अस्वल झालेला माणूस

>> Sunday, April 20, 2008

हिरवळीचा प्रदेश. थोड्या अंतरावर दोन भली थोरली अस्वलं रेंगाळतायत. आता केसांच्या झिपऱ्या कपाळावर येणारा एक माणूस फ्रेममध्ये शिरतो आणि कॅमेऱ्याशी बोलायला लागतो. हा टिमोथी ट्रेडवेल. एक विक्षिप्त पर्यावरणवादी. 1991 ते 2003 ही सुमारे तेरा वर्षं ट्रेडवेल अलास्कामधल्या ग्रिझली अस्वलांनी व्यापलेल्या जागी जात असे- प्रत्येक वर्षातले दोन-तीन महिने. हा काळ तो जंगलात तंबू ठोकून राहत असे, दिवसभर अस्वलांच्या संगतीत काढत असे, कोणत्याही हत्याराशिवाय! ट्रेडवेलनं या अस्वलांचं पारध्यांपासून रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली होती आणि त्यासाठी या हिंस्र अस्वलांबरोबर राहणं त्याला गरजेचं वाटत होतं. यात धोकाही मोठा होता; कारण ही अस्वलं वेळप्रसंगी कोणाला मारायला कमी करत नाहीत आणि चवताळलेल्या अस्वलापासून पळणं तर अशक्यच, तरी ट्रेडवेल या अस्वलांबरोबर राहिला- जणू त्यांच्यातलाच एक होऊन. आताही कॅमेऱ्यात पाहून बोलणाऱ्या आणि स्वतःला असणाऱ्या भयंकर मृत्यूच्या संभाव्य धोक्याची कल्पना देणाऱ्या ट्रेडवेलच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नाही; कारण त्याला या धोक्याची कल्पना आहे; पण तसं खरोखरंच होईल यावर त्याचा विश्वास नाही. वर्नर हरझॉग या जर्मन दिग्दर्शकानं ट्रेडवेलवर बनवलेल्या "ग्रिझली मॅन' या डॉक्युमेंटरीची सुरवात अशी होते. ट्रेडवेलनं सुमारे पाच वर्षांमध्ये व्हिडिओ कॅमेरावर चित्रित केलेल्या शंभराहून अधिक तासांच्या मुद्रणामधून या डॉक्युमेंट्रीचा बराच, म्हणजे अर्ध्याहून अधिक भाग येतो; पण हा माहितीपट म्हणजे एरवी डिस्कव्हरी चॅनेल किंवा नॅशनल जॉग्रफिकवर पाहायला मिळणाऱ्या मानव आणि प्राणी यांच्या खेळीमेळीच्या दृश्यांचं संकलन नव्हे. त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेवट. माहितीपटाचा नव्हे, तर ट्रेडवेलचा. 2003 मधल्या आपल्या अखेरच्या अलास्का फेरीच्या शेवटी ट्रेडवेलला भयंकर मरण आलं- ज्या धोक्याबद्दल तो कॅमेऱ्याला सांगत होता त्यापासूनच. एका अस्वलानं त्याला शरीराचे तुकडे तुकडे करून मारलं. त्याच्या एमी ह्यूगेबार्ड या मैत्रिणीलाही. दुसऱ्या दिवशी या अस्वलाला मारल्यावर त्याच्या शरीरात या दोघांचे अवशेष मिळाले. संपूर्ण "ग्रिझली मॅन' या शोकांताच्या सावलीत आहे आणि ते साहजिकही आहे. एक तर ही पुरेशी प्रसिद्धी मिळालेली घटना आहे. दुसरं म्हणजे हा मृत्यू अगदी अनपेक्षित नसला, तरी त्याच्याशी संबंधित घटना या विशिष्ट प्रकारे घडण्याचाही त्यामागं हात आहे. उदाहरणार्थ, ही घटना आहे ती हिवाळ्याच्या सुरवातीची, ज्या वेळी खरं तर ट्रेडवेल अलास्कात नसे. दर वर्षीप्रमाणे तेव्हाही तो परत जायला निघाला होता; पण विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी काही भांडण झाल्याकारणानं पुन्हा माघारी आला. यानंतर त्यानं जेव्हा परत जायचं ठरवलं त्याच्या केवळ एक दिवस आधी त्याचा मृत्यू ओढवला. म्हणजे त्याचं परत येणं हे जणू आपल्या मृत्यूला भेटण्यासाठीच होतं. "ग्रिझली मॅन' एरवीच्या माहितीपटांपेक्षा वेगळा होण्याचं कारण हेही आहे, की त्याचा आवाका, हा केवळ एका विषयापुरता मर्यादित नाही, तर त्याचा विस्तार तिहेरी आहे. यातला पहिला भाग आहे तो ट्रेडवेलच्या वाइल्ड लाइफ चित्रणाचा. हे चित्रण नेहमीच्या प्राणिजगतावरच्या माहितीपटांसारखंच असलं, तरी दर्जेदार आहे. अस्वलांबरोबर राहण्याचा ट्रेडवेलचा अट्टहास, काही कोल्ह्यांबरोबरची मैत्री, अस्वलांच्या मारामाऱ्या अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण जागा इथं आहेत. दुसरा भाग हा सर्वांत गुंतवणारा आहे आणि तो आहे ट्रेडवेलच्या मनोविश्लेषणाचा. ट्रेडवेल एक गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व होता; किंबहुना त्याचा तऱ्हेवाईकपणाही दिवसेंदिवस वाढत चालला होता. आता हेच पाहा, ट्रेडवेलच्या मते तो पारध्यांपासून अस्वलांना वाचावायला जात असे; पण मुळात या भागात अस्वलांच्या अवैध शिकारीचं प्रमाण अत्यल्प होतं. त्यामुळे त्यांना संरक्षणाची गरज मुळातच नव्हती. अस्वलांबरोबर राहण्यात त्याला आपलेपणा वाटत नसे; पण अनेकांच्या मते हे वागणं बेजबाबदारपणाचं होतं. त्याची जर अस्वलांना सवय झाली, तर अस्वलांना प्रत्येकच माणूस हा त्याच्याप्रमाणे वाटू शकतो आणि पुढंमागं शिकाऱ्यांपासूनही ते बेसावध निरुपद्रवी राहण्याची शक्यता तयार होते; मात्र ट्रेडवेलला हे तर्कशास्त्र मान्य नाही. ट्रेडवेल हा स्वतःच्या मर्जीनं पर्यावरणवादी बनला असला, तरी त्याला या प्रकारची पार्श्वभूमी नाही. मूळचा तो वाईट संगतीला लागलेला कॉलेज ड्रॉपाऊट. अस्वलांची संगत हे त्याच्या मनानं शोधलेलं पलायनवादी उत्तर. त्यानं आपल्या चित्रीकरणात कॅमेऱ्याशी मारलेल्या अनेक गप्पा आहेत. त्या ऐकताना असं लक्षात येतं, की त्याच्या दृष्टीनं अस्वलांचं जग हे त्याला अधिक जवळंच वाटायला लागलेलं आहे आणि माणसांचं जग हे अधिक भ्रामक. ही दरी अधिकाधिक रुंदावत चालली आहे आणि ट्रेडवेल अस्वलांच्या जगात हरवत चालला आहे. हा मुद्दा इतरांच्या मुलाखतीतही जाणवण्यासारखा आहे. त्यांच्या मते ट्रेडवेलचं वागणं, चालणं अधिकाधिक अस्वलासारखं व्हायला लागलंय. त्याच्या प्रतिक्रिया या माणसांसारख्या कमी आणि प्राण्यांसारख्या अधिक होताहेत. सरकारला दिलेल्या शिव्या चित्रित करणं, पाऊस पडावा म्हणून देवांना वेठीला धरणं, आपल्या अमेरिकन असण्याची लाज वाटून ऑस्ट्रेलियन असल्याचं भासविण्याचा प्रयत्न करणं यांसारख्या गोष्टीही ट्रेडवेलच्या मानसिक संतुलनाबद्दल शंका उत्पन्न करतात. "ग्रिझली मॅन'चा तिसरा भाग केंद्रित आहे तो ट्रेडवेलच्या भयानक अंतावर. ट्रेडवेलच्या बोलण्यात येणारे मृत्यूचे संदर्भ, ट्रेडवेलच्या वाढलेल्या पाहुणचारादरम्यान त्याच्या नेहमीच्या अस्वलांचं हायबर्नेशनला जाणं आणि नव्या अनोळखी अस्वलांनी ती जागा घेणं, ऑटोप्सी करणाऱ्या डॉक्टर्सची जबानी या गोष्टींवरही हरझॉंग रेंगाळतो. या घटनेचा अस्वस्थ करणारा भाग म्हणजे तिचं ध्वनिमुद्रण. अस्वलानं हे बळी घेतेवेळी ट्रेडवेलचा कॅमेरा चालू होता; मात्र लेन्स झाकलेली होती. त्यामुळे काही चित्रित झालं नाही, तरी आवाज मात्र रेकॉर्ड झाले. हरझॉग आपल्याला हे आवाज प्रत्यक्ष ऐकवत नाही. (आणि ते आपल्याला ऐकवणारही नाहीत.) मात्र तो स्वतः ती टेप ऐकताना आणि त्याची त्यावरची प्रतिक्रिया आपल्याला दिसते. एका परीनं पाहायचं तर हे थेट ऐकायला न मिळणं ऐकायला मिळण्याहून अधिक भयंकर आहे; कारण केवळ या मुद्रणाची शक्यताच आपल्या डोक्यात एक धक्कादायक चित्रं उभं करते, जे आपल्याला पाहवणारं नाही. ट्रेडवेल आणि हरझॉग यांचे जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन परस्परविरोधी आहेत. ट्रेडवेलचा दृष्टिकोन हा पूर्णतः सकारात्मक आहे, तर हरझॉगचा नकारात्मक, अपरिहार्यतेला कवटाळणारा. त्यामुळे निवेदनात आपल्यासमोर सतत दोन बाजू येत राहतात, ज्यातली कोणतीही निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला राहतं. "ग्रिझली मॅन'ला केवळ डॉक्युमेंटरी म्हणणं पुरेसं नाही. तिचा एकूण परिणाम आणि विषयाची चौकट ही तुलनात्मकदृष्ट्या चित्रपटांहून अधिक उजवी आहे;मात्र ती सर्वांनाच पाहवेल असं मात्र नाही. ही निसर्गाची बाजू अधिक निष्ठुर आहे. एरवीच्या गोंडस चित्रणापलीकडे जाणारी, निसर्गाच्या समतोलाकडे बोट दाखवणारी, आणि शंभर टक्के खरीखुरी.

-गणेश मतकरी

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP