कोंडीत सापडलेल्या माणसांची गोष्ट

>> Monday, April 7, 2008

शहरावर रात्र उतरलेली. एक ऍफ्रो-अमेरिकन जोडपं आपल्या गाडीत आपल्यातच मश्गूल. टेहळणी करणारा एक गोरा पोलिस ऑफिसर त्यांना हटकतो. तपासणीचं नुसतं निमित्त. झडती घेण्याच्या मिषानं तिच्या अंगावरून निर्लज्जपणे फिरणारे त्या ऑफिसरचे उद्दाम हात. तिच्या नवऱ्याच्या डोळ्यादेखत. विनाकारण तुरुंगात जावं लागण्याच्या भयापोटी काहीच न करणारा नवरा. शरम आणि संतापानं पेटलेला तिचा चेहरा आणि हे सारं असहायपणे पाहणारा त्या ऑफिसरचा कोवळा-अननुभवी जोडीदार. क्षणाक्षणानं तणाव वाढत जातो आणि आपली अवस्था त्या असहाय जोडीदारासारखी होते. दुसरा दिवस. तीच ऍफ्रो-अमेरिकन बाई एका अपघातात तिच्याच पेटत्या गाडीत अडकलेली. काही क्षणांत तिला सोडवलं नाही, तर गाडीचा स्फोट होऊन मरण नक्की. तिथेही ड्युटीवर आहे तोच उद्दाम ऑफिसर. पण आता तो फक्त एक कर्तव्यदक्ष पोलिस आहे. कसंही करून, जीव धोक्यात घालूनही एका जिवाला वाचवू बघणारा. त्याला पाहताच त्या अवस्थेतही ती किंचाळते. "तू नाही. दुसरं कुणीही चालेल, पण तू नकोस.' तरीही तिला धीर देत. तिला स्पर्श करण्याची सभ्यपणे परवानगी मागत तिला सोडवणारा तो आणि मरणमिठीतून बाहेर पडताच विश्वासानं आपल्या रक्षणकर्त्याला बिलगलेली ती. सारेच हिशेब उलटेपालटे झालेले... पॉल हॅगिसचा 2005 मधील "क्रॅश' बघताना आपले सगळे हिशेब असेच पाहता पाहता मोडीत निघतात. स्थळ आहे लॉस एन्जेलिस. "नाईन - इलेव्हन'च्या दुर्घटनेनंतरचं. तिथे आपल्याला भेटणारी ही पात्रं. एक गोरा डिस्ट्रिक्ट ऍटर्नी आणि त्याची गोरी बायको. दोन ऍफ्रो-अमेरिकन चोर. एक मेक्सिकन कुलूप दुरुस्तीवाला. एक गरीब पार्शियन दुकानदार. एक ऍफ्रो-अमेरिकन पोलिस ऑफिसर. एक ऍफ्रो-अमेरिकन जोडपं. एक वंशवादी गोरा पोलिस ऑफिसर. त्याचा गोरा जोडीदार. ते दोन काळे चोर डिस्ट्रिक्ट ऍटर्नीची गाडी लंपास करतात, तिथून घटनाचक्राला सुरुवात होते. त्या चोरांना पकडणं हा पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो. ऍटर्नीची बायको घाबरून घराची कुलुपं बदलत सुटते. मग या गोष्टीत कुलूपवाल्यापासून पोलिसांपर्यंत अनेक पात्रं येत जातात. या सगळ्या पात्रांची वंशभेदाबद्दल स्वतःची अशी स्वतंत्र भूमिका आहे. त्यांच्या जगण्यानं ती तयार झालेली आहे. ऍटर्नी कृष्णवर्णीयांच्या मतांच्या चिंतेत बुडालेला, तर त्याची बायको प्रत्येक काळ्या कातडीच्या माणसाकडे संशयानं पाहणारी. त्यांची गाडी चोरणारे चोर आपल्या कातडीच्या न्यूनगंडानं पछाडलेले. पोलिस ऑफिसर आपल्या काळ्या आईचे आणि गोऱ्या प्रेयसीचे लागेबांधे सांधण्यात मग्न. त्याच्या हरवलेल्या भावाला शोधायची जबाबदारीही त्याच्यावरच. कुलूपवाला आपला रंग आणि गरिबी विसरून मानानं जगू पाहणारा. आपल्या निष्पाप पोरीला परीकथा सांगून तिला हिंसेपासून दूर ठेवणारा. उद्दाम ऑफिसर आपल्या आजारी बापाचे हाल सोसणारा. त्याचा संताप काळ्या माणसांवर काढणारा. एक गरीब पर्शियन दुकानदार दुकान लुटलं गेल्याने उद्ध्वस्त झालेला. त्या संतापात कुलूपवाल्याचा खून करायला निघालेला... या सगळ्याचं जगणं "क्रॅश'मधल्या 36 तासांत एकमेकांशी टक्कर घेतं. हे सगळं बेमालूम पद्धतीनं रचण्यासाठी पटकथाकारांनी जी काही कामगिरी केलीय, तिला तोड नाही. इराकी, पर्शियन, मेक्सिकन, ऍफ्रो-अमेरिकन, जपानी अशा अनेक वंशांची माणसं आपल्याला या कथानकात भेटतात. आपापला इतिहास, आपले आर्थिक-सांस्कृतिक प्रश्न घेऊन एकमेकांवर आदळतात आणि "क्रॅश' नावाचं नाट्य रंगत जातं. सरतेशेवटी माणुसकी दाखवणाऱ्या एका पोलिसाकडून निव्वळ भीतीपोटी एका चोराचा खून होतो. त्यानंतर सारं जेमतेम स्थिरावतं, तोच चौकात तैवानी निर्वासित बेकायदेशीरपणे येऊन दाखल होतात आणि दोन गाड्यांची आणखी एक टक्कर होते, नव्या घटनांना जन्म देत वर्तुळ पुरं होतं. कुठल्याच पात्राच्या वागण्यावर काळा वा पांढरा शिक्का मारण्याची मुभा दिग्दर्शक आपल्याला देत नाही. प्रत्येकाच्या कृतीचं काही ना काही स्पष्टीकरण आहे. कारण परंपरा आहे ती तुमच्या आमच्यासारखीच अपुरी माणसं आहेत. या माणसाचं इतक्या मोठ्या शहरातही कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं एकमेकांशी संबंधित असणं, ही पटकथेची करामत. पण त्यामुळेच जग जवळ येणं म्हणजे नेमकं काय, ते अधोरेखित होत जातं. वेगानं जवळ येणाऱ्या आजच्या जगानं केलेली त्यांची कोंडी स्पष्ट होते. असुरक्षितता, तिरस्कार, भीती, द्वेष आणि तरीही जगण्याची धडपड आहेच. या अपरिहार्यतेचं नेमकं भान देणारं संगीत गोष्टीच्या पार्श्वभूमीलाच आहे. त्याचा अलिप्त कोरडेपणा, त्याची धार आणि तरीही त्यात असलेली करुणा. हे सगळं निव्वळ अवर्णनीय. तसाच या गोष्टीला दिलेला उदासवाणा पोत. सिनेमाभर एक उदासवाणं, गढूळ वातावरण पडदा व्यापून उरतं, ते त्यामुळेच. जागतिकीकरणाच्या या झपाट्यात या कोंडीपासून सुटका नाहीच, असं "क्रॅश' आपल्याला बजावतो. माणुसकीचा साक्षात्कार घडवणाऱ्या काही क्षणांचा दिलासाही देतो. एकाच वेळी असहाय, क्रूर आणि सहृदयही असणाऱ्या माणसांची ही गोष्ट.
-मेघना भुस्कुटे

5 comments:

Jaswandi April 8, 2008 at 10:03 AM  

crash
khupch sahi film ahe. tyachyavar lihila suddha mast ahes.pan film itaki chhan ahe ki tyavar kahihi vachtana te ugach apurn vatat rahata!

ganesh April 8, 2008 at 11:23 AM  

meghana,
if you like crash, i recommend Magnolia

Yogesh April 8, 2008 at 8:55 PM  

थोडा loud वाटत नाही का तो सिनेमा? अतिसुलभीकरण केल्यासारखा?

ganesh April 9, 2008 at 12:40 AM  

ajanukarna,
u have an interesting comment. can u elaborate?

Unknown April 17, 2008 at 11:03 PM  

एक शन्का... crash पाहिल्यावर crash course करवा लागेल का?

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP