`फस गये रे ओबामा`- आजचा आणि अर्थपूर्ण

>> Sunday, December 26, 2010

आपल्या कॉमेडीजबद्दल नित्य करण्यात येण्याजोगी हमखास तक्रार होती, ती म्हणजे त्यांचं निर्वातात घडणं. (हीच तक्रार आपल्या इतर चित्रपटांबद्दलही करणं शक्य होतं, ही बॉलीवूडची खरी शोकांतिका, पण ते राहू दे !) कोणतेही सामाजिक, प्रांतीय, राजकीय संदर्भ नसल्याने इतर भाषिक, इतर देशीय चित्रपटांची नक्कल उतरवणं आपल्या निर्मात्या- दिग्दर्शकांना शक्य होई हा एक त्यांच्यापुरता फायदा, पण त्यामुळे प्रेक्षकांना आगापीछा नसलेल्या, वरवर हसवण्याचा प्रयत्न करणा-या बाळबोध चित्रपटांवर समाधान मानावं लागत असे. काही दिवसांपूर्वी आलेल्या अभिषेक शर्माच्या `तेरे बिन लादेन`ने हे चित्र बदलण्याचा थोडाफार प्रयत्न केला, अन् नुकत्याच आलेल्या सुभाष कपूरच्या `फस गये रे ओबामा`ने या प्रयत्नावर शिक्कामोर्तब केलं.
`लादेन` आणि `ओबामा` .या दोन्ही चित्रपटात उघड साम्य असलेल्या अनेक गोष्टी नावापासूनच आहेत. अमेरिकन राजकारणाने चर्चेत आलेल्या नावांच्या या उल्लेखाबरोबरच समाजात अमेरिकेबद्दल असणारं सुप्त (वा उघड) आकर्षण, सध्याची तिथली परिस्थिती, अमेरिकन धोरणावरील टीका, थर्ड वर्ल्ड देशांवर त्यांचा होणारा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम, सध्याच्या सामाजिक परिस्थितीवरलं करमणुकीच्या बुरख्याआड दडलेलं तिरकस भाष्य या सा-या गोष्टी दोन्ही चित्रपटांमध्ये आहेत. एकाच्या नावात अमेरिकेचा द्वेष्टा दहशतवादी तर दुस-यात लाडका राष्ट्राध्यक्ष असले तरीही दोन्ही चित्रपटांची जात ही केपर कॉमेडीसारखी, गुन्हेगारी वळणाने जाणारी आहे. दोन्ही चित्रपट फार्सिकल ढंगाचे असल्याने त्यांच्यात सत्यतेचा अंश अर्थातच नाही अन् अतिशयोक्ती भरपूर आहे, मात्र आजूबाजूच्या जगाचं प्रतिबिंब मात्र दोन्हीकडे स्पष्ट दिसून येणारं आहे.
या दोन्हीखेरीज आणखी एक गोष्ट दोन्हीकडे सारखी आहे, जी मात्र कौतुक करण्यासारखी नाही. दोन्ही चित्रपट हे मूळ कल्पनेच्या उत्तम असण्यावर समाधान मानणारे आहेत. एकदा का ती सुचली, की त्यापुढे ती फुलविण्यासाठी जे कष्ट घ्यायला लागतात, ते घेण्याची तयारी या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळत नाही. साहजिकच दोन्ही चित्रपट हे उत्तरार्धात आपला जोश गमवायला लागतात. त्यांच्यात तोच तोचपणा यायला लागतो. आणि अखेर दोन्ही चित्रपट प्रेक्षकांची तडजोड केल्यासारखे जुजबी पळवाटेवर संपतात. कल्पनेला ज्या प्रकारच्या बोच-या विनोदी तरीही विदारक शेवटाची अपेक्षा आहे, तो दोन्हीकडे सापडलेला दिसत नाही. प्रेक्षक त्याकडे दुर्लक्ष करतो, तो पहिला दोन तृतियांश चित्रपट आवडल्याने. मी देखील हेच केलं.
तेरे बिन लादेनपेक्षाही फस गये रे ओबामा प्रेक्षकांना अधिक जवळचा वाटतो कारण त्याच्याशी संबंधित संदर्भ, हा त्यांना त्यांच्या मर्यादित परिघातही सतावणारा आहे. `रिसेशन` हा तो संदर्भ. आधी त्याचा अमेरिकेला बसलेला धक्का, अन् त्याचे जगभर उमटलेले पडसाद ही `ओबामा`ची पार्श्वभूमी आहे. ही पार्श्वभूमी नसती, तरीही ओबामाचं कथानक जसंच्या तसं घडविता आलं असतं. मात्र तो मग जितका ताजा वाटतो तितका वाटला नसता आणि शेवट गुंडाळणं आपण चालवूनही घेतलं नसतं.
या चित्रपटाच्या रचनेचा आपल्या प्रेक्षकाच्या दृष्टिकोनातून एक प्रॉब्लेम म्हणजे त्याला नेमका प्रोटॅगनिस्ट, नेमका नायक नाही. त्यातल्यात्यात ओम मामा (रजत कपूर) ही भूमिकाच त्यामानाने मोठी, केंद्रस्थानी असलेली आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोन अचूक पकडणारी आहे. मात्र ती पुरेशी वजनदार नाही. ती खूपशी पॅसिव्ह आहे. आणि तिच्या चातुर्यालाही फार मर्यादा आहेत. तिचं जगणं- वाचणं हे तिच्या हुशारीपेक्षा इतरांच्या बावळटपणावर, इतरांच्या प्रामाणिकपणावर आणि पटकथाकाराच्या मर्जीवर अवलंबून आहे. चित्रपट पाहताना आपण `सस्पेन्शन ऑफ डिसबिलिफ ` हे गृहीत धरतोच. मात्र इथे आपल्या कल्पनाशक्तीला थोडा अधिकच ताण द्यावा लागतो.
इथला ओम मामा हा एक एनआरआय `बिझनेसमन`  आहे, मात्र सध्या अमेरिकेतल्या रिसेशनमुळे त्याच्या बिझनेसचं वाटोळं झालंय. ओमला एक महिन्यांच्या आत एक लाख डॉलर उभे करायचे आहेत. युपीमधल्या एका गावातील आपली हवेली विकून पैसे उभे कऱण्यासाठी ओम भारतात परततो. मात्र भाईसाब (संजय मिश्रा) त्याचं अपहरण करतो. ओमकड़े पैसे नसल्याचं उघड होईपर्यंत किडनॅपिंग रॅकेटमधल्या मोठ्या माशांची नजर त्यांच्याकडे वळलेली असते. ओम या विचित्र परिस्थितीचा फायदा घ्यायचं ठरवितो, आणि भाईसाबला विश्वासात घेतो. जिवावरच्या जोखमीतून जाऊनही आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं त्याने ठरविलेलं असतं.
एकदा का चित्रपटाचा पॅटर्न ठरला की ओबामात फार काही वेगळं घडत नाही. अपहरणकर्त्यांचे टप्पे अन् ओमच्या क्लृप्तीची पुनरावृत्ती असं लॉजिक ठरून जातं. तरीही हा चित्रपट आपण पाहत राहतो त्याचं प्रमुख कारण म्हणजे इथल्या व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारी फारच चांगली कास्ट. पटकथेच्या तपशीलावर इथे फार काम झालं नसलं तरी व्यक्तिचित्रपणाचा विचार खूप खोलवर जाऊन येथे करण्यात आला आहे. ब-याच हिंदी चित्रपटात विनोद हे कथानकाशी संबंधित नसलेले अन् केवळ शाब्दिक कोट्यांप्रमाणे असतात. (पहा- रोहीत शेट्टीचा कोणताही चित्रपट) इथले विनोद हे काहीवेळा प्रासंगिक पण बहुतेकवेळा व्यक्तिरेखांशी संबंधित आहेत. प्रत्यक्षात संवादात विनोद करण्याचा प्रयत्न नसूनही व्यक्तिरेखांची पार्श्वभूमी इथे विनोद तयार करते. भाईसाबच्या व्यक्तिरेखेचा भाबडेपणा, मुन्नी (नेहा धुपिया)चा फेमिनीझम, अन्नी (मनू रिशी) ची सचोटी या सगळ्याचा या विनोदाला फायदा होतो. त्याबरोबरच आजच्या वातावरणाशी संबंधित असलेल्या आर्थिक परिस्थिती सूचित करणा-या जागा ओबामाच्या भाषणाचा (येस, वुई कॅन) वेळोवेळी येणारा संबंध अशा गोष्टी पाचकळपणा न करताही उपहास आणि विडंबनाला कथेत शिरकाव करू देतात इथे दिग्दर्शक रजत कपूर नसला, तरी त्याच्या कंपूने `रघू रोमिओ`पासून जो लो बजेट, प्रासंगिक विनोदावर भर असणारा, कथाप्रधान चित्रप्रकार आणला, त्यातलाच `फस गये रे ओबामा` हा पुढला प्रयत्न म्हणता येईल.
ओबामाला नायक नसल्याचं मी मघा म्हणालो. तसाच त्याला खलनायकही नाही. खलनायकीच्या थो़ड्या फार जवळ जाणारं पात्र म्हणजे अमोल गुप्तेने साकारलेला, अपहरणाचा व्यवसाय करणारा मंत्री धनंजय सिंग. गंमत म्हणजे यातली गुन्हेगारीलाच व्यवसाय मानणारी बरीचशी इतर पात्र ही भाबडी अन इमानदार आहेत. केवळ राजकारण्याचं पात्र हे चोरांचे
`उसूल` देखील न मानणारं आहे. चित्रपट ज्या प्रकारची तथाकथित श्रेष्ठांच्या विरोधातील भूमिका घेऊन कनिष्ठांना माफ करण्याचं धोरण दाखवितो (उदा यातील प्रत्यक्ष गुंडगिरी कऱणारी पात्र भारतात असली, तरी चित्रपट अधिक शक्तिशाली अमेरिकन अर्थकारणाला दोष देतो.) त्याच्याशी हे सुसंगतच आहे.
विनोदाच्या नावाखाली बॉलीवूडमध्ये जे काही चालतं, ते खरं तर हसवण्यापेक्षा राग आणण्यासारखं अधिक आहे. नीरज व्होरा, रोहीत शेट्टी, अनीस बाझमी यासारख्या दिग्दर्शकांचे चित्रपट हे मोठ्या स्टार्सवर भरवसा ठेवणारे, पण दर्जाची बिकट अवस्था असणारे, साधारण आठ दहा वर्षाच्या मुलांना आवडतील, याप्रकारचे असतात. आपण मुळात त्यांच्याकडून अपेक्षाच ठेवत नसल्याने या चित्रपटांचं, दिग्दर्शकांचं फावतं. मात्र तेरे बिन लादेन, फस गये रे ओबामासारख्या चित्रपटांचं धोरण बरोबर उलट आहे. अपरिचित, परंतु अभिनयात बाजी मारणारा नटसंच, विनोदासाठी आशयात तडजो़ड न करण्याचा प्रयत्न आणि बजेटचं मुळात अवडंबर नसल्याने दिग्दर्शकाची बाजू पूर्णपणे पोहोचविण्याची मुभा असलेले हे चित्रपट आता अधिक प्रमाणात येण्याची गरज आहे. मल्टिप्लेक्स संस्कृती आणि कॉर्पोरेट कल्चरने उत्तेजन मिळालेले हे चित्रपट आपल्या पारंपरिक विनोदी सिनेमाला अधिक अर्थपूर्ण आकार देतील अशी शक्यता आज तरी दिसते.
-गणेश मतकरी. 

5 comments:

हेरंब December 27, 2010 at 9:50 AM  

बरंच ऐकलं आहे याबद्दल.. नक्की बघणार आता..

>> ब-याच हिंदी चित्रपटात विनोद हे कथानकाशी संबंधित नसलेले अन् केवळ शाब्दिक कोट्यांप्रमाणे असतात. (पहा- रोहीत शेट्टीचा कोणताही चित्रपट)

अगदी अगदी सहमत.. त्याची गोलमाल सिरीज एवढी का चालली आणि लोकांना एवढी का आवडली हा तर माझ्यासाठी यक्षप्रश्न आहे !!

Suhas Diwakar Zele December 28, 2010 at 4:34 AM  

मी मुद्दाम थियेटरमध्ये बघितला होता. तुम्ही लिहलेला शब्द न शब्द पटला ..

बघताना खूप मज्जा आली होती. अश्या सिनेमातूनच खूप चांगला अभिनय बघायला मिळतो. फस गये, तेरे बिन लादेन, दो दूनी चार सगळे आवडले :)

Sachin Powar December 28, 2010 at 9:44 PM  

थिएटर मधून लवकरच उतरवल्यामुळे बघायचा राहिलाय. सीडी आली की बघेन लगेच.

>>>>रोहीत शेट्टी, अनीस बाझमी यासारख्या दिग्दर्शकांचे चित्रपट हे ... साधारण आठ दहा वर्षाच्या मुलांना आवडतील, याप्रकारचे असतात.
मला तरी ह्यांचे चित्रपट कुटुंबासोबत बघण्याच्या लायकीचे कधीच वाटले नाहीत, पण आपल्याकडील families मस्त enjoy करत असतात.
लोक का बघतात असले चित्रपट कळत नाही.
त्याउलट अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही.

attarian.01 December 30, 2010 at 4:58 AM  

kharch lvakar utravlyamule baghaych rahila .TV var nakki baghen, mulani baghu dial tar . hermbhshi me 100% sahamat ahe . hi golamal ka chalala kalat nahee . muletar cabelvar lagel tevha bagatat. aapli test kevan badalnar . amhee bagitletar cheshta kartat.any way Ganesh thanks

ganesh January 1, 2011 at 8:36 AM  

Thanks all. Aplyakade wait comedies chaltat yacha pramukh karan apan films kade serious art form mhanun Pahat nahi.casual entertainment mhanun pahato.in the long run it's not only damaging the industry but our capacity of appreciation.we deserve the films we get.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP