कश्यपचा `पाँच`

>> Sunday, June 19, 2011


प्रदर्शनानंतर चित्रपट लोकप्रिय होणं ही एक स्वाभाविक घटना आहे, पण काही वेळा, चित्रपट प्रदर्शन न होताही लोकप्रिय होऊ शकतात. बहुतेकदा महत्त्वाच्या दिग्दर्शकांनी केलेले हे मोजके अप्रदर्शित चित्रपट, काही ना काही कारणाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत, मात्र ज्या मोजक्या भाग्यवान मंडळींना ते पाहता येतात त्यांच्या बोलण्यातून आणि वृत्तान्तांच्या कर्णोपकर्णी जाण्यातून या `लॉस्ट`  फिल्म्सची चर्चा होत राहते. त्यांच्याभोवतालचं वलय वाढत जातं. चाहत्यांच्या मनात हे चित्रपट मग इतके मोठे होतात, की त्यांचं प्रत्यक्ष दर्शन हे अपेक्षाभंग करणारं ठरेल की काय, अशी शक्यता तयार होते. एरिक व्हॉन स्ट्रॉहाईमच्या ग्रीड (१९२८) चित्रपटाची मूळाची नऊ तासांची आवृत्ती ( जी स्टूडिओने ताबा घेऊन सव्वा दोन तासांत संपवली, पर्यायाने चित्रपट कोसळला), किंवा द मॅग्निफिसन्ट अ‍ॅबरसन्स (१९४२) ची ऑर्सन वेल्सने संकलित केलेली आवृत्ती (ही देखील स्टुडिओनेच निकालात काढली) अशी बरीच उदाहरणं आपल्याला पाहता येतील. आपल्याकडलं या प्रकारातलं हल्लीचं उदाहरण म्हणजे अनुराग कश्यपचा पहिला चित्रपट `पाँच`. २००२ साली चित्रित झालेल्या या चित्रपटाला आपल्या अतिशय बुद्धीमान सेन्सॉर बोर्डाने अनेक गोष्टींसाठी अडवलं. हिंसाचार, गुन्हेगारांची गुन्हा करण्याची पद्धत पडद्यावर दाखवणं, ड्रग्ज, प्रक्षोभक संवाद असे अनेक मुद्दे त्यात होते. मात्र चित्रपटात सकारात्मक व्यक्तिरेखांचा अभाव आणि सोशल मेसेज नाही या दोन मुद्दयांइतका सेन्सॉरचा निर्णय क्वचित हास्यास्पद झाला असेल. या मुद्दयांसाठी तर शेक्सपिअरच्या मॅकबेथ पर्यंत काहीही बॅन करता येऊ शकतं. असो.
अनुराग कश्यपची निर्मिती असलेल्या बिजॉय नाम्बियार दिग्दर्शित `शैतान` चित्रपटाने पुन्हा एकदा पाँचच्या  वलयाला उजाळा दिला. त्याबद्दल जे माहिती होतं, ते या दोन चित्रपटातलं साम्य दाखवून देण्यासाठी पुरेसं होतं. मॉरल कम्पस हरवलेल्या, दिशाहीन मुलांचा एक ग्रुप, पैशांच्या निकडीतून एका छोट्या अपहरणाचा बेत रचणं आणि पुढे होणारी मनुष्यहानी हे दोन्ही चित्रपटांत असणारे घटक. त्यामुळे शैतान पाहिल्यावर `पाँच` पाहणं अपरिहार्य होतं.निदान या खेपेला, तो ऑनलाईन उपलब्ध असल्याने, पाहाणं शक्य झालं. मात्र खरा प्रॉब्लेम होता, तो आपल्या कल्पनेत अजस्त्र रूप धारण केलेल्या कलाकृतीला पाहाताच, तिच्याभोवतालचं वलय गळून पडण्याच्या शक्यतेचा. हा धोका मी पत्करायचं ठरवलं.
`पाँच` च्या कल्पनेमागे दोन सूत्र असल्याचं मानलं जातं. पहिलं म्हणजे स्वतः कश्यपच्या भूतकाळात त्याची एका रॉक बॅन्डच्या मेंबरांबरोबर झालेली मैत्री. आणि दुसरं म्हणजे जोशी अभ्यंकर प्रकरणाच्या सुरूवातीला घडलेलं अपहरण प्रकरण. याबरोबरच अर्थातच एक तिसरं सूत्रही असणार, आणि ते म्हणजे पाश्चात्य चित्रपटांमधला या प्रकारच्या पटकथांचा प्रभाव. मुळात सोप्या वाटणा-या योजनेचं क्षणाक्षणाला बिघडत जाणं आणि मित्रांमधल्या बेबनावातून परिस्थिती अधिकच बिकट होत जाणं. स्वतः चांगला पटकथाकार असलेल्या कश्यपने या प्रकारचे चित्रपट पाहिले नसले, तर नवल.
२००२/३चा काळ मल्टिप्लेक्स प्रेक्षकांसाठी नवसमांतर सिनेमा सुरू होण्याच्या आधीचा होता आणि बहुतेक चित्रपट हे आपल्या सांकेतिक प्रेक्षकांच्या सांकेतिक आवडीनिवडींना चिकटून राहणारे होते. त्या काळात पाँचसारखा `मानवी विकृती` हाच केंद्रबिंदू असणारा चित्रपट काढणं, हे निश्चितच आव्हानात्मक काम होतं. ज्याप्रकारे तो प्रदर्शित न होण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले त्यावरूनही हे दिसून आलंच.
पाँचमधे कोणीही नायक नाही.खलनायकही नाही. सारेच अ‍ॅन्टीहीरो आहेत. कामाची लांबी ही कमी अधिक प्रमाणात सारखी. त्यामानाने `रूट ऑफ ऑल इव्हिल `  असणा-या लूकला (के.के.) थोडं अधिक दमदार काम आहे, आणि एकुलती एक स्त्री भूमिका असलेल्या शिउलीला (तेजस्विनी कोल्हापुरे) पडद्यावर किंचित कमी वेळ मिळतो. पण त्यापलीकडे जाऊन पाहिलं, तर भूमिका या बरोबरीच्या आहेत. लूकचा एक रॉक बॅन्ड आहे. त्याच्या स्वभावाला शोभेलशा `पॅरासाईट्स` या नावाचा. यात त्याच्या बरोबरीने आहेत मुर्गी (आदित्य श्रीवास्तव), पॉन्डी (विजय मौर्य), जॉय (जॉय फर्नांडेस) आणि शिउली. सा-यांचे स्वभाव वेगवेगळे. लूक शीघ्रकोपी आणि फार विचार न करता हमरीतमुरीवर येणारा. पॉन्डी चटकन भावनेच्या आहारी जाणारा. मुर्गी शांतपणे, त्रयस्थपणे विचार करणारा. जॉय लूक म्हणेल ते विचार न करता करणारा. शिउली ही पोरांसोबरोबर फिरणारी अन् पैशांसाठी वाटेल ते करायला तयार असणारी. त्यासाठी ती काय काय करू शकेल हे आपल्याला चित्रपटाच्या उत्तरार्धात कळतं. तो पर्यंत हे पान लेखक-दिग्दर्शकाने हातचं राखून ठेवलेलं.
तर पॅरासाईट्स बॅन्डला फारसं नाव नाही. छोटी-मोठी कामं मिळतात, पण पैसा फार नाही. जरा नाव मिळवायचं तर प्रोफेशनल रेकॉर्डिंग करून घ्यायला हवं. त्याला चार-पाच लाख लागणार, ते कुठून आणायचे? या प्रश्नाचं उत्तर अनपेक्षितपणे मिळतं. या सा-यांचा एक मित्र असतो. वडील श्रीमंत पण पोराकडे दमडी न देणारे. त्याचं खोटंच अपहरण करून वडिलांकडून पैसे मागायचं ठरतं. अपहरण झाल्याचं कळताच पोलिसांना कळवलं जातं आणि लूकचं डोकं फिरतं. थोड्याशा बोलाचालीनंतर तो मित्राला मरेस्तोवर मारतो, आणि परिस्थिती एकदम बदलते. सारं पुन्हा पहिल्यासारखं होणं आता अशक्य असतं.
पाँचच्या पटकथेत एक मोठा गोंधळ आहे. तो म्हणजे ती सांगण्याचा दृष्टिकोन हा पुरेसा स्पष्ट नाही. एका परीने पाहिलं, अन् तसं आपण जवळपास पाउण चित्रपट पाहू शकतो, तर  ही अतिशय गडद, आपल्यासारख्या मध्यमवर्गीय संस्कृतीशी संबंध नसलेली परंतु, प्रत्य़क्षात घडण्याची शक्यता असलेली कहाणी आहे. (आणि आपल्याशी संबंध नाही तरी कसं म्हणणार, पाँचपेक्षा कितीतरी अधिक भयंकर जोशी-अभ्यंकर हत्याकांड मध्यमवर्गीय पुण्यातच तर घडलं.) त्यातल्या व्य़क्तिरेखा या सुसंगत आहेत, चित्रपट पुरेसा गंभीरपणे केलेला, अन् खरोखरंच सामाजिक सत्य मांडणारा आहे, जरी सेन्सॉर बोर्डाला तसं वाटत नसलं तरी. मात्र एका हाय पॉईन्टला, हा हाय पॉईन्ट कोणता हे मात्र मी सांगणार नाही, तर या हाय पॉईन्टला पोहोचल्यावर एकदम याचं वास्तव रूप संपतं आणि चाली-प्रतिचाली, कूट कारस्थानं असणारा फसवाफसवीचा खेळ सुरू होतो. हा भाग चतुर रहस्यपटांशी नातं सांगणारा आहे, पण तो इतका कमी वेळ आहे, की पहिल्या पाउण भागाचा प्रभाव पुसून टाकण्यापलीकडे तो काही करू शकत नाही, स्वतःचा प्रभाव पाडणं हेदेखील नाही. त्याशिवाय त्यातलं चातुर्य तेवढ्यापुरतं आहे. संपूर्ण चित्रपटातल्या घटनांना तो काही वेगळं स्पष्टीकरण देऊ शकत नाही.
अशी शक्यता आहे, की पहिला भाग लिहिल्यावर `हा आपल्या प्रेक्षकाला कितपत झेपेल?` अशी रास्त शंका चित्रकर्त्यांच्या मनात उपस्थित झाली असेल. आणि एक सोपी परिचित पळवाट म्हणून शेवटचा भाग लिहिला असेल. जे असेल ते असो, पण इट जस्ट डझन्ट वर्क. फार तर आपण त्याकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय स्वीकारू शकतो.
पहिला भाग मात्र खूपच चांगला, आणि दिग्दर्शकाने आपल्या डोक्याशी प्रामाणिक राहून केलेला आहे. अंगावर येणारे अनेक प्रसंग इथे आहेत. बेस्ट बसमधे लूकने केलेली मारामारी, ओलीस ठेवलेल्या मित्राचा खून करण्याचा-प्रत्यक्ष फार हिंसा न दाखवताही अंगावर येणारा (अन् बहुदा ब्रायन डी पामाच्या अनटचेबल्सच्या ऋणात असलेला) प्रसंग, घरातील कन्फ्रन्टेशन्स अशा अनेक जागा त्याने आपली चमक दाखविण्यासाठी खास योजलेल्या आहेत. दिग्दर्शक हे पहिली फिल्म आपली हुशारी, आपली बलस्थानं, आपला दृष्टिकोन यांच्याशी प्रामाणिक राहून करणं पसंत करतात. कश्यपने इथे हेच केलंय आणि पाँच शेल्व्ह होऊन, अन् ब्लॅक फ्रायडेवर बंदी येऊनही त्याने आपली दिशा बदललेली नाही, हे त्याच्या पुढल्या करिअरवरून दिसून येतं. 
`शैतान` हा बिजॉय  नाम्बीयारचा चित्रपट  `पाँच`चा अपडेट नव्हे. खरं तर काही बाबतीत तो पाँचहून अधिक चांगला आहे. त्यातला गडदपणा शेवटपर्यंत टिकून राहतो, तो भरकटत नाही. त्यातल्या व्यक्तिरेखा आपले मार्ग सोडत नाहीत, त्यातला सोशल मेसेज ओढून ताणून आणलेला वाटत नाही. मात्र निश्चितच हे सारं इथे योग्य त-हेने होण्याला कश्यपचा पाँचचा अनुभव अमुक एका प्रमाणात जबाबदार आहे हे निश्चित. मी तर असं म्हणेन की शैतान हा पाँचवरून केलेला नाही, मात्र पाँच नसता, तर शैतानदेखील बनू शकला नसता.
- गणेश मतकरी.

4 comments:

Suhrud Javadekar June 27, 2011 at 12:23 AM  

Ganesh, Shaitan's director Nambiar has said he hasn't seen Paanch and the similarity is just a coincidence...would you believe him?

ganesh July 5, 2011 at 6:29 AM  

the film is produced by kashyap. paanch is kashyap's arguably most famous and controversial film till date. shaitan has at least 3 major elements similar to paanch. its about a generation losing its way, its about a kidnapping gone wrong, it focuses on violence both visual and verbal.so ,you tell me...... would you believe him?

आनंद पत्रे August 2, 2011 at 10:16 PM  

पांच पाहिला, आवडला आणि तुम्ही लिहिलं ते संपुर्ण पटलंही.. आणि शैतान त्याची सुधारीत आवृत्तीही आहे...

Ayub Attar May 8, 2020 at 8:52 AM  

लॉक डाउन मुळे शांतपणे एका दिवसात पांच पाहता आला.प्रामाणिक पणे सांगायचे तर संपूर्ण आवडला . अनपेक्षित शेवटासह , हा 2003 मध्ये बनला आहे त्या काळातिल बनत असलेल्या चित्रपटा पेक्षा हा नक्की च वेगळा आहे . तुमचा लेख पुन्हा वाचला , नेहमी प्रमाणे उत्तम, मात्र काही काही मताशी असहमत , हरकत नाही , धन्यवाद.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP