शैतान- वेगळा पण नवा नाही

>> Sunday, June 12, 2011

२००९च्या कॅन चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला, आणि खूपच वादग्रस्त ठरलेला लार्स व्हॉन ट्रायरचा  `अ‍ॅन्टीक्राईस्ट` अखेर प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे का होईना, पण आपल्या चित्रपटांवरही आपला प्रभाव टाकताना दिसतो आहे. सध्या एकाच वेळी दोन हिंदी चित्रपटात हा प्रभाव दिसतो. दोन्हीकडे तो थेट, कथानक वा दिग्दर्शनाच्या पातळीवर नाही. पण एकीकडे तो संकल्पनेच्या पातळीवर असल्याने लक्षवेधी आहे. यातला पहिला, आणि अगदीच बाळबोध प्रभाव म्हणजे मर्डर-२ ने केलेली  `अ‍ॅन्टीक्राईस्ट` च्या पोस्टरची नक्कल. एका जीर्ण वृक्षाच्या मुळांपासून वर येणारे हात, ही प्रतिमा मर्डरच्या पोस्टरवर का असावी माहीत नाही, मात्र इतकी उघड आणि अनावश्यक चोरी, बरेच दिवसात पाहण्यात आली नव्हती, हे खरं. दुसरा प्रभाव हा खरा महत्त्वाचा आहे. आणि तो म्हणजे  `अ‍ॅन्टीक्राईस्ट या नावाचा.  `अ‍ॅन्टीक्राईस्ट` चित्रपटात प्रत्यक्ष  `अ‍ॅन्टीक्राईस्ट` किंवा सैतान, कुठेही अवतरत नाही. नाव आहे ते आपल्या आतल्या प्रवृत्तीकडे निर्देश करणारं. अनुराग कश्यप निर्मित आणि बिजॉय नाम्बीयार दिग्दर्शित `शैतान`मधे या थेट भाषांतरीत नावाचा याच प्रकारचा वापर आहे. चित्रपटाच्या कथेशी तो सुसंगत आहे. उपरा नाही.
शैतान हा पूर्णपणे `कश्यप` क्लॅनचा चित्रपट आहे. तो हिंदी चित्रपटांच्या संकेतांना खुंटीवर टांगतो. हा नायक/तो खलनायक अशा स्पष्ट व्यक्तिरेखांचा वापर करत नाही, व्यक्तिचित्रणापासून दृश्ययोजनांपर्यंत अनेक `टॅबू` गोष्टींना पडद्यावर स्थान देतो, सेन्सॉर कमिटीच्या मेम्बराना घाम फुटेल अशी भाषा पात्रांच्या तोंडी घालतो आणि चिकार हिंसाचारही न कचरता दाखवितो. एकूण काय, तर तो `आजचा` चित्रपट आहे, हे दाखवून देण्याचा आपल्या परीने भरपूर प्रयत्न करतो. यामुळे तो इतर हिंदी चित्रपटांपेक्षा वेगळा जरूर बनतो. मात्र हा वेगळेपणा वरवरचा, आशयापेक्षा स्टाईलमधे येणारा आहे, असं सतत वाटत राहातं.
यश चोप्रा, करण जोहर आणि बडजात्या यांच्या चित्रपटांत आपण नेहमीच श्रीमंताघरची सज्जन, सुशील, गुणी बाळं बघतो. ही मंडळी कर्तव्यदक्ष असतात, प्रामाणिक असतात, त्यांना मोठ्य़ांबद्दल आदर असतो. लहानांची ते कदर करतात. आईबापांकडे खो-यांने पैसा असून ती उधळत नाहीत, आणि साधं सिगरेटचंही व्यसन त्यांना नसतं. ही पात्रं तद्दन खोटी आहेत, हे आपण जाणतो. विशेषतः रोजच्या वर्तमानपत्रातून येणा-या तरूण मुलांनी झोपडपट्टीयवासीयांना चिरडल्याच्या आणि रेव्ह पार्ट्यांच्या बातम्या वाचताना हे अधिकच जाणवतं. मात्र चोप्रा, जोहर हे एक टोक असेल तर अनुराग कश्यप हे दुसरं टोक म्हणावं लागेल.
शैतानमधल्या तरूण मुलामुलींमध्ये एकही गोष्ट बरी दिसेल, तर शपथ. ती व्यसनं करतात, पैशाने सर्व प्रश्न सुटतील असं मानतात, परक्यांच्या सोडाच, पण आपल्या मित्रमंडळींच्या जीवाचीही त्यांना पर्वा नाही. संपूर्ण शुभ्र छटांमध्ये रंगवलेली पात्रं जर अविश्वसनीय असतील, तर ही संपूर्ण काळ्या गडद रंगातली पात्रं आपण वास्तव मानावीत का ? शैतानमधील पात्रं, ही याच प्रकारची आहेत.
अमेरिकेतून नुकतीच मुंबईत आलेली एमी (कल्की) हिला इथलं मध्यवर्ती पात्रं म्हणावं लागेल. मध्यवर्ती अशासाठी, की इथे घडणा-या ब-याच गोष्टी तिच्या अवती-भवती घडतात. अन् त्यातल्या काहींना ती कारणीभूत असते. तसंच चित्रपट तिच्यापासून सुरू होतो अन् तिच्यावरच संपतो. मात्र सामान्यतः चित्रपट ज्या पद्धतीने प्रोटॅगनिस्टच्या दृष्टिकोनातून घडतात, त्या प्रकारची ही प्रोटॅगनिस्ट नाही. किंबहूना त्या प्रकारे इथल्या कोणत्याच पात्राला प्रोटॅगनिस्ट म्हणता येणारच नाही. कारण `शैतान` पाहताना प्रेक्षकांनी तो कोणत्या बाजूने पाहावा, कोणत्या पात्रांशी समरस व्हावं हे कळायला मार्ग नाही.
तर एका समारंभात एमीची के.सी (गुलशन देवैया) य़ाच्याशी गाठ पडते. के.सी. तिची आपल्या इतर मित्रमंडळींशी ओळख करून देतो. ड्रग डिलर डॅश (शिव पंडित), होतकरू अभिनेत्री तान्या (किर्ती कुल्हारी), फारसं काहीच न करणारा पारशी झुबिन ( नील भूपालम). स्वतः के.सी. देखील वडिलांचे पैसे उडवणं आणि एका प्रचंड हमर गाडीतून फिरणं यापलीकडे इतर काहीच करीत नाही. म्हणजे उपयोगाचं काही करीत नाही. तो इतर, सर्व अन् आता एमी देखील, व्यसनं, रात्रीबेरात्री भटकणे,मारामा-या करणे या आणि अशा कश्यप कंपूच्या चित्रपटात चालण्याजोग्या गोष्टी करतंच असतात.
अशातंच, एक उत्तम चित्रित केलेल्या प्रसंगात हमरला अपघात होतो आणि दोन निरपराध्यांचा बळी जातो. केस दडपून टाकण्यासाठी पोलिसातलाच एक जण (राज कुमार यादव) या सा-यांकडे २५ लाखांची मागणी करतो. आई वडील पैसे देणार नाहीत या भीतीने ठरतं की एमीचं अपहरण झालं असं खोटंच दाखवायचं आणि तिच्या वडिलांकडून पैसे उकळायचे. अपहरण तर होतं, मात्र अनपेक्षितपणे एमीला शोधायची जबाबदारी एका इमानदार आणि भडक माथ्याच्या इन्स्पेक्टरवर, अरविंदवर (राजीव खंडेलवाल) येऊन पडते. तशातंच मीडियाला अपहरणाची बातमी लागते आणि के.सी. आणि कंपनीचे सर्व मनसुबे रसातळाला जाण्य़ाची चिन्ह दिसायला लागतात.
शैतानची पटकथा दोन फॉर्म्युल्यांचा स्पष्टपणे वापर करते. हे दोन्ही परिचित फॉर्म्युले आहेत. मात्र आपल्याकडे त्यांचा फार वापर झालेला नाही. यातला पहिला म्हणजे प्रमुख व्यक्तिरेखांच्या गटाने आपल्या फायद्यासाठी एक कारस्थान रचणं आणि आपआपसातला बेबनाव, स्वार्थ यामुळे परिस्थिती बिघडत जाणं. ए सिम्पल प्लान, शॅलो ग्रेव्ह, बिग नथिंग अशा कितीतरी चित्रपटांत हा फॉर्म्युला वापरला गेला आहे. मुळात गडद व्यक्तिरेखा अन् कटकारस्थानातून येणारा शोकांत असणारं याच फॉर्म्युल्याचं व्हेरिएशन स्वतः अनुराग कश्यपने आपल्या पहिल्या, अप्रदर्शित असूनही गाजलेल्या  `पाँच` साठी वापरलं होतं. (जिज्ञासूंना  `पाँच` अनेक टोरन्ट साईट्सवर मिळू शकतो. या मार्गाने तरी तो रसिकांपर्यंत पोहोचावा, म्हणून स्वतः दिग्दर्शकानेच तो तिथे उपलब्ध करून दिल्याची वदंतादेखील मी ऐकून आहे.) दुसरा फॉर्म्युला आहे तो वैयक्तिक संकटात असलेल्या नायकाने आपल्या अडचणींना विसरून अधिक मोठ्या अन् महत्त्वाच्या कामगिरीला वाहून घेण्याचा. हा हॉलीवूडमध्ये अनेक वर्ष प्रचलित असणारा अन् आजही दिसणारा फॉर्म्युला आहे. २००९च्या  `टेकिंग ऑफ पेलहॅम-१२३ ` मधेही भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली असणा-या डेन्झेल वॉशिंग्टनने ट्रेनमधे अडकलेल्या प्रवाशांना सोडवण्याचा जीवापाड प्रयत्न करणं किंवा २०१०च्या `अनस्टॉपेबल`मधे वैवाहिक अडचणी बाजूला ठेवून क्रिस पाईनने अपघात टाळण्यासाठी सर्वस्व लावणं ही टोनी स्कॉटच्या अगदी हल्लीच्या दोन चित्रपटांतील उदाहरणं. इथली राजीव खंडेलवालची व्यक्तिरेखा त्या दोन पात्रांपेक्षा फार वेगळी नाही. पटकथा या दोन फॉर्म्युल्याना ब-यापैकी एकत्र करते. त्यांना सुटंसुटं वाटू देत नाही. मात्र तरीही मी पटकथा पूर्ण जमलेली आहे, असं म्हणणार नाही. गोंधळलेल्या दृष्टिकोनाबरोबर आणखीही एक दोष पटकथेत आहे. आणि तो म्हणजे अशा विषयांच्या मांडणीत जी सामाजिक न्यायाची जाण दिसायला हवी, ती इथे दिसत नाही. इथला संघर्ष काही असला, तरी इथे खरा अन्याय झालाय तो के.सी.च्या हमरखाली आलेल्या दोन निरपराध्यांवर. त्यामुळे चित्रपटातल्या व्यक्तिरेखांना मिळणारी सजा ही अंतिमरीत्या त्या अन्यायाचं उत्तर म्हणून आली पाहिजे. थेट नसली, तरी कळेलशा पद्धतीने (अशाच अपघातावर आधारित असणारा १९८५ साली आलेला शंकर नागचा `अ‍ॅक्सिडेन्ट` या दृष्टीने पाहता येईल.) शैतानमधे ते त्या पद्धतीने येत तर नाहीच, वर थोड्या वेळाने पटकथा या बळींना विसरून जाते की काय, असं वाटतं.
शैतानच्या दृश्य शैलीबद्दल खूप बोललं गेलंय, आणि ती वेधक निश्चितच आहे. न्यू हॉलीवूडच्या काळात (१९७०चं दशक) ज्या प्रमाणे नवे हॉलीवूड दिग्दर्शक हे केवळ अमेरिकन चित्रपटांकडे न पाहता जगभरातून स्फूर्ती घेताना दिसले, त्याचप्रमाणे नाम्बियार देखील आपल्या चित्रपटासाठी पूरक संदर्भ जगभरातून गोळा करताना दिसतो. मेन स्ट्रीम हॉलीवूडपासून एशियन चित्रपटांपर्यंत अनेक शैलीचा शैतानवर प्रभाव आहे, पण त्यांचा एकत्र वापर हा खटकणारा नाही. टायटल्स दरम्यान पात्रांची करून दिलेली लक्षवेधी ओळख, राजीव खंडेलवालची पॉईन्ट ऑफ व्ह्यू शॉटने होणारी एन्ट्री, खोया खोया चाँदच्या संगीतावर होणारा गोळीबार या सगळ्या गोष्टी लक्षात राहणा-या  आहेत, मात्र सर्वात जमलेला आहे, तो अपघाताचा प्रसंग. प्रत्यक्ष अपघाताआधीचा पाठलाग, अपघाताचं मिनीमलीस्ट चित्रण, नंतरची भीषण शांतता आणि अस्वस्थ पात्रांना आठवणारे स्लो मोशन शॉट्स हे सगळं फार उत्तम आहे. झोपडपट्टीतला पाठलाग छान असला तरी तो पेटन्टेड `कश्यप` पाठलाग आहे (ब्लॅक फ्रायडे आठवा) तो नवा नाही.
थोडक्यात शैतान हा आपल्यासाठी वेगळा आहे, मात्र खूप वेगळा नाही. मल्टिप्लेक्स अन् कॉर्पोरेट कल्चरनंतर उदयाला येणा-या, मर्यादित प्रेक्षकांसाठी असलेल्या स्टायलिश निर्मितीचा तो एक भाग आहे. त्याला मास अपील नाही, पण ते असेल अशी चित्रकर्त्यांची अपेक्षाही नाही. आपल्या हुकमी प्रेक्षकवर्गाला खूष करण्यात त्यांना आनंद आहे. आणि ते हे करूनही दाखवितात हे विशेष.
- गणेश मतकरी.

15 comments:

lalit June 13, 2011 at 1:46 AM  

plan to watch ...once again best writting

हेरंब June 13, 2011 at 8:22 AM  

उत्तम ओळख. शैतान बघेनच पण पाँचबद्दल बरंच ऐकलं असूनही तो बघायचा राहून जात होता. तोही आता नक्की बघेन.

joshnilu June 13, 2011 at 10:48 AM  

i want to download पाँच
I serched by words panch
but nothing found can you post correct words in english please

ganesh June 13, 2011 at 8:43 PM  

Thanks lalit and heramb. Joshnilu, its paanch with an extra a.

chetansubhashgugale June 13, 2011 at 9:14 PM  

फारूक शेख, अभिमन्यू सिंह, रूखसार आणि सेलिना जेटली यांचा ऍक्सिडेंट ऑन हिल रोड याच पठडीतला आहे.

Suhrud Javadekar June 14, 2011 at 7:34 PM  

Excellent, well-balanced analysis...I felt the film would've been far better if the 'social' angle, as you mention, wasn't forgotten by the director...also the Rajat Barmecha 'flashback' was very irritating and quite mediocre...the initial friendship between Kalki and others looked contrived...

ganesh June 14, 2011 at 10:07 PM  

chetan, from what i remember of the posters ,I think u r right, though it may be slightly on the noir category. unfortunately can't say exactly because i haven't seen the film. thanks suhrud.flashback was more irritating because it was out of texture here. that kind of humour may be at home in some other film. one understand the filmmakers attempt to defy the norms, but not all norms can be defied without a cost.

मंदार जोशी June 15, 2011 at 5:12 AM  

बघायला हवा. पण केबलवर लागला तरच.

Anee_007 June 15, 2011 at 5:58 AM  

Paanch was really a good movie based on to joshi-abhyankar serial murders.
Shaitan nearly had same thing and you come to know whats gonna happen next at each corner of the movie.But I loved the movie because of visual style,as you've mentioned.Ultra slow motion,high FPS,1 to 3 frame style was really scintillating.But somewhere I think this guys just don't think about script actually because this movie could've been a great one.

BTW,watch 404 error not found,a good movie with things we like paranoia,mystery and so on

Suhrud Javadekar June 15, 2011 at 7:41 PM  

Overall, after weighing all the pros and cons, one can say Shaitan isn't a bad film,but it isn't good either...somewhere in between, I guess...one expected a lot more from an Anurag Kashyap production...

ganesh June 16, 2011 at 4:56 AM  

Suhrud, why did u? This is probably the base of all major problems we face here these days. When filmmaker is working alone ,for his convictions and his name he works best. Now ,with corporates,multiple film deal , each successful director is expected to become a production house. Chopra, johar, rgv, kashyap. ...is it any surprise that the focus may get lost. Plus ,u cant expect from a nambiyar film what u expected from kashyap. Or the whole point of the director's film gets lost.same school ,yes .but that doesnt mean much.

Hemant June 17, 2011 at 2:48 AM  

good that you atleast wrote about Shaitan, I was asking you earlier to write about DevD but you didnt because you told you dont like Kashyap and Bhansali ...

nyway I am big fan of Kashyap n DevD was the masterpiece
In Shaitan even the posters are on the same lines of DevD so expected something but not very high as he is not directing this one

ganesh June 17, 2011 at 12:39 PM  

Hemant, its a coincidnce that u mentioned the posters.earlier today ,i was discussing the posters of shaitan with someone and was kicking myself for not writing about them in the article . As it turned out no one else did as well. This seems to be ann original idea and i dont remember any western posters taking inspiration from rorschach test or inkblot test as it is otherwise known. They r a popular device in psychology where the person looking at the inkblots is supposed to describe what he sees in the blots and there is a rather ingeneous system of deciphering these results. Shaitans symmetrical posters are obviously modelled after this form, and seem to be giving the inkblot test to the viewer. In other words ,the film claims to be a psychiatric device for its viewer. Too bad if the irony is lost to most of us.

Hemant July 11, 2011 at 5:16 AM  

oh.. I saw your comment today :)

Actually I collected all the posters of DevD and I found its quite artistic..

And even the movie was like painting..
The songs the dance the background colors .. Shaitan's music is also awesome
I think Bollywood started taking new paths and breaking the old image

आनंद पत्रे July 20, 2011 at 12:21 PM  

शैतान मला तरी प्रचंड आवडला... फक्त एक गोष्ट म्हणजे राजीव खंडेलवालच्या वैवाहिक आयुष्याबद्दलच्या भागाची काहीही गरज नव्हती.. बाकी सर्वच आवडलं...
आणि प्रत्येकजण स्वार्थी असल्यामुळं ते आपल्याआपल्या परीने प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात आणि प्रत्यक्ष आयुष्यातही तसंच होतं.. निरपराधी कोण आहे हे खरं आपल्यापर्यंत कधी पोचतं.. यामुळं मला तरी संपुर्ण सिनेमा पटला..

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP