तर स्पीडरेसरच्या नेत्रदीपक दृश्‍यात्मकतेशी आपली ओळख घडवून आणतात आणि दुसरं म्हणजे एक त्यामानानं सोपं, पण मांडणीनं गुंतागुंतीचं करण्यात आलेलं कथानक इथं सांगितलं जातं, जे या भागाला स्वतंत्रपणे एका उत्तम शॉर्टफिल्मचं स्वरूप आणून देतं. या छोट्या कथानकात आपल्याला दिसतो तो कथानायक स्पीड (एमिल हर्श). एका मोठ्या कार रेसच्या सुरवातीला लॉकर रूममध्ये बसल्यापासून, ती रेस तो जिंकेपर्यंत हा भाग चालू राहतो. मध्यंतरी भूतकाळातून चकरा मारत वाचोस्की बंधू आपल्याला स्पीड कोण आहे हे सांगतात. लहानपणीपासून त्याला रेसिंगची कशी आवड होती आणि रेक्‍स (स्कॉट पोर्टर) या आपल्या मोठ्या भावावर त्याचं कसं प्रेम होतं, ट्रीक्‍सी (क्रिस्टीन ा रिची) ही वर्गमैत्रीण त्याला कशी आवडायची, वडिलांबरोबर (जॉन गुडमन) बिनस्‌न रेक्‍स कसा घराबाहेर पडला, पुढे त्याला पद्धतशीरपणे कसं बदनाम करण्यात आलं आणि एका अपघातात त्याचा मृत्यू कसा झाला, हे सगळं आपल्याला या थोडक्‍या वेळात सांगितलं जातं. सर्व प्रमुख पात्रांची ओळख होते, स्पीडची दुखरी नस दाखवली जाते अन्‌ पुढे घडणाऱ्या अनेक घटनांना इथं संदर्भ आणून दिला जातो. या भागात दिग्दर्शकांच्या चतुराईची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. गतिमान अन्‌ काळाला न जुमानणारं, पण तरीही गोंधळात न पाडणारं संकलन, संकल्पनेपासून वेगळी वाटणारी भव्य रेस, थोडक्‍या संवादांमधून किंवा लकबींमधून होणारा पात्रपरिचय, संगणकीय ऍनिमेशनवरची चित्रकर्त्यांची कमालीची पकड आणि प्रकर्षानं रंगांची उधळण, हे सगळंच उल्लेखनीय. इथं छोटे, पण लक्षात राहण्याजोगे प्रसंगही अनेक. छोटा स्पीड वर्गात बसला असताना पार्श्‍वभूमी अस्पष्ट होत जाणं आणि अचानक वर्गांचं रेसमध्ये रूपांतर होणं, यासारख्या जागा शोधून दिग्दर्शक आपलं माध्यमावरचं प्रभुत्व सहज दाखवतात. चित्रपटाचा मुख्य भाग आहे, तो अर्थातच स्पीड रेसरनं तथाकथित खलनायकांचा बीमोड करून आपणही रेक्‍ससारखेच किंवा त्याहूनही सरस रेसकार ड्रायव्हर आहोत हे सिद्ध करणं आणि जागतिक कीर्ती मिळवणं. कदाचित दिग्दर्शकांनी पहिल्या पंधरा मिनिटांत आपली सर्व पानं उघड न करता आपल्या हुशारीचा एकेक नमुना अंतराअंतराने आपल्यापुढे आणला असता, तर हा चित्रपट अधिक प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रमाणात पोचला असता. आता मात्र आपल्या चित्रपटाकडून, म्हणजे त्याच्या दृश्‍य भागाकडून असलेल्या सर्व अपेक्षा सुरवातीलाच पूर्ण होतात; अन्‌ पुढचा भाग पुनरावृत्ती ठरतो, मग कथेबाबत तोही तितकाच नवा असता, तर गोष्टी सुसह्य झाल्या असत्या. ते न झाल्याने अन्‌ दृश्‍यांचा भडकपणा वाढत गेल्याने शैलीवर खूष नसलेल्या प्रेक्षकाला हा ओव्हरडोस होतो. फार नावीन्य नसूनही मला मात्र पुढचा भाग भारतीय प्रेक्षकांसाठी आजच्या काळाला समर्पक वाटला आणि विचार करण्यासारखा, कारण आज आपल्या क्रीडा क्षेत्रातल्या एका ज्वलंत प्रश्‍नालाच तो हात घालतो. स्पीड रेसरमध्ये खलनायक आहे तो स्पॉन्सर, जो स्पोर्टसमनच्या लोकप्रियतेचा फायदा स्वतःच्या अंतस्थ हेतूसाठी घेतो आहे. रेसिंगचं स्वरूप धंदेवाईक होत चाललंय आणि ऐरणीवर येणारा प्रश्‍न आहे, तो हा नवा खेळच आज ना उद्या खेळाडूंना, त्यांच्या मानसिकतेला, त्यांच्या स्वत्वाला बदलून टाकेल का? सध्या आयपीएलच्या निमित्तानं आपण जे काही पाहतो आहोत, त्याच्याशी हा प्रश्‍न अतिशय सुसंगत असा आहे. महत्त्वाचं काय? खेळ, खेळाडू की खेळवणारे? या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. मी असं म्हणणार नाही, की स्पीड रेसर या प्रश्‍नाचं अचूक उत्तर देतो (किंबहुना या प्रश्‍नाला खरंच अचूक उत्तर आहे का, हेदेखील माहीत नाही. बहुधा हे उत्तर प्रश्‍न कोणाला विचारण्यात येतो आहे यावरच अवलंबून दिसत आहे.) स्पीड रेसर अपेक्षेप्रमाणेच आदर्शवादी उत्तर देतो. महत्त्व आहे, ते तो हा प्रश्‍न उपस्थित करतो याला. एरवी रंजनवादी म्हणण्यासारख्या या चित्रपटाकडे आपणही त्या नजरेने पाहणं हे योग्य आहे, मात्र त्याचा अर्थ असा नाही की तो मांडत असलेल्या विचाराकडेही आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करावं. इथला विचार मेट्रिक्‍सप्रमाणे गंभीर तत्त्वज्ञानातून येणारा नसून, रोजच्या आयुष्यातून येणारा आहे. त्यामुळे अधिक जवळचा आहे. मग तो आपण बिनतक्रार स्वीकारणार, की चित्रप्रकारांच्या करमणूकप्रधान असण्याकडे बोट दाखवून त्याचं अस्तित्वंच अमान्य करणार? निदान या प्रश्‍नाचं उत्तर तरी ज्याचं त्यानं ठरवायला हवं.

- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP