`द रूल्स ऑफ द गेम` - फार्सचा आभास !

>> Monday, June 6, 2011

प्रत्येक चित्रपटाला एक कॉन्टेक्स्ट असतो आणि तो कळणं वा न कळणं हे ब-याचदा आपल्याला चित्रपटाचं आकलन होण्या न होण्याशी जोडलेलं असतं. विशिष्ट चित्रपट कोणत्या काळात तयार झाला, तेव्हाचा समाज कोणत्या परिस्थितीत होता, तो ज्या देशात बनला त्या देशात काय वातावरण होतं, चित्रपट जर जुना असेल तर तत्कालीन प्रेक्षकांची त्यावरची प्रतिक्रिया काय होती, या सा-या सा-याला महत्त्व असतं. त्याकडे दुर्लक्ष करून आपण चित्रपट पाहू शकतो, मात्र तो आपल्याला पूर्णपणे समजेल याची खात्री देता येत नाही.
जाँ रेन्वार या सुप्रसिद्ध फ्रेन्च दिग्दर्शकाचा `द रूल्स ऑफ द गेम`(१९३९) हा चित्रपट त्याच्या पार्श्वभूमीची ओळख करून न घेता पाहिला तर एक टिपिकल फार्स वाटतो. दोन-तीन जोड़पी, परम्युटेशन कॉम्बिनेशन्सना मदत होण्यासाठी इतर काही तरूण स्त्री-पुरूष, एका प्रचंड हवेलीत घडणा-या विनोदी घटना, जोडप्यांची आपापसात, अन् इतरांबरोबरची प्रेमप्रकरणं, नोकर मंडळींचे स्वतंत्र गोंधळ असं काहीसं या चित्रपटाचं स्वरूप. मात्र नीट पाहिलं तर कळेल की यातला विनोद तितका भाबडा नाही, पात्रं फार्सच्या टिपिकल नियमांत बसणारी नाहीत, चित्रपटाच्या शेवटी होणा-या एका खुनाला विनोदी प्रहसनात जागा नाही. त्याबरोबरच चित्रपट हा फ्रान्स दुस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना बनवण्यात आला आणि फ्रेन्च उच्च वर्गाने त्याला जोरदार विरोध करून त्यावर बंदी आणायला लावली. हे सगळंच `फार्स`च्या परिचित प्रकृतीशी न जाणारं. चित्रपटाचं वरवरचं रूप हे त्याचं खरं रूप नसण्याकडे सूचित करणारं. दिग्दर्शकाचा हे दाखविण्यात काही वेगळाच हेतू असावा यात संशय उत्पन्न करणारं.

रॉबर्ट(मार्सेल दालिओ) हा उमराव आणि त्याची परदेशी पत्नी क्रिस्टिना (नोरा ग्रेगॉर) हे इथलं प्रमुख जो़डपं. क्रिस्टिनावर आन्द्रे ज्युरो (रोलान्ड टुटे) या साहसी वैमानिकाचा डोळा आहे, मात्र क्रिस्टिनाची या प्रकरणाला फार संमती नाही. रॉबर्टचं जीनविव (मिल पारेल)  बरोबरचं प्रकरण अनेक वर्ष सुरू आहे, बहुधा लग्नाच्याही आधीपासून. मात्र आता त्याला आपलं आपल्याच बायकोवर प्रेम असल्याचा साक्षात्कार झालेला. तो हे प्रकरण बरखास्त करण्याच्या प्रयत्नात. आन्द्रे आणि क्रिस्टिना या दोघांचा एक खास मित्र आहे, ओक्टाव्ह (स्वतः दिग्दर्शक जाँ रेन्वार) एका बाजूने तो आन्द्रेसाठी प्रयत्न सुरू ठेवतो, पण दुस-या बाजूने त्याचं स्वतःचंही क्रिस्टिनावर प्रेम आहे. क्रिस्टिनाची लिजेट म्हणून एक मेड आहे, अन् तिचा नवरा एदुआर्द शुमाशे हा हवेलीवरचा व्यवस्थापक आहे. शुमाशे सोडून जवळजवळ सर्वच पुरूषांवर लिजेटचा डोळा आहे.
ही पात्रं आणि त्यांना एकमेकांत मिसळण्यासाठी तयार होणा-या अडचणी हीच इथली पटकथा. चित्रपटाला हलतं ठेवणारी आणि चटकन ध्यानात न येणा-या एका सूत्राभोवती फिरणारी. हे सूत्र आहे महायुद्धाशी जोडलेलं, म्हटलं तर इतकं जवळून की फ्रान्समधला उच्च वर्ग चित्रपट पडद्यावर आल्याने अस्वस्थ व्हावा, पण म्हटलं तर कथाबाह्य असलेलं तत्कालीन परिस्थिती माहीत नसेल तर लक्षातही न येणारं.
`द रूल्स ऑफ द गेम` चित्रित होताना आणि पडद्यावर येण्याच्या तयारीत असताना जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर होतं. फ्रान्सला युद्धात उतरावं लागेल हे देखील दिसत होतं. मात्र इथेही नाझींच्या तत्त्वज्ञानाबद्दल सहानुभूती असणारा एक वर्ग होता. या वर्गाला खरं तर युद्धाशी देणंघेणं नव्हतं. बहुसंख्य उच्चवर्गीय हे या गटात मोडणारे होते. त्यांना युद्धाचा गंभीरपणा समजलेला नव्हता. त्याउलट आपल्याच विलासी जगात ते रमलेले होते. फ्रेन्च उच्चवर्गीयाचं हे सामाजिक, राजकीय वास्तवाला नाकारणं अन् आपल्याच जुन्यापुराण्या ऐषोरामी सवयींना चिटकून राहणं `द रूल्स ऑफ द गेम`मध्ये दिसून येतं. इथे असणारे `रूल्स` या उमरावांनी, त्यांच्या जीवनशैलीला अनुसरून योजलेले आहेत. या शैलीशी परिचित नसणा-या आन्द्रे परदेशी क्रिस्टिना आणि ऑक्टाव यांना त्या रूल्सप्रमाणे खेळता न येणं हे अपेक्षितच म्हणायला हवं. रेन्वारचा हा चित्रपट आणखी एका कारणासाठी उल्लेखनीय मानला जातो, आणि ते म्हणजे, त्यातला डीप फोकस तंत्राचा वापर. पूर्वी छायाचित्रणात विशिष्ट एरिआ शार्प फोकसमध्ये असे.अन् त्याच्या आजूबाजूचा भाग, पार्श्वभूमी ही दुर्लक्षित राही. डीप फोकसमुळे संपूर्ण डेप्थ ऑफ फिल्ड सारख्याच स्पष्टपणे दिसू लागली. आणि दिग्दर्शकाला आपल्या पात्रांना सर्वत्र फिरवण्याची अधिकाधिक गुंतागुंतीच्या दृश्यरचना साधण्याची मुभा मिळाली. पुढे या तंत्राचा सर्वांना परिचित आणि भव्य वापर ऑर्सन वेल्सने आपल्या १९४१ च्या  `सिटिझन केन`मध्ये केला. असं मानलं जातं की, वेल्सने आपल्या चित्रपटाचा अंतिम आकार ठरवताना रेन्वारच्या या तंत्राचा `द रूल्स ऑफ द गेम` पाहून अभ्यास केला होता.
इथे रेन्वारने या तंत्राचा वापर फार काळजीपूर्वक केलेला पाहायला मिळतो. इथलं कथानक गुंतागुंतीचं आहे. दर प्रसंगात एक मुख्य कथानक तर आजूबाजूला उपकथानकांचे धागे अशी योजना आहे. अशा वेळी आपल्या दृश्य चौकटीत दिग्दर्शक पात्रांचे विविध समूह योजतो. आपल्या लांबवर पसरलेल्या फिल्डमध्ये ज्याच्या त्याच्या महत्त्वानुसार  ज्याच्या त्याच्या महत्त्वानुसार त्या त्यू समूहाला स्थान मिळतं अन् गुंतागुंतीची परंतु स्पष्ट कळण्याजोगी दृश्य चौकट समोर येते.  अनेक प्रसंगात या प्रकारची उदाहरणं पाहायला मिळतील. मात्र पार्टीदम्यान सादर केल्या जाणा-या नाट्यप्रवेशांच्या वेळी दिग्दर्शकाचं या पद्धतीवरलं नियंत्रण दिसून येतं. केवळ डीप फोकसच नव्हे, तर इतरही विविध गोष्टींसाठी हे प्रवेश उल्लेखनीय आहेत. छायाप्रकाशाचा वापर, क्षणाक्षणाला अँगल बदलणारा स्वैर कॅमेरा, विविध ठिकाणी समांतर चालणा-या अ‍ॅक्शनमध्येही प्रेक्षकांना गोंधळात न पाडता निवेदनात सहभागी करून घेण्याची किमया, अशा गोष्टी दिग्दर्शकाने आपल्या कामाचा किती बारकाईने विचार केला आहे, याच्या निदर्शक आहेत.
फ्रेन्च प्रेक्षकांनी आपला मास्टरपीस नाकारल्याने रेन्वार चिडला, यात आश्चर्य नाही. मात्र सुदैवाने महायुद्धानंतर जगभरच्या लोकांनी चित्रपट पाहिला आणि त्याचं स्वागतच केलं. आजही अनेक मान्यवरांच्या `टॉप टेन` यादीत  `रूल्स`चा उल्लेख असतो. बहुदा दुसरा, ऑर्सन वेल्सच्या `सिटिझन केन`नंतर येणारा. चित्रपट आणि त्याची पार्श्वभूमी हे दोन्ही लक्षात घेता त्याचं तिथे असणं संभ्रमात पाडणार नाही.
- गणेश मतकरी.

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP