अभिनेता, भूमिका आणि चित्रपट

>> Sunday, January 17, 2016

अभिनेता मोठा का चित्रपट? भूमिका मोठी का आशय? हे प्रश्न साऱ्या चित्रपटसृष्टीला छेद देऊन राहिलेले दिसतात. प्रमुख नटाला अव्वाच्या सव्वा महत्व देऊन सामान्य चित्रपटांना डोक्यावर घ्यायला लावणाऱ्या स्टार सिस्टीमच्या मुळाशी तेच आहेत. दर्जेदार चित्रपटांना स्टार पॉवरच्या अनुपस्थितीने दुर्लक्षित ठेवण्याला कारणीभूतही तेच आहेत. बॉलिवुड हे मला वाटतं याचं सर्वात बेकार उदाहरण असावं. इथे स्टार असणारा दर सिनेमा चालतोच असं नाही, पण काही स्टार्सचे भक्त इतक्या प्रचंड प्रमाणात आहेत, की बऱ्याचदा टुकार चित्रपटही या भक्तांमुळे उचलले जातात. अमिताभ बच्चनचा अॅंग्री यंग मॅन पिरीअड हे यातलं मोठच उदाहरण म्हणता येईल . या काळात अमिताभने केवळ स्वत:ला महत्व असणारे, पण त्याच त्या प्रकारचे आणि नवी वाट नं चोखाळता जुनच दळण दळणारे अनेक चित्रपट निवडले आणि चित्रपटसृष्टीची वाढ काही प्रमाणात रोखून धरली. याएेवजी त्याने जर केवळ चित्रपट म्हणून दर्जा पाहिला असता, तर कदाचित त्याच्या हातून काही अधिक वैशिष्ट्यपूर्ण झालं असतं.
अर्थात, एकट्या अमिताभ बच्चनला का दोष द्या !  आपल्याकडे दिलीप कुमारपासून शहारुख खान पर्यंत या प्रकारची परंपरा आहे. शहारुख खानने स्वदेस (२००४)  किंवा पहेली (२००५) सारख्या काही चित्रपटांतून वेगळी वाट निवडायचा प्रयत्न केला. पण त्यांना अपेक्षेइतकं यश न मिळाल्याने तो पुन्हा जुन्या वाटेवर रुजू झाला. त्या मानाने आपल्या हल्लीच्या काही स्त्री स्टार्सनी किंचित वेगळा दृष्टीकोन निवडल्याचं आपल्या लक्षात येईल. विद्या बालन यातली पहिली, जीने आपलं स्टारपण लोकांच्या मनावर ठसवलं आणि इश्कीया (२०१०) , द डर्टी पिक्चर्स (२०११) किंवा कहानी (२०१२) सारख्या चित्रपटांमधून ती आपल्याभोवती फिरणारे चित्रपट निवडते हे स्पष्ट झालं. मात्र तिने ज्या भूमिका निवडल्या, त्या पुरुष स्टार्स सारख्या , केवळ स्वत:ला महत्व असणाऱ्या म्हणून विशेष नव्हत्या , तर भूमिका म्हणूनही खास होत्या. ( त्याशिवाय, नो वन किल्ड जेसिका सारखी रानी मुखर्जीबरोबर स्प्लिट होणारी, आणि ग्लॅमरस नसणारी भूमिकाही तिने निवडली, हे लक्षात घेतलं पाहिजे. ) विद्या बालन प्रमाणेच रानी मुखर्जी, कंगना रनावत अशा इतर स्टार्सनीही या प्रकारे भूमिका निवडायला सुरुवात केलेली दिसते. 
ही परिस्थिती पुरुष नायकांहून फारच उजवी असली तरी यातही हा प्रश्न उरतोच, की तुम्हाला भूमिका करण्याजोगी असली, तरी एकूण चित्रपटाच्या गुणवत्तेचं काय. डर्टी पिक्चर, किंवा अय्या यासारख्या चित्रपटांमधून नायिकांना जरूर वाव असेल, पण त्यासाठीच ते निवडले जावेत का? त्यापेक्षा नायिकेची भूमिका किंचित कमी महत्वाची असणारा एखादा अधिक सरस चित्रपट असता, तर त्याने या तारकांचं काही नुकसान झालं असतं का?
हॉलिवुडच्या स्टार सिस्टीम बद्दलही असा प्रश्न पडतोच. त्यांच्याकडेही हे दोन्ही प्रकार पहायला मिळतात. एकसुरी, आपली आणि चित्रपटांची वाढ खुंटवणारे, आणि आपल्यापुरत्या वैशिष्ट्यपूर्ण वेगळ्या भूमिका निवडताना, चित्रपटाच्या एकूण दर्जाचा कमी विचार करणारे. गेल्या वर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ऑस्करसह बहुतेक सगळी पारितोषिकं घेऊन जाणाऱ्या एडी रेडमेनची गणना,या दुसऱ्या प्रकारच्या स्टार्समधे होणार, अशी लक्षणं दिसायला लागली आहेत. 
रेडमेन गेली काही वर्ष रंगभूमी, टेलिव्हीजन आणि चित्रपट यांमधे काम करतोय पण गेल्या वर्षीचा जेम्स मार्श दिग्दर्शित ' द थिअरी ऑफ एव्हरीथिंग ' हा त्याचा फारच मोठा ब्रेक ठरला. थिअरी मधली त्याची भूमिका होती ती प्रसिध्द वैज्ञानिक स्टीवन हॉकिंग यांची. हॉकिंग यांची भूमिका ही दोन पध्दतीने आव्हानात्मक होती. एक तर हा वैज्ञानिक आजच्या काळातला,घराघरात परिचित असणारी त्यामुळे अनेकांची तीक्ष्ण नजर रेडमेनच्या कामावर होती. दुसरं आव्हान होतं, ते हॉकिंग यांच्या अपंगत्वाचं यथायोग्य चित्रण होणं आवश्यक होतं. ते अती झालं असतं तर प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी काढण्यासाठी मेलोड्रामाचा आसरा घेतल्याचा आरोप झाला असता किंवा कमी दाखवलं असतं, तर भूमिका दुर्लक्षित पध्दतीने साकारली असं प्रेक्षक म्हणाले असते. या भूमिकेसाठी रेडमेनने व्हीलचेअर, ऑटोमेटेड आवाज, यासारख्या घटकांना जरूर वापरलं, पण प्रेक्षक मंत्रमुग्ध झाला तो रेडमेनच्या परफॉर्मन्सने, आजूबाजूच्या तपशीलाने नाही. मात्र चित्रपट म्हणून थिअरी परिपूर्ण होता का? तर नव्हता. त्याच्या प्रेमकथेवर भर देण्याने हॉकिंग यांच्या एकूण चित्रणाकडे दुर्लक्ष झालं. त्यांचं इतर काम थोडक्यात, पण परिणामकारक पध्दतीने येण्याची गरज होती. त्या जोरावर चित्रपटातला संघर्ष अधिक पोचला असता. पण तसं झालं नाही. पटकथा आणि चित्रपट एका मर्यादेपलीकडे जाउ शकला नाही. रेडमेनची भूमिका , ही मध्यम चित्रपटातली उत्तम भूमिका ठरली. ते त्या एका चित्रपटात राहिलं असतं, तर मला काही वाटलं नसतं. 
पण लगेचच आलेल्या द डेनिश गर्ल (२०१५) मधेही त्याने थिअरीप्रमाणेच चांगल्या पण उत्कृष्ट नसलेल्या चित्रपटातल्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेलाच प्राधान्य दिलेलं दिसतं. टॉम हूपर हा दिग्दर्शक ऑस्कर विजेता आणि नावाजलेला आहे हे खरच, पण तुलनेने डेनिश गर्ल हा डाव्या हाताने केलेला चित्रपट वाटतो.१९२० च्या दशकात घडणारा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत जरुर आहे, मात्र प्रत्यक्ष चरीत्रावर नसून त्यावर बेतलेल्या कादंबरीचं चो चित्रपटरुप आहे. कदाचित कादंबरीच्या निमित्ताने आणलेलं उसनं नाट्य त्याला काही प्रमाणात मागे खेचत असेल, अशीही शक्यता आहेच.  तरीही, ही भूमिका पहाता रेडमेनने अशी निवड का केली असेल अशा शंकेला जागा उरत नाही. 
पुरुषांनी स्त्रीभूमिका करणं हे काही नवं नाही. नायकांना जबरदस्तीने स्त्रीवेश धारण करायला लावणाऱ्या सम लाईक इट हाॅट( आपला रफू चक्कर) , टूट्सी, मिसेस डाउटफायर  ( आपला चाची ४२०)या सारख्या निव्वळ विनोदपटांपासून ते खरोखरच एल जी बी टी वर्गाचे प्रश्न सकारात्मक स्वरुपात पुढे आणणाऱ्या 'द अॅडव्हेन्चर्स ऑफ प्रिसिला, क्वीन ऑफ द डेजर्ट' पर्यंत अनेक चित्रपटांमधे पुरुषांनी स्त्री/स्त्रीसदृश भूमिका केलेल्या आहेत. मात्र या साऱ्यांच्या तुलनेत रेडमेनने द डेनिश गर्ल मधे आपल्या आतल्या स्त्रीत्वाची जाणीव होणाऱ्या आयनार वेगनर या चित्रकाराचा सेक्स रिअसाईनमेन्ट शस्त्रक्रियांसह  लिलि या स्त्रीरुपात पोचणारा जो प्रवास दाखवला आहे, त्याला भूमिकेपेक्षा परकायाप्रवेश म्हणणच अधिक योग्य ठरेल.
वरवरच्या हावभावांमधून, वेश/रंगभूषेमधून अशा भूमिका साकारणं हे अमुक एका पातळीच्या कलावंताला फार कठीण नाही, पण ज्या प्रकारे रेडमेनने आपला स्टीवन हॉकिंग हा वरवरच्या तपशीलाला वापरतही त्यांच्यापलीकडे पोचवला होता, तोच प्रकार त्याने डेनिश गर्लमधेही केला आहे. तुम्ही जेव्हा ही भूमिका पहाता तेव्हा तुम्हाला हा बदल तो कसा घडवतो या संबंधातल्या एखाद्या मुद्द्यावर बोट ठेवणं अशक्य होऊन जातं, इतका हा बदल आमूलाग्र आहे, संपूर्ण आहे. चित्रपटात तो अनेक टप्प्यांवर येतो. आयनार चं लोकप्रिय चित्रकार असणं, गर्डा ( अलिशीआ विकॅन्डर) या त्याच्या पत्नीने नकळत केलेल्या एका गोष्टीने झालेली बदलाची सुरुवात, मग मानसिक बदल, बाह्यरुपातला बदल आणि अखेर शस्त्रक्रियेपर्यंत पोचणं असे सारे टप्पे या भूमिकेत येतात. त्यातला प्रत्येक टप्पा हा वेगळा कळणारा आणि विचार करून आपल्यापर्यंत पोचवलेला आहे. चांगला अभिनेता हा स्वत: ती व्यक्तिरेखा तर होऊन दाखवतोच, वर एका अंतरावरून त्या व्यक्तीकडे पाहिल्यासारखा तिचा स्वभाव, तिच्या वागण्याचे बारकावे, तिची भूमिका  यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. ( डॅनिएल डे लुईसच्या भूमिका यासाठी उदाहरण म्हणून घ्यायला हरकत नाही) रेडमेनने हे आपण किती उत्तम पध्दतीने करुन दाखवू शकतो हे दुसऱ्यांदा सिध्द केलय. बहुधा यंदाचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं ऑस्करही त्यालाच मिळणार यात शंका नाही. तरीही, पुढल्या दिवसांमधे त्याने भूमिकेपलीकडे जाऊन विचार केला तर त्याचं योगदान एकूण चित्रपटसृष्टीला अधिक फायद्याचं ठरेल. कदाचित शेल्फवरला एखाद दुसरा पुतळा कमी होईल, पण माध्यमाच्या फायद्यापुढे त्याचं काय एवढं
आपल्या नटवर्यांना या प्रकारची विनंती करणं हे फार मोठं धाडस होईल काय?
-गणेश मतकरी


1 comments:

Roopa Deodhar January 18, 2016 at 2:02 AM  

तुम्ही म्हणता ते कळतं आणि पटतं. पण उत्तम अभिनेत्याला उत्तम रोल आणि उत्तम सिनेमा दोन्ही एकावेळी मिळाला पाहिजे. तो स्वतः काही निर्माता आणि दिग्दर्शक नसेल दर वेळी.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP