द पॅशन ऑफ जोन ऑफ आर्क (१९२८)
>> Sunday, May 1, 2011
काही माणसांचं आयुष्य चित्रपटातल्यासारखं असतं, पण काही चित्रपटांचं आयुष्य माणसांसारखं असू शकतं का? तेदेखील ते ज्या माणसांच्या आयुष्यावर बनले आहेत त्यांच्या आयुष्यासारखं? कार्ल थिओडोर ड्रेयर या डेनिश दिग्दर्शकाच्या `द पॅशन ऑफ जोन ऑफ आर्क` (१९२८) या मूकपटाचं उदाहरण घ्यायचं, तर असं असू शकतं हे मान्य करावंच लागेल.
`जोन ऑफ आर्क` हे नाव आपल्यातल्या अनेकांनी ऐकलं असेल, पण सर्वांनाच तिच्याबद्दल फार माहिती असेलच असं नाही. १४१२मध्ये फ्रान्समधल्या एका छोट्या खेड्यात जन्मलेल्या जोनला परमेश्वरी साक्षात्कार झाल्याचं मानलं जातं, आणि देवाच्या थेट आज्ञेवरून तिने `हण्ड्रेड इयर्स वॉर` नावाने ओळखल्या जाणा-या युद्धात फ्रेन्च आर्मीचं नेतृत्त्व केलं. अनेक चढायांवर तिने इंग्रज सैन्याला मात दिली. मात्र पुढे इंग्रजांच्या ताब्यात सापडल्यावर धर्मगुरूंनी तिच्यावर दावा लावला.तिची साक्षात्काराची हकीकत खोटी ठरविण्यासाठी या तथाकथित न्यायालयाने जंगजंग पछाडले. शारीरिक छळ करून शेवटी १४३१ मधे, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी तिला जाळून मारण्यात आलं. मृत्युनंतर पंचवीसेक वर्षांनी पोपने तिच्या खटल्याचा वृत्तान्त तपासला आणि तिला निर्दोष घोषित केलं. जोन ऑफ आर्क फ्रान्सच्या पेट्रन सेंट्समध्ये आहे आणि त्यांच्या राष्ट्रीय नायिकांमधली एक.
धार्मिक न्यायालयाचे आक्षेप, शारीरिक छळ, जाळून मारणं अन् मृत्यूनंतर येणारं अमरत्व हे जोन ऑफ आर्कच्या आयुष्यातले सर्व महत्त्वाचे टप्पे, ड्रेयरच्या चित्रपटाच्या नशिबातही आले. चर्चच्या विरोधातल्या आशयाने त्याला निर्मितीनंतर लगेचंच मोठ्या प्रमाणात विरोध झाला आणि त्याची जाहीर हेटाळणी केली गेली. चित्रपटातही वेगवेगळ्या संस्कृतीरक्षकांकडून काटछाट केली गेली आणि दृश्यभाषेतल्या बदलापासून आशयाला पसरट करण्यापर्यंत सर्व प्रकार झाले. शेवटी काही महिन्यांतच चित्रपटाची मूळ निगेटिव्ह आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आणि ड्रेयर हतबुद्ध झाला. आपल्या कलाकृतीचा नाश अमान्य करीत त्याने न वापरलेले टेक्स शोधले आणि दुसरी, जवळजवळ मुळाबरहुकूम असणारी आवृत्ती तयार केली. मात्र या आवृत्तीच्या नशिबीही तेच आलं. दुसरी आग या आवृत्तीलाही गिळंकृत करून बसली. काट छाट झालेल्या, बदललेल्या विद्रूप आवृत्त्या, याच शिल्लक उरल्या आणि दिग्दर्शकाबरोबरच चित्रपट रसिकांवरही हळहळण्याची पाळी आली.
या जोन ऑफ आर्कचा उद्धार झाला, तो विनाशानंतर पन्नास एक वर्षांनी. १९८१मध्ये. डेन्मार्कमधल्या एका मनोरुग्णालयाच्या स्टोअर रूममध्ये अचानकपणे चित्रपटाची उत्तम प्रिण्ट सापडली. ती तिथे कशी आली याचे अंदाज व्यक्त झाले, परंतु `चमत्कार` एवढं एकच स्पष्टीकरण इथे लागू पडण्यासारखं आहे. या आवृत्तीला तपासून, थोडी डागडूजी करून, संगीताची जोड देऊन १९८५ मधे या चित्रपटाला पुनरुज्जीवन मिळालं, आणि आज जगातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं.
चित्रपटाच्या भवितव्याची ही कथा खास असली, तरी केवळ ही कथा चित्रपटाची थोरवी पसरायला जबाबदार आहे असं नाही. द पॅशन ऑफ जोन ऑफ आर्कची लोकप्रियता ही पूर्णतः त्याच्या गुणवत्तेवर आधारलेली आहे. ड्रेयरचा चित्रपट हा आपण या प्रकारच्या चित्रपटापासून जी अपेक्षा करतो त्यापेक्षा अत्यंत वेगळा आणि अनपेक्षित आहे. पंधराव्या शतकात घडणारा चित्रपट, म्हणजे आपली अपेक्षा असते की तो काळ उभा करण्याचा प्रयत्न करेल. नेपथ्य, वेषभूषा, वातावरण निर्मिती याची मदत घेईल. प्रत्यक्षात तो या बाबींकडे दुर्लक्ष करतो, अन् मदत घेतो ती अप्रत्यक्ष. ड्रेयरने चित्रपटासाठी एक छानसा किल्ल्याचा अन् आजूबाजूच्या घरांचा सेट उभारला, मात्र तो चित्रपटात दिसावा असा हेतू त्यामागे नव्हता, तर या वातावरणाचा परिणाम अभिनेत्यांच्या कामावर व्हावा, त्यांना भूमिकेशी एकरूप होण्यासाठी या नेपथ्याची मदत व्हावी असं त्याला वाटत होतं.
या दिग्दर्शकाला त्याच्या निर्मात्यांनी एक छानशी पटकथा बनवून दिली होती. मात्र ती देखील वापरण्याचा ड्रेयरचा इरादा नव्हता. जोन ऑफ आर्कच्या न्यायालयीन चौकशीची कागदपत्र प्रत्यक्षात उपलब्ध आहेत. ही कागदपत्रं, यातला युक्तीवादच त्याने संहितेच्या ऐवजी वापरण्याचं ठरवलं. आता मूकपटांच्या काळात कोर्टरूम ड्रामा करायला घेणं, आणि तोदेखील जवळजवळ पूर्णपणे संवादातल्या नाट्यावर आधारणं हे आश्चर्यकारक होतं. कारण पात्रं संवादच बोलू शकत नसल्याने या काळाचा भर प्रत्यक्ष अॅक्शनवर असे. मात्र ड्रेयरने न्यायालय, टॉर्चर चेम्बर आणि वधस्तंभावरच सर्व नाट्य घडवायचं ठरवल्याने अॅक्शन येणार ती कशी आणि कुठे ?
`द पॅशन ऑफ जोन ऑफ आर्क` ची पूर्ण संकल्पना ही केवळ युक्तीवादाला पुढे आणून इतर सर्व गोष्टी मागे ठेवणारी आहे. त्यासाठी ड्रेयर जवळजवळ पूर्णपणे वापर करतो, तो क्लोज अप्सचा. त्यासाठी तो चित्रभाषेचे मूलभूत नियमदेखील बाजूला ठेवतो आणि स्थळ, नेपथ्य, पात्रांच्या हालचाली स्पष्ट करणारे एस्टॅब्लिशिंग शॉट्ससुद्धा घेत नाही. त्याला दिसतात ते चेहरे. हे चेहरे चित्रित करतानाही तो पात्रांना एकमेकांचे संदर्भ देऊ इच्छित नाही. उदाहरणार्थ पहिल्या न्यायालयीन चौकशीच्या प्रसंगात न्यायाधीश मंडळी आणि जोन ऑफ आर्क कायम स्वतंत्रपणे दिसतात. न्यायाधीशांना दोन तीन जणांच्या गटात फ्रेम केलं जातं, मात्र या दोन विरूद्ध बाजूंना एकाच चौकटीत घेतलं जात नाही. चौकटीच्या रचनेतही पात्रांना त्या विशिष्ट कॉम्पोझिशनच्या सोयीने फिरवलं जातं. चित्रभाषेच्या संकेतानुसार प्रसंगातली पात्रांची पूर्ण हालचाल लक्षात घेणं दिग्दर्शकाला आवश्यक वाटत नाही. चेह-यांपलीकडे चित्रचौकटींना काही अर्थच नसल्याने नेपथ्यावर केलेली मेहनत ही अदृश्य राहते हे देखील आलंच.
मात्र ही योजना एक स्ट्रॅटेजी म्हणून मान्य करणं शक्य होतं, ती या क्लोज अप्सच्या अतिशय प्रभावी वापराने. रेने जेआन फालकोनाती या अभिनेत्रीने पॅशनमधली प्रमुख भूमिका करण्याआधी रंगभूमीवर कामं केली होती, पण चित्रपट मात्र एकच केला होता. पॅशननंतर तिने एकाही चित्रपटात भूमिका केली नाही. मात्र या चित्रपटातल्या भूमिकेने तिचं नाव चित्रपटांच्या इतिहासात अजरामर होऊन गेलंय. तिच्यावर सतत रोखलेल्या कॅमेराला अन् ड्रेयरसारख्या अभिनेत्यांचा अंत पाहणा-या दिग्दर्शकाला तिने दिलेलं तोंड (no pun intended) हे पाहत राहण्यासारखं आहे.
प्रत्यक्ष इतिहासातल्या नोंदीप्रमाणे जोन ऑफ आर्कची उलटतपासणी, तिने साक्षात्काराला नकार द्यावा यासाठी चालविलेली तिची छळणूक अनेक दिवस चालली होती.
ड्रेयरने मात्र हे एकूण नाट्य, सलग घडणा-या पाच तुकड्यात विभागलं आहे.पहिल्या चौकशीत जोनचं मन वळविण्याचा होणारा प्रयत्न, टॉर्चर चेम्बर, वधस्तंभाजवळ जोनने आपलं मत बदलून मृत्यूऐवजी जन्मठेप स्वीकारणं, कोठडीत तिला आपल्या वागण्यातला दुटप्पीपणा लक्षात येणं, अन् पुढे वधस्तंभावरला शेवट, असे हे पाच तुकडे. संवादाच्या गरजेमधून टायटलकार्डस वापरणारे, पण त्यामुळे आस्वादात किंचितही फरक न पडू देणारे.
पॅशनची रचना, त्याचं संकेत न जुमानणं, अॅक्शनऐवजी क्लोजअप्सना पुढे करणं हे सारं मूकपटापेक्षा, बोलपटाच्या संकल्पनेकडे झुकत जाणारं आहे. अर्थात, यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
अजून काही वर्ष मूकपटांची निर्मिती सुरू राहिली, तरी चित्रपटाने १९२७ च्या जाझ सिंगरपासूनच बोलायला सुरूवात केली होती. मूक-बोलपटाच्या सांध्यावरल्या काही मोजक्या उत्तम चित्रपटांत द पॅशन ऑफ जोन ऑफ आर्कचं नाव कायमचं घेतलं जाईल.
-गणेश मतकरी.

1 comments:
APRATIM TUMACHA LEKHA ANI DILELEI KAHANI PAN ...CHHAN WATALA LEKHA VACHUN ...
Post a Comment