स्टार वॉर्स- नव्या त्रयीच्या निमित्ताने

>> Friday, January 8, 2016


शाळेत असताना माझ्या मोठ्या बहिणीची एक मैत्रिण घरी रहायला आली होती. दोघीजणी कॉलेजच्या ग्रुपबरोबर सिनेमाला गेल्या होत्या, आणि तिथून घरी आल्या. मी गप्पा मारताना तिला विचारलं की,' पिक्चर कसा होता?'. तर म्हणाली ,'काय माहीत ! दोन विरुध्द बाजूचे लोक होते . एका बाजूचे दुसऱ्यावर हल्ला करायचे, तर दुसऱ्या बाजूचे पहिल्या. मला जाम बोर झालं. मी झोपून गेले.'

तिला आपण पाहिलेल्या सिनेमाचं नावही लक्षात नव्हतं. 'एम्पायर आणि पुढे काहीतरी होतं', म्हणाली. हा सिनेमा पहाण्यासाठी तिच्या मित्रांमधे जी प्रचंड एक्साईटमेन्ट  होती, ती कशामुळे, हेच तिला कळत नव्हतं.

पुढे जेव्हा मी स्टार वॉर्सची पहिली चित्रत्रयी ( भाग ४/५/६) पाहिली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिने पाहिलेला चित्रपट 'एम्पायर स्ट्राईक्स बॅक' होता. हा अर्विन कर्शनर दिग्दर्शित चित्रपट, मूळ त्रयीतला सर्वोत्कृष्ट आणि एकूण चित्रपटांमधेच अधिक महत्वाचा मानला जातो. त्रयीतल्या  ' रिटर्न ऑफ द जेडाय ' या शेवटच्या भागाहूनही अधिक लक्षणीय. तरीही या चित्रपटाचं काय करायचं हे नं कळणारे माझ्या बहिणीच्या मैत्रिणीसारखे इतरही अनेक जण .स्टार वॉर्सने हॉलिवुडचे स्टार वॉर्स पूर्व आणि स्टार वॉर्स उत्तर असे दोन भाग पाडले, ते चित्रपटनिर्मितीची दृष्टी, प्रेक्षक प्रतिसाद आणि दृश्य शक्यता याची गणितं या मालिकेने नव्याने लिहील्यामुळे. प्रेक्षकांचे एका वेगळ्या पातळीवरही दोन भाग पडले असावेत. ज्यांच्यापर्यंत ही मालिका पोचू शकते असा एक प्रेक्षकगट आणि तिचा अर्थच न लागणारा दुसरा.

मध्यंतरी, स्टार वॉर्सच्या ' द फोर्स अवेकन्स' या सातव्या भागाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मी सहजच ही बहिणीच्या मैत्रिणीची प्रतिक्रिया आणि त्यावरची माझी टिप्पणी फेसबुकवर पोस्ट केली. त्यावर आलेल्या कमेन्ट्समधे एकाने विचारलं, की प्रेक्षकाला हे कळत नसेल, तर चूक कोणाची? ( चित्रपटाची, हे त्याला अभिप्रेत उत्तर असावं, जे या चित्रपटांची प्राप्ती पहाता अजिबातच पटण्यासारखं नाही) मला वाटतं म्हणावीशी चूक कोणाचीच नाही.सर्व प्रेक्षकाना सगळच आवडेल, रुचेल अशी अपेक्षाच फोल आहे. प्रत्येकाची निवड ही आपल्या वृत्तीप्रमाणे, आकलनशक्तीप्रमाणे, संदर्भज्ञानाप्रमाणे असते. त्यामुळे अमुक एका प्रेक्षकाला स्टार वॉर्स नाही कळला, तर मी त्याचं काही चुकलं असं निश्चितच म्हणणार नाही. तरीही एक म्हणेन, की आपल्या प्रेक्षकाला काय आवडतं याला फारच मर्यादा  आहेत. वास्तवाची चौकट, ही त्याच्यासाठी फार महत्वाची आहे. त्यामुळे बॉलिवुडच्या एस्केपिस्ट फॅन्टसी चित्रपटांमधेही त्याला वास्तवाचा आभास लागतो. वर्ल्ड सिनेमावर पोसलेले अभ्यासकही इतर कशाहीपेक्षा रिअलिस्ट स्कूल्सना अधिक जवळ करताना दिसतात. सायन्स फिक्शनचा तर सर्वांना बऱ्याच प्रमाणात फोबिआच आहे.

आपल्या समीक्षकांनी वा चित्रपट अभ्यासकांनीही फँटसी ला कधीही गंभीरपणे घेतलं नाही आणि हे काहीतरी पोरांचं आहे हा समज वाढीला लावला. प्रत्यक्षात टोलकीनच्या लॉर्ड ऑफ द रिंग्ज वर पीटर जॅक्सनने केलेल्या मालिकेपासून जॉर्ज ल्युकसच्या स्टार वॉर्स पर्यंत अनेक उत्तम , मल्टीलेअर्ड आशय मांडणाऱ्या फिल्म्स या चित्रप्रकारात आहेत ज्यांच्याकडे डोळसपणे पहाणं आवश्यक आहे.

स्टार वॉर्स मालिका वरकरणी उगाचच भयंकर गुंतागुंतीची वाटते, ती प्रामुख्याने दोन कारणांसाठी. एकतर त्याचं नऊ भागात विभागलेलं असणं आणि अनपेक्षित क्रमाने निर्मिती असणं ( ४/५/६/१/२/३) हे अनेकांना गोंधळाचं वाटतं. दुसरं म्हणजे त्याचं वरकरणी सायन्स फिक्शन वाटणारं रुप हे प्रेक्षकांना कम्फर्ट झोनच्या बाहेर नेतं. खरं तर आपण वेगळं काही पहायची तयारी ठेवली, तर यातलं काहीच समजायला कठीण नाही.

स्टार वॉर्स सायन्स फिक्शन नसून पौराणिक, दंतकथांसारखा मुळात भल्या विरुध्द बुऱ्याची गोष्ट सांगणारे चित्रपट आहेत, हे लक्षात यावं ते यातल्या कोणत्याही चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून, ज्यात नेहमीच एक आश्वासक वाक्य लिहिलेलं दिसतं- ए लॉंग टाईम अगो, इन ए गॅलेक्सी फार फार अवे.... पृथ्वीशी जोडलेली वास्तवाची चौकट पुसत ' कोणे एके काळी' पध्दतीने केलेली ही सुरुवात, ही कोणालाही आपल्या लहानपणी वाचलेल्या परीकथांची आठवण करुन देईल. ही मालिका त्या परीकथांसारखीच आहे. सुबोध, पण आस्वादकाच्या क्षमतेनुसार गहन अर्थाच्या शक्यता असणारी.

जॉर्ज ल्युकसने जेव्हा या मालिकेतला पहिला भाग १९७७ मधे बनवला, तेव्हा त्याला या मालिकेला एवढं वारेमाप यश मिळणार हे अर्थातच माहित नव्हतं. एक अपयशी ( THX-1138,१९७१) आणि एक यशस्वी ( अमेरिकन ग्राफिटी,१९७३) असे दोन चित्रपट गाठीशी होते. त्याला दिसणाऱ्या नव्या चित्रपटाची कथा लांबलचक होती आणि कोणत्याही परिस्थितीत ती एका चित्रपटात संपणार नव्हती. त्यावर ल्युकसने काढलेला तोडगा सोपा होता. त्याने ठरवलं, की या लांबचलांब कथानकातला आपल्याला इन्टरेस्टिंग वाटेलसा भाग पहिल्यांदा करायचा, पण त्याला मारुन मुटकून पहिला म्हणायचं नाही. डोळ्यासमोरच्या कथानकाच्या मध्यावर तो असल्याने, त्याला सरळ एपिसोड चार म्हणून टाकायचं. पुढल्या काळातला मालिकेचा आकार ठरला, तो या निर्णयामुळेच.

मी काही या छोट्या जागेत पहिल्या सहा भागांची गोष्ट सांगणार नाही, आणि ती तशी सांगण्यात मुद्दाही नाही. थोडक्यात सांगायचं तर एवढच म्हणता येईल की पहिली चित्रत्रयी, ही जेडाय विरुध्द एम्पायर, या सत्प्रवृत्ती विरुध्द दुष्प्रवृत्ती  यांच्यातल्या वैश्विक संघर्षाचं चित्रण आहे. जेडाय योध्यांचा प्रतिनिधी आहे लूक स्कायवॉकर ( मार्क हॅमिल), त्याची बहीण प्रिन्सेस लिआ ( कॅरी फिशर), एक ज्येष्ठ योध्दा बेन कनोबी ( अॅलेक गिनेस) तर एम्पायरचा प्रतिनिधी आहे लूक आणि लिआचा पिता अॅनाकिन स्कायवॉकर, जो आता बाजू बदलून डार्थ वेडर या नावाने एम्पायरला सामील झाला आहे. या युध्दात जेडायना मदत मिळते ती विक्षिप्त प्रवृत्तीच्या हान सोलोची (हॅरीसन फोर्ड) जो नफ्याच्या शोधात अनपेक्षितपणेच सत्कार्याला हातभार ठरतो.

चार पाच आणि सहा, या तीन भागात हे प्राथमिक कथानक घडवल्यावर आणि ते प्रचंड यशस्वी ठरल्यावर, कदाचित ल्युकसने पुढल्या ( आणि आधीच्या) भागांचा विचारच सोडून दिला असावा, पण कालांतराने त्याने पहिल्या तीन भागाना पूर्णत्वाला न्यायचं ठरवलं. १९९९ पुढल्या काळात पडद्यावर येऊन ठाकलेले आधीचे  तीन भाग- फँटम मेनेस, अॅटॅक ऑफ द क्लोन्स आणि रिव्हेन्ज ऑफ द सिथ देखील तितकेच यशस्वी ठरले. स्वत: ल्युकसने दिग्दर्शित केलेल्या या तीन भागांमधे त्याने आपली तंत्राशी खेळण्याची हौस पुरती भागवली पण स्वतंत्र साहसांना वाहिलेल्या मूळ चित्रत्रयीहून अधिक गंभीर आशय त्याने अॅनाकिन च्या पांढऱ्या बाजूचं वेडरच्या काळ्या बाजूत रुपांतर करताना दाखवला. हे भाग नव्या दृष्टीत कदाचित कमी असतील, पण आशय आणि तो पडद्यावर आणणारं तंत्रज्ञान हा या सुरुवातीचा कथाभाग मांडणाऱ्या प्रीक्वल चित्रत्रयीचा विशेष ठरला.

गेले काही दिवस मात्र नव्याने घोषित झालेल्या अखेरच्या चित्रत्रयीच्या निमित्ताने चर्चेला ऊत आला होता. ल्युकसफिल्म कडून कोणीच अपेक्षा करत नसलेली अखेरची चित्रत्रयी येणार ही बातमी उत्साहवर्धक होती, पण ल्युकसफिल्म आता डिस्नीकडे गेल्याने मालिकेतल्या गडद छटा कमी करत ती अधिक कौटुंबिक केली जाते की काय, ही भीतीही होती. नुकतच स्टार ट्रेक मालिकेचं पुनरुज्जीवन केलेल्या जे जे एब्रम्सच्या हातात निर्मितीची सूत्र सोपवल्यानेही काही चहाते काळजीत होते.मात्र चित्रपट आला आणि आनदीआनंद झाला.

द फोर्स अवेकन्स हा मालिकेतला पहिलाच असा भाग, ज्याचा कथानकातला आणि प्रदर्शनाचा अनुक्रम एकच आहे. सातवा. यातलं कथानक मूळच्या चित्रत्रयीनंतर काही वर्षांनी घडतं, आणि नव्या तरुण नायक नायिकांबरोबरच, आता तरुण न राहिलेल्या सोलो, लूक आणि लिआ या व्यक्तिरेखांनाही  मूळ कलावंतांसह सामिल करुन घेतं. फोर्स अवेकन्स काळजीपूर्वक पाहिला तर लक्षात येईल, की तो प्रेक्षकाना प्रेमात पाडणाऱ्या मूळच्या चौथ्या भागाचाच ढाचा वापरतो. प्रसंग, स्थळं, नेपथ्य, व्यक्तिरेखांची वजनं, या साऱ्या बाबतीत न्यू होप ची आठवण करुन देणाऱ्या जागा येतात. दोन तरुण नायक आणि  एक नायिका हेच गणित पो( ऑस्कर आयजॅक) / फिन ( जॉन बोयेगा) आणि रे( डेजी रिडली ) शाबूत ठेवतात. वेडरची जागा घेतो कायलो रेन ( अॅडम ड्रायवर) तर कनोबीची जागा घेतो आता वय झालेला हान सोलो आणि सुप्रसिध्द आर२डी२ ची जागा घेतो बीबी-८ हा नवा यंत्रमानव . आंतरग्रहीय युध्द, पात्रांची जन्मरहस्य, अत्याधुनिक शस्त्रांबरोबर लाईट सेबर्सची तलवारबाजी या साऱ्या गोष्टी तशाच रहातात आणि आपल्याला या नव्या भागाबद्दल असणाऱ्या साऱ्या शंका फिटतात, किंबहुना आपल्याला त्या पडल्याच कशा असंही वाटायला लागतं.

स्टार वॉर्स सरसकट सर्वाना आवडायला हवी असं मी नक्कीच म्हणणार नाही. मात्र तिच्याकडे सरळ दुर्लक्ष करण्याआधी तिच्याकडे तुम्ही पुरेशा गांभीर्याने जरुर पहावं, इतकच मी सांगेन.
- गणेश मतकरी

1 comments:

Unknown January 14, 2016 at 4:43 AM  

फार पूर्वी ती पहिली होती. नाविन्य हा एक भाग सोडता मला त्या चित्रपटांना मिळालेलं यश जरा अतीच वाटतं. अजून नवीन पहिला नाहीये. पण जुन्याची उजळणी करून पाहीन एकदा. स्पेस एपिक हा विषय तसा नवीन नाही. Dune सारख्या अनेक सायन्स फिक्शन ने हाताळलेला आहे. त्याचा चित्रपट बनवणं कदाचित नवीन असेल आणि ते पूर्ण श्रेय लुकास चं आहे. पण म्हणून एवढी प्रसिद्धी? हे काही पटलेलं नाही.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP