कासाब्लान्का - आजही आजचा वाटणारा
>> Sunday, July 17, 2011
असं मानलं जातं की `कासाब्लान्का` चित्रपटाचा शेवट काय व्हावा याच्याबद्दलचा संभ्रम हा चित्रिकरणाच्या अखेरच्या दिवसापर्यंत कायम होता. नायिका इल्साने आपल्या प्रियकर रिकला सोडून क्रांतिकारक नव-याबरोबर अमेरिकेत पलायन करावं, का रिकबरोबर मागे राहून एकट्या नव-यालाच नाझी अधिका-यांपासून दूर, सुरक्षित ठिकाणी जाऊ द्यावं, असा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता. ही गोष्ट ऐकिवात जरूर आहे, पण ती खरी वाटत नाही. कासाब्लान्काचा शेवट इतका सर्व बाजूंनी जमलेला आहे की, त्याहून वेगळ्या शेवटाची कल्पना आज तरी अशक्य वाटते. एका परीने तो सुखांत आहे. सर्व प्रमुख पात्रांना जिवंत ठेवून तो प्रेक्षकांना समाधान तर देतोच, वर रिकच्या पात्राला स्वार्थापलीकडे पाहायला देऊन त्याला एक व्यक्तिरेखा म्हणूनही मोठं करतो. कासाब्लान्का अजरामर होण्यामागे जी अनेक कारणं आहेत, त्यातलं या शेवटाचं अचूक असणं, हे महत्वाचं कारण मानावं लागेल.
दिग्दर्शकीय दृष्टीचा सर्वोत्तम नमुना मानला जाणारा सिटीझन केन (१९४१) आणि लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारा कासाब्लान्का (१९४३) हे दोन चित्रपट एकमेकांपासून केवळ दोन वर्षांच्या अंतरावर येणं, हे हॉलीवूडसाठी या काळाची महती सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे.
कासाब्लान्का जेव्हा बनत होता तेव्हा, अन् प्रदर्शित झाला तेव्हाही, ही कलाकृती एवढी गाजेल असं कोणाच्या गावी नव्हतं. सिटीझन केनप्रमाणे तिच्याभोवती आधीपासून वलय नव्हतं,वा ती एखाद्या वादातही सापडलेली नव्हती. दिग्दर्शक मायकेल कर्टीझ हे अनुभवी दिग्दर्शक असूनही त्याच्या कामासाठी हा चित्रपट ना तेव्हा ओळखला गेला, ना आज हे नाव कासाब्लान्काशी जोडलेलं दिसतं.
प्रदर्शनानंतर चित्रपट उत्तम चालला, मात्र त्याची कीर्ती पसरत गेली, ती पुनर्प्रदर्शनातून आणि व्हिडीओ रिलीजमधून. आज कासाब्लान्का म्हणताच आठवतात ते हम्फ्रे बोगार्ट आणि इनग्रीड बर्गमन, मात्र ही दोघं देखील निर्मात्यांची प्रथम पसंती नव्हते. कासाब्लान्का ज्या नाटकावर आधारित होता ते देखील खूप महत्वाचं नाटक नव्हतं.
या सा-याच गोष्टींमध्ये एकप्रकारची अनिश्चितता दिसून येते, मात्र यशाला गणित नव्हतं. थोडा फॉर्म्युला, थोडी स्टार पॉवर, उत्तम पटकथा आणि बरेच योगायोग यांच्या जिवावर कासाब्लान्का गाजत राहिला. आजही त्याचं नाव सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अनेक याद्यांत स्थान मिळवून आहे, आणि आजही तो पाहाताना आपण गुंग होऊन जातो.
चित्रपट घडतो १९४१ मधे, नाझी साम्राज्याच्या वाटचालीदरम्यान, जर्मन फौजांच्या जाचातून सधन अमेरिकेकडे पलायन करण्याची इच्छा असणा-या युरोपीय नागरिकांसाठी `कासाब्लान्का` हे छोटंसं गाव खूप महत्वाचं ठरलेलं. इथूनच त्यांच्या सुटकेचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. मात्र तो खुला कऱण्याचा परवाना मात्र दुर्मिळ आहे. अनेकजण तो मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काहीच न घडता घडण्याचा आभास मिरवणारं, उत्साहाचा खोटा आभास तयार करणारं इथलं वातावरण हे चित्रपटाच्या कथानकासाठी योग्य ती पार्श्वभूमी तयार करणारं आहे.
रिक (बोगार्ट) कासाब्लान्कामधे एक नाईट क्लब चालवतो. रिकचा राजकीय त्रयस्थपणा हा त्याच्या नाईटक्लबच्या अन् स्वतःच्याही शिल्लक राहण्यामागचं प्रमुख कारण आहे. इथल्या पोलीस खात्याचा प्रमुख कॅप्टन रेनो (क्लॉड रेन्स) हा देखील त्याच्या मैत्रीत आहे तो या त्रयस्थपणामुळेच. मात्र नाझींना उघड विरोध करणारा चेक क्रांतिकारक पीटर लाझ्लो (पॉल हेन्रीड) आणि त्याची पत्नी इल्सा (बर्गमन) या गावात येतात आणि रिक धर्मसंकटात पडतो. पॅरिसमधे असतानाचं आपलं इल्साबरोबरचं प्रेमप्रकरण रिक विसरू शकत नाही. अन् तिचं लाझ्लोबरोबरचं अवतरणं त्याला विश्वासघात वाटतो. कर्मधर्मसंयोगाने लाझ्लोला अमेरिकेत पाठविण्यासाठी आवश्यक असलेला परवाना रिककडे असतो, मात्र लाझ्लोच्या कामाचा मोठेपणा लक्षात घेऊनही इस्लाला माफ करणं रिकला जड जाणारं असतं.
मुळात नाटकावर आधारित असलेल्या कासाब्लान्काचा नाटकासारखा आकार हा लपणारा नाही. इथल्या ब-याच घटना या रिकच्या नाईट क्लबमध्ये घडतात आणि पॅरिसमधल्या दिवसांचा छोटेखानी फ्लॅशबॅक अन् अखेरचा एअरपोर्ट वरला प्रसंग, हीच काय ती थोडी वेगळी पण अनावश्यक स्थळं आहेत. मात्र हा आकार असूनही फारसं बिघडत नाही, उलट काही प्रमाणात फायदाच होतो. चित्रपट यामुळे नाटकातल्या प्रवेशांप्रमाणे मोठे प्रसंग अन् अर्थपूर्ण संवाद रचण्यावर आपलं लक्षं केंद्रित करतो. घटना घडण्याच्या वेगापेक्षा त्या ठाशीवपणे सावकाश घडविण्याकडे लक्ष दिल्याने इथलं नाट्य चढत जातं.
चित्रपट आला तेव्हा बोगार्टची प्रतिमा ही साहसपट अन् फिल्म न्वार वर्गातले चित्रपट यामध्ये रुळलेली होती. त्यामुळे इथली रोमॅण्टिक पार्श्वभूमी प्रेक्षक कसे चालवून घेतील हा प्रश्नच होता. मात्र त्याच्या इतर भूमिकांचा ठसा इथे पूर्ण काढण्यात आला नव्हता, आणि हे या व्यक्तिरेखेच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी फायद्याचं ठरलं. बोगार्ट अन् बर्गमन यांची इथली कामं उत्तम आहेत. यात वादच नाही, पण त्यांना तुल्यबळ वाटेल अशी इथली भूमिका आहे, ती पोलीस अधिकारी रेनोची. क्लॉड रेन्सने या भूमिकेला दिलेला मिश्किलपणा या पूर्णपणे भ्रष्ट अन् भल्याबु-याची चाड नसलेल्या पात्राला सहानुभूती मिळवून देतो.
ही पात्रं लक्षात राहायला कारण, त्यांची अभिनेता म्हणून असणारी ताकद तर आहेच, मात्र त्याबरोबर त्यांच्यासाठी लिहिले गेलेले संवादही. या चित्रपटातील अनेक वाक्य अजरामर झालेली आहेत. आणि त्यांचं कुठेही वापरलं जाणं हे ताबडतोब कासाब्लान्काची आठवण जागवणारं आहे. `हिअर इज लुकिंग अॅट यू किड` , `वुई`ल ऑलवेज हॅव पॅरिस` किंवा `लुईस, आय थिंक धिस इज द बिगिनिंग ऑफर ब्युटीफुल फ्रेण्डशीप ` अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. पुढल्या काळात कासाब्लान्काचा प्रभाव हा अनेक चित्रपटांवर पडलेला दिसतो. बोगार्टने पुढे केलेल्या `टू हॅव अॅण्ड हॅव नॉट` आणि `सिरॉको`वर कासाब्लान्काचा प्रभाव होता, तर `ए नाईट इन कासाब्लान्का` किंवा वुडी अॅलनची प्रमुख भूमिका असणारा `प्ले इट अगेन सॅम` यामधे त्याचा विनोदी पद्धतीने वापर करण्यात आला होता. सिडनी पोलाकच्या `हवाना`सारखी काही आधुनिक रूपांतरही पुढल्या काळात केली गेली. मात्र या आधुनिक रुपांतराची फार गरज वाटत नाही वा प्रभाव पडत नाही, कारण मूळ चित्रपटच पुरेसा आधुनिक आहे. एखादी गोष्ट मोडलेली नसेल, तर ती दुरूस्त करण्याच्या फंदात पडू नये, असं म्हणतात. हॉलीवूडच्या बाबतीत, एखादा चित्रपट कालबाह्य झाला नसेल तर त्याची आधुनिक आवृत्ती काढायला जाऊ नये, असा अलिखित नियम काढायला हरकत नाही. चित्रकर्त्यांची अनेक आर्थिक संकटं टळायला त्याची नक्कीच मदत होईल.
- गणेश मतकरी

0 comments:
Post a Comment