हायस्कूलमधला ऑथेल्लो
>> Tuesday, April 1, 2008
उत्तर प्रदेशीय राजकारणातली गुन्हेगारी आणि अमेरिकेतल्या उच्चभ्रू हायस्कूलमधले बास्केटबॉल सामने या दोन विरुद्ध टोकाच्या पार्श्वभूमीचा वापर एकच कथानक सांगण्यासाठी सारख्याच प्रभावी रीतीने केला जाऊ शकेल, असं मला तरी कधी वाटलं नव्हतं. त्यातून ते कथानकही आजचं नाही तर शेकडो वर्षांपूर्वीचं शेक्सपिअरनं लिहिलेलं. "ऑथेल्लो'वर आधारित "ओंकारा' पाहिल्यानंतर आठवण होते, काही वर्षांपूर्वी याच नाटकाचा आधुनिक अमेरिकन शालेय वातावरणात आणण्याचा प्रयत्न टीम ब्लॅक नेल्सन या दिग्दर्शकाने केला होता "ओ' या नावाने, त्याची. मी तो बघितला नव्हता. पण त्याबद्दल ऐकलं जरूर होतं. मुळात तो 2001 मध्ये प्रेक्षकांसमोर आला असला तरी त्याआधी दोनेक वर्षं तो संपूर्णपणे तयार होता. मात्र, कोलम्बाईन शाळेत दोन विद्यार्थ्यांनी शिरून गोळीबार केल्यानंतर "ओ'चं कथानक हे आपसूकच वादग्रस्त बनलं आणि मिरामॅक्स ही वितरणसंस्था घाबरून गेली. साहजिकच चित्रपट डबाबंद झाला. अखेर लायन्स गेट फिल्म् सला सुबुद्धी आठवली. त्यांनी वितरणाचे हक्क आपल्याकडे घेतले आणि "ओ' पडद्यावर पोचला. त्याही वेळी वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त झाले. मात्र, त्यामुळे या चांगल्या चित्रपटाकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं, हादेखील फायदाच. खरं तर मिरामॅक्सचं घाबरणं हे समजण्यासारखं असलं तरी अनाठायी होतं. "ओ'मध्ये (मूळ कथानकाप्रमाणेच) हिंसाचार जरूर आहे, पण तो कोलम्बाईन शाळेप्रमाणे रॅण्डम घडणारा नाही. शिवाय चित्रपट या हिंसाचाराची बाजूही घेत नाही. मात्र, काही प्रमाणात त्यामागची कारणं शोधतो आणि असंही सुचवतो, की महाविद्यालयीन हिंसाचाराची कारणं ही वरवरची नसून समाजाच्या जडणघडणीत आणि मानसिकतेतच दडलेली आहेत. चित्रपट, म्युझिक व्हिडीओ यांसारख्या ढोबळ गोष्टींवर त्याचं खापर फोडण्यापेक्षा अधिक गरजेचं आहे ते प्रत्येकानं आत्मपरीक्षण करणं, पालकांनी मुलांशी संवाद साधणं, त्यांच्या गरजा, जाणिवा समजून घेणं आणि मुलांचं विश्व हे आपल्या जगापासून भरकटत पार हरवून जाणार नाही, हे पाहणं. "ओ' मधला ऑथेल्लो आहे ओदीन जेम्स (मेखी फायफर) हा पाल्मेटो ग्रोव्ह प्रेप स्कूलमधला एकमेव कृष्णवर्णीय विद्यार्थी. शाळेने खास भरती करून घेतलेला, त्याच्या बास्केटबॉल खेळातल्या कौशल्यासाठी. ओचं डीनच्या डेसी (ज्युलिया स्टाईल्स/डेस्डेमो) या मुलीवर प्रेम आहे. ह्यूगो (जॉश हार्टनेट/इयागो) ला ओची भरभराट सहन होत नाही. मात्र, त्याच्याकडे आपला मत्सर जोपासण्यासाठी मूळ नाटकातल्या इयागोहून सबळ कारण जरूर आहे. ह्यूगो हा बास्केटबॉल कोचचा (मार्टिन शीन) मुलगा आहे. मात्र, त्याच्या वडिलांना ओ अधिक मुलासारखा वाटतो. त्याचं ह्युगोकडे लक्ष नाही हा त्याला अपमान वाटतो आणि इतके दिवस दाबून ठेवलेला राग हा अखेर बाहेर पडतो. ह्युगो ठरवतो, की ओ आणि डेसीची ताटातूट करायची. त्यासाठी तो डेसीचे मायकेल या दुसऱ्या खेळाडूबरोबर प्रेमसंबंध असल्याचं चित्र ओ समोर उभं करायचं ठरवतो आणि कथानकाचा प्रवास शोकांताकडे जायला लागतो. शेक्सपिअरची सध्या होणारी आधुनिक काळातली रूपांतरं ही साधारणतः दोन प्रकारे होतात. एक तर संवादासकट शेक्सपिअरला उचलून आधुनिक काळात ठेवण्यात येतं. उदाहरणार्थ बाज लुहरमनचा रोमिओ ऍण्ड ज्युलिएट (अर्थात ही शक्यता केवळ इंग्रजी चित्रपटांना चालू शकते) किंवा मग पटकथेचा आकार आणि व्यक्तिरेखांचे तपशील शक्य तितके तसेच ठेवून त्याची पुनर्रचना केली जाते. आपला "मकबूल' किंवा "ओंकारा' या दुसऱ्या प्रकारात मोडणारे होते आणि अर्थातच ओदेखील त्याच प्रकारात मोडणारा आहे. सामान्यतः असं दिसून येतं, की दुसऱ्या प्रकाराला जरी शेक्सपिअरची खासीयत मानली जाणारी त्याची भाषा गमवावी लागली असली, तरी हे चित्रपट म्हणून अधिक प्रभावी वाटतात. याचं प्रमुख कारण म्हणजे या नाटकांची कथानकं ही मुख्यतः अमुक काळाची नसून त्यांचा संबंध हा माणसाच्या मूलभूत भावनांशी असल्याने ती कालबाह्य होत नाहीत. काळानुसार ती सहज बदलू शकतात आणि त्यांचा परिणाम हा त्या त्या काळातली गोष्ट म्हणून नित्य नवा राहू शकतो. मग हे चित्रपट पाहणाऱ्याला मूळ नाटक माहीत असण्याची आवश्यकता उरत नाही. तो इतर कोणतीही कलाकृती पाहिल्याप्रमाणेच त्याकडे पाहू शकतो. शेक्सपिअरच्या अभ्यासकांनाही हे नवं रुपडं कितपत जमलंय, हे पाहण्याचा नवा खेळ मिळतो. याउलट पहिल्या प्रकारात जरी शेक्सपिअर लांबीनुसार संकलित होऊन, पण संवादासकट आला, तरी हे चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोचू शकत नाहीत. भाषेमुळे ते अवघड तर जातातच, वर आधुनिक दृश्य आणि जुनी भाषा यांचा विशेष मेळही बसत नाही. त्यामुळे एक प्रयोग एवढंच महत्त्व यांच्याकडे बहुतेकदा आलेलं दिसतं. ओ सारखे चित्रपट जे आजच्या प्रेक्षकांना देऊ शकतात, ते हे चित्रपट करताना दिसत नाहीत. ओ पाहताना आपल्याला ओंकाराहून अधिक अस्वस्थ व्हायला होतं. अर्थात, याचं कारण दिग्दर्शकाच्या कामगिरीशी संबंधित नसून निवडलेल्या पार्श्वभूमीशी आहे. मूळचा सरंजामी गोष्टीतला भावनांचा खेळ आणि त्याचा रक्तरंजित उद्रेक आपण ओंकाराच्या पार्श्वभूमीवर पाहताना हबकून जात नाही. कारण ते वातावरणही काहीसं सरंजामी वळणाचंच आहे. शेक्सपिअरच्या व्यक्तिरेखा तिथे चपखल बसतील अशी आपल्या मनाची आपसूकच तयारी झालेली असते. मात्र, ओमध्ये हे सगळं घडवणारे विद्यार्थी आहेत. त्यांचं वागणंही स्वाभाविकपणे मुलं वागतील तसंच आहे. जगभरातल्या कोणत्याही शाळांसारखीच हीदेखील एक. या मुलांना चांगलं शिक्षण मिळालेलं आहे. त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. मग त्यांच्या मनात आणि कृतीत हे विष येतं कोठून? की माणसातला पशू हा केवळ संस्काराच्या जोरावर कधीच दबत नाही? संधी मिळताच तो आपलं डोकं वर काढतो आणि संहाराला तयार होतो? हा प्रश्न "ओ'च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याला दिसणारी विकृती ही केवळ एक दोन व्यक्तींमध्ये असणारी नाही, तर प्रत्येकातली आहे. होणाऱ्या घटनांना जबाबदार केवळ ओ आणि ह्यूगोच नाहीत, तर प्रत्येकाची मानसिकता आहे. "मला फसवणारी मुलगी तुझ्याशी प्रामाणिक कशावरून राहील?' हे विचारणारा डेसीचा बाप, आपल्या शरीरसंबंधाविषयी तिखटमीठ लावून ह्यूगोकडे बोलणारा मायकेल, ह्यूगोच्या जवळ येण्यासाठी चोरी करणारी एमिली, मुलाकडे दुर्लक्ष करणारा कोच, डेसीला मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारा रॉजर हीदेखील या शोकांतिकेला तितकीच जबाबदार आहेत आणि एका तऱ्हेने ही पात्रं कोणी वेगळी नव्हेत, ती जशी शेक्सपिअरच्या काळात होती तशीच समाजात आजही आहेत. ती सरदारी कपड्यात वावरत नसली आणि अलंकारिक भाषा बोलत नसली तरी त्यांची प्रकृती आजही बदललेली नाही. समाजाच्या या अंगाकडे ओ लक्ष वेधत असल्याने तो ह्यूगोच्या व्यक्तिरेखेला किंचीत अधिक न्याय करायला बिचकत नाही. ह्यूगोचं वागणं तो बरोबर आहे असं म्हणत नसला, तरी त्याच्या भोवतालच्या समाजाचे संदर्भ तो लक्षात घेतो. सुरवात आणि शेवट ह्यूगोच्या वाक्यांवर करून तो त्याचा दृष्टिकोन एका परीने मान्य करतो. ज्यांना ओंकारा आवडला असेल त्यांनी "ओ' शक्य झाल्यास जरूर पाहावा. एका प्रभावी नाटककाराच्या कथावस्तूला सशक्त दिग्दर्शक किती वेगवेगळ्या पद्धतींनी साकारू शकतात, याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि एका परीने हा धोक्याचा इशाराही आहे. एरवी आपण गृहीत धरत असलेल्या आपल्या मूलभूत भावनांना काबूत ठेवण्याचा; ओ ज्या वर्तमानात घडतो त्याचेच आपण घटक आहोत हे न विसरण्याचा.
गणेश मतकरी (साप्ताहिक सकाळ)
1 comments:
परवा ओ पहिला. अचानक चॅनल बदलत असताना ओचं टायटल पाहिलं... तुमच्या ब्लॉगवर वाचलेलं हे परीक्षण आठवलं आणि लगेच पाहिला..!
खुप छान फिल्म आहे. धन्यवाद!!
All my life I always wanted to fly. I always wanted to live like a hawk. I know you're not supposed to be jealous of anything, but... to take flight, to soar above everything and everyone, now that's living..... One of these days, everyone's gonna pay attention to me. Because I'm gonna fly too
हुगोची ही शेवटची वाक्यं ऐकुन खुप disturb व्हायला झालं... फिल्म संपल्यानंतरही कित्तीतरी वेळ खुप निराश, खुप disturb वाटत राहिलं होतं!
Post a Comment