स्टॅनले क्युब्रिक / डॉ. स्ट्रेन्जलव्ह ऑरः हाऊ आय लर्न्ड टू स्टॉप वरिईंग अ‍ॅन्ड लव्ह द बॉम्ब

>> Monday, August 29, 2011


बहुतेक दिग्दर्शकांची शैली किंवा विषयाच्या निवडीतलं त्यांचं स्वारस्य हे कालांतराने रसिकांच्या ओळखीचं व्हायला लागतं. त्यांचे चित्रपट काय प्रकारचे असणार, हे साधारण लक्षात यायला लागतं. मात्र या अलिखित नियमाशी फारकत घेणारे सन्मान्य अपवाद आहेत, त्यामधे स्टॅनली क्युब्रिकचं नाव फार अग्रणी ठरतं. क्युब्रिकचे चित्रपट हे त्यांचे विषय, उपप्रकार, दृश्यमांडणी, अभिनयशैली आणि दिग्दर्शकीय दृष्टिकोन यामध्ये एकमेकांपासून इतके कमालीचे वेगळे आहेत की, त्यामागला एकाच दिग्दर्शकाचा हात हा सांगितल्याखेरीज स्पष्ट होऊ नये. रेसकोर्सवर अतिशय योजनाबद्ध रीतीने घातलेल्या दरोड्याचा अनपेक्षित अंत (द किलिंग), रोमन पार्श्वभूमीवरला भव्य कॉश्च्युम ड्रामा (स्पार्टाक्स), अल्पवयीन सावत्र मुलीकडे आकर्षित होणा-या बापाची शोकांतिका (लोलिता), सायन्स फिक्शनमधील माईलस्टोन असणारी विज्ञान आणि मानवातील तणावपूर्ण कथा (२००१ः ए स्पेस ओडिसी) स्वातंत्र्य, कायदा आणि हिंसाचार यांची धक्कादायक भेसळ कऱणारी फॅण्टसी (क्लॉकवर्क ऑरेंज), मानसशास्त्रीय वळणांवर प्रेक्षकांना घेऊन जाणारी भूतकथा (द शायनिंग) असे त्याच्या चित्रपटाचे विषय पाहिले तरी त्याच्या हरहुन्नरी पण यशस्वी कारकीर्दीचा अंदाज येऊ शकतो.  `डॉ. स्ट्रेन्जलव्ह ऑरः हाऊ आय लर्न्ड टू स्टॉप वरिईंग अ‍ॅन्ड लव्ह द बॉम्ब` हा क्युब्रिकच्या अतिशय लोकप्रिय आणि अतिशय अवघड चित्रपटांपैकी एक. १९६४मधे म्हणजे कारकिर्दीच्या पूर्वार्धात आलेला, तरीही या दिग्दर्शकाची माध्यमावरची (म्हणजे केवळ तंत्रावरची नव्हे, तर आशयाची देखील) पकड दाखविणारा.
चित्रपट क्षेत्रात येण्याआधी क्युब्रिकची दृश्य माध्यमाची आवड स्पष्ट झाली, ती फोटो जर्नलिझममधून. क्युब्रिकच्या ड़ॉक्टर वडिलांनी त्याला लहान वयातच कॅमेरा घेऊन दिला होता. त्याचा तो सराईतपणे वापर करीत असे. लवकरच या कामात तो इतका तरबेज झाला, की `लूक` सारख्या नावाजलेल्या मासिकातून त्याची छायाचित्रे प्रसिद्ध व्हायला लागली. थोडा मोठा झाल्यावर मात्र त्याने आपला रोख वळवला तो चित्रपटांकडे.
अगदी सुरुवातीच्या काळात जेम्स बी हॅरीस या निर्मात्याबरोबर केलेल्या द किलिंग (१९५६) आणि पाथ्स ऑफ ग्लोरी (१९५७) या चित्रपटांनी क्युब्रिक हे प्रकरण काय आहे, हे हॉलीवूडच्या लक्षात आणून दिलं. किलिंगने फार पैसा मिळविला नसला तरी अनेक मोठ्या अभिनेत्यांनी या नव्या दिग्दर्शकाची दखल घेतली. मार्लन ब्रँडो, कर्क डग्लस, यांच्यासाठी चित्रपटाचे खास शोज लावले गेले, आणि पाथ्स ऑफ ग्लोरीमधे तर त्या मानाने या नव्या दिग्दर्शकाला डग्लसबरोबर काम करण्याची संधीही मिळाली. पाथ्स ऑफ ग्लोरीचं छायाचित्रण पाहिलं तर त्यात एक वैशिष्ट्य दिसून येतं, जे स्टॅनली क्युब्रिकच्या चित्रपटांत कायम पाहायला मिळतं, ते म्हणजे सतत हलणारा कॅमेरा. एका जागी कॅमेरा बसवून दृश्य चित्रित करण्यापेक्षा तो हलता ठेवणं, हे प्रेक्षकाला दृश्यात गुंतवतं, आणि प्रसंगाची गती, किंवा त्यातला तणावही अधिक प्रभावीपणे मांडता येतो, हे इथे क्युब्रिकच्या लक्षात आल्याचं जाणवतं.
डग्लसबरोबर लगेचच केलेला स्पार्टाकस मात्र क्युब्रिकच्या प्रकारातला वाटत नाही, जरी आपण `क्युब्रिकचा प्रकार` अशी एक ढोबळ संकल्पना उभी करू शकलो तरीही. अर्थात याला आणखीही एक कारण होतं, ते म्हणजे क्युब्रिक हा आयत्यावेळी आणलेला दिग्दर्शक होता. दिग्दर्शक अँन्थनी मॅनबरोबर डग्लसचं वाजल्यानंतर एके शुक्रवारी क्युब्रिकला निरोप आला, की सोमवारी सकाळी तू चित्रिकरणाला सुरुवात करू शकलास, तर तू स्पार्टाक्सचा नवा दिग्दर्शक. क्युब्रिक तयार झाला, आणि एक संस्मरणीय चित्रपट तयार झाला. गंमत म्हणजे, या दिग्दर्शकाला स्पार्टाक्समधे आणताना डग्लसची कल्पना होती की, तो आपल्या हाताखाली काम करेल. पण क्युब्रिकने चित्रपटाचा जो ताबा घेतला तो घेतला. डग्लसबरोबर पुढे त्याचंही पटेनासं झालं. `स्टॅनली क्युब्रिक इज ए टॅलेन्टेड शिट`! हे डग्लसचं वक्तव्य हा देखील त्याचा पुरावाच आहे.
स्पार्टाक्स आणि क्युब्रिकचे नंतरच्या कालावधीतले चित्रपट यामधला एक महत्त्वाचा फरक, म्हणजे कल्पनेच्या भव्यतेपुढे यातला मानवी भाव भावनेचा उद्रेक झाकोळून जात नाही. क्युब्रिकचे पुढले बरेचसे चित्रपट हे घटनांना माणसांच्या पुढे उभे करणारे होते.
 २००१ः ए स्पेस ओडिसी (१९६८) सारख्या चित्रपटांत तर माणसांचाच वापर हा कॅरेक्टरपेक्षा प्रॉपर्टीसारखा अधिक वाटावा. लोलितासारख्या अधिक व्यक्तिप्रधान चित्रपटाकडून डॉ. स्ट्रेन्जलव्हकडे वळणं, ही या बदलाची सुरुवात म्हणावी लागेल. स्ट्रेन्जलव्ह हा त्या काळचा चित्रपट होता, जरी आश्चर्यकारकपणे तो आजही कालबाह्य वाटत नाही. शीतयुद्ध या काळात जोर धरून होतं, आणि अण्वस्त्रांची छाया जगावर अशी काही पसरली होती, की जगाचा विनाश हा अंतिमतः अणुयुद्धामधेच होणार अशी सर्व समाजाच्या मनाची तयारी झाली होती. या परिस्थितीत हा गंभीर विषय खिल्ली उडविण्याकरीता निवडणं हे एक धाडसचं म्हणावं लागेल.
अर्थात या चित्रपटाची सुरुवात काही ब्लॅक कॉमेडी म्हणून झाली नाही. पीटर जॉर्जच्या `रेड अलर्ट` या अणुयुद्धाशी संबंधित गंभीर कादंबरीवरून तितकाच गंभीर चित्रपट करावा असा मनसुबा होता. त्या दृष्टीने पटकथा रचायला सुरुवातही झाली. मात्र हॅरीस आणि क्युब्रिक चर्चेला बसले की अचानक त्यांना या व्यक्तिरेखांच्या वागण्यातील विसंगती, किंवा त्या पार्श्वभूमीवर घडू शकतीलसे विनोदी प्रसंग दिसायला लागत, आणि चर्चेचं गांभीर्य ठेवणं अशक्य होऊन बसे. पुढे हॅरीस वेगळा झाल्यावरही क्युब्रिकने हा विसंगतीचा मार्ग सोडला नाही आणि टेरी सदर्न या पटकथाकाराला बरोबर घेऊन स्ट्रेन्जलव्हची एक राजकीय उपहासात्मिका करून सोडली.

आपल्या मार्गावरून भरकटलेली माणसं, ही क्युब्रिकच्या अनेक चित्रपटांत आहेत. त्याप्रमाणे ती इथेही दिसतात. पण माणूस आणि तंत्रज्ञान यांच्यामधे तयार झालेलं नातं, जे २००१मधे पुढल्या टप्प्यावर नेलं गेलं, ते पहिल्यांदा स्ट्रेन्जलव्हमधे आलेलं दिसतं. इथल्या सर्व व्यक्तिरेखा या अतिशय शक्तिशाली जगांवर विराजमान झालेल्या आहेत, आणि आपल्या हातातील शक्तीकडे, आपल्या पुरुषार्थाचा, मर्दानगीचा, पुरावा म्हणून पाहणा-या आहेत. (त्यासाठी मर्दपण दाखविणा-या तथाकथित प्रतिकांचा वापरही मुबलक आहे. भ्रमिष्ट जनरल फ्रँक डी रिपर याच्या हातातला चिरुट, किंवा अखेरच्या दृश्यात मेजर किंग काँगने मांड ठोकलेलं अण्वस्त्र अशी प्रतिकं इथे शोधली तर सापडतील.) मूळ कादंबरी गंभीर असल्याने म्हटलं तर .येऊन ठेपलेला प्रसंगही गंभीर आहे. अमेरिका आणि रशिया आपापल्या अस्त्रांना घट्ट धरून आहेत. त्यातच एक अफवा आहे की, रशिया एका डुम्सडे डिव्हाईस नावाच्या भयानक अस्त्राच्या रचनेत गुंतलेला आहे. अशा परिस्थितीत डोकं पुरतं जागेवर नसलेला जनरल जॅक डी रिपर (स्टर्लिंग हेडन) आपल्या तुकडीतल्या अण्वस्त्रधारी विमानांना रशियावर हल्ला करण्याची आज्ञा देऊन मोकळा होतो. त्याला परावृत्त करण्याच्या प्रयत्नात असलेला ब्रिटिश ग्रुप कॅप्टन मॅट्रेकचाही (पीटर सेलर्स) यावर काही उपाय चालत नाही.
रिपरच्या आततायी निर्णयाने हादरलेले सैन्यप्रमुख आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष मफली (पुन्हा पीटर सेलर्स) पेन्टेगॉनच्या वॉर रुममध्ये जमून तोडग्याचा विचार करायला लागतात. मात्र एके काळचे नाझी अधिकारी पण आता अमेरिकेचे शस्त्रास्त्र सल्लागार जनरल बक टर्गिडसन (जॉर्ज सी. स्कॉट) हे तोडगा काढण्याऐवजी गुंता वाढवायलाच अधिक मदत करतात. त्याचवेळी अण्वस्त्र घेऊन जाणारं रिपरच्या तुकडीतलं विमान `लेपर कॉलनी` हे रशियाच्या जवळ येत असतं, आणि मेजर काँग आपल्या कर्तव्याला जागणार यात काही शंका उरत नाही.
स्ट्रेन्जलव्हचा उपहासात्मक विनोद हा प्रासंगिक आणि शाब्दिक या दोन्ही प्रकारचा आहे. अण्वस्त्र स्पर्धेचा होऊ घातलेला खेळ, किंवा या स्पर्धेला जबाबदार हे तंत्रज्ञान नसून माणसाचा कमकुवतपणा आहे. यासारखी स्पष्ट करण्याजोगी विधानं तर चित्रपट करतोच, वर अनेक छोट्या-मोठ्या जागांमध्ये तो आपली गि-हाईकं शोधतो. सेनाधिका-यांच्या वृत्तीवरला टोमणा जनरल बकच्या शाळकरी उत्साहात दिसून येतो. बकला तोडगा काढण्याहून युद्ध करण्यातच अधिक रस आहे, रशियाचं डुम्सडे डिव्हाईस आपल्याकडे नाही याचं त्याला वाईट वाटतं आणि एका क्षुल्लक चुकीमुळे संपूर्ण योजनेला दोष देण्यात अर्थ नाही, असं त्याचं प्रामाणिक मत आहे, मग त्या चुकीमुळे जगाचा विनाश का ओढवेना, राष्ट्रांमधला वरवरचा सुसंवाद आणि मैत्रीपूर्ण संबंधांचंही इथे हसं उडवलं जातं. राष्ट्राध्यक्ष मफलींचं रशियन प्रीमियर दमित्री किसॉफ बरोबरचं पीटर सेलर्सने जवळजवळ उस्फूर्तपणे रचलेलं फोनवरचं संभाषण हा चित्रपटाचा एक हायलाईट आहे. खेरीज अमेरिकतलं कॉर्पोरेट्सचं वाढणारं वर्चस्व सूचित करणा-या कोका कोला मशिन फोडण्याच्या प्रसंगासारख्या जवळपास अदृश्य जागाही इथे आहेत. ज्या जागरुकपणे पाहिल्या तरच स्पष्ट होतात.
`जन्टलमेन, यू कान्ट फाईन इन हिअर, धिस इज वॉर रूम!` हे बहुधा स्ट्रेन्जलव्हमधील सर्वात गाजलेलं वाक्य. पण इथला शाब्दिक विनोद त्या वाक्यापुरता मर्यादित नाही. जनरल बक हे इथलं एकच उघड विनोदी पात्र असलं, तरी विक्षिप्तपणाची झाक ही मफलीपासून काँगपर्यंत सर्वच पात्रांमधे आहे, आणि वेळोवेळी ती त्यांच्या संवादातून प्रगट होते. मात्र एका गोष्टीची नोंद जरूर घ्यावी लागेल, की विनोदाच्या किती आणि कुठे आहारी जावं याची क्युब्रिकला उत्तम जाण होती. पीटर सेलर्सने अतिशय परिणामकारकपणे केलेल्या तीन व्यक्तिरेखांमधला तोल दिग्दर्शकाने ज्या प्रकारे ठेवला आहे, त्यात ही जाण दिसून येते.
सेलर्सच्या मनात मफलीची व्यक्तिरेखा अधिक उघडपणे विनोदी करण्याचं होतं. त्यासाठी सर्दी झालेल्या, कायम इन्हेलर बाळगणा-या बावळट ध्यानासारखी ही व्यक्तिरेखा त्याने रचली होती. मात्र काही प्रसंग चित्रित केल्यावर क्युब्रिकला हे चित्रण पटेना. घडणा-या प्रसंगात हा माणूस खंबीर दिसला तरच त्याची असहाय्यता पोहोचेल आणि परिणामी विनोद अधिक धारदार होईल, हे त्याच्या लक्षात आलं, आणि पीटर सेलर्सला ही भूमिका उघड विडंबन  न करता सादर करण्यासाठी त्याने भाग पाडलं.
स्ट्रेन्जलव्हचा शेवटही उल्लेखनीय आहे, तो दिग्दर्शकीय कामगिरीसाठी. चित्रपट कॉमेडी (मग ती काळी का असेना) असल्याने शेवट सुखांत करण्याचा मोह दिग्दर्शकाला होणं स्वाभाविक होतं. हा मोह आवरून, क्युब्रिकने अपरिहार्य युद्धाच्या प्रतिमांवरच चित्रपटाचा शेवट केला आहे. आणि पार्श्वभूमीला `वुई विल मीट अगेन` हे आनंदी गाणं विरोधाभास आणत वापरलं आहे. शेवट हा वॉर रूममधल्या पाय फाईटवर करण्याची योजना होती, जिथे फेकले जाणारे पाय ही अण्वस्त्रांची प्रतिकं होती. मात्र चित्रिकरण झाल्यावर क्युब्रिकने हा प्रसंग काढून टाकला. हा निर्णय योग्य होता, कारण चित्रपटाचा परिणाम त्यामुळे कमी झाला असता.
स्ट्रेन्जलव्ह नंतर अशा प्रकारचा उघड विनोदी चित्रपट क्युब्रिकने केला नाही, पण त्याच्या बदलत जाणा-या विषयांच्या पद्धतीकडे पाहता ते अपेक्षितही होतं. नंतरच्या काळात त्याचे चित्रपट अधिकाधिक लार्जर दॅन लाईफ होत गेले आणि व्यक्तिरेखा निमित्तमात्र. अगदी शायनिंगसारख्या एका व्यक्तीच्या भ्रमिष्ट होत जाणा-या चित्रपटात, जॅक निकोलसन सारख्या उत्कृष्ट नटाने काम करूनही अधिक परिणामकारक वाटतं ते या उदास हॉटेलमधील झपाटलेलं वातावरण. मग क्लॉकवर्क ऑरेन्जसारख्या समाजव्यवस्थेवर टीका करणा-या चित्रपटांत किंवा २००१सारख्या विज्ञान आणि मानवतेवर चिंतन करणा-या चित्रपटात व्यक्तिरेखा दुय्यम ठरल्या तर आश्चर्य नाही.
१९९९मधे कालवश झालेल्या क्युब्रिकचा अखेरचा चित्रपट होता आईज वाईड शट. जवळजवळ सरिअँलिस्ट असलेल्या या चित्रपटावरही क्युब्रिकच्या टिकाकारांनी तोंडसुख घेतलं. आपल्या चित्रपटांतून स्त्रिया क्वचितचं दाखवणा-या क्युब्रिकच्या या चित्रपटातल्या मुबलक नग्नतेवरही ताशेरे ओढले गेले. अशी टीका करणं सोपं असलं तरी या दर्जाच्या दिग्दर्शकाच्या बाबतीत ते योग्य म्हणता येणार नाही. क्युब्रिक कायमच आपल्या चित्रपटांचा तपशीलात विचार करीत आला आणि तो करण्यासाठी पुरेसा वेळ घेत आला. त्याचे अखेरचे तीन चित्रपट पाहिले, तर शायनिंग आणि फुल मेटल जॅकेटमधे सात वर्षांचं अंतर होतं, तर फुल मेटल... आणि आईज वाई़ड...मधे बारा वर्षांचं अंतर होतं. प्रत्येक चित्रपटाचा पूर्ण विचार झाल्याखेरीज तो सुरू करीत नसे. (त्यामुळेच त्याने `सुपरटॉईज लॉस्ट ऑल समर लाँग` या लघुकथेवरला ए. आय. पुढे ढकलत नेला, आणि अखेर तो स्पीलबर्गने स्वतंत्रपणे पूर्ण केला.) आईज वाईड शटदेखील त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणेच भरकटलेल्या मनुष्यस्वभावाच्या कथासूत्राला पुढे नेणारा होता. त्यातलं वातावरण किंचित अनोळखी होतं इतकंच. पण क्युब्रिकच्या कोणत्या चित्रपटात ओळखीचं वातावरण असतं ? क्युब्रिक हा हॉलीवूडचा असून हॉलीवूडला कायम परका राहिला. त्याने चित्रपट ना कोणत्या व्यावसायिक गणितात बसवले, ना कोणत्या फॉर्म्युल्याचा आधार घेतला. पण त्यामुळेच हे चित्रपट आजही स्वतःचं वेगळं अस्तित्त्व टिकवून ठेवताना दिसताहेत. आणि उद्याही ते तितकेच ताजे वाटले तर त्यात आश्चर्य नाही.
- गणेश मतकरी. 

4 comments:

हेरंब August 29, 2011 at 8:13 AM  

अतिशय आवडला लेख. क्लॉकवर्क आणि शायनिंग बघितलेत. बाकीचे सगळे नक्की बघेन आता.

Vivek Kulkarni August 29, 2011 at 11:38 PM  

Khup chan article. Stanly Kubrick baddal khup eekun hoto ata chitrapat pahun gein,

विशाल तेलंग्रे October 4, 2011 at 10:47 AM  

शब्द नाहीत, अतिशय माहितीपूर्ण लेख. आम्ही क्युब्रिकचे फार वेडे... हेरंबाने रेकमेंड केलेत, सगळे पाहतो... क्लॉकवर्क, शायनिंग, २००१: ए स्पेस ओडिसी बघितलेत अगोदर, आज डॉ. स्ट्रेन्जलव्ह, व बाकीचे काही दिवसांतच...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP