काही "फास्ट' निरीक्षणं

>> Friday, April 18, 2008

मी "डोंबिवली फास्ट' तसा उशिराच पाहिला. लवकर पाहिला नाही. कारण त्यावर आपण लिहिणार नाही, असं मला वाटत होतं. आता न लिहिण्यामागं कारण हे की तो ज्या "फॉलिंग डाऊन'वर आधारित आहे त्याविषयी मी साप्ताहिक स‌काळमध्ये 2005 मध्ये तपशिलात लिहिलं होतं.( पाहाः मागची पोस्ट) त्यामुळे "डोंबिवली फास्ट'वर लिहिताना तेच मुद्दे लिहावे लागतील असं काहीसं मला वाटत होतं. चित्रपट पाहिल्यावर मात्र वाटलं, की रूपांतरित असला, तरी हा महत्त्वाचा चित्रपट आहे. खास करून मराठी चित्रपटांच्या सध्याच्या चमत्कारिक परिस्थितीत तर अधिकच; त्यामुळे त्यावर काही निरीक्षणं मांडणं आवश्यक आहे. मराठी चित्रपटांची परिस्थिती चमत्कारिक अशासाठी म्हणावी लागेल, की सध्या मराठी चित्रपट बदलत चालल्याची एक अफवा पसरलेली आहे. खरं तर यात तथ्य नाही. "श्वास' भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवण्यात आल्यानं एकदम मराठी चित्रपटांकडे भारताच्या एकूण चित्रसृष्टीचं लक्ष काही प्रमाणात वेधलं गेलं आणि अनेक निर्मात्यांनी मराठी चित्रपटांना हात घातला हे खरं, पण संख्या म्हणजे दर्जा नाही. आज मराठी चित्रपटांची निर्मिती मुबलक होते आहे, पण यातले बहुसंख्य चित्रपट हे सामान्य आणि दर्जाहीन आहेत. परिस्थिती अशीच राहिली, तर आपल्या चित्रपटांचं कठीण आहे; त्यामुळेच कोणी चाकोरीच्या बाहेर पडून निराळा चित्रपट काढला तर त्यांचं याबद्दल कौतुक होणं आवश्यक आहे. मग तो रूपांतरित असला तरीही. आपल्याला हे माहीत आहेच, की आपल्याकडल्या अनेक चित्रपटांची कथानकं ही निर्वातात घडतात. म्हणजे दुसऱ्या शब्दांत सांगायचं, तर त्यांना कोणताही संदर्भ नसतो. स्थलकालाचं गणित हे या चित्रपटांना लागूच पडत नाही. "डोंबिवली फास्ट' मात्र याला अपवाद आहे. त्याला चित्रकर्त्यांनी मुंबईचा एक समर्पक संबंध जोडला आहे. तो केवळ शहरी नाही, तर स्पेसिफिकली मुंबईकरांच्या मानसिकतेच्या आणि आयुष्याच्या अनेक छटा या चित्रपटाच्या नावापासूनच आपल्याला दिसतात. त्यांच्या वागण्याला आलेली कृत्रिमता, असणारी गती, टोकाची सहनशीलता या गोष्टी तर इथं आहेतच. वर रेल्वे प्रवासाचं जे दिव्य इथल्या लाखो लोकांना रोज पार पाडावं लागतं त्याचाही कथावस्तूत सहभाग आहे. या प्रवासाचा ताण दिग्दर्शक निशिकांत कामत इथं पहिल्या मॉन्टाजमध्ये दाखवून देतो आणि नायकाच्या मानसिक संतुलनाची या रुटिनमुळे झालेली परिस्थिती, ही मुख्य कथानकाकडे वळण्यासाठी स्प्रिंगबोर्डसारखी वापरतो. रेल्वेचा हा ट्रॅक (पन इन्टेन्डेड) मूळ चित्रपटात नाही. तिथला नायकही आधीपासूनच थोडा मानसिकदृष्ट्या अस्थिर व्हायला लागलेला आहे, पण त्यांचं मूळ हे त्यांच्या मोडलेल्या संसारात आहे, इथं तसं नाही. दिग्दर्शकाचं दुसरं कॉन्ट्रिब्युशन म्हणजे त्यानं चित्रपटातल्या सामाजिक अन्यायाविरूद्ध उभा राहणारा नायक आणि कुटुंब कलहानं डोकं फिरलेला नायक यांचं प्रमाण बदललं आहे; त्यामुळे इथलं माधव आपटेचं बंड हे अधिक बंडाप्रमाणे आहे; तर मूळ चित्रपटात तो साइड इफेक्ट आहे. डोंबिवली फास्टचं कथानक फार घडामोडी असणारं नाही. माधव आपटे (संदीप कुलकर्णी) हा सरळमार्गी माणूस. धावपळीचं आयुष्य, घरातले वाद यातही समाधानी राहण्याचा प्रयत्न करणारा. आपली तत्त्वं जपून राहणारा; मात्र समाजात ज्या त्या जागी करावी लागणारी तडजोड त्याला सहन होत नाही. बायकोचं असमाधान, मुलीच्या ऍडमिशनसाठी मागितलेलं डोनेशन, ऑफिसमधला भ्रष्टाचार या सगळ्यांचा परिणाम घेऊन एकदा त्याचं डोकं फिरतं आणि तो कायदा हातात घेतो. कोल्ड्रिंकवर एक रुपया जास्त घेणाऱ्याचं दुकान बॅटनं फोडण्यापासून सुरू झालेला हा लढा अनेक सामाजिक अन्यायांना स्पर्श करत अधिकाधिक वरच्या थरावर जात राहतो. काही बाबतीत चित्रपटाचा आशय विचारप्रवर्तक असला तरी डोंबिवली फास्ट उघडच कमी पडतो. यातला मोठा भाग आहे तो पटकथा संवादाचा. माणसाच्या रागाचा जेव्हा भडका उडतो, तेव्हा तो राग किती काळ डोक्यात खदखदत राहील याला मर्यादा आहेत. "फॉलिंग डाऊन'मध्ये हा राग चित्रपटभर राहतो. याचं कारण हा पूर्ण चित्रपट, नायकाच्या आपल्या वेगळ्या राहणाऱ्या पत्नीकडे जातानाच्या काही तासांच्या वाटचालीत घडतो. त्याची निघतानाची मनःस्थिती, वाटेत भेटणारे लोक आणि स्वतःवर होणाऱ्या अन्यायाची जाणीव यामुळे हा राग टिकतो, वाढत जातो. डोंबिवली फास्टमध्ये दुपारी कोल्ड्रिंकवाल्याशी भांडण आणि दुचाकी तोडल्यानंतर आपटे नाहीसा होतो आणि उगवतो एकदम रात्र पडल्यानंतर. मधल्या वेळात तो काय करतो कुणास ठाऊक; मात्र इथं त्याचा पारा मात्र तेवढाच चढलेला दिसतो. बॅटही हातात असते. पुढे त्याला पोलिसांनी पकडूनही राग कमी होत नाही. हा राग टिकतो सुमारे दोन दिवस, जे एरवी अशक्य आहे. चित्रपटाचा कालावधी काही तासांवरून दोन दिवसांवर नेण्यामागे एक उघड कारण आहे. आपटे निर्माण करत असलेल्या प्रश्नांची पोच राजकारण्यांपर्यंत गेलेली दाखवणं आणि त्यांनी हे प्रश्न निकालात काढण्यासाठी टोकाचा पवित्रा घेणं या गोष्टी कथेत बसवणं दिग्दर्शकाला गरजेचं वाटलं. या घडामोडींनी चित्रपटाला एक वजन येईल आणि त्यातल्या सामाजिक अन्यायाचा मुद्दा अधोरेखित होईल अशी कल्पना असावी, पण त्याचा परिणाम म्हणजे पटकथेचं विस्कळित होणं. प्रसंग प्रवासात घडणं काढून टाकल्यानं होणारा आणखी घोळ म्हणजे आपटेच्या हालचालींनाही सुसूत्रता उरत नाही. पोलिस कोठडीतूनही त्याला सहज सोडतात. मग तो डोंबिवलीलाही जातो, पण घरी जात नाही. कंपाउंडमध्येच भांडतो आणि पुन्हा निघतो तो परत उलट्या दिशेला फाऊंटनपर्यंत. शिवाय चित्रपट संपताना क्लायमॅक्स डोंबिवली फास्ट गाडीत हवा, म्हणून आपटे पुन्हा डोंबिवलीला निघतो. हे सगळं घडताना त्याच्या शोधातला इन्स्पेक्टर (संदेश जाधव) मात्र फाऊंटन ते डोंबिवलीमधल्या कोणत्याही स्थळी काही मिनिटांत पोचू शकतो. इन्स्पेक्टर अनासपुरेची इथली व्यक्तिरेखा ही फारच टु डिमेन्शनल आहे. हा माणूस कर्तबगार आहे आणि त्याला मनातून आपटेचं वागणं पटतं हे तर उघड आहे; पण या दोन गोष्टी एकदा समोर आल्या की मग या व्यक्तिरेखेची वाढ होत नाही. मूळ चित्रपटातला या भूमिकेचा ग्राफ हा अभ्यास करण्यासारखा आहे. पत्नी आणि वरिष्ठांच्या दबावाखाली असणारा फॉलिंग डाऊनमधला इन्स्पेक्टर (रॉबर्ट डुबॉल) हे नायक बिलचंच (मायकेल डग्लस) दुसरं रूप आहे. त्याचा प्रवास नायकाला समांतर जाणारा आहे आणि नायकाच्या बंडापासून स्फूर्ती घेणाराही. संवादांपुरतं बोलायचं तर चित्रपट अतिशय ओव्हर रिटर्न आहे. पात्रं अनावश्यक गोष्टी पुन्हा पुन्हा बोलतात. खास करून आपटेची बायको. हे पात्र इतकं कटकट करणारं न दाखवताही मुद्दा पोचू शकला असता. याच पद्धतीनं प्रत्येक वेळी आपटेकडे नवं हत्यार आल्यावर "आता त्याच्याकडे अमुक अमुक आहे' असं बोलण्याची गरज नाही किंवा आपटेचं फाऊंटनच्या रस्त्यावरलं स्वगतही छान चित्रित केलं, तरी अनावश्यक आहे. या सर्व बडबडीला स्क्रिप्टिंगमध्येच कात्री लावायला हवी होती. निशिकांत कामत आणि छायाचित्रकार संजय जाधव यांनी चित्रपटात शैलीदार सफाई मात्र आणली आहे. आपटेचा दिनक्रम दाखवणाऱ्या अधिकाधिक वेगवान होत गेलेल्या मॉन्टाजपासूनच हे दोघं प्रेक्षकाची पकड घेतात. मराठी चित्रपटात इतकं चांगलं काम क्वचितच पाहायला मिळतं. काही वेळा मात्र छायाचित्रण खटकेल इतकं शैलीदार होताना दिसतं. उदाहरणार्थ आपटेचा एन्काउंटर करण्याची ऑर्डर अनासपुरेला मिळते. तो प्रसंग आपण केवळ पाहतो. आपलं लक्ष अडकतं ते कॅमेरा मूव्हमेंटवर आणि बोलणाऱ्या व्यक्तिरेखांकडे दुर्लक्ष होतं. पोलिस स्टेशनमधल्या सर्व प्रसंगांत, सर्व प्रहरीइतका प्रचंड अंधार दिसतो की रात्र आणि दुपार यात फरकच वाटू नये. अशा काही जागा सोडता हे चित्रण पहिल्या दर्जाचं आहे. डोंबिवली फास्ट पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते, की यातल्या माधव आपटेला येणाऱ्या अडचणी, तो समाजाच्या ज्या थरातला आहे त्या थरातल्या प्रत्येक प्रेक्षकाला आणि इतर थरातल्या अनेकांना पटणाऱ्या आहेत; त्यामुळे आपण आपटेच्या भूमिकेशी काही प्रमाणात समरसही होतो, पण चित्रपटाचा शेवट तर नकारात्मक आहे. म्हणजे सामान्यांना कितीही वाटलं, तरी त्यांच्या हातात काहीच नाही. असा या चित्रपटाचा संदेश म्हणावा का? की इन्स्पेक्टरला वाटणारी अस्वस्थता, हा याचा माफक सकारात्मक शेवट म्हणायचा? मला वाटतं, की आपटेचा विचार समाजापर्यंत पोचला हे दाखवणारी एखादी गोष्ट चित्रपटाच्या शेवटी दिसली असती, तर कदाचित ते अधिक परिणामकारक ठरलं असतं. हे एखाद्या संवादातूनही करता आलं असतं, पण त्यामुळे या व्यक्तिरेखाला न्याय मिळाला असता. जो आता मिळत नाही. कदाचित चित्रपटाच्या शेवटालाही "फॉलिंग डाऊन'चा आधार न घेता, स्वतंत्रपणे त्याचा विचार होणं आवश्यक होतं. जे इथं होत नाही. 2006मध्ये ब्लफमास्टर आणि जिंदानंतर पाहण्यात आलेलं हे तिसरं चांगलं रूपांतर; मात्र या तीनही चित्रपटांच्या प्रकारात खूपच फरक आहे. ब्लफमास्टर किंवा जिंदा हे केवळ करमणूकप्रधान होते. आशयाला महत्त्व असणारा आणि आपल्याकडे चपखल बसवणारा विचार मांडणारा डोंबिवली फास्ट मात्र अधिक काळाबरोबरचा आहे; त्यामुळेच अधिक महत्त्वाचा.
-गणेश मतकरी

6 comments:

Prasad April 19, 2008 at 6:59 AM  

Hello Sir..Can u Change ur blog Template..?..It is pain to read all ur good posts..in black..Hope U wont mind..

सिनेमा पॅरेडेसो April 19, 2008 at 10:46 PM  

रवी आणि प्रसाद
thanks for ur comment.

an all white web page uses about 74 watts to display, while an all black page uses only 59 watts. the Google page black would save 3000 MWh per year! As a result, Blackle was created.
www.Blackle.com वर वाचा त्याबद्दल तपशीलात.
मला नेहमी आश्चर्य वाटतं कुणी ब्लँकल स्क्रीनचा फार वापर करीत नाही त्याचा. या ब्लाँगवर ब्लँकलसारखंच टेम्प्लेट घेण्यामागे डोळ्यांना कमी त्रास होतो वाचताना हेही एक आहे. पण काहीच जणांचे म्हणणे आहे की येथे वाचताना त्रास होतो. ब्लँकलला चांगले की वाईट त्याची इथे चर्चा नको. ब्लँकलबाबत वादच चिक्कार आहेत. त्यामुळे त्यात आणखी भर नको. पांढऱया किंवा इतर कोणत्याही रंगाच्या टेम्प्लेटवर वाचण्यासाठी जितके कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. त्यापेक्षा निश्चितच कमी ब्लँक स्क्रीनवर होतात. त्याबाबत गुगलनेने प्रयोग करून सिध्द केले आहे. त्यामुळे Douglas Bowman यांनी तयार केलेले ब्लँकलशी साम्य असणारे टेम्प्लेट अजूनही बदलले नाही. याशिवाय प्रत्येक ब्लाँगला स्वतःची एक ओळख असते. तशी या ब्लाँगची कायम राहावी, यासाठी हे टेम्प्लेट बदलू नये असं वाटतं. दर महिन्याला टेम्प्लेट बदलणारे ब्लॉगर चिक्कार आहेत. दिसलं नवं टेम्प्लेट की घ्या... मला ते मुळातच पटत नाही. म्हणून. त्यातून आपण सिनेमाबद्दल चर्चा करण्यापेक्षा या ब्लॉगचा रंग बदला, नीट दिसत नाही यावर चर्चा नको करूया. हे टेम्प्लेट फार कमी जण वापरतात. तुम्ही सातत्याने इतर रंगांचे टेम्प्लेट पाहता. त्यानंतर येथे वाचताना वेगळं वाटतं, म्हणून तो त्रासच आहे असं वाटत असावं.

Yogesh April 20, 2008 at 12:55 AM  

sundar lihile ahe ganeshrao. tingya baddalahi tumhi jaroor liha.

ganesh April 20, 2008 at 2:20 AM  

thanks ajanukarna ,
did you see falling down?
whats the verdict?

केसु April 20, 2008 at 7:24 PM  

Ganesh,
Ajun ek sundar parikshan.. chhan zalay.. ha mala aavadalela chitrapat.. madhav apate che fountain che manogat tar ekdam patnare.. kahi kahi wel chitrapat tantrik angane na baghta bhavnatmak ritya jast mahhatvacha vatato tasa haa.. aso..
tumhi "No country for old men" baghitla ka? asel tar kripaya tyache pan parikshan liha pls..maza gondhal zalay chitrapat baghun :)

-- Kedar Sahasrabudhe

ganesh April 21, 2008 at 12:03 PM  

kedar ani ajunukarna,
i have seen both no country and tingya and have liked both. i feel i should write about them, but lets see.
kedar, have u seen any other coen bros film? that may give you some clues about no country...
their films are always about american small towns, crime and morality. if you havent, i would recommend blood simple, miller's crossing and fargo. in that order.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP