पोलान्स्की- `रोझमेरी`ज बेबी` आणि इतर चित्रपट

>> Monday, June 27, 2011


एका छोट्या बोटीचा अंतर्भाग. या छोट्या जागेत एक उच्चभ्रू जो़डपं आणि त्यांना वाटेतच भेटलेला एक हिच हायकर. वरच्या पावसाच्या मा-याने तिघे आडोशाला, बोटीच्या खालच्या भागात शिरलेले. नवरा आणि आगंतुक कॅमे-याच्या अगदी जवळ बसलेले, पत्नी मागच्या बाजूला कपडे बदलतेय. नवरा आपल्या कामात असल्याचं पाहून हिच हायकर डास मारण्याचं निमित्त साधतो आणि हळूच मागच्या बाजूला दृष्टीक्षेप टाकतो. नव-याच्या हे लक्षात येतं, पण तो ते दाखवून देत नाही. पत्नी लवकरच या दोघांबरोबर येऊन बसते आणि काही घडलंच नसल्यासारख्या गप्पा पुढे सुरू होतात.
रोमन पोलान्स्कीला दिग्दर्शक म्हणून जागतिक किर्ती मिळवून देणा-या `नाईफ इन द वॉटर` (१९६२)मधील हे दृश्य. या तीन प्रमुख व्यक्तिरेखांच्या मनस्थितीची कल्पना देणारं.
हक्क, अभिमान, आकर्षण, अपराधी भावना, संताप या अनेक भावना या छोट्या दृश्यात डोकावतात. त्याही संवादाचा अजिबात आधार न घेता. बोटीतील अडचणीची जागा ही देखील तिघांच्या मानसिक आंदोलनाला साथ देणारी, एक प्रकारची घुसमट तयार करणारी. प्रेक्षक या घटनेचा अर्थातच मूक साक्षीदार. तो हे तिघे कसल्या विचारात आहेत हे जाणतो. या तिघांना नसणारी परिस्थितीची पूर्ण कल्पना प्रेक्षकाला आहे. या अदृश्य तणावाचा तोदेखील एक बळी आहे. पोलान्स्की मुळचा पोलीश दिग्दर्शक. नंतर पुढे तो अमेरिकेत गेला. अधिक व्यावसायिक वळणावर जाण्याआधीच्या चित्रपटातल्या आणि त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतल्याही, सर्वाधिक महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये `नाईफ इन द वॉटर`चं नाव घ्यावं लागेल. अतिशय कमी खर्चात केलेल्या, चोवीस तासातल्या घडणा-या घटना मांडणा-या या चित्रपटातही पोलान्स्कीच्या शैलीचे अनेक विशेष दिसून येतात. संहितेतलं मनोविश्लेषणात्मक नाट्य, अपराधी भावनेला पोसणारं चित्रपटातलं वातावऱण, मानवी स्वभावाचे अंधारे कोपरे हुडकण्यातली त्याची सफाई याबरोबरच मर्यादित जागेत अतिशय प्रभावी आणि नाट्यपूर्ण दृश्यरचना करण्याचं कौशल्य देखील पाहायला मिळतं.
गुन्हेगारी, भीती, संशय, हिंसा या गोष्टी पोलान्स्कीच्या बहुतेक चित्रपटांच्या कथाविषयाचा अविभाज्य भाग आहेत. किंबहुना केवळ चित्रपटांच्या नव्हे, तर आयुष्याचाही. बालपणापासून ते प्रथितयश दिग्दर्शक झाल्यावरही अनेक वर्षे या दिग्दर्शकाचं आयुष्य, हे अनेक हिंसक, शोकांत आणि वादग्रस्त घटनांनी भरलेलं होतं. ज्यू कुटुंबातल्या पोलान्स्कीच्या आईचा मृत्यू नाझी यातनातळावर झाला, वडील देखील नाझी अत्याचारात कसेबसे तग धरून राहिले. स्वतः पोलान्स्की एका शेतक-याच्या गोठ्यात युद्ध संपेस्तोवर लपून राहिला. त्याच्या आयुष्यातील अनेक शोकांतिकांचा हा पहिला टप्पा म्हणता येईल.
`नाईफ इन द वॉटर` नंतर त्याने याच प्रक्षोभक कथासुत्रांना पुढे नेलं. रिपल्शन (१९६५) आणि क्युल- ड- साक (१९६६) बनले आणि उत्तम युरोपियन दिग्दर्शकांमध्ये त्याचं नाव घेतलं जायला लागलं. १९६७ च्या `द फिअरलेस व्हॅम्पायर किलर्स` मध्ये त्याने आपल्या चित्रपटातल्या भयाला उघडपणे भयपट विभागात आणून दाखल केलं, आणि वर त्याला विनोदाची जोड दिली. यापुढचा त्याचा चित्रपट मात्र उघड भयपट होता, ज्याने पोलान्स्कीला हॉलीवूडमध्ये दाखल केलं. तो होता `रोझमेरी`ज बेबी`.
आल्फ्रेड हिचकॉक आणि रोमन पोलान्स्की यांच्या शैलीत आणि कथासूत्रांत अनेक साम्यस्थळे आढळतात.त्यांची दृश्यशैली, प्रसंगाचा तणाव वाढविण्याची पद्धत किंवा प्रमुख पात्रांमधील गुन्हेगारी वृत्ती हे या दोन्ही दिग्दर्शकांमध्ये आढळतं. मात्र हिचकॉक आपल्या नायक-नायिकांच्या दोषांचं प्रत्यारोपण कोणा वेगळ्या व्यक्तिरेखेवर करतो (ट्रान्स्फर ऑफ  गिल्ट) आणि प्रमुख पात्रांना प्रेक्षकांची सहानुभूती मिळवून देतो. रोमन पोलान्स्की मात्र अशी युक्ती करीत नाही. त्याच्या पात्रांच्या अपराधाचे बरे-वाईट परिणाम हे बहुधा ते स्वतः भोगताना दिसतात. प्रेक्षक त्यांना समजून घेतो, पण स्वतःही अस्वस्थ होतो. या दोघांच्या शैलीतल्या या सारखेपणामुळेच कदाचित, पण या दोघांनी केलेले भयपट हे त्यांच्या वेगळेपणासाठी आणि प्रभावासाठी नावाजले जातात. हिचकॉकचा `सायको` आणि पोलान्स्कीचा `रोझमेरी`ज बेबी`. असं ऐकिवात आहे की, हिचकॉकचा `रोझमेरी`ज बेबी` कादंबरीवर चित्रपट काढण्याचा विचार होता, पण त्यातल्या अतिमानवी सूत्राला प्रत्यक्षात आणणा-या शेवटामुळे हिचकॉकने आपला हक्क सोडला. `रोझमेरी`ज बेबी`चा विशेष हा आहे, की तो भयपटाच्या ठरल्या वाटेने जात नाही. त्यातलं वातावरण अस्सल शहरी आहेच, वर त्यातल्या घटनाही ख-या आयुष्य़ाशी ब-याच समांतर जातात. हे त्याचं वास्तवाच्या इतक्या जवळून जाऊनही अतिमानवी अस्तित्त्व सूचित करणं त्यातली भीती वाढवत नेतं. पहिल्या मुलाच्या वेळी गरोदर असणारी स्त्री ही नेहमीच काळजीत असते. इतरांचे अनुभव काय होते ? आपला डॉक्टर कसा आहे ? आपण घेतोय ती औषधं बरोबर आहेत का? असे अनेक प्रश्न तिला पडतात. त्यावर उत्तरं मिळविण्यासाठी ती अनेकांशी बोलते, अनेक पुस्तकं वाचते. पण तिची काळजी संपत नाही. ती वाढतच जाते. हे रोजच्या आयुष्यात पाहायला मिळणारं चित्रं  `रोझमेरी`ज बेबी`ने ख-याखु-या अतिमानवी रहस्याशी नेऊन जोडलं आहे. त्यामुळेच ते प्रभावी ठरतं. तेही कोणत्याही उघड धक्क्याशिवाय. यातली रोजमेरी(मिआ फेरो) आपल्या नव-याबरोबर, म्हणजे गाय (जॉन कॅसावेट्स) बरोबर नव्या घरात राहायला येते. शेजारी मिनी (रूथ गोर्डन) आणि रोमन कास्टेवेट (सिडनी ब्लॅकमर) हे म्हातारं, प्रेमळ पण जरा आगाऊ जोडपं राहत असतं. गाय नट असतो, पण फार यश न मिळालेला. अचानक गायचं नशीब पालटतं. आणि हातची गेलेली भूमिका त्याला परत मिळते. दोघांना चांगले दिवस येतात. एके रात्री रोजमेरीला एक भयानक स्वप्न पडतं. ज्यात तिला एक सैतानी शक्ती तिच्यावर बलात्कार करीत असल्याचा भास होतो. गाय हे सरळ हसण्यावारी नेतो. रोजमेरी अस्वस्थ होते, पण पुढे दिवस राहिल्यावर तीही सगळं विसरून जाते. मिनी आणि रोमन तिला एक चांगला डॉक्टर गाठून देतात आणि तेवढ्यापुरता आनंदी आनंद होतो. पण दिवसागणिक रोजमेरी काळजीत पडायला लागते. तिचं वजन कमी व्हायला लागतं. डॉक्टरचा सल्ला फसवा वाटायला लागतो, शेजा-यांना संशय यायला लागतो. सगळेजण कसल्याशा कटात सामील असून आपलं मूल हिरावून घेण्याचा हा बेत असल्याची तिची खात्री होते. तिचा तोल अधिकाधिक ढळायला लागतो आणि सगळे हवालदिल होतात.  `रोझमेरीज बेबी`. इतका साधेपणाने केलेला, पण अतार्किक गोष्टी सुचवणारा भयपट क्वचितच पाहायला मिळेल. यात जे प्रत्यक्ष दाखवलं जातं त्याहून परिणामकारक जे दाखवलं जात नाही ते ठरतं. उदाहरणार्थ, गायला हातची गेलेली भूमिका परत मिळते, ती निवडलेल्या नटाला आंधळेपणा आल्याने. आता हे सगळं प्रसंगात येऊ शकतं, पण पोलान्स्की इथे केवळ एका फोनद्वारे हे सगळं गायला आणि अर्थातच प्रेक्षकांना कळवतो. आंधळेपणा येण्याची प्रत्यक्ष घटना आणि त्यामागचे काय कारण असेल हे प्रेक्षक स्वतः कल्पना करून भीती तर वाटून घेतातच वर दिग्दर्शकाला प्रेक्षकांना वाटणारं स्पष्टीकरण खरं वा खोटं ठरविण्याची मुभाही देतात. प्रामुख्याने वास्तववादी असणा-या या चित्रपटातलं वास्तव पंक्चर करणा-या काही जागा पोलान्स्की मिळवितो त्या स्वप्नं किंवा भासांच्या मार्गाने. मात्र इथेही त्याचा भर चमत्कारापेक्षा प्रतिकात्मक आणि वादग्रस्त प्रतिमा आणण्यावर आहे. पुन्हा ख-या-खोट्याचं मिश्रण आहेच.
 `रोझमेरी`ज बेबी` हा भयपटाइतकाच मनोविश्लेषणात्मक चित्रपट म्हणूनही पाहता येतो. तो दिग्दर्शकाच्या पारलौकिकाला अखेरच्या प्रसंगापर्यंत पडद्याआड ठेवण्यामुळे. हाच चित्रपट इतर मार्गांनी हास्यास्पद ठरला असता. पोलान्स्कीने निवडलेला मार्ग हा प्रेक्षकांना पसंत पडला आणि हा दिग्दर्शक हॉलीवूडच्या यशस्वी दिग्दर्शकांत जाऊन बसला. हॉलीवूडमध्ये टॅबू समजल्या जाणा-या अनेक कल्पना चित्रपटात होत्या. नव-याच्या संमतीने पत्नीवर होणारा बलात्कार, सैतानाच्या अत्याचारादरम्यान रोजमेरीला होणारं धर्मगुरूंच भासमय दर्शन, नायिकेच्या नावातल्या मेरीपासून अनेक वेळा सुचवलेलं ख्रिस्त जन्माचं प्रतीक या कल्पना आणि दृश्यसंकल्पना सहज पचनी पडणा-या नव्हत्या. पण अशा कल्पनांशी खेळ ही पोलान्स्कीच्या चित्रपटांची खासीयत मानली जाते.
गरोदर स्त्री वर केलेल्या वादग्रस्त चित्रपटानंतर वर्षभरात झालेला, आठ महिने गरोदर असणा-या पोलान्स्कीच्या पत्नीचा खून ही घटना त्याच्याच एखाद्या चित्रपटात शोभेलशी. १९६९मध्ये त्यांच्या राहत्या घरी इतर चौघांसह झालेल्या या खूनाचा संशयही पोलान्स्कीवरंच घेतला गेला. पुढे चार्लस मॅन्सन आणि त्याच्या सहका-यांना वेगळ्याच कारणांसाठी ताब्यात घेतल्यावर या गुन्ह्याला वाचा फुटली.
 `रोझमेरी`ज बेबी`.नंतर हॉलीवूडमध्ये त्याला याच प्रकारची लोकप्रियता मिळवून देणारा दुसरा चित्रपट म्हणजे चायनाटाऊन (१९७४). मधल्या काळात त्याने काही चित्रपट केले, पण त्यांना तुलनेने कमी यश मिळालं. चायनाटाऊन मात्र आजही महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. त्याच्या नेहमीच्या कथासूत्रांच्या आधारे इथे भ्रष्टाचाराची एक करूण आणि भेदक गोष्ट सांगितली आहे . जॅक निकल्सनची प्रमुख भूमिका आणि फिल्म न्वार पद्धतीची दृश्यशैली यांमुळे हा चित्रपट व्यावसायिक अन् कलात्मक या दोन्ही निकषांवर उतरला.
पोलान्स्कीला पुढचा धक्का होता, तो १३ वर्षाच्या सामान्था गायमर बरोबर शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप, ज्या (ख-या असलेल्या) आरोपामुळे त्याला अमेरिकेतून पळ काढून आपलं बस्तान पॅरिसला हलवावं लागलं.
२००२मध्ये पोलान्स्कीला `पिआनिस्ट`साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचं आँस्कर मिळालं, तेव्हा  ते स्वीकारण्यासाठी तो अमेरिकेत समारंभाला उपस्थित राहू शकला नाही. आजही त्याच्यावरचा या प्रकरणातला आरोप त्याला अमेरिकेत पाऊल ठेवू देत नाही.
पोलान्स्कीची कारकीर्द पाहता एक लक्षात येईल की त्याचा प्रवास हा कलात्मक ते व्यावसायिक असा होत गेलेला आहे. त्याबरोबर त्याच्या विषयांचा आवाकाही वाढत गेलेला आहे. एखाद्या छोट्या घटनेवर केंद्रित होणारे त्याचे चित्रपट आता मोठमोठे विषय हाताळताहेत. १९६२ मध्ये `नाईफ इन द वॉटर` सारखं छोटं कथानक घेणा-या पोलान्स्कीचा २००२मधला `पिआनिस्ट` नाझी हुकुमतीखालच्या पोलंडमध्ये वॉरसॉतल्या ज्यू रहिवाशांवर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचणारा होता, तर २००५मधला `आँलिव्हर ट्विस्ट` चार्ल्स डिकन्सच्या एकोणिसाव्या शतकात लंडनमध्ये घडणा-या कादंबरीचं भव्य रूपांतर होतं. असं असूनही एक गोष्ट कायम आहे. त्याचे चित्रपट आजही व्यक्ती आणि त्यांची मानसिकता यांना महत्त्व देतात. त्यांच्या व्यक्तिरेखा या त्याच्या कथावस्तूंची गुलामी स्वीकारत नाहीत, तर स्वतंत्र अस्तित्त्व असल्याप्रमाणे आपल्या परिस्थितीचा, पर्यायांचा आणि परिणामांचा विचार करताना दिसतात. पोलान्स्कीचा सिनेमा इतकी वर्षे वेगळेपणा राखून आहे, तो त्याच्या या विशेषांमुळेच.
- गणेश मतकरी.

3 comments:

Anonymous,  June 28, 2011 at 10:28 AM  

this is a must see movie now!

हेरंब July 24, 2011 at 1:27 AM  

सुप्पर्ब.. ऑस्सम !!! प्रचंड आवडला.. शेवट किंचित गंडलाय. पण ओव्हरऑल अप्रतिम !!

shubhangee mhaske August 24, 2011 at 1:03 AM  

Recently i saw movie 'The Ghost writer', Directed by Roman Polanski.i must say Polanski is really great director.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP