बाबांची इन्व्हेस्टमेन्ट

>> Saturday, September 21, 2013




लेखाआधी-

मी इन्व्हेस्टमेन्टबद्दल लिहू नये अशा फ्रेन्डली ( आणि अर्थात वेल मीनींग) अॅडव्हाईस ला न जुमानता मी जे काही लेख लिहीले त्यातला हा एक. न जुमानण्याची कारणं अशी. एक म्हणजे मला चित्रपटाच्या गुणवत्तेविषयी लिहायचं नव्हतं जे करण्यात फार मुद्दा नव्हताच, कारण माझा वाचक काही मूर्ख नाही. मीच माझ्या चित्रपटाची तारीफ करणं कोणी एेकून घेतलं नसतंच. दुसरं म्हणजे मला यातला एक महत्वाचा, काहीसा सैध्दांतिक मुद्दा मांडायचा होता, जो सर्वांच्या सहजपणे लक्षात येईलसं नाही. तो म्हणजे त्यातला वास्तवदर्शन आणि वृत्तीदर्शन यांमधल्या सरमिसळीचा मुद्दा. जो मी आधीच्या आणि या,अशा दोन्ही लेखांत नोंदवला आहे. हा मुद्दा लक्षात येणं आशयाच्यादृष्टीने आवश्यक नाही पण मांडणीच्या दृष्टीने नक्कीच असू शकतं. त्यापलीकडे जाऊन तुम्हाला ही सरमिसळ पटू वा न पटू शकते, पण तिचं असणं अपघाती नाही, हे महत्वाचं.
तुम्हाला माहीतच आहे, की इन्व्हेस्टमेन्ट मागे कोणी गाॅडफादर नाही. कोणा हिंदी स्टारची ही निर्मिती नाही, कोणत्या चॅनलचा त्याला आधार नाही, काही नाही. ही खरोखर एक इन्डिपेन्डन्ट स्वरुपाची प्रामुख्याने एका कुटुंबाने केलेली आणि त्यांच्या मित्रमंडळाने सहाय्य केलेली निर्मिती आहे. या प्रकारची, पर्सनल स्टेटमेन्ट म्हणण्याजोगी, आणि व्यावसायिक गणितांच्या आहारी न जाणारी निर्मिती ही नेहमीच दुर्मिळ असते. ती पाहाणं हे एका परीने तिला आधार देण्यासारखं आहे. त्यामुळे नियमित वाचकांना हे माझं वैयक्तिक आवाहन आहे,की शुक्रवारी, २० सप्टेम्बर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सर्वांनी जरुर बघा. त्याच्या गुणदोषांची चर्चा आपण करुच पण त्यामुळे या निर्मितीमागचा विचार बदलत नाही. जो महत्वाचा आहे.





आमच्या घरात अनेक वर्षांपूर्वीपासून एक रिचुअल आहे. वाचनाचं, बाबांनी घरच्यांसाठी केलेल्या.  नव्या साहित्याच्या, बाबांनी लिहिलेल्या. साहित्य म्हणजे कोणत्याही प्रकारचं. मग ती भाषणं असतील, लेख असतील, कथा असतील, नाटकं आणि पटकथाही. नाटकांची/ पटकथांची वाचनं अर्थात पुढे इतरांसमोरही होतात. दिग्दर्शकांसमोर, निर्मात्यांसमोर, नटसंचासमोर. पण हे वाचन त्याआधीचं. पूर्वीपासून या वाचनाला आम्ही चौघं असणं गृहीत. आई, मी, सुप्रिया आणि अर्थात ते स्वतः. एकदा का वाचन झालं की मग चर्चा/ गप्पा. काही वेळा या वाचनाच्या आधी आईसाठी एक खास वाचनही होत असे , पण नेहमीच नाही. मी शाळेत असल्यापासून यात फार बदल झाल्याचं आठवत नाही. एक्स्टेन्डेड फॅमिलीचा, म्हणजे पल्लवी आणि मिलिंदचा शक्य तेव्हा सहभाग  हा एक बदल, आणि हल्ली सर्वाच्या वेळांच्या अडचणीमुळे काही वेळा आम्हाला बाबांकडून एेकायला न मिळता स्वतः वाचायला लागणं हा दुसरा. हे आमच्या कोणाचं फार आवडतं आॅप्शन नाही. हा नाईलाज. इन्व्हेस्टमेन्ट ही कथा, माझ्या  आठवणीप्रमाणे, मी वाचली, एेकली नाही. त्यामागे कारण काय हे आता आठवत नाही, वेळा जमणं ही बहुधा नित्याची अडचण असावी, पण पटकथेचं वाचन चांगलं स्मरणात आहे.

बाबांची वाचनाची पध्दत उत्तम ( नाटकउद्योगातल्या अनेकांना आधीच माहित असल्याप्रमाणे) आहे. व्हाॅइस माॅड्यूलेशन्समधून व्यक्तिरेखा डोळंयांपुढे उभ्या करणं त्यांना अचूक साधतं. त्यामुळे आणि कथेची पारायणं झाल्यामुळेही चित्रपट कसा होणार हे आम्हाला तेव्हाच दिसायला लागलं. चित्र थोडं अस्वस्थ करणारच होतं, नाही असं नाही, पण ओळखीचं. व्यक्तिरेखा आमच्या पाहाण्यातल्याच होत्या ,मैत्रीतल्याही म्हणता येतील. परिणाम त्यामुळेही अधिक टोकाचा. आणि त्या व्यक्तिरेखा तशाच्या तशा उभ्या राहाणं हे चित्रपट पोचण्याच्या दृष्टीने आवश्यक होतं. पण कथावाचन आणि पटकथा वाचन यांत एक मोठा फरक असतो, जो इथेही होता. कथेचं वाचन हे शांतपणे केवळ रसास्वादाच्या नजरेने पाहाता येतं. पटकथेच्या वाचनात, 'चला ,कामाला लागा' अशी एक अनुच्चारित सूचना असते.

'कामाला लागणं' हे काही आम्हाला नवीन नाही. वेळोवेळी बाबांच्या डोक्यातून नव्या नव्या योजना येत असतात ,आणि त्या आल्या की त्यादृष्टीने सगळं घरच पावलं उचलतं. मग  ती बालनाट्य जोरात होती त्या काळातली सुटीतली मुलांची नाटकं असोत, कार्यशाळा असोत, सूत्रधारने केलेली राज्य नाट्य स्पर्धेतली नाटकं असोत, गहीरे पाणी सारखी मालिका असो वा इन्व्हेस्टमेन्ट सारखा चित्रपट.  अर्थात इथे एरवीपेक्षा एक मोठा फरक होता, की नाटकं, मालिकांप्रमाणे चित्रपटाचा अवाका आमच्या हातात राहाण्याएवढा छोटा नव्हता. मात्र तरीही तो व्हायला हवा हे बाबांनी पक्कं डोक्यात घेतलं . त्यांच्या दृष्टीने, त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीची ती तर्कशुध्द पुढची पायरी होती. आणि ती गाठता येणार नसेल तर इतर काही करण्यातही फार मुद्दा नव्हता.

२००६/७ ते साधारण २०११ पर्यंतचा काळ हा साधारणपणे त्यांच्यासाठी तरी या एकाच गोष्टीवर केंद्रीत झाला होता. फिल्म करणं हे खूपच महत्वाचं बनलं. तीही कुठलीही नाही, तर इन्व्हेस्टमेन्टची फिल्म. खरं तर इन्व्हेस्टमेन्टचं कथारुप इतकं स्ट्राँग होतं, की इतर निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनीही या गोष्टीला चित्रपटरुप देण्यात स्वारस्य दाखवलं होतं. पण बाबांचा त्याला तत्वतः विरोध होता. आणि आम्हा सर्वांना तो मान्यही होता. ' चित्रपट दिग्दर्शकाचं माध्यम आहे' हे वाक्य आपण नेहमी एेकतो. खरं तर ते पूर्णपणे योग्य नाही कारण लेखकाचा/ पटकथाकाराचा त्यातला सहभाग हा अतिशय मोलाचा असतो. मात्र या वाक्याचा मतितार्थ हा की दिग्दर्शकाचं या माध्यमावर नियंत्रण असतं. त्याचा निर्णय हा अंतिम असतो.

इन्व्हेस्टमेन्टच्या आशयाचा तोल हा नाजुक होता. एकतर ते बाबांचं, आजच्या समाजाविषयी, त्यातल्या प्रवृत्तींविषयी असणारं स्टेटमेन्ट होतं, निरीक्षण होतं. वरवर पाहाता ती एका ( अपवर्डली मोबाईल) उच्च मध्यमवर्गीय कुटुंबाची आणि त्यांच्या आयुष्यातल्या एका क्रायसिसची गोष्ट असली, तरी त्याचा आशय हा या कुटंुबापुरता मर्यादित नव्हता. त्यात मांडलेले दृष्टीकोन महत्वाचे होते. संस्कार -पारंपारिक आणि आधुनिक, व्यक्तिगत प्रगतीच्या बदलत्या कल्पना, मुलं आणि पालक यांमधलं आजचं नातं, समाज घेत असलेली नवी दिशा अशा बर््याच गोष्टींंविषयी त्यात बोललं जात होतं, तेही कोणत्याही संदेशाचा अविर्भाव न आणता. गोष्टीला प्रमुखस्थान देत. हा तोल जरा इकडेतिकडे होता तर चित्रपटच बदलला असता. त्यामुळे तो कोणादुसर््या दिग्दर्शकाकडे सोपवणं अवघड होतं.

काही लोकं विशिष्ट आेळखींमधे अडकतात. बाबा बर््याच वेगवेगळ्या ओळखींमधे अडकले आहेत. कोणी त्यांना आपण लहानपणी पाहिलेल्या बालनाट्याशी जोडलय, कोणी मोठ्या वयात पाहिलेल्या व्यावसायिक नाटकांशी, कोणी गूढकथांशी वगैरे वगैरे. या लेखक म्हणून असलेल्या ओळखीत अनेक नाटकं, मालिका दिग्दर्शित करुनही त्यांची दिग्दर्शक ही ओळख दुय्यम राहिली आहे. पण आम्हाला ही ओळख आहेच. त्यामुळे निर्माता शोधताना वेळ गेला तरी चित्रपट दुसर््या कोणाला देण्याचा विचार आमच्या कोणाच्याच डोक्यात आला नाही. पण हा तिढा सुटणार कसा हा प्रश्न होताच. तो अचानक सुटला, तो २०११ च्या उत्तरार्धात, बाबांच्या सतत या चित्रपटाविषयी चाललेल्या विचारांमधूनच.

डिजीटल तंत्रज्ञानाचा या निर्मितीला काहीतरी फायदा होईल असं त्यांनी मनात धरलं होतं. बहुधा इन्स्टीन्क्टीवलीच, कारण तोवर आम्ही एेकलेली दर गोष्ट ही या तंत्रज्ञानाच्या विरोधात जाणारीच होती. या तंत्रज्ञानाबद्दल चांगलं बोलणारा, पारंपारिक छायाचित्रणाच्या फापटपसार््यापासून वाढीव बजेटपर्यंत अनेक गोष्टींत आशादायक बदल दाखवणारा एक लेख बाबांच्या पाहाण्यात आला आणि त्या लेखामुळेच आमची गाठ सिनेमॅटोग्राफर अमोल गोळेशी पडली. ही गाठ एका परीने या निर्मितीसाठी उत्प्रेरकासारखी ठरली. इथून मार्ग दिसत गेला, अडचणी सुटत गेल्या. अनपेक्षितपणेच.

बाबांच्या या पिछा पुरवण्याच्या स्वभावाची मला नेहमी गंमत वाटते. काही वेळा यातून मार्ग निघतातही, पण अनेकदा मनस्तापही होतो. त्याची त्यांना विशेष पर्वा नसते. त्यांनी आजवर केलेल्या प्रचंड कामामागेही त्यांची ही भूमिकाच आहे असं मी म्हणेन. इन्व्हेस्टमेन्ट होण्यामागेही हीच भूमिका होती.

कोणी म्हणेल की दिग्दर्शन ( चित्रपटच नव्हे, कुठलही दिग्दर्शन) हे तंत्र आहे, मी म्हणेन की तो माइन्डसेट आहे. काही वेळा चमत्कृती ,तंत्रज्ञानाचे चमत्कार, तर््हेतर््हेच्या युक्त्या करणारे चित्रपटही प्रेक्षकाला अडकवू शकत नाहीत, याउलट काही वेळा साधेपणाने, कोणताही अभिनिवेष न बाळगता सांगितलेल्या गोष्टीही चटकन परिणाम करुन जातात. अर्थात प्रत्येक कलाकृती ही संकल्पनेतच आपली नैसर्गिक गरज आणि स्वरुप सुचवते हे तर खरच आहे, पण ती उभी करणारा दिग्दर्शक या कलाकृतीचं कितपत एेकू शकतो यावर तिचा अंतिम परिणाम ठरत जातो. इन्व्हेस्टमेन्टची मूळ प्रवृत्ती ही काहीशी दुभंगलेली आहे. तिला दोन बाजू आहेत. वास्तवदर्शन ही एक तर वृत्तीदर्शन ही दुसरी. तिची पार्श्वभूमी ही पूर्णपणे वास्तव आहे. त्यातल्या व्यक्तींची पार्श्वभूमी, त्यांच्या राहाण्यावागण्याचे तपशील खर््यासारखे आहेत. याउलट त्यात घडणार््या गोष्टी या प्रातिनिधिक स्वरुपाच्या आहेत. त्यांची मांडणी ही काही विशिष्ट दृष्टीकोनांचं प्रातिनिधित्व करते. ही विभागणी ठरवली कोणी, तर अर्थातच बाबांमधल्या लेखकाने. मात्र दिग्दर्शक म्हणून त्यांनी ती काय पध्दतीने वापरली यावर चित्रपटाचा परिणाम ठरतो.

इन्व्हेस्टमेन्टचा विषय आजच्या काळाशी अतिशय जवळून जोडला गेलेला आहे. त्यामुळे त्याविषयी आमची बोलणी कायमच होत असत. आधी संहितेच्या पातळीवर, तसंच चित्रीकरणाच्या वेळी देखील. सेटचं वातावरण मोकळं होतं. युनिट छोटं होतं. त्यामुळे करुन पाहायला ,चर्चेला वाव होता. बाबांच्या दृष्टीने डिजीटल तंत्राचा सर्वात मोठा फायदा होता, तो चित्रीकरणाचं अवडंबर कमी करुन उस्फूर्ततेला वाव देण्यासाठी आणि समाजाचा जो स्तर आम्हाला दाखवायचा होता त्याच्या अचूक चित्रणासाठी. विशिष्ट प्रकाशयोजनेसाठी तासंतास लायटिंग करावं लागत असेल आणि अभिनेत्यांना ताटकळत बसावं लागत असेल, तर त्यांच्या कामात ती सहजता कशी येणार ? डिजीटल माध्यमाची गती, छोट्या हॅन्डहेल्ड कॅमेरातून मिळणारा लवचिकपणा, मर्यादित प्रकाशयोजना आणि मेकअपचा अतिशय कमी वापर यातून चित्रपटाला ज्या वास्तव चौकटीची गरज होती ती मिळाली आणि चित्रपट आजचा बनवता आलं.

तुम्ही म्हणाल, की चित्रपट बाबांना हवा तसा झाला, लोकांना आवडला, अनेक देशीविदेशी चित्रपटमहोत्सवात दाखवला गेला, त्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून  राष्ट्रीय पारितोषिक मिळालं,वयाच्या चौराहत्तराव्या वर्षीही डोक्यात आलं ते जिद्दीने करुन दाखवल्याचा आनंद बाबांना मिळाला, याचा अर्थ ते समाधानी असतील. पण छे! त्यांचा स्वभाव हा असा समाधान मानणार््यांतला किंवा झाल्या गोष्टीत आनंद वाटण्याचा नाही. त्यांना केलेल्या गोष्टी, गाठलेले टप्पे हे त्यांच्या अचिव्हमेन्ट्सची आठवण करुन देत नाहीत, तर काय करायचं राहिलय याची जाणीव करुन देतात. ही यादी बिलकुल लहान नाही, अन रोजच अधिक वाढणारी आहे. मात्र त्यांचा तो स्वभावच आहे.आणि एका परीने त्यांची उर्जाही.

आताही, ही उर्जा त्यांना एका इन्व्हेस्टमेन्टवर गप्प बसू देणार नाही, याची खात्री वाटते.
-गणेश मतकरी.

3 comments:

विशाल तेलंग्रे September 22, 2013 at 1:55 AM  

मी अजून "इन्व्हेस्टमेंट" बघितला नाहीये, पुरेशा वेळेअभावी म्हणा किंवा मला शक्य झाले नाही वेळ काढायला, असो. पण हा चित्रपट बघून आलेल्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत, आणि त्यामुळे मीदेखील हा चित्रपट बघण्याची संधी दवडू नये, अशी खूप इच्छा आहे. सुटीचे दिवस दोनच असतात, आणि हा आठवडा तर गेलाच, त्यामुळे पुढील आठवड्यात सगळी कामे बाजूला ठेवून "इन्व्हेस्टमेंट" बघण्याचा पक्का निर्णय केलाय. मराठी चित्रपट थिएटरांमध्ये खूप कमी काळ चालवले जातात, त्यामुळे थोडी भितीयुक्त नाराजी मनात राहीलच बघेपर्यंत!

तुमची या ब्लॉगवरील वा फेसबुकवरील अद्यतने नियमीत वाचायला तशी सवड नसतेच, पण जेव्हा-जेव्हा मी ती वाचतो, तेव्हा मनाला एक वेगळीच अनुभूती जाणवते. अतिशय संवेदनशील अशा विषयांवर तुम्ही नोंदवलेल्या अभ्यासपूर्वक प्रतिक्रिया वाचण्याजोग्या असतात, तत्काळ घडलेल्या एखाद्या घटनेचे आढावात्मक वास्तवदर्शी विश्लेषण, घटनेशी जुळणार्‍या विविध-अंगी पैलूंचा उलगडा करत नेण्याची तुमची अभिजात शैली तुमच्या लेखनातून सहज झळकते. आणि तुमच्या-अंगी असलेल्या या अशा गुणांमुळेच "इन्व्हेस्टमेंट"सारखी दूर्मिळ गोष्ट साकारू शकली, असे मला वाटते. सदर चित्रपटासाठी तुम्ही मतकरी कुटूंबियांनी घेतलेल्या अविरत कष्टांचे मोल असिमीत आहे, मराठी चित्रपटांमध्ये आणखी एक असा, आणि आजच्या पिढीला खरोखर उपयोगी पडेल अशा चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे याबद्दल खूप आभार, आणि शुभेच्छा. प्रेक्षकही या चित्रपटाला असाच भरभरून प्रतिसाद देतील आणि या कथेतून अपेक्षित असा बोध घेतील, अशी आशा व्यक्त करतो.

जमलंच तर, चित्रपट बघितल्यावर मीदेखील यावर माझा एखादा छोटेखानी-परिक्षणपर लेख प्रकाशित करेन.

- विशाल तेलंग्रे

तृप्ती September 25, 2013 at 6:18 AM  

तुमचा या आधीचा मायबोलीवर प्रकाशित झालेला आणि हा दोन्ही लेख वाचले. तुम्ही ज्या आपुलकीने तरीही त्रयस्थपणे कथेबद्दल लिहिले आहे ते एकदम आवडले. चित्रपट आणि कथा दोन्हींबद्दल भयंकर उत्सुकता आहे. मी कथा वाचलेली नाही पण आधी चित्रपट बघणार :)

Digamber Kokitkar October 2, 2013 at 12:49 AM  

Changla cinema to asto jo aapan theatre madhun baher padlya nantar sadaiv dokyat gholat rahto. Definitly Investment is 1 of them.
Amol Gole excellent.
Must watch for Parents.
Changli Gosht - Prekshakancha changla response hota.(In Movie Hub at Goregaon with 50 odd people on sunday afternoon show)
Vait Gosht - Phakt 2-3 theatre madhyech mumbait aahe.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP