रॉजर एबर्ट
>> Tuesday, August 16, 2011
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक रॉजर एबर्ट यांच्या `आय हेटेड, हेटेड, हेटेड धिस मुव्ही` या प्रतिकूल चित्रपट समीक्षासंग्रहाच्या प्रस्तावनेची सुरुवातच या दोन वाक्यांपासून होते. ही दोन वाक्य चित्रपट समीक्षकाच्या भूमिकेची सोप्या, स्पष्ट आणि अचूक शब्दांत व्याख्या करून थांबत नाहीत, तर एकूण दृष्टिकोन आणि तिरकस विनोदाची त्यांच्या लिखाणात नित्य दिसून येणारी झाक, या विषयीदेखील काही सांगून जातात.
चित्रपट समीक्षकांत तीन प्रकारच्या जमाती पाहायला मिळतात. सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारी आणि कनिष्ठ समजली जाणारी जमात आहे ती दैनिका, साप्ताहिकांत जागा भरून काढण्यासाठी जमेल तशी पानं भरणा-या समीक्षकांची. बहुधा चित्रपटांचं परीक्षण करण्यापेक्षा गोष्ट तपशीलात सांगून जागा भरण्याकडे या मंडळींचा कल असतो. त्यांना आपल्या चित्रपट विषयक ज्ञानात भर टाकण्याची गरज वाटत नाही, किंबहूना ते मुळात असावं असाही त्यांचा आग्रह नसतो. चित्रपटांकडे चिकित्सक दृष्टीने न पाहाता अनाहूत सल्ले किंवा दर्जाबद्दल फार खोलात न जाता रोखठोक निर्णय देण्याची त्यांना हौस असते. यांची समीक्षा ही केवळ जुजबी माहिती वाचकांपर्यंत पोहोचवू शकते, आणि दर आठवड्याला प्रदर्शित होणा-या चित्रपटांची माफक प्रसिद्धी करू पाहते.
सर्वात दुर्मिळ चित्रपट समीक्षक हे खरे तर चित्रपटांचे अभ्यासक असतात, आणि चालू चित्रपटांना ब-या वाईटाची लेबलं लावण्यापेक्षा एकूण चित्रपटांच्या इतिहासात त्यांना अधिक रस असतो. ही मंडळी वृत्तपत्रीय छापाच्या परिक्षणात कमी प्रमाणात पाहायला मिळतात. किंवा त्याप्रकारचं लेखन करूनही चित्रपटांचा एकूण स्वरूपाचा आढावा घेण्याची निकड त्यांना भासते. त्र्युफो, गोदार सारख्या फ्रेन्च न्यू वेव्हमधे पुढे आलेल्या दिग्दर्शकांचं समीक्षक असताना केलेलं लिखाण या प्रकारचं मानता येईल. ही फळी समीक्षणाच्या सर्वात वरच्या पातळीवरची म्हणता येईल.
या दोन पातळ्या सोडून मधली फळीही अस्तित्वात आहे, जिचं महत्त्व चित्रपट समीक्षेबाबत अनन्य साधारण म्हणावसं आहे. या वर्गात येणारे समीक्षक हे दोन्ही पातळ्यांचा सुवर्णमध्य साधणारे आहेत. यांचं लिखाण हे चालू चित्रपटांविषयी जरूर आहे, मात्र वरवरचं नाही. या मंडळींचा स्वतःचा असा अभ्यास आहे, आणि त्यांच्या लेखनाला मिळणा-या मर्यादित जागेतूनही त्यांची जाण सहजपणे कळण्यासारखी आहे. फिल्म थिअरीमधे या मंडळींकडून काही नवे विचार जातीलसं सांगता येत नाही. मात्र त्यांच्याकडून होणारा सर्वात मोठा फायदा आहे तो चित्रपट रसिकांना होऊ शकणा-या अचूक मार्गदर्शनाचा. या वर्गातलं लिखाण क्लिष्ट नाही, पण काही विशिष्ट अभ्यासातून आलेलं आहे. आपण पाहिलेला प्रत्येक चित्रपट हा जागतिक चित्रपटाच्या चौकटीत कुठे बसणारा आहे, हे या समीक्षकांना ठाऊक आहे, आणि ते शक्य तितक्या सोप्या भाषेत आपल्या वाचकांपर्यंत नेण्य़ाची त्यांची हातोटी आहे. समाजाच्या एका मोठ्या वर्गाला आपल्यापुढे येणा-या चित्रपटांकडे पाहण्याची एक विशिष्ट नजर देण्याचं काम या समीक्षकांनी केलं आहे.
अशा वर्गाला, जो स्वतःहून अभ्यासक चित्रसमीक्षा वाचायला जाणार नाही, मात्र विशिष्ट चित्रप्रवाह तयार होण्यास वा त्यांच्या भवितव्याला ज्याचा प्रतिसाद जबाबदार ठरू शकेल, अशा समीक्षकांमधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे शिकागो सन टाइम्समधून सातत्याने लिहिणारे, अन् चार-पाच दशकांहून अधिक काळ लेखणी चालवत राहिलेले रॉजर एबर्ट.
१९६७ पासून शिकागो सन टाइम्ससाठी लिहिणा-या एबर्ट यांनी फिल्म थिअरीमधे संशोधन करण्याचा प्रयत्न केला नसला, तरी त्यांचं लिखाण महत्त्वाचं ठरतं, याला अनेक कारणे आहेत. एबर्ट यांचा लेखनकाळ पाहिला तर लक्षात येईल की तो चित्रपटांतल्या मोठ्या स्थित्यंतरांना समांतर जाणारा आहे. गेल्या शतकाच्या पूर्वार्धात चित्रपट एक माध्यम म्हणून पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती प्रगती झाली होती. जगभरच्या चित्रपटांमधून या माध्यमाच्या `कला` असण्याविषयी संशय ठरणार नाही, अशा सकारात्मक वाटचालींची चिन्हं दिसायला लागली होती. फिल्म थिअरीचे आद्य नियम अस्तित्त्वात आले होते. अमेरिकेचं नाव हॉलीवूड नामक चित्रफॅक्टरीमुळे पूर्वीपासूनच पुढे होतं, मात्र शतकाच्या मध्यावर हॉलीवूडच्या स्वरुपातही बदल व्हायला लागला. स्टुडिओ सिस्टिम संपत आली आणि निर्मितीसंस्थांहून अधिक महत्त्व व्यक्तींना यायला लागलं होतं. दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यासाठी हा फार महत्त्वाचा काळ होता.
एबर्ट यांची लिहिण्याची सुरुवात ही हॉलीवूडच्या नवदिग्दर्शकांच्या व्यवसायात पडण्याच्या सुमारास सुरू होणारी आहे. दिग्दर्शकांच्या सुरुवातीच्या पिढ्या या व्यवसायातून शिकून मोठ्या झाल्या. त्यात अनुभवाचा भाग महत्त्वाचा होता. मात्र साठाव्या दशकाच्या उत्तरार्धात पुढे येणारे दिग्दर्शक हे नवे विचार घेऊन येणारे होते. त्यातले अनेक जण फिल्म स्कूल्समधून पद्धतशीर शिक्षण घेऊन आले होते, आणि अमेरिकेबरोबरच त्यांचा जागतिक चित्रपटांचाही अभ्यास होता. त्यांची कार्यपद्धती वेगळी होती, उद्दिष्टही वेगळी होती. केवळ भव्यता आणि मनोरंजनापलीकडे केवळ नफ्या-तोट्याच्या गणितापलीकडे पोहोचणारी त्यांची नजर होती. हे स्थित्यंतर आज पाहता चटकन लक्षात येणारं आहे. मात्र ते घडत असताना हा बदल जाणवणं आणि त्याबद्दल सामान्य माणसांना कळेलशा भाषेत लिहिणं हे गरजेचं होतं. एबर्ट यांनी ते करून दाखवलं.
शिकागो सन टाइम्समधे त्यांचं लिखाण तेव्हापासून आजतागायत चालू असलं, तरी त्यांच्या `अॅट द मुव्हीज विथ सिस्केल अँड एबर्ट` या समीक्षाप्रधान टीव्ही कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. चित्रपटाच्या दोन दृष्टिकोनांतून केल्या जाणा-या चर्चेबरोबरच त्याचा दर्जा दाखविणारी एक अतिशय साधी सोपी रेटिंग सिस्टिम त्यांनी सुरू केली, जी कदाचित तिच्या सोप्या असण्याने किंवा कदाचित शोच्या वाढत्या लोकप्रियतेने इतकी प्रसिद्ध झाली, की चित्रपटांनी आपल्या प्रसिद्धीसाठी (जाहिरातीत आणि व्हिडिओ कॅसेट्स अन् पुढे डीव्हीडी कव्हर्सवर) तिचा सर्रास उल्लेख करायला सुरुवात केली. ही सिस्टिम म्हणजे `थम्ब्स अप` किंवा `थम्ब्स डाऊन` देऊन चित्रपट चांगला वा वाईट दर्शवणं. एका गोष्टीचा मात्र उल्लेख आवश्यक आहे की, वरवर पाहता बाळबोध वाटूनही हे रेटिंग अतिशय अचूक असतं. सिस्केल/एबर्ट किंवा पुढे एबर्ट/रोपर यांनी ` टू थम्ब्स अप` दिलेला चित्रपट निःसंशयपणे उत्तम असतोच. या रेटिंगबद्दल आपल्या मनात तयार होणारा दृढ विश्वासदेखील या लोकप्रियतेमागे असू शकेल.
मला स्वतःला रेटिंग सिस्टिम फार आवडत नाहीत, कारण अनेक कनिष्ठ दर्जाच्या समीक्षकांनी त्याचा दुरुपयोग केलेला कायम पाहायला मिळतो. मात्र एबर्ट यांची रेटिंग सिस्टिम (थम्ब्स किवा शिकागो सन टाइम्समध्ये वापरलेली स्टार्स सिस्टिम) ही विवेचनाशिवाय येत नाही. किंबहुना, एका गंमतीची गोष्ट म्हणजे काही वेळा एबर्ट यांनी विवेचनात मांडलेले मुद्दे अन् रेटिंग यांच्यात तफावत आढळू शकते. म्हणजे प्रतिकूल मुद्दे असणा-या चित्रपटालाही अधिक स्टार मिळणं शक्य असतं. यावरचं एबर्ट यांचं स्पष्टिकरण म्हणजे, स्टार्सचा संबंध हा रंजनात्मक मूल्याशी आहे. जर चित्रप कंटाळवाणा नसेल, तर रेटिंगमध्ये स्पष्ट होणं गरजेचं आहे. उघडंच अधिक स्टार्स देऊन.
एका समीक्षकाला आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे चित्रपटाचा प्रेक्षक ओळखणं. ही गोष्ट एबर्ट नियमितपणे करताना दिसतात. एखादा गंभीर आशय सांगणारा चित्रपट, अॅक्शन चित्रपट किंवा सुपरहीरोपट यांना एकाच नजरेनं पाहणं शक्य नाही, अन् त्यावर स्वतःची आवड निवड लादणंही योग्य नाही, हे ते जाणतात. म्हणूनच
`हेलबॉय ` सारख्या सिनेमाची तुलना `मिस्टिक रिव्हर`बरोबर करणार नाहीत. हेलबॉयचा वर्ग सुपरमॅन/पनिशरसारख्या चित्रपटांचा आहे, तर मिस्टिक रिव्हरचा वर्ग अमेरिकन ब्युटी/युनायटेड स्टेट्स ऑफ लेलँड सारख्या चित्रपटांचा आहे, हे समीक्षकाने ध्यानात ठेवणं अन् त्यातल्या कोणत्याही वर्गाला वैयक्तिक मर्जीनुसार कमी न लेखता त्या त्या संदर्भाच्या अनुषंगाने त्यांचा आढावा घेणं हेच त्यांच्या दृष्टीने योग्य आहे.
प्रेक्षकांना उपदेश असण्यापेक्षा दृष्टिकोनातून केलेल्या लाऊड थिंकिंगसारखं एबर्ट यांचं लिखाण आहे. आजही या लिखाणात बनचुकेपणा आलेला नाही. खरंतर हे सहज शक्य होतं. १९७५मधे समीक्षेसाठी पुलित्झर पारितोषिक मिळवणारे ते पहिले विजेते ठरले. २००५मधे हॉलीवूडच्या सुप्रसिद्ध `वॉक ऑफ फेम`वर स्वतःच्या नावाचा तारा मिळवणारेही ते पहिले समीक्षक होते. बुद्धिजीवींपासून कलावंतांपर्यंत सर्वांनी सारखाच गौरव केलेला हा समीक्षक आहे. मुबलक लेखन केलेल्या या लेखकाचे बहुतेक लेखन पुस्तकरुपाने प्रसिद्ध आहे किंवा इन्टरनेटवर उपलब्ध आहे. अनेक महत्त्वाचे सन्मान मिळविलेल्या या समीक्षकाचा चित्रपटसृष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही ताजा, नव्यानेच या माध्यमाकडे पाहत असल्यासारखा आहे. स्वतःच्या मताची गुर्मी त्यांच्या नजरेत दिसत नाही. ही नजरच त्यांच्या मोठेपणाची खूणगाठ आहे.
-गणेश मतकरी
(`रुपवाणी`तील देशोदेशीचे समीक्षक सदरामधून)
4 comments:
ह्या लेखका बद्दल बरच ऐकलेलं होत. विशेष करून त्यांच्या थम्ब्स अप आणि थम्ब्स डाऊन बद्दल त्यांच्या बद्दल तुम्ही बॉल्गवर लिहिलात हि छानच गोष्ट आहे.कारण चित्रपट आणि तिथे रॉजर एबर्ट नाही हे जरा विचित्रच वाटत ...तुमच लेखन ( आणि चित्रपट परीक्षण सुद्धा )छान जमलंय.
Whenever I see an interesting film, I try to look up more about it on the internet. IMDB and RottenTomatoes were the two obvious choices when I started out.
Then I discovered Roger Ebert and after few days came across baradwaj rangan's blog blogical conclusion and then one day I stumbled upon your blog.
These are the three blogs that I make sure to visit when reading anything about a movie.
Please do tell me about some other fellows like Ebert.
He is extremly good.He may be is one of the best critic ever.Talking about his books his "You're movie sucks!" was excellent.Even his Roger Ebert presents was good.Unfortunate event for us he got that jaw cancer.
I even liked the reviews of Roger Moore actually.
Very few times you see this thing that this article showed,
"One Great Critic writing about Another Great Critic."
Thanks Lalit, Pradip and Anee.
Pradip, you can go to the website www.mrqe.com
They have many reliable reviews and a massive archive. You can find many good reviews from variety , rolling stones etc. I particularly like a james berardinelli .i believe he writes only on nate, but a collection of his reviews is also published. At least one i am aware of.
Post a Comment