वुडी अॅलन आणि मॅनहॅटन
>> Sunday, May 15, 2011
२००२ साली कान चित्रपट महोत्सवात वुडी अॅलनला लाईफटाइम अॅचिव्हमेण्ट पुरस्कार देण्यात आला. गेली चाळीसेक वर्ष चित्रपटक्षेत्रात आपला ठसा उमटवून राहिलेल्या अॅलनच्या नावावर आज चाळीसेक चित्रपट आहेत. त्यातल्या दिग्दर्शनाबरोबर अभिनयासाठीही त्याचं अमाप कौतुक झालेलं आहे. त्याचं नाव ऑस्कर नामांकनात कैकदा आलेलं आहे, तर त्यात तीनदा पारितोषिक प्राप्तही ठरलेलं आहे. त्याच्या सहका-यांना त्याच्या चित्रपटांनी ऑस्कर मिळवून दिली आहेत. त्याखेरीज ब्रिटिश अॅकेडमी, न्यूयॉर्क आणि शिकागो फिल्म क्रिटिक्स सर्कल, रायटर्स गिल्ड ऑफ अमेरिका अशा अनेक नावाजलेल्या चित्रपटाशी संबंधित संस्थांनी त्याचा अनेकवार गौरव केला आहे. चित्रपट लेखन दिग्दर्शनाबरोबरच त्याने अनेक नाटकं आणि कथाही लिहिल्या आहेत.
असं अतिशय चतुरस्र व्यक्तिमत्त्व असून, हॉलीवूडमध्ये प्रामुख्याने विनोदी चित्रपटांवर काम करून, स्वतः उत्तम विनोदी अभिनेता, विनोदी लेखक आणि स्टॅण्डअप कॉमेडीअन असूनही वुडी अॅलनच्या कामाला मुख्य धारेतलं, किंवा व्यावसायिक काम म्हणता येणार नाही. अॅलनलचे चित्रपट म्हणजे मेनस्ट्रीम हॉलीवूड नव्हे. त्याने आपल्या कलाविष्कारासाठी चित्रसृष्टीचा एक कोपरा शोधून त्याला आपलंसं केलं आहे. काही विशिष्ट विषय, चित्रपटांचे आराखडे, निश्चित विचारधारा आणि प्रामुख्याने न्यूयॉर्क शहरावरचं प्रेम यांनी अॅलनचे चित्रपट भारलेले दिसतात. त्यामुळे ते प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाली करताना दिसत असले तरी उत्तम चित्रपटांच्या चाहत्यांसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून आहेत.
या दिग्दर्शकाचा जन्म १९३५ सालातला. आणि त्याचं मूळचं नाव अॅलन स्टुअर्ट कोनिम्जबर्ग. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने ते बदलून वुडी अॅलन केलं. अॅलनची सुरुवात झाली ती विनोदापासून. न्यूयॉर्कमधल्या वृत्तपत्रांच्या सदर लेखकांना विनोद पुरविण्यापासून त्याने सुरूवात केली. पुढे काही वर्षांनी टेलिव्हिजनसाठी लेखनाचं काम करण्यात त्याने काही वर्ष काढली आणि १९६० ते ६८ स्टॅण्ड अप कॉमेडीअन म्हणून लोकप्रियता मिळविली.
वुडी अॅलनचा हा लेखनातला अनुभव आणि स्टॅण्ड अप कॉमे़डीअन म्हणून मिळविलेलं यश हे त्याच्या चित्रपटांमधल्या संवादी विनोदाचं मूळ आहे. बोलण्यातून येणारा विनोद हा त्याला अधिक उच्च दर्जाचा वाटतो आणि संभाषणविरहीत विनोद हा त्यामानाने कनिष्ठ. इन्गमार बर्गमनच्या चित्रपटांचा मोठा चाहता असलेल्या अॅलनच्या चित्रपटांतून काही वेळा बर्गमनच्या चित्रपटांतून येणारे विचारही डोकावताना दिसतात. मृत्यूचं सावट, धर्म आणि मानवतावाद. नात्यांमधला फोलपणा या बर्गमनी कल्पनांच्या जोडीला वुडी अॅलन आधुनिक समाजाने आणलेलं तथाकथित स्वातंत्र्य मुक्तपणाच्या नावाखाली आलेला स्वैराचार, मानसिक स्थैर्य आणि असुरक्षितता, न्यूनगंड यांना आणून उभं करतो आणि आपल्या चित्रपटाचं स्वतंत्र रसायन तयार करतो. वुडी अॅलनचे चित्रपट हे त्यामुळेच सांकेतिक विनोदी चित्रपटांप्रमाणे केवळ विनोदी प्रसंगमालिका तयार करून घटकाभर रंजन करीत नाहीत, तर अधिक गंभीर वैचारिक प्रश्नांमध्ये गुंतण्याचं एक साधन म्हणून विनोदाला वापरतात. वुडी अॅलनचे चित्रपट एका परीने त्याने केलेल्या स्टॅण्ड अप कॉमेडीचं एक्स्टेन्शन म्हणता येतील. कारण यातल्या बहुतेक चित्रपटात त्याने आपली स्वतःची अशी एक व्यक्तिरेखा तयार केली जिचं मूळ त्याच्या स्टॅण्ड अप कॉमेडीत सापडतं. त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटांमधून ही व्यक्तिरेखा अधिकाधिक स्पष्ट होत गेली. तरीही आशयदृष्ट्य टेक द मनी अॅण्ड रन (१९६९), एव्हरीथिंग यू ऑल्वेज वॉन्टेड टू नो अबाउट सेक्स (बट वेअर आफ्रेड टू आस्क )(१९७२ किंवा लव्ह अॅण्ड डेथ (१९७५) हे चित्रपट अधिकपणे विनोदी राहिले. १९७७चा अॅनी हॉल आणि १९७९चा मॅनहटन यामधे मात्र वुडी अॅलनचा विनोद आणि आधुनिक समाजातल्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधाचा अभ्यास यांनी एक वेगळं परिणाम धारण केलं.
मॅ्नहॅटन हा चित्रपट ब्लॅक अॅण्ड व्हाईट आहे. न्यूयॉर्क शहरातलं वातावरण अचूक पकडणारं (गॉर्डन विलीसचं) छायाचित्रण हा मॅनहॅटनचा एक विशेष म्हणता येईल. इथला अॅलन आहे आयझॅक हा विनोदी लेखक आणि स्टॅण्ड अप क़ॉमेडी्न. वुडी अॅलनने आपल्या आधीच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर पुरती बिंबवलेलीच ही व्यक्तिरेखा आहे. लाजाळू, आपल्या कामात असमाधानी, आपल्या प्रेमसंबंधाबाबत आणि शरीरसंबंधाबाबत कायम धास्तावलेला, आपल्या मानसिक आणि आर्थिक स्थितीबाबत कायम असुरक्षित असलेला आयझॅक हा मॅनहॅटनचा केंद्रूबिदू आहे.आयझॅकची दोन लग्न मोडलेली आहेत. दुस-या बायकोने (मेरील स्ट्रिप) तर त्याला एका स्त्रीसाठी सोडलेलं आहे. आता त्याची ट्रेसी या सतरा वर्षाच्या शाळकरी मुलीबरोबर अफेअर आहे. मात्र तो ती पुरेशा गंभीरपणे घेताना दिसत नाही. ट्रेसीबरोबरचे संबंध मोडण्याचाच तो सतत प्रयत्न करताना दिसतो. हे केल्याचा त्याला पश्चाताप होतो, पण फार उशीरा. आयझॅक बरोबर अॅलनने निवडलेले इतर शहरी नमुने, हे असेच नव्या विचारांच्या नावाखाली स्वास्थ हरवून बसलेल्या आणि प्रेमाच्या कल्पनेलाच भ्रष्ट करणा-या समाजाचे प्रातिनिधिक घटक आहेत. यातलं कोणीही सुखी नाही. पण सुखाची कल्पना हेच त्यांचं मृगजळ आहे, त्यांना कायम पळवत ठेवणारं येल (मायकेल मर्फी) हा आयझॅकचा मित्र. तो देखील सुखी वैवाहिक जीवनाचा बळी आहे. आनंदाचा संसार सोडून त्याला मेरी (डाएन किटन) बरोबर राहायचंय. मेरीचं येलवर प्रेम आहे, किंवा तशी तिची कल्पना आहे, पण येलचा संसार मोडणं तिला पटत नाही. मग ती येलचा संबंध सोडते आणि आयझॅककडे येते. आयझॅकही मग ट्रेसीला सो़डून मेरीच्या मागे येतो. सुखाचा शोध, व्यर्थ, असामाधान आणि स्वार्थ यांना आपण आपलंच दुःख तयार करतो हा मॅनहॅटनमधला महत्त्वाचा भाग आहे.
वुडी अॅलनच्या शैलीचंही मॅनहॅटन हे एक ठळक उदाहरण म्हणता येईल. कथेवरून हे स्पष्टंच होतंय की ती फार विनोदी नाही. केवळ बदलत्या नात्यांचा कॅलिडोस्कोप असल्यासारखी तिची रचना आहे. या रचनेत संवादाला येणारं महत्त्व हे अॅलनच्या पथ्यावर पडणारं आहे. इथे विनोदाचा वापर हा प्रासंगिक अजिबात नाही. तो केवळ बोलण्यात दिसतो. पात्रांच्या आयुष्यातल्या विसंगती तो अधोरेखित करतो.
मॅनहॅटन दृश्यरूपात आपल्या नावाला जागतो. आपल्या आवडत्या शहराच्या सर्व बाजू प्रेक्षकांपुढे आणण्याचा अॅलनने प्रयत्न केला आहे. सर्व महत्त्वाची स्थळं, वेगवेगळे प्रहर, तिथलं बेभरवशाचं हवामान हे सगळं यातल्या व्यक्तिरेखांच्या विश्वाचा एक भाग बनून येतं. त्याचं काल्पनिक जग तपशिलांमुळे वास्तवात आणलं जातं.
व्यक्तिरेखा आणि त्यांची वजनं पाहिली तर येल आणि मेरी ही दोघं सर्वात महत्त्वाची आहेत, कारण येल मेरीचं प्रकरण, ते तुटणं आणि पुन्हा जोडली जाणं हे प्रसंग कथानकातले सर्वात महत्त्वाचे आहेत. मात्र वुडी अॅलन नायक ठरवतो, ते आयझॅकच्या व्यक्तिरेखेला आणि तिच्या घटस्फोटीत पत्नी, शाळकरी ट्रेसी आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची मेरी या तीन स्त्रीयांबरोबरच्या संबंधाला. तुलनेने दुय्यम महत्त्वाच्या पात्राला महत्त्व आणून त्याच्या दृष्टिकोनातून चित्रपट घडवणं, हे देखील अॅलनला कायम मानवतं. मॅनहॅटन त्याचंच उदाहरण म्हणता येईल. मॅनहॅटननंतरही अॅलनने अनेक चित्रपट केले. त्यातले हॅना अॅण्ड हर सिस्टर्स (१८६६), क्राईम्स अॅण्ड मिसडिमिनर्स (१९८९), बुलेट्स ओव्हर ब्रॉ़डवे (१९९५) आणि डिकन्स्ट्रक्टींग हॅरी (१९९७) हे सर्वाधिक महत्त्वाचे मानता येतील. यांच्या आगेमागे येणा-या चित्रपटांमधून वुडी अॅलनचा फॉर्म जात येत होता, त्याचा एक वेगळा चाहतावर्ग जरूर होत आहे. पण वर उल्लेखलेल्या चित्रपटांचा जोर इतरांमध्ये नव्हता, हेही खरं.
नंतरच्या कालावधीत वयपरत्वे सर्वच चित्रपटात नायकाचं काम करणं त्याला शक्य होईना. मग एनिथिंग एल्स (२००३) सारख्या चित्रपटांत त्याने आपल्या दृष्टिकोनाला वेगळा चेहरा देण्याचा ब-याच प्रमाणात यशस्वी प्रयत्न केला, बाकी पूर्ण फ़ॉरमॅट तोच ठेवून. एनिथिंग एल्समधे त्याने स्वतःला साजेशी एक भूमिकाही केली. हा चित्रपट चाहत्यांना आवडला, पण आता वुडी अॅलन थोडा कालबाह्य वाटायला लागला होता. हा अजून आपल्या ठराविक चौकटीतून जराही बाहेर येत नाही असं वाटायला लागलं. २००५ मधे मात्र त्याने एक फारंच वेगळा प्रयत्न करून ही चौकट तोडून टाकली आणि प्रेक्षकांना मॅचपॉइन्टच्या निमित्ताने एक वेगळा दिग्दर्शक वुडी अॅलन दिसला. मॅच पॉइन्ट त्याच्या अतिशय महत्त्वाच्या चित्रपटातला मानावा लागेल. इथे या दिग्दर्शकाच्या जुन्या चित्रपटांतल्या अनेक गोष्टी पूर्णपणे गायब झाल्या. विनोद नाही, अॅलनची टिपिकल व्यक्तिरेखा तर नाहीच. पण त्याची भूमिकाही नाही, कथेत नातेसंबंधांना वाव असला तरी तिचा आकार हा रहस्यपटांचा, कथानक न्यूय़ॉर्क ऐवजी लंडनमध्ये घडणारं. उच्चभ्रू समाजाची किडलेली मूल्य आणि महत्त्वाकांक्षेचा बळी असणा-या नायकाचा हा चित्रपट अतिशय परिणामकारक आणि आजच्या काळाशी घट्ट नातं सांगणारा आहे. तो पाहणारा कुणीही माणूस अॅलनला कालबाह्य म्हणू धजणार नाही. दुर्दैवाने अॅलनचा पुढला चित्रपट स्कुप हा पुन्हा म्हणावा तितका जमलेला नाही. मॅच पॉइन्टने नव्या पिढीवर केलेली जादू टिकवायची तर अॅलनला नव्या चित्रपटासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल, हे उघड आहे.
विनोदासारख्या हलक्या फुलक्या मानल्या जाणा-या साधनांचा तीक्ष्ण आणि अचूक उपयोग करणारा चित्रपट हा क्वचितच पाहायला मिळतो. त्यात तो आशयसंपन्न आणि व्यक्तिप्रधान असणं तर फारच दुर्मिळ. वुडी अॅलनचा चित्रपट त्यामुळेच दुर्लक्षित राहू शकत नाही. जगातल्या उत्तमोत्तम चित्रपटाला एक म्हणून तोही आपल्या आदराला पात्र ठरतो.
- गणेश मतकरी

0 comments:
Post a Comment