थर्टी मिनिट्स ऑर लेस - फिक्शन/नॉनफिक्शन
>> Sunday, August 21, 2011
थर्टी मिनिट्स... हा एक गंभीर विषयाचा आधार घेणारा विनोदी सिनेमा आहे. त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या घटना या नाट्यपूर्ण आणि काही वादग्रस्त विषयांना स्पर्श करणा-या आहेत. जेव्हा मी चित्रपट पाहिला, तेव्हा तो संपूर्णपणे काल्पनिक असल्याचाच माझा समज होता. नंतर मला जेव्हा समजलं की एका शोकांत सत्यघटनेवरून चित्रपट स्फुरला आहे, तेव्हा मी त्याकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागलो. आता पहिला प्रश्न असा की, हा दृष्टिकोनातला बदल कितपत योग्य आहे ? कारण मुळात आपण चित्रपटाला सेल्फ कन्टेण्ड दृष्टीनेच पाहायला हवं. चित्रकर्त्यांनी सत्य घटनेशी संबंध नाकारला आहे, त्यामुळे आपणही तो लावणं फार बरोबर नाही, तसंच चित्रपटाच्या एक कलाकृती म्हणून आपण घेतलेल्या रसास्वादात मूळ घटनेची माहिती असण्या-नसण्याने काही फरक पडलेला नाही. मग असं का व्हावं ?
दुसरा प्रश्न असा की, विनोदनिर्मितीची मर्यादा कोणती ? आपण कोणत्याही गोष्टीकडे विनोदाने पाहणं योग्य आहे, वा काही विषय हे विनोदी हाताळणीपलीकडे असावेत ? खरं तर या प्रश्नाचा मी पूर्वी विचार केलेला आहे, अन् सर्वच विषय हसण्यावारी नेणं योग्य नाही असं त्याचं माझ्यापुरतं उत्तर आहे. त्यामुळेच कितीही नावाजला गेला, तरी रोबेर्तो बेनिनीच्या `लाईफ इज ब्युटिफुल`कडे मी सहानुभूतीने पाहू शकत नाही. ज्यू हत्याकांड हा विनोदी चित्रपटाचा विषय होणं हे मला फार मूलभूत पातळीवर अयोग्य वाटतं.
`थर्टी मिनिट्स ऑर लेस` ज्या घटनेवर आधारला आहे ती घटना काही इतक्या प्रचंड विकृतीशी अन् मृत्युंशी जोडलेली नाही. पण विकृती आहे, अन् मृत्युदेखील आहेच. आता प्रश्न अधिकच अवघड होतो, तो म्हणजे विनोदाची मर्यादा ठरवायचीच, तर ती केवळ नैतिक प्रश्नावर ठरवली जायला नको का ? ती अशा स्टॅटिस्टिकल गणितात कशी बसवता येईल?
`थर्टी मिनिट्स ऑर लेस` ही एका बँक दरोड्याची गोष्ट आहे. निक (जेस आयझेनबर्ग) आणि चेट (अझीझ अन्सारी) हे दोघे मित्र. निकची परिस्थिती बेताची. तो `थर्टी मिनिट्स ऑर लेस`मधे गि-हाईकांपर्यंत पिझ्झा पोहोचविण्याचा वादा करणा-या पिझ्झा पार्लरमधे नोकरी करतो. तिथेही त्याची मालकाबरोबर भांडणं चालूच आहेत. चेट एका शाळेत शिक्षक आहे. मात्र सध्या दोघांमध्ये थोडो बेबनाव झालेला.
ड्वेन (डॅनी मॅकब्राईड) आणि ट्रॅवीस (नीक स्वार्डसन) हेदेखील मित्र, पण दोघेही गुंड प्रवृत्तीचे. आपल्या वडिलांकडून पैसे मिळण्याची आशा संपल्यावर ड्वेन त्यांना मारायचं ठरवतो. मारेक-याला देण्यासाठी पैसे मिळविण्याकरीता ते एका बँक दरोड्याची योजना आखतात. मात्र हा दरोडा ते स्वतः घालणार नसतात.
रात्री उशिरा आलेली पिझ्झा ऑर्डर पूर्ण करायला गेलेला निक या दोघांच्या तावडीत सापडतो. त्याच्यावर बॉम्ब लावलेलं एक जॅकेट जखडलं जातं. आणि काही तासांच्या आत लाखभर डॉलर मिळविण्याची जबाबदारी त्याच्यावर ढकलली जाते. बँकेवर दरोडा घालण्यावाचून दुसरा मार्ग नसलेला निक आपल्या मित्राची मदत मागतो, आणि दोघं जण बँकेकडे मोर्चा वळवतात.
२००३मधे अमेरिकेत घडलेली मूळ घटना कितीतरी अधिक भयंकर म्हणता आली, तरी त्याचा सेट अप हा जवळजवळ असाच आहे.
अर्थात, सत्य घटना म्हणजे विनोदी चित्रपट नसल्याने दरोडा टाकून बँकेबाहेर पडलेल्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी पकडलं, आणि बॉम्ब स्क्वाडची वाट बघत असतानाच बॉम्ब फुटला. त्याहून विदारक सत्य म्हणजे हा माणूस केवळ निरपराध बळी नव्हता, तर दरोड्याची योजना आखण्यातही त्याचा हात होता. केवळ आपल्याला बांधला जाणारा बॉम्ब खोटा असणार, हा त्याचा तर्क चुकीचा होता. अर्थात, ख-या बॉम्बला घाबरूनही त्याने दरोड्याची योजना पार पाडायला अन् इतर अनेकांचा जीव धोक्यात घालायला नकार दिला नाहीच.
ही मूळ घटना तिच्या केवळ तिच्या केवळ सत्य असण्यानेच नव्हे तर त्यातून पुढे येत असलेल्या नैतिक प्रश्न अन् सामाजिक पार्श्वभूमीमुळेही अधिक अर्थपूर्ण आणि अनपेक्षित आहे. मात्र दिग्दर्शक रुबेन फ्लेशरनी मात्र केवळ चमत्कृतीपूर्ण विनोदी चित्रपट करण्यावरच आपलं लक्ष केंद्रित केलंय.
`झोम्बीलॅण्ड` या पहिल्या चित्रपटातही विनोदाशी संबंध नसलेल्या विषयाची गंमतीदार कॉमेडी करून दाखवि्ण्यात फ्लेशरला यश मिळालं असल्याने त्याने त्याच शैलीत पुढे जां पसंत केलं असेल, पण त्यामुळे एका चांगल्या कल्पनेचं नुकसान होतं, हे मात्र खरं. `बॉईज डोन्ट क्राय` सारख्या अस्वस्थ करून सोडणा-या चित्रपटाला जर एखादी क्रॉसड्रेसिंग कॉमेडी म्हणून सादर केलं असतं, तर मूळ घटनेवर किती अन्याय झाला असता, याची कल्पना आपल्याला हा चित्रपट पाहून येऊ शकते. सत्यघटनेच्या संदर्भाने आणखीही काही गोष्टी स्पष्ट होतात. आणखीही काही गोष्टी स्पष्ट होतात.
कथानकाचं तर्कशास्त्र हे स्वतंत्रपणे गोंधळाचं वाटतं. उदाहरणार्थ दरोडा घालून पैसे मिळवणं अशी चित्रपटीय गुन्हेगारांची योजना पटण्याजोगी, पण मारेक-याला देण्यासाठी पैसे, हा तपशील अनावश्यक किंवा चिकटवलेला वाटतो. तो असण्याचं कारण मूळ घटनेत सापडेल. त्य़ाशिवाय दरोड्यापर्यंत अनपेक्षित वळणाने जाणारी गोष्ट पुढे अगदी नेहमीच्या वळणावर येते. कारण इथे मूळ कथानकाचा गाभा संपतो, अन् सुखांत शेवट साधण्यासाठी दिग्दर्शक -पटकथाकाराला नेहमीच्याच कसरती, पण मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात.
अर्थात, या गोष्टी चित्रपट पाहताना फार खटकत नाहीत, कारण फ्लेशरपासून आयझेनबर्गपर्यंत अनेक सहभागी कलावंतांना आपल्या क्षेत्राची उत्तम जाण आहे, चित्रपटाची लांबीही कमी आहे, आणि घटना पटापट घडवत नेताना तो आपल्याला विचार करण्यासाठी फार उसंत देत नाही. एक गोष्ट मात्र थोडी खटकली, ती म्हणजे नाव. नाव स्वतंत्रपणे चांगलं असूनही इथे ते अनावश्यक वाटतं. किंबहूना दिशाभूल करणारं बँक रॉबरी आणि बॉम्बची डेडलाईन या दोन्ही गोष्टी माहीत असल्याने, आपण ते कथानकाशी जोडू पाहतो, अन् रॉबरीची डेडलाईन ३० मिनिटं आहेत की काय, अशी आपली कल्पना होते. प्रत्यक्षात मात्र पिझ्झा डिलिव्हरी संबंधातली एक लोकप्रिय कॅचफ्रेझ यापलीकडे तिला अर्थ नाही. असो.
`झोम्बीलॅण्ड` खूपच आवडला असूनही, अन् शैलीची पुनरावृत्ती अपेक्षित असूनही `थर्टी मिनिट्स ऑर लेस` च्या एकूण कलाविचाराशी मी पूर्णतः सहमत नाही, हे उघड आहे. तरीही स्वतंत्रपणे केवळ विनोदात अडकून राहिलेल्या, आणि निव्वळ हास्यनिर्मितीवर लक्ष केंद्रित करणा-या चित्रपटांच्या लाटेत वेगळा दिसून येणारा चित्रपट आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. निर्वातात घडणा-या चित्रपटांपेक्षा विशिष्ट समाजाची अन् वास्तवाची चौकट घेऊन येणारे चित्रपट हे कधीही अधिक जवळचे वाटणारे असतात. त्यासाठी त्यांच्या काही उणिवा माफ करायलाही हरकत नसते, याच मताचा मी आहे.
- गणेश मतकरी.
1 comments:
बघायला पाहिजे ...बँक दरोड्य वर आधारित quick change मध्ये विनोदी मांडणी चांगलीच केलीय आणि दरोड्याचा यशस्वी प्रयत्न सुद्धा
Post a Comment