डायव्हर्सिटी

>> Sunday, January 31, 2016 
यंदा ऑस्करचं पांढरं स्वच्छ असणं, हा सर्वात मोठा वादाचा विषय आहे, असं म्हणणं चूक होणार नाही. हे सलग दुसरं वर्ष की ज्यात ऑस्कर नामांकन असणारा प्रत्येक जण हा गोरा आहे. अाता असं होणं खरोखर शक्य आहे का, की गेल्या दोन वर्षात एकाही चांगल्या कृष्णवर्णीय कलावंत किंवा तंत्रज्ञाने ऑस्कर मिळवण्याच्या सोडा,पण नामांकनात येण्याच्याही लायकीचं काम केलं नाही? तर अशी कल्पना करणं देखील मूर्खपणाचं ठरेल. 
गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी स्पर्धेत असलेल्या 'सेल्मा' या चित्रपटाची कृष्णवर्णीय दिग्दर्शिका आवा डूवर्ने जर नामांकनात आली असती, तर ती दिग्दर्शनासाठी नामांकन मिळालेली पहिली कृष्णवर्णीय महिला ठरती. पण चित्रपट सर्वोत्कृष्टांपैकी एक असूनही, तिचं नाव नामांकनात दिसलं नाही. सेल्मा मधल्याच मार्टीन लूथर किंग यांच्या भूमिकेसाठी डेव्हिड ओयलोओ या अभिनेत्याची निवडही अपेक्षित होती. तरीही नामांकनात नाव आलच नाही. ऑस्करची पूर्वसूचना मानल्या जाणाऱ्या गोल्डन ग्लोब पारितोषिकांमधे, या दोघांनाही नामांकनं होती. 
या वर्षीचं चित्रही वेगळं नाही. 'क्रीड' चित्रपटाचा दिग्दर्शक ( रायन कूगलर)  आणि प्रमुख अभिनेता ( मायकेल बी जॉर्डन)  कृष्णवर्णीय आहे. पण नामांकन आहे, ते सिल्वेस्टर स्टलोनला. 'स्ट्रेट आउटा क्रॉम्प्टन'चाही दिग्दर्शक ( एफ गॅरी ग्रे)  काळा आहे, तसच अभिनयातही अनेक कृष्णवर्णीयांची वर्णी आहे. तरीही ऑस्कर नामांकन आहे, ते पटकथेसाठी, जोनाथन हर्मन आणि आंद्रे बरलॉफ या दोन गोऱ्यांना. असे इतरही चित्रपट आहेत, भूमिका आहेत, जिथे कृष्णवर्णीयांचा यथोचित सन्मान होऊ शकला असता, पण झाला नाही. 
याचा दोष कोणा स्वतंत्र व्यक्तीवर घालता येणार नाही कारण मुळात अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स अॅन्ड सायन्सेसची रचना, मतदान पध्दती आणि या मेंबरांमधली गोऱ्यांची संख्या याचाही त्याच्याशी थेट संबंध आहे. तरीहि चूक ती चूकच. नामांकनं जाहीर झाल्यावर टिकेचं रान उठलं, पुरेशी डायव्हर्सिटी न दाखवणाऱ्या या पुरस्कारांवर बहिष्कार घालण्याची भाषा सुरु झाली आणि अकॅडमीने तातडीने काहीतरी करण्याची गरज भासायला लागली. अकॅडमीने ते केलंही. अकॅडमीचं आजन्म सभासदत्व काढून व्यक्ती चित्रपटात कार्यरत आहे तोवरच ठेवणं, मतदानाच्या हक्कांमधे बदल करणं  यासारखे काही नियम तडकाफडकी करुन त्यांनी नव्या उपाययोजना केल्या आहेत.  २०२० पर्यंत अल्पसंख्यांकांचं प्रमाण आता आहे त्यापेक्षा दुप्पट होईल याची काळजी घेतली आहे. कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर रहायचं, हे अकॅडमीचं धोरणच आहे, आणि एरवी पुरस्कार निवडीत, हे पापभीरु धोरण  काही लायक पण वादग्रस्त चित्रपटांच्या विरोधात जात असलं, तरीही निरपेक्ष निवडप्रक्रीयेत  मात्र हे धोरण उपयुक्त ठरलं आहे. असं असूनही, या वेळचा कृष्णवर्णीयांचा विरोध कायमच राहील, आणि विल स्मिथ, स्पाईक ली आणि इतर काही मोठ्या नावांचा समारंभावरचा बहिष्कारही राहील, मात्र पुन्हा हे चित्र दिसणार नाही  हे नक्की. 
ऑस्कर निवडीत वर्णसंबंधी डायव्हर्सिटीचा अभाव स्पष्ट दिसला, तरी यंदा चित्रपटांच्या प्रकारात मात्र ती बरीच दिसतेय. जे नामांकनात येण्याची खात्री होती असे काही चित्रपट इथे नक्कीच आहेत. उदाहरणार्थ सर्वाधिक नामांकनं असणारा अलेहान्द्रो इन्यारितूचा 'द रेव्हेनन्ट', जो बहुधा लिओनार्डो डिकाप्रिओला त्याचं पहिलं ऑस्कर मिळवून देईल अशी त्याच्या चाहत्यांची खात्री आहे, किंवा टॉम मॅकार्थीच्या 'स्पॉटलाईट' सारखा मायकल कीटन , मार्क रफालो सारख्या मोठ्या स्टार्सना घेऊन, पण वास्तववादी पध्दतीने बनवलेला शोध पत्रकारितेवर आधारीत सिनेमा. युध्द आणि माणुसकी या अकॅडमीच्या आवडत्या विषयांना जोडणारा स्टीवन स्पीलबर्गचा ' ब्रिज ऑफ स्पाईज' , तसच निर्माता आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत ब्रॅड पिट  आणि बरोबर क्रिश्चन बेल, रायन गॉस्लिंग, स्टीव कॅरल सारख्या लोकप्रिय अभिनेत्यांना घेत, रिअल इस्टेट मार्केट आणि स्टॉक मार्केटमधल्या भ्रष्टाचाराला बाहेर आणणारा अॅडम मॅकेचा 'द बिग शॉर्ट' , असे इतर काही चित्रपटही अपेक्षित होतेच, पण जॉर्ज मिलरच्या 'मॅड मॅक्स: फ्युरी रोड' सारख्या अतिशय हिंसक फॅन्टसीला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शक धरुन दहा विभागात नामांकन हे अत्यंत अनपेक्षित आहे. 
अकॅडमीला हिंसाचार वर्ज आहे अशातला भाग नाही. यंदाच्या रेव्हनन्ट मधे तर तो आहेच, पण 'द गॉडफादर' पासून 'सेव्हिंग प्रायव्हेट रायन' पर्यंत  ऑस्कर नामांकनात स्थान असलेले  असे अनेक चित्रपट सापडतील ज्यांमधे गुन्हेगारी वा हिंसाचार यांचं स्थान महत्वाचं आहे. मग मॅड मॅक्सच्या सहभागाचं आश्चर्य का वाटावं?  तर त्यालाही कारण आहे. सामान्यत: अकॅडमी अशा चित्रपटांना गौरवते ज्यात नकारात्मक गोष्टी असल्या तरी त्या अधिक मोठ्या आशयाचा एक भाग म्हणून येतात. मॅड मॅक्स मधली अॅक्शन डोळे दिपवणारी आणि खुर्चीत खिळवणारी असली, तरी अंतिमत: हा ' व्हॉट यू सी इज व्हॉट यू गेट ' असा प्रकार आहे. तुम्ही यात काही अधिक वाचण्या पडताळण्याचा प्रयत्न करु नका, हे केवळ एक अतिशय उत्कंठावर्धक साहस आहे. त्यातले पाठलाग, हाणामाऱ्या या अतिशय प्रभावी आणि खरं तर आकर्षक आहेत. त्यामुळे चित्रपटाचा नामांकनातला मोठ्या प्रमाणात सहभाग अकॅडमीच्या भूमिकेशी सुसंगत नाही , असं वाटतं. 
मला आणखीही एक गोष्ट नीट कळली नाही, ती म्हणजे मॅड मॅक्सच्या चौथ्या भागाचा एवढा गौरव होत असेल, तर त्याहूनही लोकप्रिय ( आणि अधिक निरुपद्रवी ) असलेल्या स्टार वॉर्स मालिकेने काय घोडं मारलं ? एका परीने स्टार वॉर्स फ्रॅंचाईज जॉर्ज ल्युकसकडून घेऊन त्याच दिमाखात त्याचा पुढला ( सातवा, द फोर्स ) भाग सादर करायचा हे काम तितकं सोपं नाही. जे जे अॅब्रम्स ने हे फार सराईतपणे ( चांगल्या अर्थाने ) करुन दाखवलय. स्टार वॉर्सलाही नामांकनं आहेत, पण ती फक्त पाच, म्हणजे मॅड मॅक्स च्या अर्धी, तीही ( कदाचित संकलनाचा अपवाद वगळता) बरीचशी  तांत्रिक वर्गात मोडणारी.आशयाच्या तुलनेने  स्टार वॉर्स अधिक सर्वमान्य, चाहता वर्गही पिढ्यनपिढ्यांचा . असं असताना त्याला मॅड मॅक्स पुढे डावलणं विचित्र वाटतं.
अर्थात मॅड मॅक्स काही सर्वोत्कृष्ट चित्रपटातला एकटाच धक्कादायक समावेश आहे असं नाही. रुम किंवा ब्रुकलिन सारखे त्यामानाने छोटे चित्रपट देखील सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या  नामांकनात कसे आले हे आश्चर्यच. 
रिडली स्कॉटचा 'द मार्शन' , हा चित्रपट विभागात नामांकनात असेल याबद्दल कोणाच्याच मनात शंका नव्हती आणि तसा तो आहेदेखील. काहीसा 'ग्रॅविटी'(२०१३)च्या प्रकारचा असणारा मार्शन जवळजवळ मॅट डीमनचा वन मॅन शो म्हणता येईल. मंगळ मोहिमेत झालेल्या अपघाताने मंगळावर अडकलेल्या अंतराळवीराबद्दलची ही गोष्ट पारंपारिक अर्थाने साहसकथा नाही. सुरुवात आणि शेवट वगळता मधे मोठे अॅक्शन सीक्वेन्सेस देखील नाहीत. पूर्ण भर आहे, तो नायकाच्या मनोधैर्यावर आणि मानसिक स्थैर्यावर. हा प्रेक्षकप्रिय आणि अर्थपूर्ण चित्रपट या वर्षीच्या सर्वोत्कृष्टांमधे सहजच गणता येईल, पण इथे अकॅडमीने दिलेला धक्का थोडा वेगळ्या प्रकारचा आहे. थेल्मा अॅन्ड लुईस, ग्लॅडीएटर आणि ब्लॅक हॉक डाऊन अशा तीन चित्रपटांसाठी दिग्दर्शनाचं नामांकन मिळूनही रिडली स्कॉटला अजून ऑस्कर नाही. त्यामुळे बहुतेकांची अपेक्षा होती की यंदांचं दिग्दर्शनाचं पारितोषिक त्यालाच असेल. पण ऑस्कर सोडा, अकॅडमीने त्याला दिग्दर्शकाचं नामांकनदेखील दिलेलं नाही. 
ज्याप्रमाणे कृष्णवर्णीयांना या ऑस्करने बाहेर ठेवलं, तशीच थोडी सावत्र वागणूक जेंडरच्या अनुशंगानेही मिळाली असेल की काय, अशी शंका वाटते. कारण सध्याच्या नियमांकडे पाहिलं तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकनांना दहा पर्यत जाता येतं. तरीही ही नामांकनं आठवर थांबलेली आहेत. पण टॉड हेन्सच्या लेस्बिअन प्रेमकथेवर आधारलेल्या 'कॅरल'ला सहा नामांकनं असतानाही त्याला चित्रपट किंवा दिग्दर्शन ही दोन्ही नामांकनं नाहीत. हीच गत टॉम हूपरच्या ट्रान्सजेन्डर केसवर आधारलेल्या 'द डेनिश गर्ल' ची , ज्याला चार नामांकनं असतानाही दिग्दर्शक किंवा चित्रपट या दोन्ही विभागात त्याचा विचार झालेला नाही. हे दोन्ही चित्रपट सर्वोत्कृष्ट नक्कीच नाहीत, पण एरवी त्यांचा विचार नामांकनासाठी नक्कीच झाला असता असं मानायला जागा आहे. मग या परिस्थितीत, ऑस्करमधे पुरेशी डायवर्सिटी आहे म्हणावं, की नाही? 
-गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP