ज्याचा त्याचा चष्मा

>> Sunday, January 3, 2016    अमेरिकेत वर्षाखेर जे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातला एक होता जे जे एब्रम्सने जॉर्ज ल्युकसच्या स्टार वॉर्स चित्रत्रयीचा अधिकृत ताबा घेतल्यानंतरचा पहिला ( आणि मालिकेतला सातवा ) चित्रपट, स्टार वॉर्स: द फोर्स अवेकन्स, तर दुसरा होता क्वेन्टीन टेरेन्टीनो, या वादग्रस्त परंतु अत्यंत लोकप्रिय दिग्दर्शकाचा बहुचर्चित आठवा चित्रपट ' द हेटफुल एट' . आपल्याकडे स्टार वॉर्स त्याच्या ब्लॉकबस्टर स्टेटसमुळे प्रदर्शित झालेला आहे, पण हेटफुल एटचा मात्र अजून पत्ता नाही. एेकीव माहितीप्रमाणे तो आपल्याकडे याच महिन्यात प्रदर्शित होणं अपेक्षित आहे, पण सध्याची आपल्या सेन्सॉरची संवेदनशीलता पहाता, काही सांगता यायचं नाही. आणि समजा, अशाही परिस्थितीत तो जर का प्रदर्शित झाला, तरी त्यातले किती प्रसंग सेन्सॉरच्या तडाख्यातून सुटतील , हा प्रश्नच आहे. साहजिक आहे. टेरेन्टीनो हा मुळातच हिंसक चित्रपटांसाठी लोकप्रिय, त्यामुळे आपले लोक आधीपासूनच एका पूर्वग्रहदूषित नजरेने या चित्रपटाकडे पहाणार, आणि शक्य त्या जागा कापायला लावणार, हे आलच. आणि या जागा कापल्या, की चित्रपटात मजा तरी काय उरणार !
 आता या विधानावरुन मी हिंसेला मजा म्हणतोय असा थेट निष्कर्ष काढला नाही तर बरं, कारण मुद्दा तसा वेगळाच आहे. आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून एक प्रथा सुरु झालीय की कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक चित्रणाला विरोध करायचा. सेन्सॉर सदस्य, उसने संस्कृतीरक्षक किंवा सध्या सोशल नेटवर्कवरुन ज्याला त्याला विरोध करणारी सामान्य जनता यातल्या कोणामधेही या चित्रणाला होणाऱ्या विरोधाचं मूळ सापडू शकतं.  तेही वरवरचं नकारात्मक चित्रण. पॉलिसी ही, की त्या व्यक्तिरेखेचा वा चित्रणाचा खोलवर जाऊन विचार न करता चटकन निष्कर्ष काढून मोकळं व्हायचं, आणि विचार करुन त्याबरहुकूम निर्णय घेण्याची जी एक जबाबदारी असते ती झटकून टाकायची. उदाहरणार्थ, व्यक्तीरेखेच्या हातातल्या सिगरेटला 'धूम्रपान' या लेबलाखाली टाकून विरोध करायचा, पण प्रसंगाच्या मूडपासून वृत्तीच्या दर्शनापर्यंत हे धूम्रपान काय साधतय हे समजून घ्यायचं नाही. सामान्यत: रंजनप्रधान चित्रपट, हा भल्याबुऱ्यामधल्या सनातन संघर्षावर चालत असतो, आणि सत्प्रवृत्तीचा विजय, हा त्यातल्या बहुसंख्य चित्रपटांचा शेवट असतो. या चांगल्याबरोबर वाईटाचं दर्शन होत नाही असं नाही, किंबहूना, ते न होऊन कसं चालेल? थोडं अलंकारिक बोलायचं, तर रात्र जेवढी काळी दाखवता येईल, तेवढी सकाळ अधिक तजेलदार वाटणार नाही का? पण नाही. सध्या तरी आपल्याला त्यात रस नाही.
एक मात्र खरं , की या प्रकारचा विरोध काही आपल्याकडेच होतो असं नाही. ज्या ठिकाणी टेरेन्टीनो चित्रपट बनवतोय, त्या अमेरिकेतही त्याच्या प्रक्षोभक मांडणीने दचकणारे आणि चित्रपटांना उघड विरोध करणारे लोक आहेतच. मागे किल बिल चित्रपटाच्या वेळी टेरेन्टिनोने, 'चित्रपट बारा वर्षावरच्या मुलांना पहाण्यासारखा आहे', म्हंटलं होतं तेव्हाही असाच गदारोळ उठला होता. नेटवर एका न्यूज इन्टरव्ह्यूची क्लिप अजूनही फिरतेय ज्यात चॅनल प्रतिनिधी आणि टेरेन्टिनो यांचा या विषयावरचा वाद रंगलेला दिसतो. या प्रकारच्या विरोधाने चित्रपटात काटछाट झालेली वा त्यावर बंदी आलेली उदाहरणं मात्र अल्प आहेत.
 किल बिल बाबत टेरेन्टिनोची भूमिका अगदीच समजण्यासारखी होती कारण या स्त्रीप्रधान चित्रपटातला हिंसाचार , त्याच्या ट्रीटमेन्टमुळे कार्टून व्हायलन्स सारखा झाला होता. सर्वसाधारणपणे मुलांसाठी असणाऱ्या ( टॉम अॅन्ड जेरी सारख्या ) अॅनिमेटेड मालिका, किंवा व्हिडीओ गेम्स, यांमधून त्यांना एका विशिष्ट प्रकारच्या हिंसाचाराची सवय झालेली असते ( आपल्या अॅंग्री यंग मॅन पिरिअडमधल्या  हिंदी चित्रपटातल्या रक्तविरहीत मारामाऱ्या, रोहित शेट्टीच्या चित्रपटातले गाड्या हवेत उडवत केलेले पाठलाग आणि नासधूस यालाही कार्टून व्हायलन्सच मानता येईल) आज काळानुसार या चित्रपटात रक्तासारख्या एकेकाळी टाळल्या जाणाऱ्या घटकांचा वापर जरुर असतो, मात्र त्याच्या योजनेत एक प्रकारची कृत्रिमता असते, ज्यामुळे तो खरा वाटत नाही.

गुन्हेगारी हा घटक टेरेन्टीनोच्या बहुतेक चित्रपटांमधे असतो ( कदाचित इनग्लोरिअस बास्टर्ड्स चा अपवाद वगळता -ज्यात हिंसा असली तरी प्रत्यक्ष गुन्हेगारी नाही) , त्यामुळे हाणामारी, खून या सारखे प्रसंग मुबलक, मात्र या सगळ्याच चित्रपटातली ट्रीटमेन्ट अशी मुलांना चालणारी असते असं नाही. त्याच्या द रिझरवॉयर डॉग्ज , जॅंगो अनचेन्ड यासारख्या चित्रपटात हिंसेचा वापर अंगावर येणारा आहे. द हेटफुल एटमधेही तो असाच अस्वस्थ करतो. तो असणाऱ्या प्रसंगांचं प्रमाण हे तुलनेने कमी आहे, मात्र ज्या प्रसंगांमधे ही हिंसा डोकावते त्या प्रसंगांनी  प्रेक्षक हादरवून जातो यात शंका नाही. या चित्रपटातल्या व्हायलन्स बरोबरच इतरही दोन गोष्टींसाठी हा चित्रपट गाजलाय. तो म्हणजे वर्णद्वेश आणि स्त्रीद्वेशाचा आरोप. सॅम्युएल एल जॅक्सनने उभं केलेलं यातलं प्रमुख पात्रं मेजर वॉरन, आणि जेनीफर जेसन ली ने साकारलेली बंदीवान खूनी डेजी, या दोघांच्या संहितेतल्या आणि संवादांमधल्या ट्रीटमेन्टला अनुसरून हे आक्षेप घेण्यात आलेले आहेत. गंमत म्हणजे, ते या कलावंतांना मान्य नाहीत. जॅक्सनने केवळ दोन चित्रपट वगळता टेरेन्टीनोच्या सर्व चित्रपटांमधे भूमिका केल्या आहेत, आणि त्यातल्या अनेक भूमिका रसिकांच्या मनात अजरामर झालेल्या आहेत. त्याची इथली भूमिकाही तितकीच वजनदार असल्याने त्याला हा विरोध मान्यच नाही. जेनिफर जेसन लीचं नाव तर या भूमिकेमुळे ऑस्कर नामांकनासाठी चर्चेत आहे. त्यामुळे तिलाही हरकत असण्याचं काही कारण नाही. दुसरं असं , की या दोन्ही व्यक्तीरेखांना पडद्यावर  जरी अमुक एका प्रमाणात अपमानास्पद वागणूक मिळत असली, तरी तिचा विचार हा स्वतंत्रपणे केला जाऊ शकत नाही. एकूण चित्रपटाच्या संदर्भात, आणि त्यापलीकडे जाऊन ज्या सिव्हील वॉर नंतरच्या दिवसांच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट घडतो तिच्या संदर्भातच हा विचार व्हायला हवा. आणि तसा तो केला तर या आरोपांमधे तथ्य वाटत नाही.

 सिव्हील वॉरशी संबंधित घटक असणारी राजकीय पार्श्वभूमी आणि वेस्टर्न्स या लोकप्रिय अमेरिकन चित्रप्रकारांचं मिश्रण टेरेन्टीनोने जॅंगो अनचेन्डमधे हाताळलेलं आहे. मात्र इथली मांडणी ही त्यापेक्षा संपूर्णपणे वेगळी आहे. इथली संकल्पना आहे, ती वेस्टर्न्सपेक्षा अॅगथा क्रिस्टीच्या एखाद्याच्या हूडनीटच्या जवळ जाणारी. एका निर्मनुष्य ठिकाणी काही काळापुरते अपरिहार्यपणे अडकून पडलेले  सहप्रवासी, त्यांच्यात तयार होणारे तणावपूर्ण संबंध, रहस्यमय खून, या सगळ्यामधून ही एक झकास रहस्यकथा तयार होते. या रहस्याच्या उलगड्याशी त्यातलं क्रौर्य जोडलेलं आहे. ते काढून टाकणं चित्रपटाचा परिणाम पोकळ करुन सोडणारं ठरेल.

अर्थात हा युक्तीवाद तर्कशुध्द विचार करणाऱ्यांसाठी. ज्यांना आपल्या सेन्सॉर बोर्डाची पध्दत माहीत आहे, त्यांच्यापुढे हेटफुल एट ने एक प्रश्न उपस्थित केलेलाच आहे. त्यांना खात्रीने माहित आहे, की चित्रपट प्रदर्शित झाला , आणि त्यातल्या प्रसंगाना स्पष्टीकरण असलं, तरी त्याला कात्री ही लागणारच. दृश्यांना नक्कीच, पण टेरेन्टीनोच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य समजल्या जाणाऱ्या त्यातल्या संवादांनाही. मग या परिस्थितीत त्यांना असा पेच पडतो, की चित्रपट प्रदर्शित होण्याची  उशीरापर्यंत वाट पाहून मग चित्रपटाच्या कलामूल्याशी फारसं देणंघेणं नसलेल्या लोकांनी त्यावर केलेले अत्याचार सहन करत चित्रपट पहावा, का अन्य मार्गांनी ( म्हणजे पायरेटेड कॉपी शोधून) तो मूळ स्वरुपात पण कमी प्रभावी असलेल्या छोट्या पडद्यावर पहावा ? माझ्या मते हा प्रश्न नो ब्रेनर आहे. टेरेन्टीनोचा खरा चाहता त्याचे चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहील( त्यानंतर तो पायरेटेड कॉपीही शोधेल हा भाग वेगळा).

मला नेहमी असं वाटतं, की ज्या त्या गोष्टीकडे आपण एका विशिष्ट चष्म्यातून का पहायला हवं? त्यावर आक्षेप का काढायला हवे?  हा चित्रपट वर्णद्वेषी, तो स्त्रीद्वेष्टा, तमुक धार्मिक भावना दुखावणारा, अमका बालमनावर दुष्परिणाम करणारा, यात हिंसेचं दर्शन, तर त्यात इतर काही. पूर्वी आपण जसे हे तपशील उगाळत न बसता चित्रपट त्यात सांगितलेल्या गोष्टीसाठी पहायचो, तसं आता होऊच शकणार नाही का? या पोलिटीकली करेक्ट असण्याच्या हौसेपोटी आपलं रसिक असणंच संपून चाललय की काय?
-गणेश मतकरी

1 comments:

HaRsHaD January 3, 2016 at 9:54 AM  

सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहणारच !!!!!! आणि नंतर त्याची UNCUT version download करुन पाहणार

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP