शहरी समाज आणि दहशत

>> Sunday, September 21, 2008


"मुंबई मेरी जान' हा ११ जुलैला मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणारा चित्रपट. शहरी समाज आणि दहशतवाद, एकूणच आजूबाजूचं स्फोटक, असुरक्षित वातावरण याची मांडणी या चित्रपटात आढळते. अर्थात असं असलं तरी हा चित्रपट नकारात्मक नाही. मुंबईनं या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी उचललेलं पाऊल याकडे लक्ष वेधणारा सकारात्मक सूर इथं आहे. एक स्तुत्य प्रयत्न असंच या चित्रपटाचं वर्णन करावं लागेल. .......

बऱ्याचदा असं होतं, की एखादी हिंसक घटना ही ज्याप्रमाणे सामान्य माणसांना हादरवून सोडते, तशी फिल्ममेकर्सनादेखील. मग ही घटना घडल्यावर नजीकच्या काळात तिच्याकडे एक विषय म्हणून पाहण्यापेक्षा ते ती विसरून जाण्याच्या मागे लागतात. याला प्रामुख्यानं दोन कारणं संभवतात. पहिलं म्हणजे त्या घटनेची प्रॉक्‍झिमिटी. या घटनेच्या, त्या स्थलकालाच्या, संबंधित व्यक्तींच्या ते इतके जवळ असतात, की चित्रपट बांधण्यासाठी जो त्रयस्थपणा लागतो, तो त्यांना मिळू शकत नाही. दुसरं कारण असतं ते या माध्यमांचं व्यावसायिक स्वरूप. चित्रपट चालायचा, तर प्रेक्षकांचा प्रतिसाद आवश्‍यक आहे आणि बहुधा अशा घटनेनंतर प्रेक्षकाचं घटनेशी भावनिकदृष्ट्या जोडलेलं असणं त्यांना त्या विषयावरच्या चित्रपटाकडे आणणार नाही, तर बरोबर विरुद्ध दिशेला म्हणजे अधिक पलायनवादी करमणुकीकडे घेऊन जाईल, अशी शक्‍यता असते. या दोन्ही कारणांमुळे घटनांना प्रामाणिक स्वरूपात मोठ्या पडद्यावर येण्यासाठी काही एक काळ जावा लागतो. आश्‍चर्य म्हणजे युद्धासारख्या घटना या अधिक मोठ्या प्रमाणात हिंसेशी संबंधित असूनही त्या सामान्य प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर घडत नसल्यानं पडद्यावर लवकर स्वीकारल्या जाऊ शकतात; मात्र रोजच्या आयुष्यात असं काही घडलं तर मात्र ते पडद्यावर पाहणं सोपं ठरत नाही.
याचं सर्वांत मोठं उदाहरण आपल्याला अमेरिकन चित्रपटात मिळू शकतं. २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर हॉलिवूड झपाट्यानं आपल्या चित्रपटातून "वर्ल्ड ट्रेड सेंटर', "विमानतळ' आणि "दहशतवाद' पुसून टाकायला लागलं. "कोलॅटस्प डॅमेज'सारखे दहशतवादी कारवाया असणारे चित्रपट प्रदर्शित न करता पुढे ढकलण्यात आले, नव्या चित्रपटांच्या पटकथा बदलण्यात आल्या. "स्पायडरमॅन'सारख्या चित्रपटाची पूर्ण पब्लिसिटी कॅम्पेन बदलण्यात आली, कारण त्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरचा वापर होता. कालांतरानं मात्र चित्रकर्ते अधिक धीट झाले, प्रेक्षकही आपल्या जखमा विसरून वर्तमानाला सामोरं जाण्याच्या तयारीला लागले. २००६ मध्ये ९/११ च्या घटनांना सरळपणे पडद्यावर आणणारे दोन चित्रपट आले आणि त्यांनी उत्तम प्रतिसाद मिळवला. पॉल ग्रीनग्रासचा "युनायटेड ९३' हा हल्ल्यासाठी पळवण्यात आलेल्या; पण प्रवाशांनी दाखवलेल्या अभूतपूर्व धैर्यानं हत्यार म्हणून वापरण्यात न येऊ शकलेल्या विमानाच्या अखेरच्या प्रवासाला चित्रित करणारा होता, तर ऑलिव्हर स्टोनचा "वर्ल्ड ट्रेंड सेंटर' प्रत्यक्ष घटनेविषयीच होता. या चित्रपटांचं स्वीकारलं जाणं हे काळानं जखमांवर फुंकर घातल्याचं लक्षण आहे.
हॉलिवूड आणि बॉलिवूड यांच्या नावात जरी बेतीव साम्य असलं तरी फॉर्म्युला चित्रपटांचं प्रमाण हे आपल्याकडे अधिक आहे, हे आपण जाणतोच. हॉलिवूडमध्येही फॉर्म्युला चित्रपट असले तरी त्यामध्ये असणारी विविधता, फॉर्म्युला मोडणारे अन्‌ अधिक गंभीर आशय मांडणारे चित्रपट अन्‌ जवळच असलेलं इंडिपेंडंट सिनेमाचं वास्तव्य, यामुळे अमेरिकन सिनेमा हा आपल्यापेक्षा अधिक धाडसानं निर्मिती करतो. आपला धंदा हा जवळजवळ पूर्णपणे पलायनवादी असल्यानं त्यात अधूनमधून डोकावणारे प्रामाणिक प्रयोग अधिक ठळकपणे लक्षात येतात. दोन वर्षांपूर्वी मुंबईत झालेल्या बॉंबस्फोटांच्या मालिकेवर आधारित निशिकांत कामतचा "मुंबई मेरी जान'देखील असाच उठून वेगळा दिसतो.
२००४ मध्ये जेव्हा अनुराग कश्‍यपचा "ब्लॅक फ्रायडे' आला होता, तेव्हा मला एक गोष्ट खटकली होती. १९९३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोट मालिकेवर त्याचं आधारित असणं आणि नावातल्या "ब्लॅक'वरून माझी कल्पना झाली होती की तो मुंबईच्या भावनिक धक्‍क्‍यालाही प्रेक्षकांपुढे आणण्याचा प्रयत्न करेल; प्रत्यक्षात मात्र तो होता केवळ "पोलिस प्रोसिजरल' प्रकारचा चित्रपट, म्हणजे गुन्हेगार आणि मागावरचे पोलिस यांनाच प्राधान्य देणारा. अर्थात हादेखील एक रास्त चित्रप्रकार आहे. मात्र त्यामुळे घटनेच्या एका अंगाकडे चित्रपटाचं पूर्ण दुर्लक्ष झालं, हेदेखील तितकंच खरं. या दुर्लक्षित बाजूला "मुंबई मेरी जान'पुढे आणतो. त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखांपैकी दोन पोलिसांतल्या असूनही चित्रपट प्रत्यक्ष तपासाला गाळून टाकतो अन्‌ मुंबईला बसलेला धक्का अन्‌ त्यातून सावरण्यासाठी तिनं उचललेलं पहिलं पाऊल यावरच आपलं लक्ष केंद्रित करतो.
निशिकांतच्या "डोंबिवली फास्ट'मध्ये "मुंबई मेरी जान'मध्ये असणारे काही घटक जरूर पाहायला मिळाले होते. ट्रेनचं मुंबईशी असणारं घट्ट नातं, शहरी समाजाचे विविध पैलू आणि हिंसा ही तिन्ही सूत्रं तिथं कमी-अधिक प्रमाणात होती. मात्र त्या पलीकडे जाऊन या दोन्ही चित्रपटांत काही साम्य नाही, निदान आशयाच्या दृष्टीनं. उलट तिथला काहीसा बोचरा नकारात्मक सूर इथं अधिक सकारात्मक झाल्याचं दिसून येतं.
म्हणून आपल्याकडे ७/११ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या लोकल्समध्ये घडवण्यात आलेल्या बॉंबस्फोट मालिकेकडे "मुंबई मेरी जान' पाच वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहतो. या प्रकारच्या घटनेचा उगम असणारं हिंदू-मुस्लिम वैर, घटनेनं स्कॅनरखाली येणारे पोलिस, घटनेचा कधी योग्य, तर कधी गैरवापर करणारी मीडिया, अन्‌ समाजाची दोन टोकं, म्हणजे झोपड्यांत राहणारा मुंबईकर आणि परदेशी जाण्याला केवळ तात्त्विक विरोध असणारा श्रीमंती इन्टेलिजन्शीआ ही इथली पाच प्रातिनिधिक कथासूत्रं.
चित्रपट नमनाला घडाभर तेल घालत नाही आणि थोडक्‍या प्रस्तावनेनंतर लगेचच स्फोट घडवून आणून मूळ विषयाकडे वळतो. स्फोटानंतर आपल्याला आधी भेटलेल्या व्यक्तिरेखा अधिक स्पष्ट व्हायला लागतात आणि चित्रपटाची दिशादेखील. आठवड्याभरात निवृत्त होणारा एएसआय तुकाराम पाटील (परेश रावल) आणि त्याचा तरुण चेला (विजय मौर्य) यांची गोष्ट, हे इथलं सर्वांत महत्त्वाचं कथानक. पाटील हा जवळजवळ सूत्रधार आणि चित्रपटाचं कथानकही त्याच्या निवृत्तीबरोबर संपणारं. (ही जोडी बहुधा फिन्चरच्या "सेव्हन'मधल्या मॉर्गन फ्रीमन/ ब्रॅड पिट जोडीची दूरची नातलग असावी. तिथल्या फ्रीमनच्या निवृत्तीच्या अखेरच्या सात दिवसांतच कथानक घडणं, हा योगायोग नसावा) पाटील हा भ्रष्ट आहे; मात्र स्वतःच्या भ्रष्ट असण्याची त्याला खंत आहे. त्याला आशा आहे ती त्याच्या चेल्यासारख्या तरुणांकडून, ज्यांच्यात उसळणारा राग हा कदाचित सिस्टिममध्ये काही बदल घडवून आणू शकेल. मीडियाची प्रतिनिधी आहे रूपाली (सोहा अली खान, सुधारित आवृत्ती) जिच्या प्रियकराचा मृत्यू तिला आपल्या भूमिकेबद्दलच साशंक करून सोडतो. मुस्लिमद्वेष्टा सुरेश (के.के.) आणि त्याचं मित्रमंडळ एका संशयिताच्या मागावर आहे. सुरेशची या संशयिताच्या आईशी झालेली भेट हा इथला एक लक्षात राहण्याजोगा प्रसंग. थॉमस (इरफान) चहावाला आणि निखिल (माधवन) हा मुंबईतल्या असुरक्षिततेला कंटाळून परदेशी जाण्याचा विचार करणारा बुद्धिजीवी, ही दोन्ही कथानकं त्यातल्या त्यात कमी डेव्हलप होणारी. थॉमसचं कथानक तर मला चित्रपटाच्या इतर बाजूंशी फटक्‌न वागणारं वाटलं, तर निखिलचं योग्य मार्गावरलं, पण इतरांच्या तुलनेत मागे पडणारं.
"मुंबई मेरी जान'मधली चांगली गोष्ट ही, की तो कथानकांना पूर्णपणे वेगळं ठेवूनही केवळ थीमॅटिक पातळीवर त्यांची सांगड घालू शकतो. सर्व पात्रांच्या आयुष्याकडे पाहत त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या तपशिलांना जिवंत करू शकतो. तो सोपी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत नाही. अर्थात, जेव्हा तो सोपी उत्तरं शोधत नाही, असं आपण म्हणतो, तेव्हा तो खूप स्वतंत्र विचार करतो, असं मात्र नाही. कारण यातल्या प्रत्येक एपिसोडचा शेवट हा त्या मानानं ओळखीचा आणि अंदाज बांधण्याजोगा आहे. चित्रपट हा मध्यंतरापर्यंत चढता आणि विशिष्ट आलेख असणारा आहे. पुढे मात्र त्याचं काय करायचं हे ठरत नाही, आणि पुनरावृत्ती वाढत जाते. अपवाद पाटील आणि सुरेशच्या गोष्टीचा. त्यांना पुरेसा आकार आहे.

चित्रपटाचा शेवट सकारात्मक करण्यानं ज्याला त्यातली एक गोष्ट गमवावी किंवा अंडरप्ले करावी लागते, ती म्हणजे त्यात येऊ पाहणारं (खास करून निखिलच्या कथानकात) खरोखरच्या असुरक्षिततेचं, दहशतीचं वातावरण. ही असुरक्षितता केवळ निखिल या व्यक्तिरेखेच्या डोक्‍यातली नाही, ती प्रत्यक्ष आहे. आजही मुंबईतले अनेक जण प्रत्येक गोष्टीकडे संशयानं पाहतात. वातावरणातला बदल खराच नाही, तर गरजेचाही आहे. अनेकांचं आयुष्य हे या सावधपणावर अवलंबून आहे. शेवटामुळे हे वातावरण काहीसं विसरलं जातं, मागे पडतं. मुंबईकरांचं कौतुक करणं हे योग्यच आहे; पण त्यासाठी या चित्रणातला तीव्रपणा बोथट करण्याची गरज नाही.
निशिकांत कामतच्या दिग्दर्शनातली सफाई "ंडोंबिवली फास्ट'च्या वेळीच लक्षात आली होती. इथंही ती तितक्‍याच प्रकर्षानं जाणवते. मात्र आता ती मराठी चित्रपटाकडे वळणं कठीण, ही एक दुर्दैवाची बाब.
यू.टीव्ही ही आजच्या सर्वांत महत्त्वाच्या चित्रनिर्मिती संस्थांमधली एक आहे. दर्जामध्ये तडजोड न करता ती प्रथितयश तसंच नवशिक्‍या, बिग बजेट तसंच लो बजेट चित्रपटांमध्ये सारख्याच प्रकारे गुंतलेली दिसते. मुंबई बॉंबस्फोटांवर आधारलेले त्यांचे दोन चित्रपट "आमीर' आणि "मुंबई मेरी जान' नुकतेच आले आहेत, तर "वेनस्डे' प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. एका निर्मिती संस्थेच्या डोक्‍यातून आलेली ही चित्रत्रयी म्हणावी का? असल्यास हा एक स्तुत्य प्रयत्न म्हणावा लागेल- व्यावसायिक गणितात न सापडता, डोळे उघडे ठेवून वर्तमानाकडे पाहण्याचा.

- गणेश मतकरी

2 comments:

Abhijit Bathe September 21, 2008 at 4:08 PM  

गणेश - लेख लई भारी आहे यात वादच नाही. मला ऍनॅलिसिस फारसा जमत नाही, पण तरी - कुठल्याही ऍंगलने हे परिक्षण नक्कीच वाटलं नाही. एनीवे - लेख आवडला, पण काही गोष्टी खटकल्या - त्यावर विस्ताराने लिहिणं आवश्यक. ते लिहुन मगच कमेंट टाकावी असा विचार केला होता, पण तसं काही होत नाही. आता या कमेंटने मी सविस्तर लिहायला बांधील झालोय, तर २-३ दिवसात लिहितो.
पण तरिही - तुझ्या लेखांमधला one of the best लेख झालाय हा.

ganesh September 22, 2008 at 2:21 AM  

dhanyawad.to lekhach ahe.will wait for comments

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP