गावाकडची गोष्ट

>> Wednesday, September 24, 2008


रोमँटिक कॉमेडीमध्ये नित्य पाहायला मिळणारी सिच्युएशन. तरुण-तरुणीची पहिली भेट. ती दुकानातील सेल्सगर्ल,तो बहुदा काहीतरी विकत घ्यायला आलेला. बोलण्यातून बोलणं निघतं. दोघांचे क्लोज अप्स, वाढती जवळीक दाखविणारे.अशा प्रेमळ संवादातले सगळे ओळखीचे टप्पे घेत तो तिला आपण कदाचित तिच्या जन्मांतरीचा साथी असल्याची ओळख करून देतो. तिचाही आता त्याच्यावर पूर्ण विश्वास बसलेला. या प्रेमसंवादानंतर मात्र तो थांबतो.म्हणतो किंवा कदाचित असंही असेल, की मी नुसता भुरटा चोर असेन. दुकान रिकामं होण्याची वाट पाहत थांबलेला. त्याच्या बोलण्याचा अर्थ तिच्या ध्यानात यायच्या आधीच तो फाडकन तिच्या थोबाडीत मारतो,ती कोप-यात जाऊन पडते. तोंड रक्ताळलेलं.आता लेहीफ (कॉलीन फारेल) शांतपणे कॅश रजिस्टर उघडून पैसे काढतो. आणि दुकानातून काढता पाय घेतो. रोमँटिक प्रसंगाचा आभास देत दिग्दर्शक जॉन क्रॉलीने प्रेक्षकांना गुगली टाकलेली असते.तीही चित्रपटाच्या पहिल्याच प्रसंगात.या अनपेक्षित धक्क्याने आपण गार होतो, पण चित्रपटात आणि दिग्दर्शकातही दम असल्याचं आपल्या लक्षात येतं.
इन्टरमिशन चित्रपट असा वाकड्या वळणाने सुरू होतो आणि अशी अनेक वळणे घेत सुरू राहतो. एका छोटेखानी आयरिश गावातल्या अवलियांची गोष्ट सांगत, खरं तर याला गोष्ट म्हणणंही कठीण. कारण इथे खरं तर गोष्ट थांबलेली आहे. उगाच नाही चित्रपटाचं नावच मध्यांतर आहे.
तर थांबलेली ही गोष्ट आहे जॉन (सिलिअन मर्फी) आणि त्याची मैत्रिण डायेडू (केली मॅक्डोनाल्ड) यांच्या प्रेमकथेची. दोघांमध्ये अचानक विसंवाद तयार झालेला. खरं तर जॉनच याला जबाबदार. कारण सर्व सुरळीत चालू असताना मैत्रिणीच्या प्रेमाची परीक्षा घेण्याकरता त्यानेच मध्ये ब्रेक घेण्याची कल्पना काढली. हेतू हा की तिने नको म्हणावं. झालं मात्र उलटच. ती एका विवाहित बँकरबरोबर संबंध ठेवती झाली आणि जॉन बसला आपल्या नशिबाला दोष देत. इन्टरमिशनचा कालावधी हा साधारण या लव्ह स्टोरीच्या इन्टरमिशन एवढा आहे.मात्र ही कल्पना केवळ दोन व्यक्तीरेखांपुरती मर्यादित नाही. चित्रपटात किमान दहा बारा प्रमुख पात्रं आहेत.आणि त्या सर्वांची स्थिती कमी अधिक प्रमाणात या दोघांसारखीच आहे. त्यांचा जीवन प्रवाह थंड पडलेला आहे, आणि तो पुढे सरकण्याची ते वाट पाहताहेत.
यात सेक्स लाईफ बिकट परिस्थितीत असलेला जॉनचा मित्र आँस्कर (डेव्हिड विल्मॉट) आहे, प्रेमभंगानंतर कोषात गेलेली डायडूची मिशीवाली बहीण सॅली (शर्ली हॅन्डरसन) आहे. रिऍलिटी शोसाठी विषय शोधून थकलेला टीव्ही निर्माता आहे, आणि स्वतःला स्टार मटेरियल समजणारा पोलीस जेरी (कोम मीनी) आहे. पहिल्याच प्रसंगात आपला हिसका दाखविणारा लेहीफ तर आहेच आहे. छोट्याशा गावात जसे सगळे एकमेकांना ओळखतात, तसा यातला प्रत्येक जण दुस-याला ओळखतो. गोष्टी सुट्या रहातच नाहीत. सर्वांची मिळून एक गोष्ट होते.
इन्टरमिशन हे रसायन नक्की कशामुळे यशस्वी होतं हे सांगणं कठीण आहे. कारण दर्जाहीन चित्रपटांमध्ये शोभण्यासारख्या अनेक प्रसंगांना यातली पात्र सामोरी जातात. अश्लील आणि हिंसक प्रसंगांची इथे कमी नाही. मात्र या सगळ्यात गल्लाभरूपणा कुठेच दिसत नाही. पहिली काही मिनिटं बिचकण्यात गेली की हळूहळू आपली या मंडळींशी ओळख व्हायला लागते. अन् शेवटापर्यंत तर बहुतेकांशी चांगली मैत्री होते. पल्प फिक्शन किंवा ट्रेनस्पॉटिंग या दोन्ही चित्रपटांशी इन्टरमिशनची तुलना होणं स्वाभाविक आहे. अनेक पात्रांच्या आयुष्याचा कोलाज असल्यासारखं कथानक,ब्लॅक ह्यूमर,पात्रांमधल्या नकारात्मक छटा, गुन्हेगारीचं खुलं चित्रण या सर्व विशेषांना इथे स्थान आहे. तरीही ते दोघे आणि हा, यांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे त्या दोन चित्रपटांकडे आपण स्मार्ट/स्टायलिश म्हणून पाहतो. मात्र त्यातल्या कोणत्याही पात्राबरोबर समरस होत नाही, ती खोटी आहेत हे आपल्याला जाणवत राहतं. इन्टरमिशन मध्ये अशी सांगून सवरून केलेली हुशारी नाही. पटकथेवर आणि दिग्दर्शनात केलेलं काम अदृश्य आहे. आपल्या हुशारीकडे ते लक्ष वेधताना दिसत नाही.
ओघवत्या कथेत घटना सुचत जाणं स्वाभाविक असतं. मात्र इथल्या घटना या ओघाचा अभाव दाखविण्यासाठी रचलेल्या आहेत, आणि तरीही त्यात पुनरावृत्ती येत नाही. किंवा कंटाळाही. दिग्दर्शकाचा तर हा प्रथम प्रयत्न असल्याचं सांगूनही खरं वाटू नये. अर्थात हा दिग्दर्शक पूर्ण नवखा नाही. रंगभूमीचा चिकार आणि टीव्हीचा थोडा अनुभव त्याच्या गाठीला तेव्हाही होता. तरीही या प्रकारची गुंतागुत आणि त्यातून साधणारा एकसंघ परिणाम हे सराईत दिग्दर्शकालाही कठीणच. अर्थात काहीवेळा सराईत नसणं हेच कामगिरी अधिक उत्स्फुर्त, अधिक लोकांपर्यंत पोचणारी व्हायला कारणीभूत होऊ शकतं. इथे तसंच झालं असणं सहज शक्य आहे.
-गणेश मतकरी

3 comments:

suchi September 25, 2008 at 11:23 AM  

chhan lihilay. avadala.
Suchi

Ashish Khurange September 25, 2008 at 11:10 PM  

Ganesh Sir,
Parikshan nehami sarakhach damdaar :-)

He videshi bhashatale chitrapat Punyaat kuthe pahayala / vikata ghyayala milatil?

ganesh September 26, 2008 at 12:18 AM  

thanks suchi ani ashish.
punyat dvd libraries madhech pahava lagel. mumbait on ani off record chikar sources ahet.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP