भीती,विनोद आणि समाजचित्रण

>> Friday, September 26, 2008


समाजात वाढत चाललेली कृत्रिमता,सर्वांनी आपली स्वतंत्र ओळख विसरून चाकोरीत फिरत राहणं आणि आणि आयुष्याला यंत्रवत सामोरं जाणं याचा धिक्कार फाइट क्लब या चित्रपटाने रहस्यमिश्रित थ्रिलरच्या आवरणाखाली केला, तर एडगर राइट या ब्रिटिश दिग्दर्शकाच्या शॉन ऑफ द डेड (२००४) चित्रपटाने तो, भयपट आणि विनोद यांचं बेमालूम मिश्रण बनवून केला. भीती आणि विनोद यांचं क्वचित जमलेलं दिसतं आणि स्केअरी मूव्ही मालिकेसारख्या गल्लाभरू चित्रपटात जेव्हा हे यशस्वी झाल्याचं दिसतं तेव्हा ते चुटके आणि चावट विनोद यांच्या प्रमुख आधाराभवर उभं असतं. शॉन..मध्ये असला थिल्लरपणा नाही. झोम्बीपट या भयपटांच्या उपप्रकाराचं विडंबन आणि भयपट म्हणून टिकवलेलं वेगळं अस्तित्त्व, असा त्याचा प्रकार आहे. अमेरिकन भयपटांनी लोकप्रिय केलेला भुतांचा मठ्ठात मठ्ठ प्रकार म्हणजे झोम्बी. शून्यात पाहणारे डोळे,त्राण हरवलेली चाल आणि आत्माहीन शरीर वागवणा-या या अमानवी आविष्काराला जॉर्ज रोमरोने आपल्या चित्रपटांतून मोठीच प्रसिद्धी दिली. (शॉन ऑफ द डेड) हे नावही रोमरोच्या डॉन ऑफ द डेडवरून सुचलेलं) प्रत्यक्षात झोम्बीच्या दिसण्यात भीती वाटण्यासारखं काहीच नाही. पण त्याची लागण एखाद्या रोगाप्रमाणे पसरत असल्याने प्रचंड प्रमाणात वाढणारी संख्या,जराही न थकता आपल्या बळींचा पाठपुरावा करण्याची शक्ती आणि माणसं मारून त्यांची चव पाहण्याची आवड, हे या मंडळींचे विशेष गुणधर्म. शॉन आजच्या विक्रेता आणि गि-हाइक या दोनच संस्थांनी झपाटलेल्या समाजातल्या घटकांची तुलना या झोम्बींशी करतो आणि एक अतिशय चलाख चित्रपट आकाराला येतो.
शॉन (सायमन पेग) हा कसलीच महत्त्वाकांक्षा नसलेला एक सेल्समन. लिझ (केट अँशफिल्ड) त्यांची मैत्रिण, एड (निक फ्रॉस्ट) त्यांचा मित्र. रोज संध्याकाळी विन्चेस्टर पबमध्ये जाऊन बसण्याचा उद्योग सहन न झाल्याने शॉनशी संबंध तोडायला निघालेली लिझची समजूत कशी काढावी, हा शॉनपुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न.पण त्यांचं उत्तर मिळण्याआधीच झोम्बींची साथ सुरू होते. मेलेले उठून बसतात. जिवंत माणसांवर हल्ले करतात. एकदा का झोम्बी चावला की मग तुमचं खरं नाही. तुम्ही लवकरच त्यांच्यातले होणार. स्वतः ए़ड,लिझ आणि आपली आई (सावत्र बाप मरायला शॉनची हरकत नसते.) यांना सुरक्षित ठिकाणी न्यायचं, अशी महत्त्वाकांक्षी योजना शॉन बनवतो. आता शहरभर पसरलेल्या या झोम्बींपासून सुरक्षित जागा कोणती? अर्थात विन्चेस्टर पब.
शॉन विनोदी असला, तरी विनोद काही एका विचारांमधून पुढे येतो आणि केवळ सतत हसवत ठेवण्याचा त्याचा हेतू नाही. सामाजिक टीकाटिप्पणी हा त्याचा महत्त्वाचा भाग आहे. एव्हर फेल्ट लाइक यू आर सराऊन्डेड बाय झोम्बीज? ही त्याची टँगलाइनसुद्धा बुद्धीभ्रष्टपणे ज्या त्या गोष्टीचं अंधानुकरण करणा-या समाजाला दिलेला टोला आहे. चित्रपट सुरू होतानाच आपल्या रोजच्या पाहण्याऐवजी समूहाला महत्त्व देणा-या आणि जाणिवेपेक्षा सवयीने गोष्ट करणा-या आजच्या जीवनपद्धतीचं उदाहरण म्हणून दाखवली जातात. नायकही यातलाच एक असल्याचंही दाखवून दिलं जातं. साहजिकच प्रत्यक्षात जेव्हा अघटिताला सुरुवात होते. तेव्हा बराच काळ शॉनच्या ते लक्षातच येत नाही. भिका-याला सुटे नाही सांगणं किंवा कोक विकत घेण्यासारख्या गोष्टी करताना आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्याच्याकडे तो स्पष्टपणे पाहतच नाहीच, वर टीव्हीदेखील सवयीने चॅनेल बदलत राहताना त्याला खरी बातमी लक्षातच येत नाही.
सामान्य माणसाला ओळखीचे मार्ग सोडून पलीकडे पाहायचं नसतं आणि छोट्या सरावाच्या गोष्टींपायी तो अधिक महत्त्वाच्या गोष्टीही सहजपणे टाळतो, हे इथे फार गमतीदार पद्धतीने मांडलं जातं. आपल्यावर काय संकट येऊन पडलं आहे आणि त्यातून काय मार्ग काढावा, यावर विचार करतानाही शॉनचा पहिला विचार आपण आहोत तिथे बरे आहोत, हाच असतो. पुढे घरात शिरलेल्या झोम्बींना मारताना कोणती रेकॉर्ड फुटली तरी चालेल आणि कोणती आपण नेहमी ऐकतो? घराबाहेर पडताना कोणती गाडी कोणी चालवावी ? लपायला जागा शोधताना आपला नेहमीचाच पब हीच जागा कशी सर्वात योग्य आहे? असेच प्रश्न त्याला पडतात. एरवीच्या चित्रपटातल्या नायकाप्रमाणे तो जग वाचविण्याची चिंता करत नाही. आपल्या शर्टाला पडलेला डाग त्याला अधिक अस्वस्थ करतो आणि पबमध्ये अंधारात शेंगदाणे खात राहण्यापलीकडे आपल्या योजनेची मजल जात नाही, याचं त्याला दुःख वाटत नाही.
रोमरोच्या चित्रपटाचं विडंबन हा शॉनमधला महत्त्वाचा भाग असला, तरी दिग्दर्शकाला हे चित्रपट आवडत असावेत. आधी सखोल अभ्यास आणि मूळ कलाकृतीबद्दल जिव्हाळा असल्याशिवाय उत्तम विडंबन होत नाही. पण शॉन पाहण्यासाठी मात्र झोम्बीपट पाहिले पाहिजेत असं नाही. त्यातली गंमत आणि त्यामागची सबटेक्स्ट तशीही सहजपणे कळू शकेल.
-गणेश मतकरी

3 comments:

HAREKRISHNAJI September 27, 2008 at 4:08 AM  

आपला ब्लॉग वाचणे हे फार मोठे खर्चीक काम असते. वाचल्या्वर चित्रपटाला जावेस वाटते व अफाट खर्च होतो अशी माझी गोड तक्रार आहे.

असेच लिहीत चला

rakesh ms September 27, 2008 at 8:24 AM  

xceelent....
m new on blogwani! read ur blog as 1st!!

ganesh September 29, 2008 at 3:30 AM  

thank you both.
actually piracy is a great boon, which is instumental in making lot of films accessible, and also affordable...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP