ऑस्कर निमित्ताने
>> Sunday, January 24, 2016
मी शाळेत असताना ऑस्कर आणि ग्रॅमी पारितोषिकांची तेवढ्यापुरती हवा असल्याचं आठवतं. म्हणजे या दोन्ही पारितोषिकांची किर्ती कानावर होती, त्या समारंभांचे हायलाईट्स पहायला मिळत( लाईव टेलिकास्ट आठवत नाही, पण बहुधा नाहीच) , एक दोन चॅनल्स च्या जीवावर चालणाऱ्या टिव्हीवर माफक प्रमाणात जाहिरात केली जात असे, आणि ऑस्करच्या रात्री उशीराने ( समारंभ त्यांच्याही रात्रीच असल्याने, आपल्या सकाळी ऑलरेडी होऊन गेलेला असायचा, पण पारितोषिकप्राप्त कोण ठरलं, याची विशेष कल्पना नसायची. अर्थात, त्यातले बरेचसे चित्रपट हे आपल्याकडे दिसलेलेच नसल्याने, तेव्हा विजेत्यांचं कौतुकही मर्यादीतच)सगळे भक्तीभावाने समारंभाचा अंश पाहून घेत. त्यावेळी कौतुक असायचं, ते कोण जिंकतं वा हरतं यापेक्षा तो समारंभ कशा पध्दतीने सादर होतो यालाच.
आता अर्थात ही परिस्थिती बदलली आहे. आता त्यांच्याप्रमाणेच आपल्याकडेही गोल्डन ग्लोबच्या निकालाबरोबर ऑस्करचं वारं वहायला लागतं आणि ऑस्कर नॉमिनेशन्स जाहिर झाली की त्याला गती मिळते. त्यांच्याकडे अर्थात हे चित्रपट येऊन गेलेले असतात, त्यामुळे सर्वसाधारण प्रेक्षकाला ते पुन्हा मोठ्या पडद्यावर पहायची संधी मिळणार नसते. आपल्याकडचं चित्र मात्र असं असतं, की यातले माफक चित्रपट हे आधी लागून गेलेले असतात, जसे या वर्षीचे द मार्शन,मॅड मॅक्स: फ्युरी रोड, द ब्रिज ऑफ स्पाईज, किंवा स्टार वॉर्स द फोर्स अवेकन्स. हेदेखील लागतात, ते त्यांच्या दर्जापेक्षा व्यावसायिक शक्यता उघड झाल्यामुळे, पण जसजसा ऑस्कर समारंभ जवळ येतो, तस तसे नामांकनात असणारे अधिकाधिक चित्रपट पडद्यावर यायला लागतात आणि ऑस्कर वातावरणनिर्मिती वाढत जाते. आताही आपण पहातोय, की द हेटफुल एट, डेनिश गर्ल, जॉय हे नुकते प्रदर्शित झाले आहेत, आणि यंदा सर्वाधिक म्हणजे बारा नामांकनं मिळवलेल्या, आणि अनेक नामाकनांनंतर बहुधा लिओनार्डो डिकाप्रिओला आॅस्कर मिळवून देण्याची शक्यता तयार करणाऱ्या आलेहान्द्रो इन्यारितूच्या द रेवेनन्ट पर्यंत अनेक चित्रपट येऊ घातले आहेत. त्यामुळे ज्यांना या चित्रपटांमधे रस असेल, त्यांनी सध्या मोठ्या पडद्याकडे नजर ठेवलेली बरी.
अर्थात, यातलं सारच काही पडद्यावर येईल असंही नाही,त्यामुळे जे सहज मार्गाने मिळणार नाही त्याला वाकड्या मार्गाने शोधणारेही अनेक असतील. या प्रकाराकडे , म्हणजे पायरसीकडे, सर्वसामान्यपणे गुन्हा म्हणून पाहिलं जात असलं, तरी मला तो शब्द जरा टोकाचा वाटतो. ऑस्कर नामाकनं पाहून , वेळात ते चित्रपट मिळवून पहाणाऱ्या रसिकांमधे ( यातले अनेक जण तरुण वर्गातले असतात) एक अभ्यासूपणा निश्चित असतो, निदान आपण काय पहातोय याबद्दलचं गांभीर्य तरी. आणि जर का त्यांना सनदशीर मार्गाने हे चित्रपट उपलब्ध होऊ शकत नसतील, तर त्यांनी काय करणं अपेक्षित आहे?
पुन्हा सनदशीर मार्गाने उपलब्ध होणाऱ्या चित्रपटांचंही सारं आलबेल आहे अशातला भाग नाही. मला असलेल्या भीतीप्रमाणेच टेरेन्टीनोच्या 'द हेटफूल एट' चित्रपटाला प्रौढांसाठी घोषित करुन वर काटछाट, शब्द म्यूट करणं यासारखे अत्याचारही त्यावर केल्याचं दिसून आलय. प्रौढांसाठी चित्रपट असल्याचा दाखला देऊनही त्यात काटछाट करणं हा सेन्सॉर बोर्डचा नित्याचा आणि शुध्द मूर्खपणा आहे. वितरकांना, निर्मितीसंस्थांना, जर चित्रपट कमी वयोमर्यादेच्या प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा असेल, तर काटछाट करुन वयोमर्यादेत सवलत देणं हे समजण्यासारखं आहे. पण एकदा का चित्रपट एका वयापलीकडच्या प्रेक्षकांसाठी आहे हे गृहीत धरलं, की त्यात दुरुस्त्या सुचवण्याची हिंमत सेन्सॉरने का करावी? हे सर्रास आणि अनेक महत्वाच्या दिग्दर्शकांबाबतचं त्यांचं धोरण आहे जे नक्कीच निंदनीय मानता येईल. असो.
मध्यंतरी मला कोणीतरी ऑस्करबाबत प्रश्न विचारला होता, की आपला राष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट आणि ऑस्कर विजेते चित्रपट यांची तुलना शक्य आहे का? खरं सांगायचं, तर हा प्रश्न फारसा योग्य नाही. कारण ऑस्कर पारितोषिकं आणि आपला राष्ट्रीय पुरस्कार यांमधे एक मूलभूत, धोरणात्मक मानता येईल असा फरक आहे. ऑस्कर पारितोषिकं, ही कायमच व्यावसायिक चित्रपटांची, व्यावसायिक दृष्टीने देण्यात आलेली पारितोषिकं असतात. समांतर वळणाच्या अमेरिकन इंडिपेन्डन्ट चित्रपटांचा सन्मान करण्यासाठी 'इंडिपेन्डन्ट स्पिरीट अवॉर्ड' नावाची वेगळी पारितोषिकं असतात, ज्यांचं वितरण ऑस्कर पुरस्कारांच्या आदल्या दिवशी केलं जातं.त्यांचा दृष्टीकोन हा अधिक कलाभिमूख आणि आपल्या राष्ट्रीय पुरस्कारांमागच्या कलेला अधिक महत्व देण्याच्या भूमिकेशी सुसंगत असतो.
गंमत अशी, की ऑस्करकडून ती अपेक्षा नसतानाही, गेल्या काही वर्षातली पारितोषिकं पाहाता लक्षात येईल की ऑस्करनेही आपला दृष्टीकोन काहीसा बदलून अधिक मोकळा केला आहे. त्याशिवाय साईडवेज ( २००४ , ऑस्करला पाच नामाकनं, आधारित पटकथा विभागात विजेता,स्पिरीट अवॉर्डमधे उत्कृष्ट चित्रपटासह सहा नामांकनं, सर्वात विजेता) बॉयहूड (२०१४, ऑस्करला सहा नामांकनं, सहाय्यक अभिनेत्री विभागात विजेता , स्पिरीट अवॉर्डमधे पाच नामाकनं, दिग्दर्शन आणि सहाय्यक अभिनेत्री विभागात विजेता) यासारखे चित्रपट आॅस्कर नामांकनातच येऊ शकले नसते. दरवर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकनात या दोन अवॉर्ड्समधे कोणी ना कोणी कॉमन असतच. यंदा स्पॉटलाईट, या टॉम मॅकार्थी दिग्दर्शित चित्रपटाची वर्णी दोन्ही ठिकाणी लागलेली आहे. तरीही जर आपल्याला खरोखर नॅशनल अवॉर्ड्सची तुलना करायचीच असेल, तर ती स्परीट अवॉर्ड पेक्षाही ऑस्करच्या परभाषिक चित्रपट पुरस्कारांशी करावी लागेल. जगभरातून अनेक देशांनी पाठवलेल्या चित्रपटांना निवडताना जे निकष लावले जातात ते खरोखरच केवळ कलामूल्याचे असतात. आणि आपल्याकडे , खासकरून प्रादेशिक चित्रपटांमधून याप्रकारचे चांगले चित्रपट बनत असतात. ते ऑस्करला पाठवतानाची निवड मात्र नेहमी जमतेच असं नाही.
परभाषिक पुरस्कारांच्या मुद्द्यावर आलोच आहे, तर कोर्टविषयी बोलल्याखेरीज पुढे सरकता येणार नाही. या वर्षी आपण ऑस्करकरता पाठवलेला चित्रपट, अर्थात चैतन्य ताम्हणेचा कोर्ट एका नस्त्या वादाचं कारण झाला होता. वाईट याचं वाटतं, की क्वचितच आपण या योग्यतेचा चित्रपट पाठवू शकतो, पाठवतो. दुर्दैवाने या निवड प्रक्रियेत जे वाद घडले, त्यांनी या चांगल्या निवडीवर एक प्रश्नचिन्ह उभं केलं.
आपल्याकडे हल्ली एक सवय लागून गेलीय. 'जे मला स्वत:ला व्यक्तीगत पातळीवर उमजू शकलं नाही, ते सुमार आहे', असं म्हणून टाकायची. पूर्वीही सहजपणे अर्थ न लागणाऱ्या कलाकृती असत, पण ज्यांच्या मनात शंका उपस्थित होई, ते 'आम्हाला हे कळलं नाही',म्हणून थांबत. त्यापलीकडे जाऊन त्याच्या दर्जावर ठाम भाषण करण्याची कोणाला आवश्यकता वाटत नसे. एखादी गोष्ट न समजण्यात गैर काहीच नाही. सगळ्याना सगळं समजतं, सगळं समजायला हवं असं थोडच आहे? काहींना अकाऊंट्समधलं कळत असेल, काहींना वास्तुकलेतलं कळत असेल, काहींना पाकक्रियेतलं कळत असेल, तसच काहींना सिनेमातलं. तरीही चित्र, सिनेमा यासारख्या गोष्टी प्रत्येकाला उस्फूर्तपणे कळतात, त्यासाठी नजर तयार होण्याची गरजच नाही, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. या समजातून, तसच सोशल मिडीआने देऊ केलेल्या कोणत्याही जबाबदारीशिवाय मुक्तपणे मतप्रदर्शन करण्याच्या हौसेमधून हा ठाम नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. ( राष्ट्रीय पुरस्कारांच्या निवडीनंतरही असाच नकारात्मक प्रतिसाद उफाळून आलेला आपल्याला दिसतो. या बक्षीसपात्र चित्रपटांची नावंही आम्ही कधी एेकली नाहीत , यांच्यातले काही प्रदर्शितही झाले नाहीत, मग आता यांना पुरस्कार कसा, असं चवताळून लिहीलेली पत्र दर राष्ट्रीय पुरस्कारानंतर पेपरात आलेली दिसतात. फेसबुक वगैरेवरही या प्रकारची टीका असते). या वेळी आपण हे विसरतो, की ही निवड, मग ती ऑस्करसाठी पाठवण्याच्या चित्रपटाची असो, किंवा राष्ट्रीय पुरस्कारांमधली असो, ही त्या विषयातल्या तज्ञांनी केलेली असते, प्रेक्षकांच्या कौलावर ती केली जात नाही.
यंदाची कोर्टची निवड योग्य होती यात शंकाच नाही. आता कोर्ट ला जेव्हा परभाषिक नामांकनात स्थान मिळालं नाही, तेव्हा या आपलं मत हाच दर्जा मानणाऱ्या लोकांचं आयतं फावलं आणि 'पहा, आम्ही सांगत नव्हतो', असाएक सूर पुढे यायला लागला. हा सूर बाजूला राहूदे. कोर्ट नामांकनात आला नाही त्याची साधी कारणं असू शकतात. एकतर बरोबरचे चित्रपट त्याहून अधिक चांगले असतील, किंवा दुसरं म्हणजे, त्यांचं या चित्रपटावर एकमत झालं नसेल. जेव्हा अनेक चांगले चित्रपट एकत्रितपणे विचारात घेतले जातात तेव्हा असं होण्याची शक्यता असतेच. माझ्या दृष्टीने मात्र आपल्या बाजूने केलेली ही निवड योग्य होती आणि हाच दर्जा आपण कायम राखला तर आपल्यासाठीही ऑस्कर दूर असणार नाही.
- गणेश मतकरी Read more...
ब्लाॅगची आठ वर्षे - काही आठवणनोंदी
>> Wednesday, January 20, 2016
आठ वर्षांपूर्वी हा ब्लाॅग सुरू करण्यापूर्वी मी मुंबई सकाळमध्ये, बेलापूर कार्यालयात, संपादकीय विभागात काम करीत होतो. पानेक संपल्यावर रात्री दीड वाजता घरी जाण्याचा मार्ग नसल्याने पावणेचारच्या गाडीपर्यंत तेथेच वाचन करत बसायचो किंवा तेव्हा बाल्यावस्थेत असलेल्या यू ट्युब नामक संकेतस्थळाचा वापर गाणी पाहत ऐकण्यासाठी करायचो.
मी तेथे हाॅलीवूड चित्रपटांची परीक्षणे आपण काही थोर काम करीत असल्याच्या थाटात लिहीत होतो. मेघना भुस्कुटे हिच्याकडून गणेश मतकरी यांचे समीक्षण कसे उत्तम असते, अन् ते किती गोष्टी एका लेखातून देतात याची माहिती मिळाली. त्यावेळी मग सकाळच्या अद्ययावत स्मार्ट अर्काइव्हमध्ये (साप्ताहिक सकाळ सुंदर असतानाचा) सगळा डेटा असल्याची खबर लागली. आणि सकाळच्या पुढच्या सगळ्या नाईट्स गणेशचे लेख वाचण्यात गेले. आपण सिनेमावर किती फोकना़डोत्तम लिहीत होतो याची जाणीव झाली.
आॅरकुटवर गणेश यांच्याशी ओळख झाली. तो काळ डीव्हीडी क्रांतीचा होता. पुढच्या काही दिवसांत डीव्हीडी, सिनेमे यांची चर्चा झाली. तेव्हा सिनेमा पॅरेडेसो नावाचा ब्लाॅग मी तयार केला होता. माझ्या सिनेमावरच्या लिखाणाचा. तो रद्द करून त्याजागी गणेशचे आर्टिकल्स टाकणे सुरू केले. मला माहिती होतं या लेखनातून मला जे मिळतंय, तेच साप्ताहिक सकाळ परिघाबाहेरच्या लोकांनाही मिळेल. अन् झालंही तसंच.
त्यादरम्यानच डीव्हीडी पायरसीमुळे सिनेमा आकलन विस्तारत होतं. यू ट्युबमध्ये सिनेमा अपलोडीकरण वाढत होतं आणि फोकनाडवजा लिहायला वगैरे जमू लागलं होतं. मी कुठेही डीव्हीडी शोधत असायचो. मुंबई, ठाणे उपनगरांतील डीव्हीडी अड्डे तयार झाले होते. ब्लाॅग नियमित झाला होता. गणेशचे अड्डेही माहिती झाले होते. अन् त्यांच्यासोबत डीव्हीडी, सिनेमा, लेखनचर्चा यांची देवाणघेवाण होत होती. टोरण्ट्स नसण्याच्या काळात रस्त्यावर भलतीच चांगली डीव्हीडी मिऴाल्यास दोन दिवस तरंगणं व्हायचं. डॅनी बाॅयल यांच्या स्लमडाॅग मिलिआॅनेरचे आॅस्कर पक्के झाल्याच्या काळात रस्त्यावर उघड्या ठेवल्या जाणा-या सेमी पोर्न सिनेमाच्या गठ्ठ्यात मला त्याचा शॅलो ग्रेव्ह हा पहिला सिनेमा सापडला होता. पाहिल्या-पाहिल्या गणेशजवळ सुपूर्द केला. त्यावर चौकटीबाहेरच्या सिनेमावरचा लेख झाल्यानंतर डीव्हीडी शोधाचे श्रम वसुल झाले. तोच आनंद नोव्हेंबर (कळकट्ट जुनाट डीव्हीडींच्या ठाण्यातील एका गाडीवरील गठ्ठ्यातून)
रिस्टकटर्स - ए लव्ह स्टोरी(थायलंडमधून आणलेल्या संग्रहातून), द किंग आणि वन्स (फोर्टातील अड्ड्यातून) या चित्रपटावरच्या ब्लाॅगवरील धारदार लेखांच्या बाबतीतही आला. या ब्लाॅगमुळे माझं ज्ञान ठोकून-ठाकून वाढवता आलं, हा इथल्या वाचकांपेक्षा माझा अधिकचा फायदा आहे.
ब्लाॅग सुरू केला त्यावेळचा डीव्हीडी क्रांतीचा जोम आता ओसरलाय. नेटफ्लिक्स , टोरंट, टोरबाॅक्स, हब असे कैक पर्याय सिनेमावेड्यांसाठी या आठ वर्षांच्या काळात दाखल झालेत. परदेशी व देशी चित्रपटांवर फेसबुकपासून ब्लाॅगवर लेखन जोमाने येतंय.
सिनेमा साक्षरीकरणाचे मूलभूत काम या ब्लाॅगने आठ वर्षांत केले. पुढल्या वर्षांतही हा ब्लाॅग सिनेदिशादर्शक म्हणून भूमिका बजावू शकेल, याची खात्री आहे. या ब्लाॅगची वाट पाहणा-यां सगळ्यांचे आठ वर्षे सोबत केल्याबद्दल आभार . गेले संपूर्ण वर्ष संथावस्थेचे टोक गाठलेला ब्लाॅग यंदा (पन्नास आठवड्यांच्या हमीसह) निश्चितपणे सक्रिय राहणार आहे.
-पंकज भोसले, ब्लाॅगएडिटर
ब्लाॅगला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गणेश यांचा रुपवाणीतील लेख येथे वाचायला मिळेल.
मराठीचे दिवस
मी मराठी फिल्म्सचे रिव्यू नियमितपणे लिहायला लागलो, त्याला आता वर्ष होऊन गेलं. त्याआधीचं माझं लिखाण हे प्रामुख्याने इंग्रजी आणि जागतिक सिनेमा, त्यानंतर काही प्रमाणात हिंदी आणि त्याहूनही कमी मराठी चित्रपटांबद्दलचं असं होतं. तसं ते साहजिकही होतं, कारण मुळात मी लिहायला सुरुवात केली तेव्हा , म्हणजे १९९७ मधे, मराठी सिनेमा असून नसल्यासारखा होता. तथाकथित विनोदी चित्रपटांचं वेड संपत आलं होतं, काही निर्माते , दिग्दर्शक धकवून मराठी चित्रपट काढत होते, पण त्यांना काही डिमान्ड नव्हती. कोणाला ते पहाण्यात फार रसही नव्हता. भावे, सुकथनकर, पटेल, पालेकर अशी गंभीरपणे काम करणारी मंडळी होती, पण त्यांचं काम तसं थोडकं होतं, आणि त्यातलही बरचसं सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोचत नसे.
खरं तर प्रेक्षकाचा मराठी सिनेमा या गोष्टीवरुन विश्वासच उडाला होता. आणि त्याला तरी दोष कसा देणार? गेल्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी सिनेमाची जी झेप दिसली होती , त्याच्या बरोबर उलटा प्रवास आपण शतकाच्या उत्तरार्धात करुन दाखवला होता. त्याची कारणं हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल, त्यामुळे मी त्यात पडणार नाही, पण एक मात्र म्हणेन की परिस्थिती आशादायक नव्हती. मी लिहायला लागलो ते मुळातच इंग्रजी सिनेमाची परीक्षणं ,या प्रकारचं, पण माझी खात्री आहे, की कोणी मला मराठी चित्रपटांवर लिहायला सांगतं, तर कदाचित समीक्षेपासून मी चार हात दूरच राहिलो असतो.
पुढे पुढे, म्हणजे , २००४ नंतर मराठी चित्रपट कसा सुधारत गेला आणि श्वासपासून त्याला एक लेजिटिमसी कशी आली, मराठी सिनेमांचं नाव कसं देशभरात पोचलं, आणि चित्रपटसृष्टीत कसा उत्साह संचारला हे आपल्याला माहितच आहे. हा उत्साह थोडा धोकादायक होता, कारण त्यामुळे उद्योगाला फुगवटा आला हे खरं असलं, कामाचा दर्जा काही प्रमाणात सुधारला हेही निश्चित असलं, तरी संख्या आणि दर्जा यांचं प्रमाण व्यस्त आहे , हा मुद्दा बराचसा दुर्लक्षित राहिला. आधी संदीप सावंत, आणि पाठोपाठ सचिन कुंडलकर, निशिकांत कामत, उमेश कुलकर्णी, रवी जाधव, मंगेश हाडवळे अशा तरुण आणि कलात्मक तसंच व्यावसायिक प्रकारचे चित्रपट हाताळणाऱ्या पिढीमुळे आपण सहजच राष्ट्रीय पुरस्कारात पोचलो. पण या सर्वांचा सिनेमा म्हणजे काही संपूर्ण मराठी सिनेमा नव्हता. आणि आजही नाही.
जेव्हा आपण सहजच मराठी सिनेमाचं कौतुक करतो, तेव्हा त्याचे पुरस्कार, तो हाताळत असणारे विषय, महोत्सवांमधली उपस्थिती आणि काही निवडक चित्रपटांचे आर्थिक उच्चांक, याची चर्चा होते, पण त्याचा एकूण प्रभाव काय आहे, त्याचा प्रेक्षक कोण आहे? ( आणि त्याहून महत्वाचं म्हणजे किती आहे?) आपण ज्यांची नावं घेतो ते चित्रपट हे मराठी चित्रपटांचं खरं रिप्रेझेन्टेशन होऊ शकतील का? असे अनेक प्रश्न या पार्श्वभूमीवर संभवतात,ज्यांचा पुरेसा विचार होत नाही, केला जात नाही. जेव्हा मी नियमितपणे मराठी चित्रपटाचं परीक्षण करत नव्हतो, तेव्हाही मला हे प्रश्न पडत होतेच, पण त्यांचा फार विचार करण्याची गरज वाटत नव्हती. मराठी चित्रपटाचं कौतुक होतय याचा आनंद होता, शिवाय पहायचे असले तर वर उल्लेखलेल्या काही किंवा त्याच्याच जातकुळीतल्या इतर दिग्दर्शकांचे चित्रपट एक आशादायक चित्र रंगवण्यासाठी पुरेसे होते.पुणे मिररने मला मराठी चित्रपटांची परीक्षणं करायला सांगितलं तेव्हा ते स्वीकारण्यामागे, हे वरवरचं चित्र डोळ्यासमोर अधिक स्पष्टपणे उभं रहावं, हा एक हेतू होता. आवडत्या दिग्दर्शकांचे, केवळ नाव मिळालेले चित्रपट नं बघता सरसकट बरं, वाईट , दर्जेदार, अभिरुचीहीन, प्रेक्षकप्रिय , एलिटीस्ट असं सारच पाहिलं तर एक वास्तव अंदाज डोळ्यापुढे येईल अशी माझी अपेक्षा होती. आता वर्षभरानंतर तो काही प्रमाणात आलाय, असं मी म्हणू शकतो. त्यादृष्टीने मी नित्य पडणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं देऊन पहाणार आहे. अर्थात, ही उत्तरं वैयक्तिक स्वरुपाच्या निरीक्षणांवर आधारित आहेत आणि त्याच फ्रेमवर्कमधून त्यांच्याकडे पहायला हवं. जारगन किंवा आकडेवारी यांना दूर ठेवूनच ती मांडली आहेत.
कोणालाही पडेलसा पहिला प्रश्न म्हणजे आजचं मराठी चित्रपटाचं नेमकं स्वरुप काय?
मी म्हणेन, की आजचा मराठी सिनेमा हा बराचसा गोंधळलेल्या स्थितीत आहे, जरी ही परिस्थितीदेखील शतकाच्या सुरुवातीच्या दिवसांपेक्षा फारच चांगली म्हणावी लागेल. तेव्हा मुळात फार कमी चित्रपट बनत होते, जे बनायचे त्यांनाही प्रेक्षक नव्हता आणि एकूण चित्र हे निराशाजनक होतं. आजच्या चित्रपटात वरवर पहाता तरी सुबत्ता असल्याची लक्षणं आहेत. आज वर्षाला सहजच शंभराहून अधिक मराठी चित्रपट बनतायत, दर आठवड्याला दोन तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होतायत आणि नवनव्या चित्रपटांच्या मुहूर्तांच्या, चित्रीकरणाच्या बातम्या येतायत. झी , व्हायाकॉम यासारखे मोठे निर्माते / वितरक, तसंच इतर कॉर्पोरेट संस्थाही या चित्रपटांमधे रस घेऊन आहेत, राष्ट्रीय पुरस्कारांत दहाबारा पुरस्कार तर हमखास ठरलेलेच आहेत.
या सगळ्याला वरवर म्हणायचं ते का, तर हे सारं, म्हणजे चांगल्या निर्मितीसंस्थांच्या सहभागापासून पुरस्कारांपर्यंत आणि व्यावसायिक यशापासून ते प्रेक्षकांच्या समाधानापर्यंत सारच होतय, ते जेमतेम दहा पंधरा टक्के चित्रपटांपुरतं. बाकी सगळा आनंदच आहे. गेल्या वर्षभरातल्या मराठी चित्रपटांकडे पाहिलं तर काही उत्तम ,अगदी सर्वच बाबतीत दर्जेदार ( कोर्ट, फँड्री, रेगे इत्यादी) , काही ब्लॉकबस्टर वर्गातले ( टिपी २, लय भारी इत्यादी ), काही व्यवसायाच्या चांगल्या शक्यता असणारे आणि आशयाला महत्व देणारे ( डॉ प्रकाश बाबा आमटे, हॅपी जर्नी, कॉफी आणि बरच काही, एलिझबेथ एकादशी, पोस्टर बॉईज इत्यादी) आणि काही वेगळा प्रयोग करु पहाणारे ( बायोस्कोप, बहुधा हा एकच, कोर्ट दुसऱ्यांदा पकडायचा नसेल तर) असे काही लक्षणीय म्हणा, लक्षवेधी म्हणा चित्रपट आले ( ही पूर्ण यादी नाही , दोनचार इतरही असतील) ,पण त्याबरोबर अनेक चित्रपट असेही आले की जे लक्षातही राहू नयेत. ज्यांना एकतर आपलं जुनच दळण दळायचं होतं, किंवा त्या निर्मात्यांना हात साफ करण्यासाठी हिंदी पेक्षा मराठी निर्मिती स्वस्त वाटत होती ( अमराठी निर्मात्यांमधे हा प्रकार खूप) , किंवा ज्यांचा आपल्या चित्रपटाच्या दर्ज्यापेक्षा संख्येवर भर होता , किंवा ज्यांनी पुरेसा विचार न करता काहितरी करायचं म्हणून करायला घेतलं होतं. मराठी चित्रपटांची एक गंमत आहे, अॅपेरन्टली निर्मितीसाठी कोणालातरी पटवणं हे काम तितकं कठीण नाही. त्यामुळे हे चित्रपट उभे तर रहातात, निर्मात्यांची आपलं नाव पडद्यावर पहाण्याची हौसही होते, पण निर्मितीइतकाच वा त्याहून अधिक पैसा चित्रपटात घालणं सर्वांना झेपत नाही, किंवा एकदा आपल्या नावाने चित्रपट झाल्यावर त्यावर पुन्हा इतका खर्च वर्थ वाटत नाही, जे असेल ते असो, पण यातले अनेक चित्रपट हे प्रदर्शनाच्या वेळी गडबडतात हे खरं.
चांगल्या चित्रपटातही सर्वाना चांगला किंवा समान प्रतिसाद मिळतो असं नाही. झी सारख्या भरभक्कम संस्था ज्याच्या पाठिशी उभ्या असतात, ते चांगलं मार्केटिंग/ वितरण करु शकतात, चित्रपटगृहात सिनेमा टिकवू शकतात. हे सिनेमे मुळात चांगले असले, तरी त्याना माउथ पब्लिसिटी, चांगली चित्रपटगृह यांचा फायदा मिळतो, तो प्रामुख्याने मोठ्या संस्थांच्या मदतीने. आता साहजिक आहे, की अनेक चित्रपट चांगले असले तरीही या संस्था साऱ्यांना सारखी मदत करु शकत नाहीत. मग ज्यांना त्याची मदत होत नाही, त्यांना चित्रपटगृहात म्हणावं तसं यश मिळत नाही.
मी यातल्या अनेक निर्मितीप्रमुखाना, दिग्दर्शकाना बोलताना एेकलय, की मार्केटींग वगैरे पहिल्या खेळापर्यंतच असतं, पुढे चित्रपट चांगला असला तर चालतोच. हे अर्धसत्य आहे. कारण चित्रपट कुठे लागतो, त्याचं पी आर किती होतं, जाहिरात किती होते यावर तो पहिल्या आठवड्यात किती चालतो हे अवलंबून असतं. मार्केटिंग वगैरे होऊनही चित्रपट चांगला नसला तर पडू शकेल, पण केवळ चांगला चित्रपट हा इतर मदतीशिवाय चालणं हे जवळजवळ अशक्यच असतं.
आता पुढला प्रश्न हा, की जर चांगला असूनही चित्रपट भक्कम मदतीखेरीज चालायचं नाव घेत नसेल, तर यात प्रेक्षकांचा दोष किती? कारण राजकारण्यांच्या लोकांची अस्मिता जागृत करणाऱ्या भाषणांपासून , चित्रपटाला मिळालेल्या पुरस्काराच्या यादीपर्यंत एकाही गोष्टीने जर प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळत नसेल , आणि भक्कम मदत मिळालेला - जाणकारांनी कौतुक केलेला चित्रपटही थिएटरमधे पाहून आल्यावरही, केवळ त्यातून पारंपारिक वळणाची करमणूक होत नाही या कारणाने चित्रपटाला सोशल नेटवर्कवर जाहिर शिव्या देण्यात हा प्रेक्षक काहीच गैर समजत नसेल, तर यात प्रेक्षकांचा दोष नाही तरी कसं म्हणायचं?
'फिल्म सोसायट्यांचं एक आवडतं वचन आहे, की आपण चांगले प्रेक्षक बनेपर्यंत आपला चित्रपट सुधारणार नाही'. या वचनावर माझा विश्वास नाही. प्रेक्षक सुधारणं आणि चित्रपट सुधारणं या एकाच सुमाराला, हळूहळू घडणाऱ्या क्रिया आहेत. एक संपूर्ण बदलेपर्यंत दुसरीने ढिम्म हलू नये असं होणं बरोबर नाही, तसं व्हायचंही नाही. त्यामुळे प्रेक्षक आधी बदलणार नाही, हे आलच. मात्र आपला चित्रपट बदलत असल्याचं लख्ख दिसत असताना, त्याच्यापुढे काय अडचणी आहेत हे ठाऊक असतानाही जर प्रेक्षकाने या बदलत्या चित्रपटाला मदत करण्यासाठी काहीच हालचाल नं करणं, आपली करमणूकीची व्याख्या बदलायचा जराही प्रयत्न न करणं हा हलगर्जीपणा आहे. त्यातही आज चित्रपट बदलल्यावर उद्या त्यांनी बदलावं असंही कोणाचं म्हणणं नाही. पण नाही म्हंटलं तरी आता श्वासला दहा बारा वर्ष होऊन गेली. अजूनही आपल्या प्रेक्षकाला आजूबाजूचं चित्र बदलल्याचं लक्षातच येत नसेल, तर कमाल आहे.
मध्यंतरी माझा एक मित्र म्हणाला की मराठी प्रेक्षकांच्या डोक्यातून करमणूक हा शब्द काढून टाकून त्याजागी आस्वाद हा शब्द घालायला हवा, तरच काही बदल संभवेल. त्याचं हे म्हणणं तंतोतंत खरं आहे. ते करायचं कसं, एवढाच प्रश्न आहे. प्रेक्षकांचा हा निरुत्साह, चित्रपटांमधला बदल दहा पंधरा टक्क्यांच्या वर नं सरकण्यामागचं एक महत्वाचं कारण मानता येईल. मागणी तसा पुरवठा, आणि पुरेशी मागणी नसताना चांगल्या सिनेमाची बाजारपेठ अचानक विस्तारणार तरी कशी, नाही का?
प्रेक्षकांनी उत्तम चित्रपटांना दिलेली वाईट वागणूक मी अलीकडच्या दोन चित्रपटांच्या वेळी पाहिली. पहिला नागराज मंजुळेचा फॅन्ड्री, आणि दुसरा चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट. फॅन्ड्रीला मार्केटींग स्ट्रॅटेजीमधे प्रेमकथा असल्याचं भासवलं गेलं हे खरं आहे, त्यामुळे त्या अपेक्षेने आलेला प्रेक्षक थोडा वैतागला हे खरच, ( त्या अपेक्षेने येऊनही फँड्री आवडलेला प्रेक्षक होता , शिवाय महत्वाचं म्हणजे अशा वेगळ्या प्रकारच्या चित्रपटाला प्रेक्षक आला, चित्रपट चालला, त्यामुळे मार्केटींग स्ट्रॅटेजी अगदीच फसली नाही, हेही इथे नमुद करायला हवं) पण त्यामुळे त्यांनी समोर दिसणाऱ्या , अनेक पुरस्कार मिळालेल्या आणि समीक्षकांनी कौतुक केलेल्या चित्रपटाला नावं ठेवणं हे एका मोठ्या प्रेक्षकवर्गाला फार काही कळत नसल्याचच लक्षण आहे. प्रेक्षकांना कलाकृती स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क आहे यावर माझं दुमत नाही, किंवा लोकांना मारुनमुटकून काय बरं काय वाईट सांगायला लागावं असही मला वाटत नाही. मात्र इतकं सांगावसं वाटतं, की सर्वच जाणकार जर एखादी गोष्ट मनापासून सांगत असतील, तर केवळ आपली करमणुकीची आजवरची व्याख्या वेगळी आहे या कारणापायी कलाकृतीच्या सिध्द होण्याजोग्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणं हे काही पटण्यासारखं नाही. जाणकारांकडे दुर्लक्ष हा तर मराठी प्रेक्षकाचा खाक्याच म्हणायला हवा. कारण फँड्रीमधे प्रेक्षक चित्रपटाची उणीदुणी काढणारा प्रेक्षक कोर्टला एक पायरी आणखीच वर गेला.
कोर्ट प्रदर्शित झाला तेव्हा त्याची किर्ती फारच मोठी होती. व्हेनिस पासून अनेक मोठ्या महोत्सवातल्या पुरस्कारांना त्याने पटकावलं होतंच, वर आपल्या देशातला सर्वोत्कृष्ट मानाचा चित्रपट पुरस्कार म्हणजे सुवर्ण कमळ, हाही त्याने पटकावला होता. कोर्टबद्दल उत्तम परीक्षणं यायलाही लगेच सुरुवात झाली, त्याचबरोबर नवं काही पहाण्याची तयारी , समज आणि पेशन्स असलेल्या बऱ्याच प्रेक्षकांकडून सोशल नेटवर्कवरही त्याचं कौतुक करण्यात आलं. आता हे पाहून सवयीच्या गोष्टीपलीकडे काहीही पहाण्याची तयारी नसलेला प्रेक्षक बिथरला आणि ' आम्हाला चित्रपट आवडला नाही असं म्हणण्याचा अधिकार नाही का ?' असा एक चुकीचा सूर लावला गेला. कोर्ट यंदाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटात पहिला दुसरा असेल. पण आपल्याकडे ना त्याला हवं तसं वितरण मिळालं, ना पुरेसा प्रेक्षक. हे आता नित्याचच झालय. त्यामुळे एक गोष्ट नक्की. आपल्याकडे मराठी चित्रपटात लक्षणीय फरक हवा असेल, तर प्रेक्षकाच्या मानसिकतेत निश्चित बदल हवा, त्याला पर्याय नाही.
सामान्यत: समीक्षकांवर एक टिका होते, ती म्हणजे समांतर वळणाच्या चित्रपटाला डोक्यावर घेतलं जातं, व्यावसायिकला बाजूला ठेवलं जातं किंवा नकारात्मक तरी लिहिलं जातं. हे काही खरं नाही. समांतर वळणाचे काय, वेगळे विषय असणारे काय किंवा व्यावसायिक काय, सर्व प्रकारच्या चित्रपटांमधे चांगलं वांईट असतच. टिका होते ती या अंगांना धरुन, सरसकट विशिष्ट प्रकारावर नाही. आजचा मराठी चित्रपटही या दोन्ही प्रकारांना ओळखतो. आणि का ओळखणार नाही? त्यांचं अस्तित्व एक उद्योग म्हणून टिकण्यासाठी या दोन्ही विचारधारा आवश्यक आहेत. मात्र या विचारधारांना कोणते निकष लावायचे, याचा मात्र काही वेळा गोंधळ उडताना दिसतो. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकाचाच नाही, तर समीक्षकांचाही.
गंभीर किंवा सेन्सेशनल विषय असलेल्या चित्रपटाचं त्याच्या गुणवत्तेचा विचारच न करता कौतुक करायचं, असा एक पायंडा आहे , जो धोकादायक अाहे. त्याचप्रमाणे रंजनाची व्याख्या काय याबद्दलही मोठाच गोंधळ आहे. एखादा चित्रपट तुम्हाला गुंतवत असेल, तर त्याला रंजन म्हणता येणार नाही का? त्यासाठी पारंपारिक रचनेचा किंवा नाच गाणी विनोद अशा घटकांचा आधार कशाला घ्यायला हवा? किंवा याचाच कॉन्वर्स म्हणजे हा आधार घेणारा चित्रपट हा बाय डिफॉल्ट रंजक म्हणता येऊ शकतो का? असे प्रश्न अजूनही आपल्याला सोडवता आलेले नाहीत. गुणवत्ता केवळ संदर्भाने कळत नाही. हा चित्रपट त्या दुसऱ्या सारखा आहे, आणि तो दुसरा चित्रपट तर गाजला होता, म्हणजे तर्काच्या आधाराने हा चित्रपटही चांगलाच असावा, असं समीकरण मांडणं योग्य नाही. जेव्हा कोर्टसारखा एखादा चित्रपट येतो आणि त्याची तुलना करण्यासारखं मराठी चित्रपटांमधे काहीच नसतं तेव्हा आपण गडबडतो. मग इतरांचं एेकून त्याला आंधळेपणाने चांगलं म्हणतो, किंवा आपली पारंपारिक निरीक्षणं वापरुन चित्रपट फसला असं म्हणतो. हे व्हायला नको, त्याएेवजी दर चित्रपटाबद्दल स्वतंत्र मत घडवणाऱ्या एका इन्स्टीन्क्टची आपल्याला आवश्यकता आहे, जो लवकरात लवकर तयार झाला पाहिजे. त्याशिवाय आपण सगळेच चाचपडतो आहोत.
मराठी चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात येतो, तेव्हा तो चालेल का पडेल याचं गणित हे अनेकदा स्पष्ट दिसत असतं. बहुतेक मराठी चित्रपट चित्रपटगृहात फार कमाई करु शकत नाहीत. यात मी वर म्हंटल्याप्रमाणे वितरणाचा अँगल तर आहेच, पण त्याच्याशी जोडलेला आणि प्रेक्षकांकडून सतत बोलला जाणारा आणखी एक अँगल आहे, आणि तो म्हणजे चित्रपटांची संख्या. सोशल नेटवर्कवर हा प्रश्न मला अनेकदा विचारण्यात येतो की मराठी प्रेक्षकाची आर्थिक क्षमता ही महिन्याला सरासरी दोन तीन मराठी चित्रपट पहाण्याची आहे. आता जर महीन्याला दहा पंधरा चित्रपट प्रदर्शित व्हायला लागले तर आम्ही ते पहायचे कसे? आणि मग ते पडले तर प्रेक्षकांच्या माथी खापर का?
प्रश्न काही प्रमाणात रास्त आहे पण पूर्णपणे नाही. आपल्याकडल्या मराठी माणसाची महिन्याला केवळ दोन तीन टॅक्स फ्री सिनेमे पहाण्याइतकी बेताची परिस्थिती आहे असं वाटत नाही. शिवाय खान कंपनी आणि इतरांचे जे हिंदी चित्रपट सुपरहिट होतात ते पूर्णत: अमराठी प्रेक्षकांच्या जीवावर असंही वाटत नाही. त्यामुळे दोन तीन, या आकड्याचा संबंध परवडण्यापेक्षा चॉईसशी असावा. मात्र तो आकडा फारच कमी आणि काळजी करण्यासारखा आहे, कारण चित्रपटमहामंडळापासून ज्येष्ठ निर्मात्यांपर्यंत अनेकांचे सर्व चित्रपटांना वितरणासाठी समाधानकारक तारखा, वेळा मिळाव्यात या दृष्टीने प्रयत्न चालले असले, तरी त्यांचं गणित सहज सुण्यातलं नाही. वर्षाला शंभर सव्वाशे चित्रपट येत असले, वर्षाला बावन्नच आठवडे असले आणि त्यातलेही काही परीक्षांच्या वेळा, सणवार, मोठे हिंदी रिलीज यांनी खाऊन टाकलेले असले, तर दर आठवड्याला दोन तीन चित्रपट प्रदर्शित होण्यावाचून इलाजच उरत नाही. अशा वेळी प्रेक्षकाला काय पहावं , काय नाही, याचा विचार करता आला, तर काही चांगल्या चित्रपटांना मदत होण्याची आणि सुमार चित्रपट आपोआप वगळले जाण्याची शक्यता आहे. असे ते कायम वगळले गेले तर प्रेक्षकाना काय आवडतं काय नाही याचं एक चित्र उभं राहू शकतं, पण निवडीत सुस्पष्टता नसल्याने ते होताना दिसत नाही.
चुकीच्या वेळा हा चित्रपटाना कायमच सतावणारा प्रश्न. आणि कदाचित मराठी आशयपूर्ण मराठी चित्रपटांचं मोठं नुकसान करणारा. मध्यंतरी चित्रपटाना संध्याकाळची वेळ मिळावी असा एक फतवा सांस्कृतिक मंत्र्यांनी काढून पाहिला, पण तो मल्टीप्लेक्स मालकानी आणि हिंदी निर्मात्या वितरकांनी इतक्या चतुराईने गुंडाळला की कोणाला काही कळलच नाही. मराठीला प्राईम टाईम निश्चित मिळायला हवा पण खरं तर दुपार पासून रात्रीपर्यंत साराच प्राईम टाईम असतो अशा घोषणेने त्यांनी मराठी चित्रपटांकडे आपलं लक्ष आहे हेही दाखवलं आणि परिस्थितीत काहीही बदल होणार नाही हेदेखील पाहिलं. इतर राज्यांमधेही व्यावसायिक चित्रपटांचं वर्चस्व असतं आणि आशयाला महत्व देणारा चित्रपट मागे असतो, पण निदान ते सारं त्यांच्याच भाषेतलं असतं. आपल्याकडला सर्व कारभार हा हिंदी धार्जीणा आहे ज्यामुळे मराठी चित्रपटांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतय. अर्थात , सरकार यावर मार्ग काढील या भ्रमात आपण नं राहिलेलच बरं.
आता या सगळ्या बिकट परिस्थितीत मराठी चित्रपट निघत रहातायत याचं कौतुक करावं, का त्यातले बहुसंख्य दर्जेदार नाहीत याचं दु:ख करावं? आणि ज्यांना आपण दर्जेदार म्हणतो त्यांचा दर्जाही कोणत्या फुटपट्टीवर मोजायचा? हे सारे जागतिक पातळीवरचे चित्रपट मानले जावेत का? आणि जाणार नसले तर त्यांचं मूल्यमापन कसं करायचं?
मला विचाराल तर सर्व चित्रपटांची तुलना जागतिक चित्रपटांबरोबर करुच नये. प्रत्येक चित्रपटाची त्या माळेत जाऊन बसण्याची महत्वाकांक्षा नसते, अनेकदा त्यांना तशी गरजही वाटत नाही. ऑस्करला नॉमिनेटेड दर सिनेमा हा जागतिक वळणाचा असतो का? नाही ना? त्यांचे वेगळे नियम असतात. तसच कोणत्याही मराठी चित्रपटाने आपला प्रेक्षक ओळखणं आणि त्यांना मूर्ख न समजता , त्यांना जुनाच माल नव्या वेष्टनात न विकता , प्रामाणिकपणे काही देणं, हे पुरे आहे. आता गेल्या वर्षी प्रेमकथा या सदरात बसणारे इतके चित्रपट आले पण त्यातला प्रकाश कुंटेचा कॉफी आणि बरच काही लक्षात राहिला तो त्याच्या साधेपणाने, उस्फूर्तपणाने. अभिजित पानसेचा गुन्हापट रेगे लक्षात राहिला तो त्यात वर्तमानाची जाण दिसल्याने, रचनेतल्या कौशल्याने. या चित्रपटांना आपण नक्कीच चांगले चित्रपट म्हणू शकतो. त्यासाठी लगेच जागतिक सिनेमा गाठण्याची गरज नाही.
गेल्या वर्षी खराखुरा जागतिक चित्रपट म्हणावासा एकच चित्रपट होता आणि तो म्हणजे कोर्ट. तो सर्वाना आवडला नसेलही आणि अनेकाना नाही आवडला हे खरच आहे, पण त्याची दृष्टी ही खरोखरच वर्षभरातल्या एकाही मराठी सिनेमासारखी नव्हती. त्याला गोष्ट सांगायची नव्हती तर व्यवस्थेवर नजर टाकायची होती आणि ती सांगताना प्रेक्षकाना परिचित वाटावं म्हणून कोणतीही तडजोड करण्याची त्याची तयारी नव्हती. गतिमान कॅमेरा आणि क्लोजअप्सच्या युगात फिक्स्ड कॅमेरावर पकडलेल्या त्याच्या वाईडस्क्रीन फ्रेम्सच खूप काही सांगून गेल्या . त्याची खरीखुरी माणसं वाटणाऱ्या नॉनअॅक्टर्सची निवड, प्रसंगाच्या आगेमागे असलेल्या अवकाशाचा शोध, अनपेक्षित शेवट, हे सारंच एका अतिशय टोकाच्या नियंत्रणाखाली होतं. तो यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणावा का? कदाचित !
गेल्या दहा वर्षांच्या टप्प्यात आपण इथवर येऊन पोचलो आहोत. संख्यात्मक वाढ जोरात पण दर्जात्मक परिस्थिती काळजी करण्यासारखी. जी आहे तीदेखील वितरणातल्या मोठ्या माशांच्या मदतीने उभी असणारी. आता पुढे काय? निर्मिती - वितरणातल्या कॉर्पोरेट सेक्टरच्या मते आजचं चित्र खूप आशादायक आहे. आज जिथे दोन तीन मोठ्या कंपन्या आहेत तिथे उद्या पाच सहा होतील. आज जर त्यांच्या छत्राखाली दहा सिनेमे बनत असतील तर उद्या पंचवीस बनतील. आज जे वितरण करतायत ते उद्या निर्मिती करतील, अशा रितीने मराठी सिनेमाचा दुसरा सुवर्णकाळ लवकरच आपल्यापुढे अवतरेल. असं झालं तर आनंदच आहे, पण तसं होईलशी मला खात्री नाही.
जेव्हा मोठ्या संस्था क्षेत्रात उतरतात, तेव्हा त्यांना दर गोष्टीवर त्यांचं नियंत्रण लागतं. मग त्यांचा क्रिएटीव इंपुट हा ग्राह्य मानावा लागतो, त्यांच्या गणितात बसणाऱ्या गोष्टींवरच काम करावं लागतं, ते म्हणतील ते मानावं लागतं. हे सारं करुन आपला टिव्ही उद्योग पैशांनी किती श्रीमंत झाला हे आपण पहात असलो तरी त्याच्या वैचारिक बाजूचं कसं भजं झालं हेही आपण पाहिलय. दिग्दर्शक हा चित्रपटाचा कॅप्टन आहे. पुढल्या वाटचालीतही तो अग्रस्थानी राहून त्याच्या नेतृत्वाखालीच जर गोष्टी घडल्या, तर आपला चित्रपट लवकर सुधारेल. त्यासाठी आपल्याकडे अनेक उत्तम दिग्दर्शक आहेत , त्यांच्याकडे दृष्टी आहे, कल्पना आहेत, पेट प्रोजेक्ट्सही असतालच. पण का कोण जाणे मराठी चित्रपटाची येऊ घातलेली भरभराट दिग्दर्शकाच्या भूमिकेला तोच मान देईल का, याबद्दल मी साशंक आहे. आणि जर का कलावंताचं कलाकृतीवरचं नियंत्रण जाऊन ते लोकशाही तत्वावर गेलं, वा चुकीच्या हुकूमशहाकडे गेलं, तर त्याचं काय होईल हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही.
हे शक्य आहे की कोणाला हा अतिशय निराशावादी दृष्टीकोन वाटेल. असेलही. काय होईल ते लवकरच कळेल. घोडामैदान जवळ आहे.
- गणेश मतकरी Read more...
अभिनेता, भूमिका आणि चित्रपट
>> Sunday, January 17, 2016
दृश्य, शब्द आणि भाषा
>> Sunday, January 10, 2016
चित्रपट दृश्य माध्यम असल्याचं विधान जरी खरं असलं, तरी ते विधान वापरण्यात , वापरणाऱ्यांच्या सवयीचा भाग आहे. काहीही दाखवणं शक्य असलं, तरी सारच दाखवायला हवं, असा त्याचा अर्थ असू नये. दिग्दर्शक काय दाखवतो, कोणत्या पध्दतीने दाखवतो आणि काय दाखवणं टाळलं जातं, या सगळ्यातूनच कोणत्याही चित्रपटाची योजना ठरते. दृश्ययोजनेबरोबरच ध्वनीचा चित्रपटातला वापर हा जवळजवळ तुल्यबल असू शकतो. आपल्याकडे प्रेक्षक, समीक्षकांपासून दिग्दर्शकांपर्यंत सर्वाना एक सवय आहे ती ध्वनीच्या , खासकरुन आवाजाच्या ( त्यात शब्द आले, पण केवळ शब्द नाही. माणसं आवाज अनेक पध्दतीने वापरु शकतात. आपल्याला स्पष्ट न कळणाऱ्या कुजबुजीपासून कानठळ्या बसवणाऱ्या किंकाळीपर्यंत चित्रपटातला आवाज अनेक दृष्टीने वापरला जातो) वापराला कमी लेखण्याची.
दृश्यांना मूळातच एक फायदा होता. तो म्हणजे सिनेमा अवतरल्यापासून पहिली तीस चाळीस वर्ष माध्यमावर दृश्यांचीच सत्ता होती. या काळात अनेक प्रतिभावंत दिग्दर्शकांनी हे माध्यम त्या अनुषंगाने पुढे नेलं. ध्वनीच्या आगमनानंतर सुरुवातीच्या वर्षांमधे काही प्रमाणात चित्रपट शब्दात अडकला हे खरं, पण त्याला कारणं होती. एकतर तांत्रिक अडचणींनी ध्वनीमुद्रण स्टुडिओबाहेर शक्य होईना आणि प्रेक्षकांसाठी बोलपट म्हणजे बोलणारी माणसं हे समीकरण बनलं. मात्र ही नव्याची नवलाई ओसरल्यावर चित्रपटांनी आवाज, संगीत आणि साउंड इफेक्ट्स या साऱ्याचाच किती उत्तम वापर केला , हे आपण अनेक चित्रपटांमधे पाहू शकतो.
सामान्यत: दृश्य आणि ध्वनी, यांचा त्यांच्याकडे स्वतंत्रपणे लक्ष न वेधता केलेला कथानिवेदनाला पूरक वापर, हा चित्रपट सर्वसाधारण प्रेक्षकापर्यंत पोचण्यासाठी महत्वाचा असतो. पण याला बरेच अपवाद आहेत. अनेकदा संकल्पनेच्या गरजेनुसार, दिग्दर्शक एका अंगावर अधिक भर देऊन दुसऱ्याचा कमीत कमी वापर करतात. हा वापर मुद्दाम केलेला आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. एकदोन उदाहरणं पहायची, तर शेन करुथच्या प्रायमर( २००४) सारख्या फिल्मकडे पाहाता येईल. प्रायमर ही ७००० डॉलर्स च्या बजेटवर ( म्हणजे मराठी चित्रपटांहूनही कमी) केलेली सायन्स फिक्शन जातीची फिल्म होती. कालप्रवास हा तिचा विषय होता. आता मुळात या चित्रपटात विज्ञानाधारीत भव्य दृश्यांना वाव तरी कुठे होता? मग चित्रपटाची सारी वातावरणनिर्मिती आणि दृष्टीकोन उभा करण्यासाठी दिग्दर्शकाने विज्ञानाधारीत बडबड वापरली. त्या बडबडीतून खरोखरचं विज्ञान शोधणाऱ्यांच्या हाताला काही लागणार नाही, पण प्रेक्षक चित्रपटात अडकतो तो या बडबडीच्या जोरावर. याच प्रकारे शब्दाला महत्व येतं, ते एका खोलीत घडणाऱ्या ट्वेल्व अॅंग्री मेन (१९५७) किंवा एक्झाम (२००९) सारख्या चित्रपटात, ज्यात दृश्यभाषेचा वापर असला तरी मर्यादीत आहे. मग प्रेक्षक लक्ष देतो ते काय सांगितलं जातय याकडे. अशा चित्रपटांमधली बडबड ही प्रेक्षकाला खटकत नाही कारण प्रेक्षकासाठी ती चित्रपटाचा महत्वाचा भाग असते.
याचच उलट्या बाजूच उदाहरण नुकतच पाहीलं ते म्हणजे मायरोस्लाव स्लॅबोशपिट्स्की या दिग्दर्शकाचा युक्रेनिअन सिनेमा, द ट्राईब (२०१४)मधे . कॅन चित्रपट महोत्सवात तीन महत्वाची पारितोषिकं मिळवलेल्या या चित्रपटाविषयी मी काही वाचलं नव्हतं, पण अचानकच मला तो सापडला इंटरनेटवर पहायला मिळणाऱ्या असंख्य याद्यांमधल्या एकीत. संकल्पना प्रभावी वाटून मी ट्राईबची ट्रेलर पाहिली, तर तीही खास होती. चार पाच दृश्यांचे तुकडे होते. पण त्यांना जोडणारी वाक्य आपल्यासारख्या सवयीने चित्रपट पहाणाऱ्यांना दचकवणारी होती. ती साधारण अशी.
' ही फिल्म साईन लेंग्वेज मधे आहे. त्यात सबटायटल्स किंवा व्हॉइस ओव्हरचा वापर नाही. कारण प्रेम- आणि द्वेष- दाखवण्यासाठी वेगळ्या भाषेची आवश्यकता नसते.'
चित्रपटांमधे खरेखुरे प्रयोग क्वचित पहायला मिळतात, त्यामुळे या प्रकारचा शब्द गाळूनच टाकण्याचा प्रयोग मी चुकवणं शक्यच नव्हतं. फिल्म पाहिली आणि थक्कच झालो. त्यात केवळ संवाद नव्हते असं नाही, तर संगीतही टाळून त्यातल्या वास्तवाची प्रखरता अधिकच तीव्र केली होती.
एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी. साईन लॅंग्वेजमधला चित्रपट म्हणजे मूकपट नाही. त्याला भाषा आहे. यातली पात्र सतत एकमेकांशी चिकार बोलत असतात. फक्त ती जे बोलतात, त्याचा तपशील आपल्याला कळत नाही. आपण जे घडतय त्याचे साक्षीदार असतो, त्यांच्या डोक्यात काय चाललय याची पुसटशी कल्पनाही आपल्याला असते, पण चित्रपट माध्यमात भाषा आल्यापासून आपल्या आकलनात जी स्पष्टता आहे,ती इथे कुठेतरी हरवून जाते.
यापूर्वी मी काही महोत्सवांमधून आपल्याला न कळणाऱ्या भाषेतला चित्रपट सबटायटल्स उपलब्ध नसताना पहाण्याचा पराक्रम केलेला आहे. हा अनुभव थोडाफार त्याच प्रकारचा. फरक एवढाच, की भाषेबद्दल प्रेक्षक अनभिज्ञ असणं हा या चित्रपटांच्या योजनेचा भाग कधीच नव्हता. इथे मात्र तो तसा आहे. ट्राईबचा आणखी एक वेगळेपणा म्हणजे अपंगांविषयी असूनही, त्यात दिसणारं क्रौर्य.
आपल्याकडे, किंवा आपल्याकडेच का, जगभरातच अपंगांविषयी असणाऱ्या चित्रपटात त्यांच्याकडे एका सहानुभूतीने पाहिलेलं दिसतं. मिरॅकल वर्कर(१९६२) ,ब्लॅक (२००५) , चिल्ड्रन ऑफ ए लेसर गॉड (१९८६) , कोशीश( १९७२) , बियॉंड सायलेन्स(१९९६) ,खामोशी (१९९६) , अशी अनेक उदाहरणं पहाता येतील. अर्थात- त्यातली तुलना ही हट्टीकट्टी माणसं आणि अपंग यांमधली असते. ट्राईबमधले सारेच जणं मुके, बहीरे. तो घडतो एका शाळेच्या पार्श्वभूमीवर. शाळेचे शिक्षक / संचालक बोलू, एेकू शकतात का माहीत नाही.एखादा असला तर असेल, पण इतर नाही. कारण ते आपसातही खुणांच्या भाषेतच बोलतात. ही शाळा नावापुरती शाळा. प्रत्यक्षात ती चालते एका गुन्हेगारी संघटनेप्रमाणे. इथे गुंडगिरी, मारामाऱ्या, वेश्याव्यवसायापासून सारं चालतं. आपल्याला या जगाची ओळख होते ती एका नव्या विद्यार्थ्याच्या नजरेतून.पण हा बिचाराही लगेचच त्या विश्वात अडकतो आणि खोल गर्तेत खेचला जातो.
हा चित्रपट पाहून गोल्डींगची भेदक कादंबरी लॉर्ड ऑफ द फ्लाईज ( किंवा तिचं पीटर ब्रुकने केलेलं चित्रपट रुपांतर,१९६३ )आठवणं सहज शक्य आहे. लहान मुलांसारख्या एरवी निरुपद्रवी वाटणाऱ्या आशयसूत्रातून तिथे जशी क्रूर हुकूमशाही व्यवस्था उभी रहाते तशीच इथे ती अपंगांच्या विश्वातून उभी रहाते. प्रेक्षक या विश्वाचा भाग कधीच बनू शकत नाही. दिग्दर्शकाची नजर, आपल्याला कळण्यासारख्या भाषेचा अभाव आणि त्याने योजलेली कॅमेराची भाषा काळजी घेते की आपण केवळ एका असहाय्य निरीक्षकाच्या भूमिकेत राहू. यातले स्थिर कॅमेरातून त्रयस्थपणे या जगात डोकावणारे शॉट्स ( जे क्वचित येणाऱ्या बोलू शकणाऱ्या व्यक्तिरेखाना आवाजाच्या टप्प्याबाहेर ठेवतात) कोर्ट चित्रपटाची आठवण करुन देतात, पण त्याबरोबरच इथे सतत पात्रांना ट्रॅक करणारा हलता कॅमेराही लांबचलांब चालणाऱ्या शॉट्समधून त्याच चतुराईने वापरला जातो.
इथे एक प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. न कळणारी भाषा एरवी चित्रपटात आली, तर ती सर्वसाधारण प्रेक्षकाला कळेलशा भाषेतल्या सबटायटल्समधून आपल्यापर्यंत पोचवली जाते. मग इथे ते टाळण्यामागे प्रेक्षकाला उपरं ठेवणं हे एकच कारण असेल का? कारण एरवी खुणांच्या भाषेलाही सबटायटल्स देता आली असतीच की ! आता हा प्रश्न काही मला एकट्याला पडलेला नाही. अनेकांनी यातून अनेक अर्थ काढले आहेत. माझ्या मते दिग्दर्शक यातून आपल्यालाही जाणीव करुन देतोय की सामान्य माणसांच्या भाषेपासून दूर असणाऱ्या समाजाच्या छोट्या घटकाला ( ट्राईबला?) कायम आपल्यात वावरताना काय वाटत असेल ? त्यांचं उपरेपण त्यांना कसं जाणवत असेल?
जी गोष्ट आपण एरवी गृहीत धरतो तिचा संपूर्ण अभाव आपल्याला कसं भांबावून सोडतो त्याचं हे एक बोचरं आणि परीणामकारक उदाहरण आहे. हा विदारक चित्रपट पहाताना आपण या विश्वाचा भाग बनू शकलो नाही तरी त्यांना काही प्रमाणात समजून घेऊ शकतो, ते त्यामुळेच.
स्टार वॉर्स- नव्या त्रयीच्या निमित्ताने
>> Friday, January 8, 2016
शाळेत असताना माझ्या मोठ्या बहिणीची एक मैत्रिण घरी रहायला आली होती. दोघीजणी कॉलेजच्या ग्रुपबरोबर सिनेमाला गेल्या होत्या, आणि तिथून घरी आल्या. मी गप्पा मारताना तिला विचारलं की,' पिक्चर कसा होता?'. तर म्हणाली ,'काय माहीत ! दोन विरुध्द बाजूचे लोक होते . एका बाजूचे दुसऱ्यावर हल्ला करायचे, तर दुसऱ्या बाजूचे पहिल्या. मला जाम बोर झालं. मी झोपून गेले.'
तिला आपण पाहिलेल्या सिनेमाचं नावही लक्षात नव्हतं. 'एम्पायर आणि पुढे काहीतरी होतं', म्हणाली. हा सिनेमा पहाण्यासाठी तिच्या मित्रांमधे जी प्रचंड एक्साईटमेन्ट होती, ती कशामुळे, हेच तिला कळत नव्हतं.
पुढे जेव्हा मी स्टार वॉर्सची पहिली चित्रत्रयी ( भाग ४/५/६) पाहिली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिने पाहिलेला चित्रपट 'एम्पायर स्ट्राईक्स बॅक' होता. हा अर्विन कर्शनर दिग्दर्शित चित्रपट, मूळ त्रयीतला सर्वोत्कृष्ट आणि एकूण चित्रपटांमधेच अधिक महत्वाचा मानला जातो. त्रयीतल्या ' रिटर्न ऑफ द जेडाय ' या शेवटच्या भागाहूनही अधिक लक्षणीय. तरीही या चित्रपटाचं काय करायचं हे नं कळणारे माझ्या बहिणीच्या मैत्रिणीसारखे इतरही अनेक जण .स्टार वॉर्सने हॉलिवुडचे स्टार वॉर्स पूर्व आणि स्टार वॉर्स उत्तर असे दोन भाग पाडले, ते चित्रपटनिर्मितीची दृष्टी, प्रेक्षक प्रतिसाद आणि दृश्य शक्यता याची गणितं या मालिकेने नव्याने लिहील्यामुळे. प्रेक्षकांचे एका वेगळ्या पातळीवरही दोन भाग पडले असावेत. ज्यांच्यापर्यंत ही मालिका पोचू शकते असा एक प्रेक्षकगट आणि तिचा अर्थच न लागणारा दुसरा.
मध्यंतरी, स्टार वॉर्सच्या ' द फोर्स अवेकन्स' या सातव्या भागाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मी सहजच ही बहिणीच्या मैत्रिणीची प्रतिक्रिया आणि त्यावरची माझी टिप्पणी फेसबुकवर पोस्ट केली. त्यावर आलेल्या कमेन्ट्समधे एकाने विचारलं, की प्रेक्षकाला हे कळत नसेल, तर चूक कोणाची? ( चित्रपटाची, हे त्याला अभिप्रेत उत्तर असावं, जे या चित्रपटांची प्राप्ती पहाता अजिबातच पटण्यासारखं नाही) मला वाटतं म्हणावीशी चूक कोणाचीच नाही.सर्व प्रेक्षकाना सगळच आवडेल, रुचेल अशी अपेक्षाच फोल आहे. प्रत्येकाची निवड ही आपल्या वृत्तीप्रमाणे, आकलनशक्तीप्रमाणे, संदर्भज्ञानाप्रमाणे असते. त्यामुळे अमुक एका प्रेक्षकाला स्टार वॉर्स नाही कळला, तर मी त्याचं काही चुकलं असं निश्चितच म्हणणार नाही. तरीही एक म्हणेन, की आपल्या प्रेक्षकाला काय आवडतं याला फारच मर्यादा आहेत. वास्तवाची चौकट, ही त्याच्यासाठी फार महत्वाची आहे. त्यामुळे बॉलिवुडच्या एस्केपिस्ट फॅन्टसी चित्रपटांमधेही त्याला वास्तवाचा आभास लागतो. वर्ल्ड सिनेमावर पोसलेले अभ्यासकही इतर कशाहीपेक्षा रिअलिस्ट स्कूल्सना अधिक जवळ करताना दिसतात. सायन्स फिक्शनचा तर सर्वांना बऱ्याच प्रमाणात फोबिआच आहे.
आपल्या समीक्षकांनी वा चित्रपट अभ्यासकांनीही फँटसी ला कधीही गंभीरपणे घेतलं नाही आणि हे काहीतरी पोरांचं आहे हा समज वाढीला लावला. प्रत्यक्षात टोलकीनच्या लॉर्ड ऑफ द रिंग्ज वर पीटर जॅक्सनने केलेल्या मालिकेपासून जॉर्ज ल्युकसच्या स्टार वॉर्स पर्यंत अनेक उत्तम , मल्टीलेअर्ड आशय मांडणाऱ्या फिल्म्स या चित्रप्रकारात आहेत ज्यांच्याकडे डोळसपणे पहाणं आवश्यक आहे.
स्टार वॉर्स मालिका वरकरणी उगाचच भयंकर गुंतागुंतीची वाटते, ती प्रामुख्याने दोन कारणांसाठी. एकतर त्याचं नऊ भागात विभागलेलं असणं आणि अनपेक्षित क्रमाने निर्मिती असणं ( ४/५/६/१/२/३) हे अनेकांना गोंधळाचं वाटतं. दुसरं म्हणजे त्याचं वरकरणी सायन्स फिक्शन वाटणारं रुप हे प्रेक्षकांना कम्फर्ट झोनच्या बाहेर नेतं. खरं तर आपण वेगळं काही पहायची तयारी ठेवली, तर यातलं काहीच समजायला कठीण नाही.
स्टार वॉर्स सायन्स फिक्शन नसून पौराणिक, दंतकथांसारखा मुळात भल्या विरुध्द बुऱ्याची गोष्ट सांगणारे चित्रपट आहेत, हे लक्षात यावं ते यातल्या कोणत्याही चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून, ज्यात नेहमीच एक आश्वासक वाक्य लिहिलेलं दिसतं- ए लॉंग टाईम अगो, इन ए गॅलेक्सी फार फार अवे.... पृथ्वीशी जोडलेली वास्तवाची चौकट पुसत ' कोणे एके काळी' पध्दतीने केलेली ही सुरुवात, ही कोणालाही आपल्या लहानपणी वाचलेल्या परीकथांची आठवण करुन देईल. ही मालिका त्या परीकथांसारखीच आहे. सुबोध, पण आस्वादकाच्या क्षमतेनुसार गहन अर्थाच्या शक्यता असणारी.
जॉर्ज ल्युकसने जेव्हा या मालिकेतला पहिला भाग १९७७ मधे बनवला, तेव्हा त्याला या मालिकेला एवढं वारेमाप यश मिळणार हे अर्थातच माहित नव्हतं. एक अपयशी ( THX-1138,१९७१) आणि एक यशस्वी ( अमेरिकन ग्राफिटी,१९७३) असे दोन चित्रपट गाठीशी होते. त्याला दिसणाऱ्या नव्या चित्रपटाची कथा लांबलचक होती आणि कोणत्याही परिस्थितीत ती एका चित्रपटात संपणार नव्हती. त्यावर ल्युकसने काढलेला तोडगा सोपा होता. त्याने ठरवलं, की या लांबचलांब कथानकातला आपल्याला इन्टरेस्टिंग वाटेलसा भाग पहिल्यांदा करायचा, पण त्याला मारुन मुटकून पहिला म्हणायचं नाही. डोळ्यासमोरच्या कथानकाच्या मध्यावर तो असल्याने, त्याला सरळ एपिसोड चार म्हणून टाकायचं. पुढल्या काळातला मालिकेचा आकार ठरला, तो या निर्णयामुळेच.
मी काही या छोट्या जागेत पहिल्या सहा भागांची गोष्ट सांगणार नाही, आणि ती तशी सांगण्यात मुद्दाही नाही. थोडक्यात सांगायचं तर एवढच म्हणता येईल की पहिली चित्रत्रयी, ही जेडाय विरुध्द एम्पायर, या सत्प्रवृत्ती विरुध्द दुष्प्रवृत्ती यांच्यातल्या वैश्विक संघर्षाचं चित्रण आहे. जेडाय योध्यांचा प्रतिनिधी आहे लूक स्कायवॉकर ( मार्क हॅमिल), त्याची बहीण प्रिन्सेस लिआ ( कॅरी फिशर), एक ज्येष्ठ योध्दा बेन कनोबी ( अॅलेक गिनेस) तर एम्पायरचा प्रतिनिधी आहे लूक आणि लिआचा पिता अॅनाकिन स्कायवॉकर, जो आता बाजू बदलून डार्थ वेडर या नावाने एम्पायरला सामील झाला आहे. या युध्दात जेडायना मदत मिळते ती विक्षिप्त प्रवृत्तीच्या हान सोलोची (हॅरीसन फोर्ड) जो नफ्याच्या शोधात अनपेक्षितपणेच सत्कार्याला हातभार ठरतो.
चार पाच आणि सहा, या तीन भागात हे प्राथमिक कथानक घडवल्यावर आणि ते प्रचंड यशस्वी ठरल्यावर, कदाचित ल्युकसने पुढल्या ( आणि आधीच्या) भागांचा विचारच सोडून दिला असावा, पण कालांतराने त्याने पहिल्या तीन भागाना पूर्णत्वाला न्यायचं ठरवलं. १९९९ पुढल्या काळात पडद्यावर येऊन ठाकलेले आधीचे तीन भाग- फँटम मेनेस, अॅटॅक ऑफ द क्लोन्स आणि रिव्हेन्ज ऑफ द सिथ देखील तितकेच यशस्वी ठरले. स्वत: ल्युकसने दिग्दर्शित केलेल्या या तीन भागांमधे त्याने आपली तंत्राशी खेळण्याची हौस पुरती भागवली पण स्वतंत्र साहसांना वाहिलेल्या मूळ चित्रत्रयीहून अधिक गंभीर आशय त्याने अॅनाकिन च्या पांढऱ्या बाजूचं वेडरच्या काळ्या बाजूत रुपांतर करताना दाखवला. हे भाग नव्या दृष्टीत कदाचित कमी असतील, पण आशय आणि तो पडद्यावर आणणारं तंत्रज्ञान हा या सुरुवातीचा कथाभाग मांडणाऱ्या प्रीक्वल चित्रत्रयीचा विशेष ठरला.
गेले काही दिवस मात्र नव्याने घोषित झालेल्या अखेरच्या चित्रत्रयीच्या निमित्ताने चर्चेला ऊत आला होता. ल्युकसफिल्म कडून कोणीच अपेक्षा करत नसलेली अखेरची चित्रत्रयी येणार ही बातमी उत्साहवर्धक होती, पण ल्युकसफिल्म आता डिस्नीकडे गेल्याने मालिकेतल्या गडद छटा कमी करत ती अधिक कौटुंबिक केली जाते की काय, ही भीतीही होती. नुकतच स्टार ट्रेक मालिकेचं पुनरुज्जीवन केलेल्या जे जे एब्रम्सच्या हातात निर्मितीची सूत्र सोपवल्यानेही काही चहाते काळजीत होते.मात्र चित्रपट आला आणि आनदीआनंद झाला.
द फोर्स अवेकन्स हा मालिकेतला पहिलाच असा भाग, ज्याचा कथानकातला आणि प्रदर्शनाचा अनुक्रम एकच आहे. सातवा. यातलं कथानक मूळच्या चित्रत्रयीनंतर काही वर्षांनी घडतं, आणि नव्या तरुण नायक नायिकांबरोबरच, आता तरुण न राहिलेल्या सोलो, लूक आणि लिआ या व्यक्तिरेखांनाही मूळ कलावंतांसह सामिल करुन घेतं. फोर्स अवेकन्स काळजीपूर्वक पाहिला तर लक्षात येईल, की तो प्रेक्षकाना प्रेमात पाडणाऱ्या मूळच्या चौथ्या भागाचाच ढाचा वापरतो. प्रसंग, स्थळं, नेपथ्य, व्यक्तिरेखांची वजनं, या साऱ्या बाबतीत न्यू होप ची आठवण करुन देणाऱ्या जागा येतात. दोन तरुण नायक आणि एक नायिका हेच गणित पो( ऑस्कर आयजॅक) / फिन ( जॉन बोयेगा) आणि रे( डेजी रिडली ) शाबूत ठेवतात. वेडरची जागा घेतो कायलो रेन ( अॅडम ड्रायवर) तर कनोबीची जागा घेतो आता वय झालेला हान सोलो आणि सुप्रसिध्द आर२डी२ ची जागा घेतो बीबी-८ हा नवा यंत्रमानव . आंतरग्रहीय युध्द, पात्रांची जन्मरहस्य, अत्याधुनिक शस्त्रांबरोबर लाईट सेबर्सची तलवारबाजी या साऱ्या गोष्टी तशाच रहातात आणि आपल्याला या नव्या भागाबद्दल असणाऱ्या साऱ्या शंका फिटतात, किंबहुना आपल्याला त्या पडल्याच कशा असंही वाटायला लागतं.
स्टार वॉर्स सरसकट सर्वाना आवडायला हवी असं मी नक्कीच म्हणणार नाही. मात्र तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करण्याआधी तिच्याकडे तुम्ही पुरेशा गांभीर्याने जरुर पहावं, इतकच मी सांगेन.
- गणेश मतकरी Read more...
ज्याचा त्याचा चष्मा
>> Sunday, January 3, 2016
अमेरिकेत वर्षाखेर जे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातला एक होता जे जे एब्रम्सने जॉर्ज ल्युकसच्या स्टार वॉर्स चित्रत्रयीचा अधिकृत ताबा घेतल्यानंतरचा पहिला ( आणि मालिकेतला सातवा ) चित्रपट, स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स, तर दुसरा होता क्वेन्टीन टेरेन्टीनो, या वादग्रस्त परंतु अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शकाचा बहुचर्चित आठवा चित्रपट ' द हेटफुल एट' . आपल्याकडे स्टार वॉर्स त्याच्या ब्लॉकबस्टर स्टेटसमुळे प्रदर्शित झालेला आहे, पण हेटफुल एटचा मात्र अजून पत्ता नाही. एेकीव माहितीप्रमाणे तो आपल्याकडे याच महिन्यात प्रदर्शित होणं अपेक्षित आहे, पण सध्याची आपल्या सेन्सॉरची संवेदनशीलता पहाता, काही सांगता यायचं नाही. आणि समजा, अशाही परिस्थितीत तो जर का प्रदर्शित झाला, तरी त्यातले किती प्रसंग सेन्सॉरच्या तडाख्यातून सुटतील , हा प्रश्नच आहे. साहजिक आहे. टेरेन्टीनो हा मुळातच हिंसक चित्रपटांसाठी लोकप्रिय, त्यामुळे आपले लोक आधीपासूनच एका पूर्वग्रहदूषित नजरेने या चित्रपटाकडे पहाणार, आणि शक्य त्या जागा कापायला लावणार, हे आलच. आणि या जागा कापल्या, की चित्रपटात मजा तरी काय उरणार !
आता या विधानावरुन मी हिंसेला मजा म्हणतोय असा थेट निष्कर्ष काढला नाही तर बरं, कारण मुद्दा तसा वेगळाच आहे. आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून एक प्रथा सुरु झालीय की कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक चित्रणाला विरोध करायचा. सेन्सॉर सदस्य, उसने संस्कृतीरक्षक किंवा सध्या सोशल नेटवर्कवरुन ज्याला त्याला विरोध करणारी सामान्य जनता यातल्या कोणामधेही या चित्रणाला होणाऱ्या विरोधाचं मूळ सापडू शकतं. तेही वरवरचं नकारात्मक चित्रण. पॉलिसी ही, की त्या व्यक्तिरेखेचा वा चित्रणाचा खोलवर जाऊन विचार न करता चटकन निष्कर्ष काढून मोकळं व्हायचं, आणि विचार करुन त्याबरहुकूम निर्णय घेण्याची जी एक जबाबदारी असते ती झटकून टाकायची. उदाहरणार्थ, व्यक्तीरेखेच्या हातातल्या सिगरेटला 'धूम्रपान' या लेबलाखाली टाकून विरोध करायचा, पण प्रसंगाच्या मूडपासून वृत्तीच्या दर्शनापर्यंत हे धूम्रपान काय साधतय हे समजून घ्यायचं नाही. सामान्यत: रंजनप्रधान चित्रपट, हा भल्याबुऱ्यामधल्या सनातन संघर्षावर चालत असतो, आणि सत्प्रवृत्तीचा विजय, हा त्यातल्या बहुसंख्य चित्रपटांचा शेवट असतो. या चांगल्याबरोबर वाईटाचं दर्शन होत नाही असं नाही, किंबहूना, ते न होऊन कसं चालेल? थोडं अलंकारिक बोलायचं, तर रात्र जेवढी काळी दाखवता येईल, तेवढी सकाळ अधिक तजेलदार वाटणार नाही का? पण नाही. सध्या तरी आपल्याला त्यात रस नाही.
एक मात्र खरं , की या प्रकारचा विरोध काही आपल्याकडेच होतो असं नाही. ज्या ठिकाणी टेरेन्टीनो चित्रपट बनवतोय, त्या अमेरिकेतही त्याच्या प्रक्षोभक मांडणीने दचकणारे आणि चित्रपटांना उघड विरोध करणारे लोक आहेतच. मागे किल बिल चित्रपटाच्या वेळी टेरेन्टिनोने, 'चित्रपट बारा वर्षावरच्या मुलांना पहाण्यासारखा आहे', म्हंटलं होतं तेव्हाही असाच गदारोळ उठला होता. नेटवर एका न्यूज इन्टरव्ह्यूची क्लिप अजूनही फिरतेय ज्यात चॅनल प्रतिनिधी आणि टेरेन्टिनो यांचा या विषयावरचा वाद रंगलेला दिसतो. या प्रकारच्या विरोधाने चित्रपटात काटछाट झालेली वा त्यावर बंदी आलेली उदाहरणं मात्र अल्प आहेत.
किल बिल बाबत टेरेन्टिनोची भूमिका अगदीच समजण्यासारखी होती कारण या स्त्रीप्रधान चित्रपटातला हिंसाचार , त्याच्या ट्रीटमेन्टमुळे कार्टून व्हायलन्स सारखा झाला होता. सर्वसाधारणपणे मुलांसाठी असणाऱ्या ( टॉम अॅन्ड जेरी सारख्या ) अॅनिमेटेड मालिका, किंवा व्हिडीओ गेम्स, यांमधून त्यांना एका विशिष्ट प्रकारच्या हिंसाचाराची सवय झालेली असते ( आपल्या अॅंग्री यंग मॅन पिरिअडमधल्या हिंदी चित्रपटातल्या रक्तविरहीत मारामाऱ्या, रोहित शेट्टीच्या चित्रपटातले गाड्या हवेत उडवत केलेले पाठलाग आणि नासधूस यालाही कार्टून व्हायलन्सच मानता येईल) आज काळानुसार या चित्रपटात रक्तासारख्या एकेकाळी टाळल्या जाणाऱ्या घटकांचा वापर जरुर असतो, मात्र त्याच्या योजनेत एक प्रकारची कृत्रिमता असते, ज्यामुळे तो खरा वाटत नाही.
गुन्हेगारी हा घटक टेरेन्टीनोच्या बहुतेक चित्रपटांमधे असतो ( कदाचित इनग्लोरिअस बास्टर्ड्स चा अपवाद वगळता -ज्यात हिंसा असली तरी प्रत्यक्ष गुन्हेगारी नाही) , त्यामुळे हाणामारी, खून या सारखे प्रसंग मुबलक, मात्र या सगळ्याच चित्रपटातली ट्रीटमेन्ट अशी मुलांना चालणारी असते असं नाही. त्याच्या द रिझरवॉयर डॉग्ज , जॅंगो अनचेन्ड यासारख्या चित्रपटात हिंसेचा वापर अंगावर येणारा आहे. द हेटफुल एटमधेही तो असाच अस्वस्थ करतो. तो असणाऱ्या प्रसंगांचं प्रमाण हे तुलनेने कमी आहे, मात्र ज्या प्रसंगांमधे ही हिंसा डोकावते त्या प्रसंगांनी प्रेक्षक हादरवून जातो यात शंका नाही. या चित्रपटातल्या व्हायलन्स बरोबरच इतरही दोन गोष्टींसाठी हा चित्रपट गाजलाय. तो म्हणजे वर्णद्वेश आणि स्त्रीद्वेशाचा आरोप. सॅम्युएल एल जॅक्सनने उभं केलेलं यातलं प्रमुख पात्रं मेजर वॉरन, आणि जेनीफर जेसन ली ने साकारलेली बंदीवान खूनी डेजी, या दोघांच्या संहितेतल्या आणि संवादांमधल्या ट्रीटमेन्टला अनुसरून हे आक्षेप घेण्यात आलेले आहेत. गंमत म्हणजे, ते या कलावंतांना मान्य नाहीत. जॅक्सनने केवळ दोन चित्रपट वगळता टेरेन्टीनोच्या सर्व चित्रपटांमधे भूमिका केल्या आहेत, आणि त्यातल्या अनेक भूमिका रसिकांच्या मनात अजरामर झालेल्या आहेत. त्याची इथली भूमिकाही तितकीच वजनदार असल्याने त्याला हा विरोध मान्यच नाही. जेनिफर जेसन लीचं नाव तर या भूमिकेमुळे ऑस्कर नामांकनासाठी चर्चेत आहे. त्यामुळे तिलाही हरकत असण्याचं काही कारण नाही. दुसरं असं , की या दोन्ही व्यक्तीरेखांना पडद्यावर जरी अमुक एका प्रमाणात अपमानास्पद वागणूक मिळत असली, तरी तिचा विचार हा स्वतंत्रपणे केला जाऊ शकत नाही. एकूण चित्रपटाच्या संदर्भात, आणि त्यापलीकडे जाऊन ज्या सिव्हील वॉर नंतरच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट घडतो तिच्या संदर्भातच हा विचार व्हायला हवा. आणि तसा तो केला तर या आरोपांमधे तथ्य वाटत नाही.
सिव्हील वॉरशी संबंधित घटक असणारी राजकीय पार्श्वभूमी आणि वेस्टर्न्स या लोकप्रिय अमेरिकन चित्रप्रकारांचं मिश्रण टेरेन्टीनोने जॅंगो अनचेन्डमधे हाताळलेलं आहे. मात्र इथली मांडणी ही त्यापेक्षा संपूर्णपणे वेगळी आहे. इथली संकल्पना आहे, ती वेस्टर्न्सपेक्षा अॅगथा क्रिस्टीच्या एखाद्याच्या हूडनीटच्या जवळ जाणारी. एका निर्मनुष्य ठिकाणी काही काळापुरते अपरिहार्यपणे अडकून पडलेले सहप्रवासी, त्यांच्यात तयार होणारे तणावपूर्ण संबंध, रहस्यमय खून, या सगळ्यामधून ही एक झकास रहस्यकथा तयार होते. या रहस्याच्या उलगड्याशी त्यातलं क्रौर्य जोडलेलं आहे. ते काढून टाकणं चित्रपटाचा परिणाम पोकळ करुन सोडणारं ठरेल.
अर्थात हा युक्तीवाद तर्कशुध्द विचार करणाऱ्यांसाठी. ज्यांना आपल्या सेन्सॉर बोर्डाची पध्दत माहीत आहे, त्यांच्यापुढे हेटफुल एट ने एक प्रश्न उपस्थित केलेलाच आहे. त्यांना खात्रीने माहित आहे, की चित्रपट प्रदर्शित झाला , आणि त्यातल्या प्रसंगाना स्पष्टीकरण असलं, तरी त्याला कात्री ही लागणारच. दृश्यांना नक्कीच, पण टेरेन्टीनोच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य समजल्या जाणाऱ्या त्यातल्या संवादांनाही. मग या परिस्थितीत त्यांना असा पेच पडतो, की चित्रपट प्रदर्शित होण्याची उशीरापर्यंत वाट पाहून मग चित्रपटाच्या कलामूल्याशी फारसं देणंघेणं नसलेल्या लोकांनी त्यावर केलेले अत्याचार सहन करत चित्रपट पहावा, का अन्य मार्गांनी ( म्हणजे पायरेटेड कॉपी शोधून) तो मूळ स्वरुपात पण कमी प्रभावी असलेल्या छोट्या पडद्यावर पहावा ? माझ्या मते हा प्रश्न नो ब्रेनर आहे. टेरेन्टीनोचा खरा चाहता त्याचे चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहील( त्यानंतर तो पायरेटेड कॉपीही शोधेल हा भाग वेगळा).
मला नेहमी असं वाटतं, की ज्या त्या गोष्टीकडे आपण एका विशिष्ट चष्म्यातून का पहायला हवं? त्यावर आक्षेप का काढायला हवे? हा चित्रपट वर्णद्वेषी, तो स्त्रीद्वेष्टा, तमुक धार्मिक भावना दुखावणारा, अमका बालमनावर दुष्परिणाम करणारा, यात हिंसेचं दर्शन, तर त्यात इतर काही. पूर्वी आपण जसे हे तपशील उगाळत न बसता चित्रपट त्यात सांगितलेल्या गोष्टीसाठी पहायचो, तसं आता होऊच शकणार नाही का? या पोलिटीकली करेक्ट असण्याच्या हौसेपोटी आपलं रसिक असणंच संपून चाललय की काय?
-गणेश मतकरी Read more...