कोरियन सूड

>> Monday, September 1, 2008


सूड हा विषय एक कथासूत्र म्हणून आपल्याला नवीन नाही. काही इंग्रजी आणि अक्षरशः शेकडो हिंदी चित्रपटांतून हा आपण पाहत आलो आहोत. सध्या आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे चित्रपट जरूर येताहेत; पण केवळ सूड आणि ताटातूट, या दोनच कथासूत्रांवर चित्रपटांमागून चित्रपट येण्याचा काळ फार जुना नाही. अमिताभ बच्चनची नायक म्हणून असलेली संपूर्ण कारकीर्दच, या प्रकारच्या चित्रपटांनी भरली होती, असं म्हणणं अतिशयोक्त ठरणार नाही. यामध्ये सूड हे प्रामुख्याने बाळबोध स्वरूपाचे असत. म्हणजे एका विशिष्ट प्रकारे चित्रित केलेला खलनायक, हा नायकाच्या जवळच्या व्यक्तीला मारणार आणि तेव्हा लहान असलेला नायक मोठा झाल्यावर हिरोगिरी आणि प्रेमप्रकरणं यांमधून वेळात वेळ काढून खलनायकाचा बदला घेणार, हे ठराविक कथानक यात पाहायला मिळे; पण या प्रकारची कथा रचताना सूड या अतिशय आदिम संकल्पनेचा खोलात जाऊन कोणी विचार केला असल्याचं जाणवत नाही किंवा संभवतही नाही. ना लेखकाने, ना दिग्दर्शकाने. त्यामुळेच जेव्हा एखादा दिग्दर्शक सूडपटाला अतिशय गंभीरपणे घेतो आणि त्यातल्या पात्रांच्या प्रेरणेपासून, त्यांच्या वागण्यातल्या तपशिलापर्यंत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतो, तेव्हा ते उल्लेखनीय ठरतं.
हा दिग्दर्शक आहे चॅन-वूक पार्क नावाचा कोरियन, ज्याचे व्हेन्जन्स ट्रायलॉजी नावाने ओळखले जाणारे चित्रपट कोरियाबरोबरच जगभरच्या समीक्षकांच्या कौतुकाला प्राप्त ठरले आहेत. या मालिकेतले पहिले दोन, म्हणजे "सिम्पथी फॉर व्हेन्जन्स' (2002) आणि "ओल्डबॉय' मात्र चांगल्या लायब्रऱ्यांमध्ये उपलब्ध आहेत. ओल्डबॉय तर संजय दत्तच्या जिंदाद्वारे हिंदीतदेखील लागून झाला आहे.
ओल्डबॉयला "कान्स'मध्ये ग्रान प्री पारितोषिक मिळालं. त्यामुळे अधिक प्रमाणात रसिकांच्या लक्षात आला आणि त्याचा आशयही अधिक धक्कादायक होता हेही खरं; पण कथेच्या एकूण परिणामाच्या दृष्टीने मला तरी "सिम्पथी फॉर मि. व्हेन्जन्स' अधिक मुद्देसूद आणि प्रभावी वाटला.
रक्तरंजित हिंसाचार
एक गोष्ट स्पष्ट आहे, की हे चित्रपट सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना पाहवतील असे नाहीत. भारतात तर ते सेन्सॉरच होऊ शकणार नाहीत. याचं कारण म्हणजे त्यातला रक्तरंजित हिंसाचार आणि त्याच तुलनेने वास्तववादी असलेलं चित्रीकरण. तुलना टेरेन्टीनोशी, कारण त्याचेही चित्रपट असेच रक्तबंबाळ असतात; पण टेरेन्टीनोची दृश्यभाषा ही अधिक फॅशनेबल असते किंवा हिंसाचार हा त्याच्या अतिरेकाने कार्टून व्हायलन्स झालेला असतो. इथे तसं होत नाही. चॅन-वूक पार्कच्या चित्रपटांतली दृश्यं आपल्याला अस्वस्थ करतात. क्वचित प्रसंगी नजर पडद्यावरून बाजूला फिरवायलाही उद्युक्त करतात.
सिम्पथीचा आशय धक्कादायक नसला, तरी विचार करायला लावणारा आहे. ही एक शोकांतिका आहे यातल्या एकूण एका पात्राची- मग ते कितीही लहान-मोठं, श्रीमंत-गरीब असो. कोरिया गेली काही वर्षं मोठ्या आर्थिक संकटाच्या काठावर आहे आणि या मंदीचीच पार्श्žवभूमी या चित्रपटाला आहे.
मुक्žया, बहिऱ्या रयु (हा-क्यु शीन)ची बहीण खूप आजारी आहे. तिला ताबडतोब किडनी मिळण्याची गरज आहे; पण पैशांचा बंदोबस्त करूनही तिला चालणारी किडनी मिळू शकत नाही. त्यावर उपाय म्हणून तो काळ्या बाजाराचा आश्रय घेतो; पण तिथले चोर त्याचे पैसे तर घेतातच, वर त्याची किडनीही घेऊन पळ काढतात. लवकरच इस्पितळातर्फे किडनीची व्यवस्था होते; पण आता ती विकत घ्यायला रयुकडे पैसे नसतात. कारण एव्हाना त्याची नोकरीही गेलेली असते. निराश झालेल्या रयुला त्याची बिनधास्त मैत्रीण चा (बु - ना बे) सल्ला देते, की उद्योगपती पार्क (कांग - हो सॉंग)च्या छोट्या मुलीचं अपहरण कर आणि पैसे घे. आता हा एकच मार्ग उरल्याने रयुला तो स्वीकारावा लागतो. पार्कचं आपल्या मुलीवर अतिशय प्रेम असतं. तो ताबडतोब पैसे द्यायला तयार होतो; पण पैसे दिल्यावर सर्वांचंच दुर्दैव आड येतं. पार्कची मुलगी बुडून मरते. इकडे रयुच्या बहिणीचा मृत्यू ओढवतो आणि सूडनाट्याला सुरवात होते. पार्क आपल्या मुलीच्या अपहरणकर्त्यांना सोडणार नसतो, तर रयुच्या दृष्टीने खरे गुन्हेगार असतात काळ्या बाजारातले अवयवविक्रेते, ज्यांचा नायनाट करण्याची तो शपथ घेतो.
अभिजात शोकांतिकांमध्ये दिसणारं एक वैशिष्ट्य सिम्पथीमध्ये आहे आणि ते म्हणजे सर्व पात्रं ही मुळात सज्जन आहेत. जे घडतं त्याला त्यांचा इलाज नसतो. बहुतेक घटनांना लागणाऱ्या गडद वळणाला जबाबदार नशीबच असतं.
दिग्दर्शकाची विसंगतीची आवड, हेही आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. चित्रपटाच्या तणावपूर्ण शेवटाला सुरवात होण्याआधी अनेक जागी दिग्दर्शक आयुष्यातल्या विसंगती, विरोधाभास शोधताना दिसतो, ज्याने सहज विनोदनिर्मिती होते. चाने रयुला अपहरणासंबंधी दिलेली शिकवणी किंवा तिचं काळ्या बाजारातल्या चोरांना पत्रकं वाटणं, इथे हा विनोद तसा निरागस आहे; पण कामावरून काढलेल्या बेरोजगार इंजिनिअरने पार्कसमोर पेननाईफने हाराकिरी करण्याचा प्रयत्न करण्यासारख्या प्रसंगात हाच विनोद गडद छटा धारण करताना दिसतो.
चित्रपटाला एक सामाजिक बाजूही मांडायचीय, जी मांडण्याकरताच आपल्याला दिग्दर्शकाने घटनांमागली मंदीची पार्श्žवभूमी सांगितली आहे. चित्रपटातल्या नावात अभिप्रेत असणारा मि. व्हेन्जन्स म्हणजे कोण? तो रयु असू शकतो किंवा पार्कदेखील असू शकतो. रयु हा वाढत चाललेल्या बेरोजगारीने संकटात आलेल्यांपैकी आहे. त्याच्याकडे पुरेसा पैसा नाही आणि तो ज्यांच्याकडे आहे, त्यांची त्याला चीड आहे. रयु हा समाजवादी संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. पार्क श्रीमंत आहे. त्याच्याकडे पैसा आहे, घर आहे, गाडी आहे. हाताखालच्या लोकांना क्षणात काढण्याची ताकद त्याच्याकडे आहे. तो भांडवलशाहीचा प्रतिनिधी आहे. यातल्या कोणत्या मि. व्हेन्जन्सला आपली सिम्पथी जाते, असं दिग्दर्शक विचारतो. याचं उत्तर ज्याचं त्याला द्यायचंय आणि त्यामागचं कारणही ज्याचं त्यालाच शोधायचंय. मात्र या प्रश्नाला दिग्दर्शकाने थोडं अधिक अवघड केलंय ते पार्कबद्दल थोडी अधिक माहिती देऊन. पार्ककडला पैसा हा त्याला बापजाद्यांकडून मिळालेला नाही. तोदेखील मुळात इतरांसारखाच इंजिनिअर आहे आणि त्यानं आपल्या मेहनतीनं कंपनी उभी केलीय. मंदीची झळ त्यालाही लागलीय, कारण आर्थिक संकटं येताच त्याची बायको त्याला सोडून गेली आहे. त्यामुळे यातल्या दोन्ही प्रमुख पात्रांच्या अडचणी या खऱ्या आहेत. यातल्या कोणाही एकाला आपलं म्हणताना आपण दुसऱ्यावर अन्याय करू, हे नक्की.
ही पात्रं जेव्हा इतकी जिवंत होतात तेव्हा त्यांचा बदलाही तितकाच खरा होतो. मग हा केवळ व्यक्तिगत प्रश्žन उरत नाही, तर त्याचे सामाजिक पडसादही जाणवायला लागतात. चॅन-वुक पार्कला एका मुलाखतीत विचारलं होतं, की तुमच्या चित्रपटात सूडाची संकल्पना वारंवार येण्यामागचं कारण काय? यावर त्यानं दिलेलं उत्तर पुरेसं बोलकं आहे.
तो म्हणाला, ""संस्कृतीच्या विकासामुळे आणि शैक्षणिक पातळी उंचावल्यामुळे आपल्या मनात खोलवर लपलेला संताप, द्वेष, आकस इत्यादींना दडवून ठेवणं लोकांना भाग पडलं; पण याचा अर्थ त्या भावना नाहीशा झाल्या, असा नाही. मानवी नाती जसजशी गुंतागुंतीची होत गेली तसतसा हा क्रोधही अधिकाधिक वाढत गेला. एकीकडं आधुनिक समाज हा या वाढत्या क्रोधाचं ओझं व्यक्तीवर लादत असताना या क्रोधाला मोकळं करण्याच्या वाटा मात्र आकुंचन पावताहेत. ही परिस्थिती मोठीशी हिताची नाही म्हणूनच बहुधा कला अस्तित्वात आली. प्रत्यक्षात माझ्या चित्रपटात दाखवले गेलेले सूड हे सूड नसतात; ते नुसतं एकानं आपली अपराधी भावना दुसऱ्याच्या हवाली करणं असतं. माझे चित्रपट स्वतःच्या दोषांची जबाबदारी नाकारून ती दुसऱ्याच्या गळ्यात घालणाऱ्या लोकांचे असतात. म्हणूनच त्यांना सूडपट म्हणण्यापेक्षा नैतिकतेवर भर देणारे आणि अपराधभावना हाच मुख्य विषय असणारे चित्रपट म्हणणं अधिक योग्य ठरेल. माझ्या व्यक्तिरेखा ही मूलतः चांगली माणसं असतात. कारण त्यांना आपण आयुष्यात केलेल्या चुकांची सतत जाणीव किंबहुना टोचणीच असते. आपल्या मनातली मूळची अपराधभावना दडपण्यासाठी या माणसांना आणखी एका वेगळ्या प्रकारच्या हिंसेचा आधार घ्यायला लागतो, हाच माझ्या आजवरच्या चित्रपटांतल्या शोकांतिकेचा मूलभूत आशय आहे.''
जेव्हा एखादा दिग्दर्शक आपल्या चित्रपटांच्या केंद्रस्थानी असलेल्या कल्पनांबाबत एवढा जागरूक असतो, तेव्हा त्याची ही जागरुकता आपोआप कलाकृतींमध्ये उतरते. त्यामुळेच या दिग्दर्शकाचे चित्रपट त्यातल्या पात्रांच्या दुर्वर्तनाला प्रेक्षकांसमोर आणूनही ना त्यांची बाजू घेत, ना त्यांना एखादा उदात्त हेतू देऊन सावरण्याचा प्रयत्न करत. ते फक्त त्यांना सहानुभूती देताना दिसतात.
निव्वळ बाजारू सूडपटांपेक्षा ते वेगळे होण्याचंही तेच कारण असावं.
-गणेश मतकरी

3 comments:

Abhijit Bathe September 1, 2008 at 5:48 PM  

गणेश -
पिक्चर पाहिला नाहिए, पण गोष्ट लई भारी वाटतिए. जसा व्हायलंस म्हटला कि (निदान इंग्रजीबाबत तरी) टॅरॅन्टिनोचा उल्लेख अपरिहार्य होतो, माझ्या बाबतीत तसं (हिन्दीमध्ये) राम गोपाल वर्मा बद्दल होतं. मला तुझी त्याच्याबद्दलची मतं माहितिएत, पण शिवा, सत्या आणि कंपनी - यातुनतरी त्याला फिल्म नॉयर चा गंध आहे हे व्यवस्थित कळतं. उगीच मुद्दा प्रुव्ह करायचा प्रयत्न करुन हा माणुस अधिकाधिक शत्रु निर्माण करत जातो हा मुद्दा वेगळा.
शिवा मध्ये तरी चल भवानी वगैरे लोक व्हिलन कॅटॅगरीत मोडणारे होते. सत्या आणि कंपनी मध्ये तर तसंही नव्हतं. तसंच काहीसं परिंदा मध्येही. पिक्चर नानाच्या हातात गेला कि भडक होतो नाहीतर प्रहारही त्या तोडीचा झाला असता.
सांगायचा मुद्दा असा कि व्हायलन्स म्हटला कि आपल्या डोक्यात जसा टॅरॅन्टिनो आपसुक येतो तसे माझ्या डोक्यात हिंदीतले हे दर्जेदार पिक्चर.

बाकी लेख आवडला - होपफ़ुली लवकरच पहाता येईल हा पिक्चर.

Ashish Khurange September 1, 2008 at 10:23 PM  

Ganesh ji,
Aapala parikshan farach sundar asat :)

ganesh September 4, 2008 at 1:17 AM  

thanx ashish,
ani abhijeet, try to see all in vengence triology. all are easily available. not recommended for general viewing though.comparison to tarantino is apt. i will also recommend his JSA , Joint Security Area.its a nonlinear telling of an incident on the border of north and south korea, but it could easily be india and pakistan.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP