चित्रपट कसा पाहावा?

>> Sunday, July 24, 2011

ब्लॉगचे मुख्य लेखक गणेश मतकरी यांच्या `सिनेमॅटिक` या दुस-या लेखसंग्रहाचे प्रकाशन  २२ जुलै २०११ रोजी बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पंधराव्या अधिवेशनात शिकागो येथे करण्यात आले. या पुस्तकातील लेखांबाबत गणेश यांचे मनोगत.
- ब्लॉगएडिटर. 


सिनेमा आपल्याला वेढून राहिलेला आहे. आपल्या असण्याचा चटकन जाणवणारा, पण अविभाज्य भाग बनून राहिलेला आहे. एकेकाळी आपल्याला आठवड्यात एकदा  टी.व्ही.वर आणि खास ठरवून केलेल्या चित्रपटगृहाच्या फे-यांमध्ये सिनेमा भेटत असे. आज ती परिस्थिती उरलेली नाही. सिनेमा आपल्याला कुठेही भेटतो. सदा सर्वकाळ चालू असलेल्या केबल चॅनल्सवर, मल्टिप्लेक्समधे, रस्त्यावरच्या डीव्हीडी विक्रेत्यांकडे, इन्टरनेटवरल्या टॉरन्ट साईट्सवर, आयपॅड किंवा मोबाईलच्या छोट्या स्क्रीन्समधून आणि अजून तग धरून असलेल्या फिल्म सोसायट्यांच्या छोट्या-मोठ्या दालनात. त्याचा हा सर्वव्यापी संचार, आपल्याला या माध्यमाची दखल घ्यायला भाग पाडणारा, नुसतंच कुंपणावर न बसता, त्याविषयी ठाम मत बनवण्य़ाची गरज तयार करणारा.
या पार्श्वभूमीवर, चित्रपटाकडे पाहण्याचे दोन प्रमुख दृष्टिकोन आज दिसून येतात.
यातला पहिला आहे, तो मीडिआ विस्फोटाआधीच्या पिढीचा, जी आजही सिनेमाकडे दुरून पाहते. त्याचं आयुष्यातलं स्थान मान्य न करता, केवळ करमणूक हेच सूत्र धरून राहते. बदललेलं चित्रच या पिढीला मान्य नाही. ती रस्त्यावरून डीव्हीडी विकत घेत नाही, इन्टरनेटचा उपयोग फक्त कामापुरता करते, आणि तंत्रज्ञानाच्या सोयी, या आक्रमण असल्याप्रमाणे धुडकावते. याउलट मी़डिआ विस्फोटानंतरची पिढी ही लहानपणापासून चित्रपटांच्या अधिक जवळ आहे. डीजिटल क्रांतीची ती साक्षीदार आहे. जागतिक फिल्ममेकर्स त्यांचे आदर्श आहेत, अन् जगातला कोणताही सिनेमा त्यांच्यापासून दूर नाही. हातातल्या मोबाईल फोन्सने त्यांच्यावर चित्रभाषेचे संस्कार करायला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष न भेटताही इन्टरनेटवरल्या गोतावळ्यात पसरलेल्या शेकडो मित्रांबरोबर चर्चा करण्याचा, सिनेमा हा त्यांचा आवडीचा विषय आहे.
आपला समाज हा एकत्रितपणे नांदणा-या या परस्परविरोधी दृष्टिकोनांचा बनलेला आहे. एका परीने `सिनेमॅटिक जनरेशन गॅप` आहे असं देखील म्हणता येईल. मात्र गॅपच्या दोन्ही तीरांवरल्या प्रेक्षकांसाठी चित्रपट माध्यम पुरतं उलगडलंय असं मात्र नाही. सर्व प्रकारचे चित्रपट आज आपल्याकडे असूनही, `चित्रपट कसा पाहावा? ` या मूलभूत प्रश्नाचं निश्चित उत्तर मात्र आजही संदिग्ध आहे.
एक गोष्ट उघड आहे की, चित्रपट हे माध्यम अतिपरिचित आहे. आणि कोणत्याही अतिपरिचित गोष्टीचं खरं मूल्य तपासून न पाहता तिला गृहीत धरणं, ही आपली सवय. त्यामुळेच असेल कदाचित, पण आपण चित्रपटाकडेही वरवरच्या नजरेतून पाहिलं जाणं हे आश्चर्य नसून अपेक्षित आहे.  विरंगुळा, करमणूक ही त्याची ओळख बनण्याचं, हे एक मुख्य कारण आहे.
 विरंगुळा म्हणून पाहणं चूक नाही, पण अपुरं आहे . चूक नाही, कारण ही एक व्यावसायिक कला आहे. प्रेक्षकाचं मन रमवणं हा तिच्याकडून असलेल्या अपेक्षांमधलाच एक भाग आहे. या पातळीवरून पाहिलेला चित्रपट आपल्याला त्याच्या सर्वांगाचं आकलन करून देणार नाही कदाचित , पण एका सर्वसामान्य दृष्टिकोनातून आपल्याला गुंतवणारा जरूर असेल. व्यावसायिक यशाची अपेक्षा असलेला कोणताही चित्रपट, हा या पातळीवरून परिणाम करणारा असतो, असावाच लागतो. मात्र त्यापलीकडे त्याचं आकलन होणं हे चित्रकर्त्यांच्या भूमिकेवर आणि प्रेक्षकांच्या तयारीवर अवलंबून राहतं.
मी चित्रपटाचं पद्धतशीर शिक्षण घेतलेलं नाही, पण चित्रपट जाणून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मी वेगवेगळ्या टप्प्यांवर नियमितपणे करतो. केवळ आवड असताना पाहिलेला सिनेमा, चित्रपटांविषयी लिहायला लागल्यावर नजरेला पडलेला सिनेमा, फिल्म सोसायटीच्या माध्यमांतून दिसलेला जागतिक पातळीवरचा सिनेमा आणि फिल्म सर्कल या छोट्या चित्रपटविषयक स्टडी ग्रुपशी संबंध आल्यावर अभ्यासलेला सिनेमा आठवला की लक्षात येतं, की यातल्या दूर टप्प्यावर तो पाहण्याची पद्धत वेगवेगळी होती. टप्प्यांचं महत्त्व हे, की त्या त्या वेळी माझ्या दृष्टीत बदल होतोय, हे निश्चितपणे जाणवलं.
 चित्रपटाविषयी लिहायला लागल्यावर आवश्यक म्हणून मी जे वाचन केलं, फिल्म सोसायटीने जे जागतिक चित्रपटांचं दालन उघडलं, यामुळे माझ्या लिहिण्यापाहण्यात आपोआप फरक होत गेला. मात्र अधिक उल्लेखनीय फरक झाला तो फिल्म सर्कलमुळे.
फिल्म सर्कल हा सात आठ जणांचा गट होता. त्यात काही दिग्दर्शक होते. काही समीक्षक तर काही फिल्म सोसायटीतली मंडळी. स्वतः दिग्दर्शक अन् अभ्यासक असलेल्या अरूण खोपकरांच्या पुढाकाराने एकत्र आलेला हा गट, त्यांच्याच घरी जमत असे. यावेळी चित्रपट पाहणं आणि त्यावर चर्चा तर होतच असे, पण एकूण माध्यम, त्याचा इतर कलांशी संबंध, त्यातल्या प्रमुख दिग्दर्शकांच्या कामाच्या पद्धती यांवर बोलणं होई. प्रत्येकाने घेतलेली नवी पुस्तके पाहिली जात, कधी देवाणघेवाण होत असे. लेखांच्या फोटोकॉपी आणि डीव्हीड़ी यांची तर सतत उलाढाल होत असे. प्रत्येकाचं चालू काम, आवडीनिवडी यालाही गप्पात प्रवेश होता. 
या प्रकारे काही एका हेतूने झालेल्या चित्रपट आणि कलाविषयक बोलण्यातून, चर्चेदरम्यान व्यक्त होणा-या मतांनी अन् वयातल्या फरकाने आलेल्या भिन्न अनुभवांनी, गटातल्या सर्वांचाच अमुक एक प्रमाणात फायदा झाला. अर्थात माझाही.
याबद्दल एवढं विस्ताराने लिहायचं कारण म्हणजे आज चित्रपट कसा पाहावा? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अशी स्टडी सर्कल्स ही योग्य जागा ठरेल. आज चित्रपटांच्या उपलब्धतेची कमी नाही, मात्र जितकी उपलब्धता अधिक, तितकाच त्यातलं काय घ्यावं आणि काय़ टाळावं हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा. एकेकाळी फिल्म सोसायट्यांच्या माध्य़मातून प्रेक्षकांच्या निवडीला दिशा देण्याचा प्रयत्न काही प्रमाणात झाला, मात्र आज सोसायट्यांच्या प्रयत्नालाही मर्यादा आहेत. एकतर नियमांच्या चौकटीत राहून त्या कोणते चित्रपट दाखवू शकतील यावर बंधने आहेत, जी स्वतंत्रपणे डीव्हीडी विकत घेणा-याला किंवा इन्टरनेटवरून डाऊनलोड करण्याला नाहीत. त्याशिवाय़ आजच्या धावपळीच्या जीवनपद्धतीत चित्रपटाच्यावेळी पोहोचणं सभासदांना कठीण, ते चर्चेला काय हजेरी लावणार? आज काही जागरुक फिल्म सोसायट्या या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांना यश येणं गरजेचं आहे. जोवर ते येत नाही, तोवर चित्रपट रसिकांनी स्वतःच काही उपाय शोधणं शक्य आहे.
 मित्रमंडळी, ऑफिसमधील सहकारी, गृहसंकुलांमधली मंडळं अशा समूहातल्या चित्रप्रेमींनी हा प्रयोग करून पाहणं जमू शकेल. केवळ व्यक्तिगत पातळीवर न राहता किंवा केवळ शेरेबाजी न करता या प्रकाराची छोटी स्टडी सर्कल्स चित्रपटाबद्दलची सतर्कता वाढवताना दिसू शकतील. माध्यमाकडे तेवढ्यापुरता मर्यादित चौकटीतून न पाहता चित्रपट संस्कृतीच्या आणि काळाच्या पार्श्वभूमीवर पाहण्याची सवय लागेल. या प्रकारच्या गटांमधूनही चित्रपट अभ्यासक-समीक्षक यांना मार्गदर्शनपर भूमिका घेता येईल, पण मला ते फार महत्त्वाचं वाटत नाही. केवळ आपलं मत तयारीनिशी मांडणं, हेच चित्रपट पाहणा-याला त्या मताचा गंभीरपणे विचार करायला लावणारं असतं. संस्काराकडे नेणा-या पहिल्या पायरीइतकं.
चित्रपट ही कला,  आणि तिचं कला असणं निर्विवादपणे सिद्धही झालेलं आहे, साहित्य वा चित्रकलेसारखी एका प्रतिभावंताच्या ताकदीवर अवलंबून असत नाही, तर त्यात अनेकांचा सहभाग असतो.  या चमूचा प्रमुख दिग्दर्शक असला, आणि तोच चित्रपटाचा अंतिम परिणाम ठरवतो हे खरं, पण तरीही यातल्या प्रत्येकाच्या कामगिरीचा स्वतंत्र विचार आवश्यक आहे. हे चांगला प्रेक्षक जाणतो. तो केवळ  एक एकसंध कलाकृती म्हणून चित्रपटाकडे पाहून तो थांबत नाही. तर दिग्दर्शन, पटकथा, छायाचित्रण, अभिनय अशा तिच्या विविध अंगांकडे तो तपशीलात पाहू शकतो. याचा उघड फायदा म्हणजे  प्रत्येक चित्रपट, अगदी फसलेला असला तरीही, त्याला काहीतरी देऊन जातो. मात्र त्याहून महत्त्वाचं म्हणजे घटकांचा स्वतंत्र अभ्यास, त्याला सुट्या कलाकृतीत न अडकवता, एकूण चित्रपट माध्यमाकडे पाहण्याची दृष्टी देऊ शकतो.
पाहणारा जर पुरेसा जागरुक असेल, तर ही दृष्टी केवळ माध्यमापुरतीही राहत नाही. एकूण कलाविचार, सामाजिक- राजकीय घटना तसंच समाजशास्त्र, तत्त्वज्ञान यांच्या विस्तृत पार्श्वभूमीवर आणि अनुषंगाने चित्रपटांचा कसा विचार करता येऊ शकतो, हे दाखवून देते.
 `सिनेमॅटीक` या माझ्या दुस-या लेखसंग्रहातलं लिखाण हे या प्रकारचं, एकट्यादुकट्या चित्रपटापलीकडे जाणारे धागेदोरे शोधणारं आहे.
आजचा सिनेमा हा कोलाज असल्यासारखा, वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांनी बनलेला आहे. अर्थगर्भ आणि अर्थहीन, व्यावसायिक आणि कलात्मक, खर्चिक आणि नो बजेट, ३५ मि.मी आणि डीजिटल, पारंपरिक आणि सर्व नियम झुगारणारे, असे सर्व प्रकारचे चित्रपट आज खांद्याला खांदा लावून उभे आहेत. चित्रपटांच्या या भाऊगर्दीत हरवून न जाता पाहिलं, तर काही सूत्रं, काही प्रवाह, काही पॅटर्न्स नजरेला पडतातच.
चित्रपट हे निर्वातात घडत नाहीत. त्याचं प्रत्येकाचं स्थान आणि विचार हे विशिष्ट काळाचे, विशिष्ट प्रदेशाचे आणि विशिष्ट वातावरणाचे असतात. आधी घडून गेलेल्या कामाचा या चित्रपटांना संदर्भ असतो, आणि पुढे होणा-या कामाकडे त्यातून निर्देश केला जातो. हा संदर्भ आणि निर्देश शोधत आजच्या चित्रपटाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न म्हणजेच हा लेखसंग्रह.
मला वाटतं, `चित्रपट कसा पाहावा?`  य़ा प्रश्नाचं माझ्यापुरतं उत्तर म्हणून `सिनेमॅटिक`कडे पाहता येईल.
-गणेश मतकरी

7 comments:

हेरंब July 25, 2011 at 11:19 AM  

सुंदर !!

प्रत्येक प्रकारच्या प्रेक्षकाने वाचावा असा लेख !!!

Vivek Kulkarni July 26, 2011 at 2:45 AM  

Hi, Ganesh congrats for brand new book on Cinema. BTW who published it and at what price? I wanted to have one copy.

ganesh July 26, 2011 at 6:45 AM  

Thanks heramb. Vivek, its published by majestic prakashan. You can get it in majestic shop in shivaji mandir, thane etc, pathfinder in pune mostly.

Suhrud Javadekar July 26, 2011 at 10:19 PM  

Ganesh,I agree with you entirely when you say that every film, even if its a bad or average one, gives the film-lover something...there are some portions even in bad films that are impressive..looking forward to reading the book..

Vivek Kulkarni July 28, 2011 at 3:45 AM  

Thank you Ganesh. Will get it soon.

Sneha September 11, 2011 at 8:23 AM  

Ganesh, first of all congratulations for your new book. Read the book and liked it very much. All the articles you write on the blog about different films are very good, but reading these articles which presented a broader picture, was a different experience. Got lot of new information about how these different genres evolved. Personally I liked the articles on Marathi cinema, The Exorcist and war movies the most. The article on Marathi cinema summarises the Marathi cinema in last decade perfectly and I agree completely with the arguments you have put forth. The historical analysis of shifts in the war movies was really good. And thoroughly enjoyed reading the story behind the production of the exorcist. I hope you will write more such articles in future.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP