आयुष्यावरला प्रभाव आणि चित्रपट - साधनाच्या विशेषांकात न आलेला निबंध

>> Monday, August 19, 2013


निवड ही नेहमी अवघड गोष्ट असते. आपल्यासमोर शेकडो उत्तम गोष्टी असताना आपण त्यातली एक निवडायची हे त्या इतर अनेकानेक गोष्टींवर, निदान त्यातल्या बर््याचशा गोष्टींवर अन्याय करणार हे उघड आहे. आपल्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव करणारा सिनेमा निवडायचा हे जवळजवळ अशक्य हे आेघानच आलं. त्यातून प्रभाव कोणत्या प्रकारचा? म्हणजे या चित्रपटाने तुम्हाला जीवनाबद्दलचं काही अंतिम सत्य ओळखायला मदत केली, का तुम्हाला एका विशिष्ट चाकोरीत विचार करण्यासाठी तो उद्युक्त करणारा ठरला, का त्याहून अधिक थेट पातळीवर त्याचा उपयोग झाला ? चित्रपट, ही सामान्यतः फ्रिवलस मानली जाणारी गोष्ट असली तरी त्यात अनेक कलाविष्कार हे सारं साधण्याची किमया करणारे नक्की असतात. थँकफुली, मला साधनाच्या या विषयाला वाहिलेल्या विशेषांकात लिहीण्याचं निमंत्रण नसल्याने मी असा एक चित्रपट निवडायला बांधील नाही.  शिवाय मी इथे फार प्रगल्भ लिहीण्याचाही प्रयत्न करणार नाही . हा  एक गंमतीने लिहिलेला निबंध आहे असं वाचकांनी समजावं.

अनेकांना आपण पहिल्यांदा पाहिलेला चित्रपट आठवत असतो. मला तो आठवत नाही, आणि नंतरच्या, दृकश्राव्य माध्यमाच्या अधिकाधिक जवळ येणार््या पिढ्यांना तर तो निश्चितच आठवत नसणार. पण त्या वेळचे अनेक चित्रपट लक्षात आहेत हे खरं. आमच्या घरी साधारण तीन मार्गांनी चित्रपट पाहाण्याची सोय होती. माझी आई आम्हाला ( म्हणजे मला आणि माझ्या बहिणीला) झाडून सगळे हिंदी सिनेमे दाखवायची. सटरफटर ते दर्जेदार, सगळेच. आपल्या बाॅलिवुड स्टॅटिस्टिक्सला अनुसरुन सटरफटर अधिक, पण झूठाँ कहीका आणि शिरडीके साईबाबा सारख्या स्ट्रिक्टली मिडीओकर चित्रपटांपासून अमर अकबर अँथनी सारख्या सांकेतिक हिंदी ब्लाॅकबस्टरपर्यंत आणि शोले सारख्या पारंपारिकतेच्या व्याख्या मोडणार््या एन्टरटेनरपासून जागतिक कसोटीला उतरणार््या गुरूदत्तच्या चित्रपटांच्या महोत्सवापर्यंत अनेक गोष्टी तिने मला दाखवल्या. न कंटाळता वाटेल ती गोष्ट पाहाण्याची शिस्त इथूनच लागली असावी. आणि चित्रपटाकडे कला आणि करमणूक, या दोन्ही अंगांनी बघण्याची देखील. बाबा सहसा आमच्याबरोबर चित्रपटांना येत नसत. ते यायचे ते त्यांना पाहायचे असत त्या किंवा आम्ही पाहावेतशी त्यांची इच्छा असणार््या चित्रपटांना. असे मुहूर्त क्वचित लागत. पण या मुहूर्तांवर  आठवणीत दीर्घकाळ टिकणारे अनेक चित्रपट पाहिले जात. हे चित्रपट बहुधा इंग्रजी असत आणि बाबा फिल्म सोसायट्यांचे काही कार्यक्रम अटेन्ड करत असल्याने ( माझ्या मते आनंदम आणि प्रभात ,पण चू भू द्या घ्या)   क्वचित प्रसंगी परभाषिक. या विभागात (!) मी डिस्नीचे बरेचसे चित्रपट पाहिले, पण कुरोसावाचा राशोमाॅन, त्र्युफोचा पाॅकेटमनी आणि ओझुचा टोकिओ स्टोरीही पाहिल्याचं लक्षात आहे. राशोमाॅन आणि टोकिओ स्टोरी मी पुढे अनेकदा पाहिले पण शाळेत असताना ( त्याही मराठी ,त्यामुळे सबटायटल्स कळण्याची बोम्ब) पाहिलेली स्पेसिफिक स्क्रीनिंग्ज लक्षात आहेत. यातल्या अनेकांमधून माझी आवड घडत गेली , मात्र त्यातल्या विशिष्ट एकामुळे नाही. राशोमाॅन खास स्मरणात राहिला आणि पुढेही ही नाॅनलिनीअर शैली माझ्या आवडत्या शैलीतली राहिली.
 चित्रपट पाहाण्याची तिसरी जागा होती ती टेलिव्हीजन, पण आतापेक्षा फारच कमी स्वरुपात उपलब्ध असलेला. यावर जे लागे ते पाहिलं जाई, आमच्याकडे तो येण्याआधीही शेजाऱ््ापाजार््यांकडे आणि आल्यावर घरी. मी नक्की किती प्रमाणात सिनेमे पाहायचो हे नक्की आठवत नाही, पण खूपच असणार.  कारण एरवी हुशार पण अभ्यासात मध्यम अशी किर्ती असलेल्या मला बाबांनी संपूर्ण दहावीचं वर्ष एकही चित्रपट बघू दिला नाही. चित्रपटगृहात आणि घरी ,कुठेच.
या सगळ्या गदारोळात अमुक एक विशिष्ट चित्रपट माझ्यावर फार परिणाम करुन गेला असं वाटत नाही पण या सार््याचं रसायन हे मला सर्व प्रकारच्या चित्रपटांची आवड लावणारं ठरलं. याला एक जोड होती ती घरच्या आणि आजोळच्या या उद्योगाला गंभीरपणे घेण्याच्या सवयीमुळे. बहुतेक वेळा दिसणारी फिल्म्सला मुळातच करमणूक म्हणून क्षुल्लक मानण्याची सवय मला कधीच लागली नाही आणि कानावर पडणार््या चर्चा आणि वाचनात येणारी पुस्तकं यांमधून विचाराला काही दिशा मिळाली. त्यामुळे अकरावी बारावी पर्यंत मी पाॅकेटमनीमधून जमलेले पैसे वाचवून फिल्मची पुस्तकं वगैरे घ्यायला लागलो होतो, त्यावर स्वतः काही लिहिण्याचा इरादा नसला तरी !
या सार््या पार्श्वभूमीचा एकत्रितपणे माझ्या आयुष्यावर परिणाम झाला कारण त्यामुळेच मी काही, किंवा बर््याच वर्षांनंतर अचानक समीक्षेकडे वळलो. मात्र त्यात दोन चित्रपटांचा भाग थोडा थेट महत्वाचा. दोन्ही चित्रपट रसिकांच्या दृष्टीने आयकाॅनिक आणि अभ्यासकांच्या दृष्टीने सामान्य.
यातला पहिला म्हणजे आदित्य चोप्राचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'. आर्किटेक्चर पूर्ण केल्यावर १९९४ ते १९९६ मी गोव्यात एका लँडस्केप प्राॅजेक्टवर काम करत असे. कामाच्या वेळा वेड्यासारख्या. म्हणजे सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते रात्री १० हे मिनिमम. कधी १२ कधी २ सुध्दा. रविवारी लवकर सुट्टी म्हणजे सहा.या काळात माझं वाचन बर््यापैकी झालं पण सिनेमे पाहाणं जवळपास पूर्ण थांबलं. मी राहात होतो पणजीत, तिथे थिएटर्सही फार नव्हती. मल्टीप्लेक्सची संकल्पनाच आलेली नव्हती. मी आणि एक इंजिनीअर मिळून एक टु बेडरूम अपार्टमेन्ट शेअर करायचो. त्याच्या वेळा बर््या होत्या त्यामुळे काही मित्रही होते. मला नव्हते. एके रात्री मी लवकर ,म्हणजे साडेआठला घरी आलो तर त्या सगळ्यांची कुठे तरी जायची तयारी चालली होती. मी विचारलं कुठे, तर म्हणाले एक नवा हिट सिनेमा आहे, येतोस का? म्हंटलं चला.
डिडिएलजे मला आवडला. पण त्याहून महत्वाचं म्हणजे मला तो, त्याच्या वरवरच्या कथेपलीकडे दिसला. त्यातला करमणुकीचा एक भाग आणि त्यापलीकडे त्यातलं जनरेशन गॅप बद्दलचं बोलणं, पूर्वीच्या चित्रपटांमधल्या कथित रोमान्सच्या तुलनेेेत या चित्रपटात असणारा वेगळेपणा, पूर्वीच्या नायकांच्या तुलनेत या नव्या नायकांचं वेगळं चित्रण, नव्या पिढीकडून जुन्या पिढीचं करण्यात येणारं सूचक मॅनिप्यूलेशन, असं बरच काही मला दिसलं. ते मला दिसलं हे मला अधिक आवडलं. या सगळ्याची एक लांबलचक नोंद मी माझ्या तेव्हाच्या मैत्रिणीला ( आताच्या पत्नीला) लिहीलेल्या एका पत्रात केली. हे मला वाटतं माझं पहिलं समीक्षात्मक लिखाण. या लिखाणाने मला आत्मविश्वास दिला जो मी प्रत्यक्ष महानगरमधे लिहायला लागलो तेव्हा उपयोगी पडला.
दुसरा थेट परिणाम करणारा चित्रपट होता तो जाॅर्ज ल्युकसचा 'स्टार वाॅर्स-ए न्यू होप' खरं तर त्याची स्पेशल एडीशन. हा मी प्रत्यक्ष रिव्ह्यू केलेला पहिला सिनेमा. मी लिहायला का लागलो हे मी मागे कुठेतरी लिहीलय, आणि काहींना ते माहितही असेल. महानगरमधे आलेल्या समीक्षणाबद्दल एका भेटीत मी चिंताजनक मत व्यक्त केल्यावर त्यांचे तत्कालिन संपादक निखिल वागळे यांनी मला सांगितलं की ' असं असेल तर पुढल्या आठवड्यापासून तूच लिही'. मी बरं म्हणालो आणि योगायोगाने या अतिशय गाजलेल्या आणि मी आधी पाहिलेल्या चित्रपटाविषयी लिहीण्याची संधी मला मिळाली. स्टार वाॅर्सवर बाष्कळ लिहीणं खूप सोपं आहे.   आपल्याकडे या मालिकेतल्या काही भागांचे खुर्चीवरुन हसून हसून खाली पाडतील इतके विनोदी रिव्ह्यू मी जान्यामान्या समीक्षकांकडूनही वाचलेत. त्यामुळे मला गंभीर समीक्षकाचा आव आणंत स्टार वाॅर्सला वेड्यात काढणं शक्य होतं. जे मी केलं नाही. मी काय लिहीलं यात मला आत्ता पडायचं नाही,पण जे लिहीलं ते मला आणि संपादकांना पटण्यासारखं होतं. त्यामुळेच अर्थात मी लिहीत राहिलो. माझं आयुष्य खरोखरच एका वेगळ्या दिशेला गेलं.
या चित्रपटांपलीकडेही अनेक चित्रपटांनी माझ्या मनावर, मतांवर, नजरेवर आणि अप्रत्यक्षपणे आयुष्यावरही परिणाम केला. वेगवेगळ्या मार्गांनी. दृश्य, आशय , तो सांगण्याची पध्दत, दिग्दर्शकांच्या दृष्टीतले फरक, तंत्रातले- तंत्रज्ञानातले बदल या सगळ्यातून माझ्या पुढला सिनेमा बदलता राहिला. त्यातल्या अमुक एकाला इतरांपेक्षा अधिक श्रेय मी ( आता तरी!) देऊ इच्छित नाही. कदाचित पुन्हा कधी तरी !
-गणेश मतकरी

9 comments:

hrishikesh August 19, 2013 at 1:57 AM  

निखिल वागळे ??

कायबीइन लोकमत वाले ??

ganesh August 19, 2013 at 2:15 AM  

Yes. He was the owner / editor of Mahanagar much before he turned to TV

पश्या August 19, 2013 at 5:26 AM  

I was shocked when u mentioned DDLJ ! I was expecting some pathbreaking movie by akira kurosawa, spielberg etc.
But on the other hand I felt nice that u like this kind of movies too. Since I follow ur blog regularly, I was under impression that u don't like masala movies at all, bcoz u hardly mention them here. But glad that I am proved wrong :)

ganesh August 19, 2013 at 8:04 AM  

Pashya ,You make me sound like an elitist :).
I like all sorts of films. Also, the films here, have a context and were actually instrumental in my being a critic. I wont say these 2 r in my top 10. although most probably Empire Strikes Back (SW-5 or chronologically 2) would make the list. I have mentioned Kurosawa's Rashomon as an influence.

शर्मिला August 20, 2013 at 10:40 AM  

मस्तच. मोकळा लेख.
आवडला लेख, विशेषत: डीडीएलजे बद्दल लिहिलेलं.

पश्या August 30, 2013 at 6:09 AM  

Extra :
Waiting for Madras Cafe review from u. I liked the movie but did not find it great. Interesting to see ur persective coz u must have seen some Hollywood movies of this kind.

attarian.01 August 30, 2013 at 7:08 AM  

खूप वाट बगत आहे पुढच्या लेखाची... जास्त लेख दया.

Ashish September 3, 2013 at 11:21 AM  

लेख आवडला.
योगायोग.. कालच हा अपडेट FB वर टाकला होता.

Impact of movies on society. Two examples -

1. 1945 Movie 'Dead of Night' inspired Hoyle, Bondi and Gold to postulate 'steady state Universe' theory which remained strong contender to now widely accepted 'Big Bang Theory' for decades.

2. Saw thanking note to Rajkumar Hirani and others who were associated with "Three Idiots" at Pangong Lake (Ladakh). थ्री इडीयटस मुळे पंगोंग सारख्या अतिदुर्गम भागात तिथल्या शेकडो लोकांना पर्यटन वाढल्यामुळे उदरनिर्वाहाचे साधन मिळाले.

चित्रपटांचा प्रभाव अशा तऱ्हेने आपल्या आयुष्यात पडावा याची डोक्यात आलेली उदाहरणे.

आणखी एक.. लेख आणखी छोट्या परिच्छेदात विभागाला तर वाचण्यास बरेच सोपे जाईल.

sagar zepale October 2, 2013 at 8:47 AM  

ddlj mala khup awadlela cinema aahe tyawarahi tumhi samiksha keli ahe mhanje tumhala tyat nakkich kahitari wegale disale asanaar . pls te jar tumachyakade asel tar share kara .

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP