द वर्ल्डस एन्ड- काॅर्नेटो चित्रत्रयीची जमलेली अखेर

>> Monday, September 9, 2013







स्वतंत्र, स्टँड अलोन असली, तरी 'द वर्ल्डस एन्ड' ही ' थ्री फ्लेवर्स काॅर्नेटो चित्रत्रयी' पाहाण्याची सुरूवात म्हणून योग्य फिल्म ठरणार नाही.



हे वाक्य ज्यांना गोंधळात पाडेल, आणि ते पुष्कळांना, अगदी जागतिक चित्रपटांत मुरलेल्या रसिकांनाही गोंधळात पाडू शकतं. या मंडळींसाठी थोडं स्पष्टीकरण. किसलोव्स्कीची 'थ्री कलर्स चित्रत्रयी' अनेकांनी पाहिलीय, निदान त्याबद्दल एेकलय. पण थ्री फ्लेवर्स? तेही काॅर्नेटो आईस्क्रीमचे? पण आहे! या नावाची चित्रत्रयी आहे. एडगर राईट दिग्दर्शित आणि सायमन पेग/ निक फ्राॅस्ट यांना प्रमुख भूमिकेत योजणारे हे तीन चित्रपट म्हणजे तीन पारंपारिक चित्रप्रकारांची विडंबन आहेत. चित्रत्रयीचा पहिला भाग ' शाॅन आॅफ द डेड' हा माझ्या अतिशय आवडत्या चित्रपटांमधला एक, झाॅम्बीपटांचं विडंबन करता करता आपल्याला आजच्या वास्तवाबद्दल विचारात पाडणारा होता. दुसर््या ' हाॅट फज' ने पारंपारिक बडी-काॅप चित्रप्रकाराची यथेच्छ टिंगल केली, तर तिसरा 'द वर्ल्डस एन्ड' वैज्ञानिक पार्श्वभूमी असणार््या भयपटांना (उदाहरणार्थ ' इन्व्हेजन आॅफ दि बाॅडी स्नॅचर्स' ) तिरक्या नजरेने पाहातो. या चित्रत्रयीतला आईस्क्रीमचा संदर्भ तसा अपघाती आहे. यात पहिल्या दोन भागांमधे अनुक्रमे स्ट्राॅबेरी अाणि ब्लू ओरिजिनल काॅर्नेटो फ्लेवर्स वापरण्यात आले होते, ज्यांचा दूरान्वयाने आशयाशी संबंध लावणं शक्य होतं. ज्या त्या गोष्टीकडे विनोदाने पाहाणार््या चित्रकर्त्यांना ही गोष्ट कोणीतरी लक्षात आणून दिली. लगेचच चित्रत्रयीचं बारसं झालं आणि थ्री कलर्सची आठवण करुन देणारी थ्री फ्लेवर्स तयार झाली. तिसर््या भागातला फ्लेवर आहे 'ग्रीन मिन्ट चाॅकलेट चिप' . म्हणा, तसा हा संबंध नावापुरताच आहे. असो! आता मूळ मुद्द्यावर येऊ.

या चित्रत्रयीच्या भागात क्रमवार एक गोष्ट पुढे नेली जात नाही, तर ' ट्रीटमेन्ट ' हे यांमधलं खरं साम्य आहे. मात्र शक्यता अशीही आहे की 'शाॅन' करताना , असे तीन चित्रपट करण्याचं ठरलेलं नसावं. पहिल्याचं यश ,हे उरलेल्या चित्रपटांना कारणीभूत ठरलं असावं. त्यामुळे पहिला भाग घडतो अधिक उस्फूर्तपणे, पण अधिक साधेपणाने. त्यात हे विडंबन काय प्रकारचं असावं याचे काही नियम हलकेच ठरताना दिसतात. ज्या चित्रप्रकाराचं विडंबन करायचं त्याबद्दल प्रेम आणि आदर यांचं दर्शन कितपत असावं, साधा विनोद आणि टिंगल याचं प्रमाण काय आणि चित्रप्रकारातला बदल गृहीत धरून प्रेक्षकांकडून ' विलिंग सस्पेन्शन आॅफ डिसबिलीफ' ची अपेक्षा किती असावी, यांचा या नियमांशी संबंध आहे. उदाहरण घ्यायचं, तर सामान्यतः झाॅम्बीपटात नायकाने संकटावर मात करण्यासाठी काढलेला तोडगा आणि 'शाॅन आॅफ द डेड' मधे शाॅनने काढलेला तोडगा, यांची तुलना होऊ शकत नाही. प्रेक्षकाने शाॅनचा तोडगा हा खरोखरच्या संकटावरला तोडगा म्हणून न पाहाता विडंबनाच्या चौकटीत पाहिला तरच तो त्यातली गंमत समजून घेणार. नाहीतर, 'हा कसला बावळटपणा', असंच त्याला वाटू शकतं. तर हे चित्रपटाचे म्हणा, पटकथेचे म्हणा, नियम, चित्रत्रयी पहिल्या भागात ठळकपणे एस्टॅब्लिश करते. नंतरच्या चित्रपटांच्या प्रेक्षकांना पेग/ राईट रसायन आणि या चित्रपटांची शैली माहित असेलशी अपेक्षा आहे. त्यामुळे नवख्या प्रेक्षकाला योग्य इन पाॅईन्ट आहे तो पहिल्या चित्रपटातच. याचा अर्थ मी कोणाला थेट 'वर्ल्डस एन्ड' पाहूच नका असं सांगत नाही, पण पाहिलात तर मन अधिक मोकळं ठेवायला मात्र विसरु नका, हे जरुर सांगेन.

नेहमीप्रमाणेच इथे प्रमुख भूमिकेत सायमन पेग आहे. हा आहे गॅरी किंग, हाय स्कूलच्या काळातला डॅशिंग हिरोसारखा मुलगा, पण आता काळाने त्याची बर््यापैकी वाट लावलेली. व्यसनापायी वाया गेलेला, धड काही काम धंदा न करणारा, एकटा. त्याचं जुन्या दिवसातलं एक स्वप्न अर्धवट राहिलेलं. त्यांच्या गावच्या बाराच्या बारा पब्जमधे एका दिवसात हजेरी लावण्याची त्याची अन त्याच्या खास मित्रांची मोहीम तेव्हा अर्धवट राहिली होती. आता इतर सर्व बाजूंवर हार मानायला लागलेला गॅरी , आपलं ते स्वप्नं आता तरी पूर्ण करण्याचा निश्चय करतो. मग तो आपली जुनी टीम ,अँडी ( पेगचा जुना पार्टनर इन क्राईम, निक फ्राॅस्ट), स्टीवन ( पॅडी काॅन्सीडाईन), आॅलिवर ( आर्थर डेन्ट, बिलबो बॅगिन्स आणि डाॅक्टर वाॅटसन या भूमिकांमुळे अचानक स्टार झालेला मार्टीन फ्रीमन) आणि पीटर ( एडी मार्सन) यांना जमवतो आणि पुन्हा आपल्या गावचा रस्ता धरतो. हे सारे गॅरीपेक्षा यशस्वी, पण आपल्या मित्राची हाक आणि थोड्या थापा एेकून ते गॅरीच्या मोहीमेत सामील होतात. पहिल्या काही पब्जनंतर गॅरी आणि कंपनीच्या लक्षात येतं की गाव बदललाय.. आणि बदललाय तोही नेहमीसारखा नाही, तर अधिक भीतीदायक पध्दतीने. आजूबाजूला दिसणारी माणसं या कोणा वेगळ्या शक्तीने चालवलेल्या कळसूत्री बाहुल्या आहेत आणि आपल्याला सत्य समजल्याचं कोणाला कळू न देणं हा एकच जीवानिशी सुटण्याचा उपाय आहे.

वरवर पाहाता वर्ल्डस एन्ड आणि शाॅन आॅफ द डेड मधे बरीच साम्य आहेत.झाॅम्बी काय किंवा कळसूत्री माणसं काय, त्यांच्या संकल्पना बर््याच एकसारख्या आहेत, वर नायकाने काही रॅडीकल उपाय न शोधता परिचित जागांमधे सुरक्षितता शोधणं हेदेखील दोन्ही चित्रपटात आहे. दोन्हीकडला एपिलाॅगही त्याच जातीचा आहे. मात्र या दोन्ही चित्रपटांमागला मुद्दा वेगळा आहे. शाॅनची टिका होती ती बधीर ,एकसारख्या विचारांच्या, परस्परांचं अनुकरण करणार््या समाजावरची, तर वर्ल्डस एन्ड विविध गोष्टींना लक्ष्य करतो. काळानुरूप आपल्यात होणारा बदल आणि भूतकाळाशी तुटत चाललेलं नातं, हे यातलं एक सूत्र. गॅरी आणि कंपनीचा तरुणपणचा फसलेला फेरा हा गावात व्हायला लागलेल्या बदलाशी जवळजवळ समांतर आहे. इथे प्रत्यक्ष गाव बदलत असलं तरी चित्रपट सुचवतो तो आपल्यात होणारा बदल, जो आपलं होऊन गेलेल्या गोष्टींबरोबरचं नातं पूर्णपणे तोडतो. केवळ जुन्या पब्जवरली चक्कर ही तुम्हाला तुमचं तारुण्य मिळवून देत नाही, गेलेली गोष्ट परत येत नाही. इथले परग्रहवासी, हे आजकालच्या काॅर्पोरेट्सची भाषा बोलतात. ते या आक्रमणाला हल्ला समजत नाहीत, मर्जर समजतात. त्यांच्या दृष्टीने ते आपल्या भल्याचाच विचार करतायत आणि आपण तो़ समजू शकत नाही, हा आपलाच करंटेपणा. आजच्या नोकरदार माणसांना ,ही भाषा चांगलीच ओळखीची आहे.

या चित्रपटाचा तथाकथित क्लायमॅक्स हा इतर दोन चित्रपटांपेक्षा थोडा अधिक गोंधळाचा आहे. त्या प्रसंगातला युक्तीवाद, नायकांचं पलायन वगैरे थोडं समजून घ््यावं लागतं ( मात्र तुम्ही आधीचे दोन चित्रपट पाहिले असल्यास , याकडे फार लक्ष देणार नाही) एपिलाॅगमधला मुद्दा 'शाॅन'च्या जवळ जाणारा असला तरी अधिक विचार करायला लावणारा आणि गमतीदारही आहे. त्याची योजना, ही शेवटाचा कमकुवतपणा लपवू शकते.

इथे विडंबनाच्या हुकूमी जागा आणि एकूण गंमती व्यवस्थित जागच्या जागी असणार हे पेग/ राईट च्या चाहत्यांना सांगायला नको. तशा त्या आहेतच. बोलण्यात येणार््या कॅची जागा 'बॅन्डसाठी चांगलं नाव आहे' म्हणून सर्वांनी शोधत राहाणं, चित्रत्रयीतल्या सर्व चित्रपटाप्रमाणे इथेही दिसणार््या कुंपणांच्या गंमती, सांकेतिक माॅब कोरिओग्राफीचा वापर, कितीही बिकट प्रसंगात गॅरीचा बिअर पिण्याचा प्रयत्न, कळसूत्री माणसांचे वेगवेगळे प्रकार, त्यांचं संकल्पनेला जरा अधिकच अनुसरुन खरंच बाहुल्यांप्रमाणे असणं, असं बरच काही इथे पाहाण्यासारखं आहे. ही सारी मंडळी हुशार आहेत, त्यामुळे जागा तुम्ही शोधाल तितक्या सापडतील.

थ्री फ्लेवर्स चित्रत्रयीच्या विनोदाचा प्रकार पाहाता, त्यांनी दर्जा सांभाळून ती पूर्ण करणं हे कठीण काम होतं, आशा आहे की पेग/ राईट यापुढेही एकत्र काम करत राहातील. राईटला प्रश्न येणार नाही , पण बिचार््या सायमन पेगला इतर चित्रपटांमधे ( एम आय पासून स्टार ट्रेक पर्यंत) जी काय फुटकळ कामं करावी लागतायत ,ती पाहाता त्याने राईटला चिकटून राहाणं त्याच्या नक्कीच फायद्याचं ठरेल.

-गणेश मतकरी



0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP