बॅन्क्सी, टेरी आणि कलेची झापडं
>> Sunday, January 16, 2011
‘इट्स क्लेव्हर, बट इज इट आर्ट?’
- रुडयार्ड किप्लिंग (द कॉननड्रम ऑफ द वर्कशॉप्स )
`देअर रिअली इज नो सच थिंग अॅज आर्ट. देअर आर ओन्ली आर्टिस्ट्स`.
- इ. एच. गोम्ब्रिक (द स्टोरी ऑफ आर्ट)
---------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------
कलेची व्याख्या काय आणि ती करणं आवश्यक आहे का?, असा एक प्रश्न गेल्या शतकाच्या मध्यावर डोकं वर काढायला लागलेला दिसून येतो. आणि या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आजही मिळालेलं नाही.गेल्या काही शतकांमध्ये चित्रकलेत झालेले बदल पाहता ढोबळ मानाने एक आलेख आपल्या डोळ्यांसमोर दिसायला लागतो, जो एक प्रकारे एक्पोनेन्शिअल आहे. या आलेखात सुरुवातीला येणारे बदल फार हळूहळू होणारे आहेत तर जास्तीत जास्त बदल हे गेल्या शतकातले आहेत. हे बदल आधी वास्तववादाकडे जाणारे अन मग त्यापासून जाणुनबुजून फारकत घेऊन दूर निघालेले दिसतात. गुंफा चित्रांपासून सुरू झालेल्या चित्रकलेच्या प्राचीन इतिहासाने वास्तववादाकडे पोचायला खूप काळ घेतला, पण हळूहळू परस्पेक्टीव, छायाप्रकाश, अॅनॉटॉमी या गोष्टी पक्क्या करत चित्रकला रिअॅलिझमपर्यंत पोचली. पुढे झालेला फोटोग्राफीचा उदय हा वास्तववादाची किंमत कमी करणारा ठरला, अन् चित्रकला बदलायला लागली. वस्तूपेक्षा छायाप्रकाशाच्या खेळावर भर देणारा इम्प्रेशनिझम किंवा फ्रॉईडच्या मनोविश्लेषणात्मक संशोधनापासून स्फूर्ती घेणारा एक्प्रेशनिझम यांनी कलावंतांना अधिकाधिक स्वातंत्र्य द्यायला सुरुवात केली आणि मॉडर्न आर्टने हे स्वातंत्र्य टिपेला पोचवलं. यामुळे कला ही वरवर पाहता सोपी होत गेली, कारण त्यात चित्रकाराकडून मुळात अपेक्षित असणारं कौशल्य दिसण्याची गरज नव्हती. आता या कलेत चित्रकारांचा विचार कसा व्यक्त होतो हे अधिक महत्त्वाचं होतं. जॅक्सन पोलॉक, मॉन्ड्रीअन किंवा फ्रान्झ क्लाईनसारख्यांची चित्रं ही एका विचारधारेतून गेलेली आहेत, जरी त्यांचं अंतिम रूप हे सोपं अन् सहज नक्कल उतरण्याजोगं झालेलं आहे. कलेच्या व्याख्येचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो तो याच कारणाने, की खरोखरीचा जातिवंत कलावंत कोणता आणि केवळ नकलाकार कोणता, हे आज या चित्रांच्या अंतिम रूपावरून कळेनासं होतं. आणि यापुढे नवा प्रश्न उरतोच, की केवळ शैलीची केलेली नक्कल ही एखाद्या चित्रकाराला विचारात न घ्यायला पुरेशी आहे का? कशावरून त्याच्या या कृतीमागेही काही विशिष्ट कलासक्त हेतू नाही? कलावंताचं स्थान, दर्जा ठरवण्याचा कोणालाच काही अधिकार आहे का?हे सगळं डोक्यात यायचं कारण म्हणजे- नुकतीच पाहिलेली ‘एक्झिट थ्रू द गिफ्ट शॉप’ ही डॉक्युमेंटरी.
‘एक्झिट’चा दिग्दर्शक आहे बॅन्क्सी. हा लंडनस्थित रहस्यमय स्ट्रीट आर्टिस्ट. रहस्यमय अशासाठी की बॅन्क्सी ही खरी कोण व्यक्ती आहे हे कोणालाच माहीत नाही. तो अमूक-अमूक असल्याच्या वदंता जरूर आहेत, पण तसा पुरावा नाही. फुटपाथ अन् भिंतींवरच्या चित्रांपासून सुरुवात केलेल्या बॅन्क्सीचे आता गॅलरी शोज् होतात. त्याची चित्रं, शिल्प कोट्यवधी रुपयांना विकली जातात. पिकासो/वॉरहॉलसारख्या थोरामोठय़ांची चित्रं बाळगणारे संग्राहक बॅन्क्सीच्या कलाकृतींसाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार आहेत. आणि आता ‘एक्झिट थ्रू द गिफ्ट शॉप’देखील माहितीपट विभागाच्या ऑस्कर शॉर्टलिस्टमध्ये पोचलेला आहे. कदाचित यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात बॅन्क्सीचं दर्शन होईलही, पण नक्की सांगता येत नाही. ‘एक्झिट’मध्ये त्याचा सहभाग असूनही त्याने आपलं हे गुपित तसंच जपलेलं आहे. चेहरा लपवण्यापासून आवाज बदलण्यापर्यंत जमतील त्या साऱ्या युक्त्या त्याने केल्या आहेत.अनेकांच्या दृष्टीने ‘एक्झिट थ्रू द गिफ्ट शॉप’ ही मुळात डॉक्युमेन्टरी आहे का, हाच वादाचा विषय आहे. ही डॉक्युमेन्टरी एखाद्या भूलभुलैयासारखी आहे. ती मुळात एका दिशेला जाईल असं वाटत असताना इतर काही गोष्टी तिच्या अजेंडय़ावर येतात. एक मात्र खरं, की ती स्ट्रीट आर्टला कला म्हणून मान्यता मिळण्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा काळ पडद्यावर आणते. टेरी गोएटा या वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिमत्त्वाशी आपली ओळख करून देते. आणि वर्तमानातल्या कलेच्या स्थानाबद्दल विचारमंथन घडवून आणते. तिच्या केंद्रस्थानी असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे टेरी.लॉस एंजेलिसचा रहिवासी टेरी हा कपडय़ाचं दुकान चालवणारा गृहस्थ, पण त्याला सवय आहे ती व्हिडीओ चित्रणाची. टेरी जे दिसेल ते शूट करतो. कॅमेरा हा जणू त्याच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग आहे. त्याच्या आजुबाजूच्यांनीही या कॅमेराचं अस्तित्व गृहीत धरलेलं आहे. काही वर्षांपूर्वी जवळजवळ बेकायदेशीर मानल्या गेलेल्या अन् काही प्रमाणात तशाच असलेल्या स्ट्रीट आर्ट चळवळीच्या सुरुवातीच्या दिवसांत टेरी फ्रान्समध्ये दाखल झाला. तिथे त्याची गाठ स्पेस इन्व्हेडर हे टोपणनाव धारण केलेल्या स्ट्रीट आर्टिस्टशी पडली. इन्व्हेडरशी झालेल्या ओळखीतून टेरीसाठी एक नवीन दार उघडलं आणि त्याच्या व्हिडीओ कॅमेराला दिशा मिळाली. फ्रान्स आणि पुढे अमेरिकेतही टेरी स्ट्रीट आर्टिस्टच्या कारवाया चित्रित करायला लागला. पोलिसांना चकवून रस्त्यारस्त्यांवर, भिंतीभिंतींवर पसरलेली चित्रकला, इन्स्टॉलेशन्स उभारणारी ही अदृश्य जमात हा टेरीच्या छायाचित्रणाचा एकमेव विषय बनला. या चळवळीतल्या अनेक प्रमुख कलावंतांशी त्याची ओळख झाली. त्यातलाच एक होता, हल्ली बराक ओबामांच्या पोस्टरसाठी प्रसिद्ध झालेला शेपर्ड फेअरी. या कलावंतांना टेरीच्या छायाचित्रणाविषयी पडलेल्या प्रश्नाला उत्तर म्हणून टेरीने तो स्ट्रीट आर्टविषयी डॉक्युमेन्टरी बनवत असल्याचं सांगितलं खरं, पण खरं तर टेरीचा तो इरादा नव्हताच. केवळ चित्रिकरणातच त्याचं समाधान होतं.याच सुमारास या क्षेत्रातला सर्वात लोकप्रिय अन् सर्वात वादग्रस्त कलावंत बॅन्क्सी उदयाला येत होता. मात्र टेरीला बॅन्क्सीशी संपर्क करणं अशक्य होतं. मुळात बॅन्क्सी कोण आहे हे माहीत असल्याशिवाय संपर्क करणार तरी कसा? शेपर्डने टेरीची बॅन्क्सीशी ओळख करून दिली आणि लवकरच दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. बॅन्क्सीची वाढत चाललेली प्रसिद्धी आणि स्ट्रीट आर्टचे बदलते दिवस पाहून बॅन्क्सीने टेरीला त्याची डॉक्युमेन्टरी पूर्ण करायला सांगितली. टेरीने डॉक्युमेन्टरीच्या नावाखाली जे काही बनवलं ते पाहून बॅन्क्सीला टेरीच्या डोक्याची शंका यायला लागली. मात्र हजारो तासांचं मूळ छायाचित्रण बहुमोल असल्याचं बॅन्क्सी जाणून होता. आता बॅन्क्सीने स्वत:च डॉक्युमेन्टरी करायचं ठरवलं आणि टेरीला कॅमेरा बाजूला ठेवून स्वत:चा एक छोटा स्ट्रीट आर्ट शो करण्याचा सल्ला दिला.
टेरीने हा सल्ला नको इतका मनावर घेतला आणि स्ट्रीट आर्टला एक नवा स्टार मिळाला. ‘मिस्टर ब्रेन वॉश’ या टोपणनावाने नव्याने काम सुरू करणाऱ्या टेरीचं नाव या क्षेत्रात दुमदुमायला लागलं, पण बॅन्क्सी, फेअरी आणि अन्य माहितगार या अनपेक्षित यशाने संभ्रमात पडले. ते आजवर जे करत होते ती जर खरोखरची कला असेल, तर टेरीने चालवलेल्या नकला या कलेच्या नावाखाली कशा खपतात? लोकांना काही कळत नाही का की त्यांनी स्वत:च आजवर डोळ्यांवर चढवलेली कलेची झापडं बाजूला करण्याची वेळ आली आहे?टेरीभोवती फिरणारा ‘एक्झिट थ्रू द गिफ्ट शॉप’ मुळात दोन भागांत विभागला जातो. यातला पहिला भाग स्ट्रीट आर्ट डॉक्युमेन्टरीप्रमाणे आहे, तर दुसरा भाग टेरीच्या कलावंत म्हणून कामगिरीकडे पाहातो. बॅन्क्सी, फेअरी अन् टेरी यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. बॅन्क्सी किंवा फेअरीचं काम हे बरंचसं त्यांनी स्वत: श्रम घेऊन केलेलं दिसतं. मूळ कल्पनांपासून कलाकृती तयार होईपर्यंत त्यात त्यांचा पूर्ण सहभाग आहे. याउलट टेरी जवळजवळ सर्व काम संदर्भावर आधारित सेकंडहॅण्ड संकल्पनांमधून तयार करतो आणि हाताखाली असणाऱ्या कलावंत- तंत्रज्ञांच्या ताफ्याकडून इंडस्ट्रीयल प्रॉडक्टप्रमाणे बनवून घेतो. या दोन भिन्न कलासंस्कृती आहेत. आज कलाक्षेत्रात या दोन्ही प्रकारची कामं पाहायला मिळतात. वरवर पाहता ‘एक्झिट’च्या निष्कर्षांवरून दोन्हीला सारखीच मागणी आहे. मग यातला एक कलाप्रकार अधिक श्रेष्ठ असावा का? आणि तो का असावा?फेअरीच्या मते- टेरीचं काम हे कनिष्ठ दर्जाचं आहे, पण हे ठरवणारा फेअरी कोण? कला जेव्हा समाजापर्यंत पोचते; तेव्हा तिचं मूल्य ठरवण्याचा अधिकार समाजाला नाही का? अन् समाजापर्यंत टेरीसारख्यांचं काम पोचत असेल तर कदाचित हीच श्रेष्ठ कला असेलही..बॅन्क्सीने या फिल्मच्या मांडणीतच हे प्रश्न उपस्थित होतील अशी योजना केली आहे. किंबहुना एक शक्यता अशीही मानता येते, की मिस्टर ब्रेनवॉशच्या यशामागे मुळात बॅन्क्सीचाच हात असावा. आपल्या फिल्मला आकार येण्यासाठी वा आपल्या कलेत थोडा वेगळा प्रयोग करण्यासाठी एखाद्या सुडोनीमसारखा मिस्टर ब्रेन वॉश या व्यक्तिरेखेचा वापर त्याने योजला असेल. आपल्यासोबत असणाऱ्या टेरीला या व्यक्तिरेखेचा चेहरा म्हणून वापरलं असेल. ही शक्यता गृहीत धरली तर मुळात या फिल्मचं डॉक्युमेन्टरी असणंच वादात येतं. मात्र डॉक्युमेन्टरीकडून सत्यकथन हीच अपेक्षा असेल तर आपणही आपल्या जाणिवेची कक्षा थोडी रुंदावायला हरकत नाही. सत्यकथन हे ज्याप्रमाणे घटीतांचं असतं तसंच विचारांचंही असायला हवं. कोणत्याही सुसंस्कृत समाजात कलेला महत्त्व हे असतंच. मग कलेला महत्त्व हे असतंच. मग कलेसंबंधात काही मूलभूत स्वरूपाचे, खरेपणाच्या निकषावर उतरणारे विचार मांडणाऱ्या फिल्मचा डॉक्युमेन्टरीचा दर्जा नाकारता येणार नाही, असा बॅन्क्सीच्या बाजूचा कौल आपण नक्कीच देऊ शकतो. अखेर सत्य हे बऱ्याचदा कोणत्या बाजूने त्याकडे पाहिलं जातं यावर अवलंबून असतं, हे आपण कसे विसरू?
- गणेश मतकरी. (लोकसत्तामधून)

2 comments:
पाहायला हवे असे काही नेहमीच तुम्ही निदर्शनाला आणून देता. नेहमी मी वाचत जरी असलो तरी प्रतिक्रिया देणे होत नाही. मात्र आपण असेच लिहित राहा, माझ्यासारखे अनेक जण वाचतातच ! :)
धन्यवाद !
thanks
Post a Comment