भडक, सुमार आणि बाळबोध गॉड तुस्सी ग्रेट हो

>> Thursday, September 11, 2008


आपल्याकडे रुमी जाफ्री या लेखक दिग्दर्शकाने "गॉड तुस्सी ग्रेट हो' या नावाने "ब्रूस ऑलमायटी'ची भेसळ करून केलेली रूपांतरित नक्कल सध्या चित्रपटगृहात सुरू आहे. रूपांतर करताना काय गोष्टी करू नयेत, याचे अनेक धडे या चित्रपटातून घेण्यासारखे आहेत. .......
मध्यंतरीचा काळ हा आपल्याकडल्या हिंदी चित्रपटासाठी चांगला काळ होता. "रंग दे बसंती'सारखे स्वतंत्र म्हणण्याजोगे चित्रपट येत होते, त्याचबरोबर आपल्या अतिशय आवडत्या "इन्स्पायर्ड बाय' या वर्गात बसणाऱ्या चित्रपटांमध्ये (उदाहरणार्थ- मुन्नाभाई मालिका) किंवा रिमेक प्रांतातही (उदाहरणार्थ- डॉन) बऱ्यापैकी प्रायोगिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनांचा मेळ दिसून आला. डेव्हिड धवन/ प्रियदर्शन वगैरे मंडळींची विनोदाची लाट या सर्वांना समांतर असल्यासारखी सुरूच होती; पण या लाटेचं पाणी नाकातोंडात जाऊन बुडण्याची पाळी तरी प्रेक्षकांवर आली नव्हती. मात्र या वर्षाच्या सुरवातीपासूनच परिस्थिती पुन्हा पूर्वीसारखी होण्याची चिन्हं आहेत. भडक आणि सुमार विनोद, इन्स्पिरेशनच्या नावाखाली काढलेल्या वाईट कॉप्या आणि बाळबोध पटकथांचे तितकेच बाळबोध आविष्कार पडद्यावर येण्यासाठी रांगा लावून आहेत. चोप्रा किंवा वर्मांसारख्या एके काळच्या यशस्वी कॅम्पांनीही नकारात्मक सूर लावला आहे आणि आमिर खानसारखे काही निर्माते-दिग्दर्शक दर्जेदार निर्मितीमागं असले तरी त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे.

आता खरं सांगायचं तर २००३ च्या "ब्रूस ऑलमायटी' चित्रपटाचं रूपांतर वाईट होण्याची काहीच गरज नाही. आता हा चित्रपट मुळातच फार लोकप्रिय अन्‌ आपल्याकडेही मोठ्या प्रमाणात पाहिला गेला असल्यानं, एकूणच ते करावं का नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण करायचं झाल्यास ते चांगलं का होऊ शकत नाही, याला पटण्यासारखं स्पष्टीकरण नाही. "जिम कॅरी'चे चित्रपट हे खासकरून त्याच्या प्रतिमेला न्याय देत लिहिले जातात आणि "ब्रूस' त्याला अपवाद नाही. अर्थातच पटकथा त्याच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते, हेदेखील आलंच. मात्र असं असूनही ही पटकथा छोटेखानी आणि बंदिस्त आहे. जिम कॅरीला वेडाचार करण्यासाठी ती वाव देते; मात्र त्यासाठी महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांना बगल देत नाही. तिची रचनाही स्पष्ट आहे. ब्रूसला सतत असणारी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना अन्‌ त्यासाठी त्यानं देवाला जबाबदार धरणं, देवानं ब्रूसला आपल्या शक्ती बहाल करणं, ब्रूसला आधी वाटणारी गंमत, मग त्यानं निष्काळजीपणे स्वतःच्या फायद्यासाठी या शक्तींचा वापर करणं, पुढे इतरांच्या भल्यासाठी केलेल्या गोष्टींचाही उलटा परिणाम होणं, आणि अखेर आपली चूक ब्रूसला उमगणं, या पटकथेचं लक्षात येण्यासारखे टप्पे होते, आणि प्रत्येक टप्पा हा आधीच्याहून चढत जाईल, अशी मांडणी होती.

आपल्याकडे रुमी जाफ्री या लेखक-दिग्दर्शकानं "गॉड तुस्सी ग्रेट हो' या नावानं "ब्रूस ऑलमायटी'चं केलेलं भजं, सध्या चित्रपटगृहात लागलेलं आहे. रूपांतर करताना काय गोष्टी करू नयेत याचे अनेक धडे या चित्रपटातून घेण्यासारखे आहेत. त्यातले काही पुढीलप्रमाणे-

धडा १ -
"एखादी गोष्ट बिघडली नसल्यास ती दुरुस्त करण्याच्या फंदात पडू नये' या अर्थाचा एक वाक्‍प्रचार इंग्रजीत आहे आणि आपल्याकडल्या सर्व रूपांतरकारांना तो घोकून पाठ करण्याची गरज आहे. मूळ पटकथेची प्रमाणबद्धता आणि आकार हा विषयाचा अवाका किती वाढवावा याचा अंदाज घेऊन बांधण्यात आला आहे. कारण नसताना त्याच्या आकाराला धक्का देण्याची मुळातच गरज नाही. "ब्रूस'मध्ये आपण कथा सुरवातीला त्रयस्थपणे पाहतो अन्‌ हळूहळू नायकाच्या दृष्टिकोनाशी एकरूप होत जातो. त्यातल्या विनोदाचा प्रकारही आपल्या लक्षात यायला लागतो. "गॉड'मध्ये कथेला प्रास्ताविक देतो तो देव स्वतः- तेही ग्रहताऱ्यांच्या पार्श्‍वभूमीवर. देव आपल्याला नायक अरुण प्रजापतीच्या (सलमान) नाराज असण्याची कल्पना देतो. म्हणजे प्रजापतीची भावना ही त्याच्यावर ओढवणाऱ्या प्रसंगातून स्पष्ट न होता निवेदनातून होते, अन्‌ पुढे मध्यंतरापर्यंत हॅमर केली जाते. प्रजापतीला शक्ती मिळण्यात अर्धा चित्रपट खर्ची पडतो, तर उरलेल्याचा पाऊण भाग त्याच्या स्वार्थीपणावर. मग शेवटाकडे चटकन उरलेले टप्पे उरकले जातात, अन्‌ देव पुन्हा प्रेक्षकांना मार्गदर्शन करायला अवतरतो.

ज्याप्रमाणे मला कथानकांच्या टप्प्यांच्या विभागणीमधला कमी जास्तपणा खटकतो, तसाच ज्या त्या गोष्टींना शब्दांतून मांडण्यातला ढिसाळपणाही. इथली सर्व पात्रं आपण काय करणार आहोत याविषयी बोलतात; नंतर प्रत्यक्ष प्रसंग घडतो. आपल्या चुकाही ती बोलून दाखवतात. देव प्रत्यक्ष संदेश देतो. ही सर्व अनावश्‍यक बडबड कशाला? प्रत्यक्ष प्रसंगातून जर एखादी गोष्ट कळत नसेल, तर तो पटकथेचा दोष आहे. ती संवादातून मांडण्यानं तो लपणार नाही.

धडा २ -
प्रत्येक पटकथेचा स्वतःचा सूर असतो, शैली असते. जेव्हा चित्रकर्त्यांना एखादा चित्रपट आवडतो, अन्‌ तो आपल्याकडे आणावासा वाटतो, तेव्हा त्यांना हा सूर आवडलेला असतो. मग तो जसाच्या तसा ठेवण्यातच रूपांतरित चित्रपटाचं यश आहे, हे उघड आहे. जिम कॅरीच्या चित्रपटाला संयत म्हणणं, हे तसं धाडसी विधान आहे; पण दोन चित्रपटांची तुलना करता हेच सत्य आहे. "ब्रूस'चा विनोद हा पटकथेला अनुरूप आहे, अन्‌ तिथं उपस्थित होणाऱ्या मुद्‌द्‌यांना अधोरेखित करणारा आहे. "गॉड'चा विनोद हा स्वतंत्र ट्रॅकवर जाणारा अन्‌ चित्रकर्त्यांच्या दृष्टीनं प्रेक्षकांना काय आवडेल याचे रॅंडम अंदाज बांधणारा आहे. उदाहरणार्थ शक्ती मिळाल्यावर टीव्ही अँकरचं काम करणारा ब्रूस आपल्या अँकरपणाला वाव मिळेल अशाच रीतीनं एका बातमीचं रिपोर्टिंग करून आपली नोकरी परत मिळवतो अन्‌ भरपूर प्रसिद्धीही. प्रसंगातला विनोद येतो, तो पोलिस कुत्र्यांनी "जिमी हॉफा'च्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासारख्या ऍब्सर्डिटीमधून, जी मुळात ब्रूसच्या व्यवसायाशी अन्‌ या व्यावसायिकांच्या "सनसनीखेज' बातम्यांच्या सतत शोधात असण्याशी संबंधित आहे. "गॉड तुस्सी'मधला प्रजापती जेव्हा शक्ती मिळवतो, तेव्हा मुलांना दहशतवाद्यांकडून सोडवण्यासारखी सांकेतिक धाडसी कामगिरी तो करतो, जी प्रत्यक्षात प्रजापतीच्या व्यक्तिरेखेबरोबर जात नाही. शिवाय इथला विनोद येतो तो मुलांनी आकाशात उडून गुंडांना मारण्यासारख्या जुन्यापुराण्या स्पेशल इफेक्‍ट्‌समधून. "मिस्टर इंडिया'च्या काळातला विनोद आजही प्रेक्षकाला हवा आहे का? चित्रकर्त्यांना काही नवीन सुचत नाही का?

धडा ३ -
व्यक्तिरेखांना मिळणाऱ्या महत्त्वाचा अन्‌ त्यांच्या भूमिकांच्या लांबीचा काही एक विचार यशस्वी पटकथांमध्ये केलेला असतो. "ब्रूस ऑलमायटी'मध्येही तो आहे. रूपांतरांमध्ये तो बदलणं शक्‍य असतं; पण त्याला तितकंच महत्त्वाचं कारण असण्याची गरज असते. केवळ नायिकेला अमुक गाणी हवीत किंवा दुय्यम भूमिकेतला सोहेल खान, सलमानचा भाऊ असल्यानं त्याची भूमिका वाढवायला हवी, हे पटकथेच्या दृष्टीनं मूर्खपणाचं आहे. "ब्रूस'मधला देव मॉर्गन फ्रीमननं अत्यंत साधेपणानं उभा केला आहे, अन्‌ दृश्‍य भागांमध्ये पटकथा त्यातल्या साधेपणालाच अधिक ठसवण्याचा प्रयत्न करते. रिकाम्या इमारतीतला जेनीटर (जेनीटरला मराठीत योग्य प्रतिशब्द असलाच तर मला माहीत नाही) म्हणून जमीन पुसताना देव तेथे पहिल्यांदा दिसतो. जेनीटरच्याच गणवेषात पुढे सूट घालूनही त्याचा नम्रपणा कमी होत नाही. त्याचे चमत्कार हे फायलिंग कॅबिनेटच्या ड्रॉवरची लांबी वाढवण्याइतके अन्‌ ब्रूसने मागे धरलेली बोटं किती आहेत, हे ओळखण्याइतके सोपे असतात. "गॉड तुस्सी..' मधला देव प्रजापतीला हॉटेलमध्ये बोलवण्याइतपत कल्पना "ब्रूस'मधून (किंवा त्याहून पूर्वीच्या "ओह गॉड'मधून) उचलतो; पण देवाला समोर आणण्यासाठी या हॉटेल रूमचं रूपांतर एका संगणकीय लो बजेट इफेक्‍ट असलेल्या स्वर्गात केलं जातं. जर स्वर्ग आणायचा तर मुळातच हॉटेलमध्ये बोलावण्याची गरज काय? या योजनेत मूळ पटकथाकारांचा काही विचार असेल, हे "गॉड तुस्सी..'च्या चित्रकर्त्यांना माहीत नसावं.

जी गोष्ट व्यक्तिचित्रणाची, तीच आलेखाची. ब्रूसची व्यक्तिरेखा ही प्रसंगागणिक अधिक आत्मकेंद्री होत जाते अन्‌ इतरांच्या तथाकथित भल्याचे त्याचे निर्णयही अखेर स्वतःभोवती फिरणारे असतात. ब्रूसमध्ये होणारा हा बदल चित्रपटातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे, जे रूपांतरात गायब आहे.

धडा ४ -
प्रत्येक चित्रपटाला दोन प्रकारची तर्कशास्त्रं लागू होतात. प्रसंग खरे वाटण्यासाठी प्रेक्षकांना पटणारं लॉजिक आणि कथेचं स्वतःचं लॉजिक, जे अगदी वास्तव नसलं, तरी चित्रपटाच्या प्रवृत्तीशी सुसंगत आहे. फॅन्टसी चित्रपटांना या दोन्ही प्रकारच्या लॉजिकची गरज असते, जी "गॉड तुस्सी...'मध्ये अदृश्‍य आहे. इथं प्रजापती ऍन्कर आहे. तो कोणत्याशा चॅनेलवर (का स्वतंत्र निर्मिती संस्थेत?) अँकर आहे. पण तो अँकरबरोबर प्रोड्यूसरही आहे. त्याचबरोबर तो संशोधकही असावा; कारण तो लाय डिटेक्‍टर असणारी खुर्चीही डिझाईन करतो, जी संगणकावर डिझाईन होते, त्याच दिवशी ऑफिसमध्ये बनलेली असते. मात्र ही लाय डिटेक्‍टर खुर्ची चालण्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर असलेली डीव्हीडी तो कोणीही चोरेल अशा जागी, कॉपीही न बनवता ठेवतो. या चॅनलचे वा निर्मितिसंस्थेचे कार्यक्रम मुद्रित केलेच जात नाहीत, थेट टेलिकास्ट होतात. कारण डीव्हीडी न मिळण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीनं चॅनेलची जाहीर नाचक्की होते. उघडच कार्यक्रम लोकांना लाईव्ह दिसत असल्यानं कथानकातल्या या सर्व घटकांना वास्तवाचा कोणताही आधार नाही. असं होणं शक्‍य नाही, अन्‌ ते होणार नाही हे चित्रकर्त्यांनाच नव्हे, तर नव्वद टक्के प्रेक्षकांनाही माहीत आहे.

फक्त भेसळ
कथेचं तर्कशास्त्र हे देवाला अन्‌ चमत्कारांना मान्यता देत असलं तरी या चमत्कारांनाही काही नियम आहेत, जे पाळले जायला हवेत. उदाहरणार्थ जेव्हा प्रजापती देव म्हणून सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद देतो, तेव्हा काहीच जणांच्या इच्छा पूर्ण होताना दिसतात. सर्व कैद्यांना मुक्ती मिळते अन्‌ ते रस्त्यावर उतरतात. म्हणजे कैदी जेलमध्ये राहावेत अशी इच्छा कोणीच प्रकट करत नाही का? प्रजापतीच्या मोलकरणीला लॉटरी लागते, म्हणजे ही लॉटरी लागावी अशी इच्छा तिनं एकटीनंच व्यक्त केलेली असते का? ("ब्रूस ऑलमायटी'मध्ये ही लॉटरी सर्वांना लागते अन्‌ बक्षिसाची रक्कम विभागली जाऊन अत्यल्प रक्कम प्रत्येकाच्या पदरी पडते) एका भिकाऱ्यानं कुत्रा होण्याची इच्छा पूर्ण होताना, तो माणूसच राहतो अन्‌ केवळ भुंकायला लागतो. देव त्याला पूर्ण कुत्रा करू शकणार नाही का? असो.

"गॉड तुस्सी ग्रेट हो'चा गोंधळ हाच आहे, की तो एकाच वेळी शब्दशः आणि पुनर्रचित रूपांतर करायला जातो. शब्दशः रूपांतर आंग्लाळलेलं वाटलं तरीही अमुक एका प्रमाणात यशस्वी होऊ शकतं. केवळ कल्पनेचा आधार घेऊन, तिला आपल्या वास्तवाशी अनुरूप बनवणं हे बऱ्याचदा अधिक प्रमाणात योग्य ठरतं. दुर्दैवानं बहुतेकदा आपल्याकडे यातला कोणताही एक मार्ग न स्वीकारता भेसळ केली जाते. "गॉड तुस्सी' या भेसळीचं ताजं उदाहरण आहे.

- गणेश मतकरी

4 comments:

ganesh September 15, 2008 at 3:36 AM  

ijazat? thats a while ago!
of course i liked the film then.
lets see. if i manage to get the dvd.....

Unknown September 15, 2008 at 8:28 PM  

oh god.. dhada 4 bhannat aahe.. asa ghadlay tya movie madhe? danger!!!

ganesh September 16, 2008 at 4:25 AM  

see it to believe it.
or actually dont bother. its not worth it really.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP