विकतचा न्याय आणि `रनअवे ज्युरी`
>> Sunday, January 23, 2011
ज्युरी सिस्टिमचा चित्रपटातला वापर पाहिला रे पाहिला की, १९५७ चा `ट्वेल्व्ह अँग्री मेन` आठवायलाच हवा. मुळात रेजिनाल्ड रोजच्या टेलीप्लेवर आधारित असलेला हा चित्रपट. हा रुढार्थाने चित्रपट माध्यमाबरोबर निगडित मानल्या गेलेल्या दृश्यात्मकतेचा मर्यादित; पण अचूक वापर करणारा होता. जवळजवळ पूर्ण चित्रपट घडतो तो एकाच खोलीत. ज्युरी रूममध्ये इथे बारा ज्युरर्स एका तरूणाच्या भविष्याचा निवाडा करताहेत. त्याच्यावर आरोप आहे, तो आपल्या वडिलांच्या खुनाचा. प्रेक्षकांना मूळ घटना दाखविली जात नाही, ना त्याला खटल्यातल्या वकिलांच्या युक्तिवादाचा भाग सुनावला जात. त्याला मिळणारी माहिती आहे, ती जवळजवळ संपूर्णपणे ज्युरींच्या चर्चेतून कळणारी. सुरूवातीला बारातल्या अकरा जणांना आरोपी दोषी आहे, असेच वाटतेय. उरलेल्या एकाला तसे खात्रीपूर्वक वाटत नाही. निदान ते जाहीर करण्याआधी त्यावर चर्चा होण्याची त्याला गरज वाटते. निरपराध माणसाच्या मृत्यूला तो कारणीभूत होऊ इच्छित नाही.
यातली चर्चा जरी आरोपीच्या गुन्हेगार असण्याबद्दल संशय निर्माण करीत असली, तरी हा रहस्यपट नाही. खरा खुनी ओळखणे हा इथला हेतूच नाही. सद्सदविवेकबुद्धी शाबूत असणा-या माणसांनी कुणाच्या जीवनमरणाचा फैसला करणे, यालाच इथे महत्त्व आहे. ज्युरीरूममधला हा उत्कंठावर्धक वादविवाद त्या एका तरुणाच्या अपराधाशीच संबंधित आहे, असे नाही. ते करताना तो कायद्याच्या मर्यादांनाही स्पर्श करतो आणि यात सहभागी व्यक्तिरेखांच्या एक माणूस म्हणून असणा-या लायकीचाही विचार करतो.
या वरवर एकसुरी होण्याची शक्यता असणा-या चित्रपटाला चढवत नेण्यासाठी दिग्दर्शक सिडनी लूमेट यांनी वापरलेल्या युक्त्या त्यांनी मेकिंग मुव्हीज या चित्रपटविषयक पुस्तकात सांगितल्याचं आठवतं. चर्चा सुरू झाल्यावर वातावरण तापल्याचं अधिक कोंदटल्याचं दाखविण्याकरीता त्यांनी ज्युरी रूम पुढल्या प्रवेशांमध्ये अधिकाधिक अरुंद वाटत गेलेली भासविण्याचं ठरविलं. त्याकरीता त्यांनी नंतरच्या भागात अधिक फोकल लेन्थच्या कॅमेरा लेन्सेस वापरल्या. ज्यामुळे पार्श्वभूमी पात्रांच्या अधिक जवळ येत गेल्याचा आभास तयार झाला. त्याचबरोबर कॅमेरा अँगल वापरतानाही, पहिल्या एकतृतियांश चित्रपटात कॅमेरा दृश्यपातळीच्या वर ठेवला. मधल्या एकतृतियांश भागात दृश्यपातळीवर ठेवला, तर शेवटच्या भागात दृश्यपातळीखाली. साहजिकच या शेवटाकडच्या भागात खोलीचे छतही दिसायला लागले आणि खोली आकुंचित होत गेल्याचा भास वाढत गेला.
ट्वेल्व्ह अँग्री मेन जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा समीक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं; पण प्रेक्षकांचा प्रतिसाद फार बरा नव्हता. नंतर हळूहळू त्याचं महत्त्व लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि आज तो न्यायव्यवस्थेशी संबंधित आणि एकूणच महत्त्वाच्या चित्रपटांत गणला जातो. साहजिकच एकदा तो लोकांपर्यंत पोहोचतो आहे, हे कळायला लागल्यावर त्याची रूपांतरं होत गेली. आपल्याकडले त्याचं रूपांतर म्हणजे `एक रुका हुआ फैसला`. हे रुपांतर चांगले असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चित्रकर्त्याने स्वतःची अक्कल न वापरता ते जवळजवळ मुळाबरहुकूम केलेलं होतं. असो.
ज्युरीपद्धती ही मुळात एका चांगल्या हेतूने अस्तित्त्वात आली असली, तरी आजही तितकीच प्रभावी अन् निरपेक्ष आहे, असं म्हणणं बरोबर नाही. आपल्याकडे तर ती ६०-६५च्या आसपास काढून टाकण्यात आली;पण इतर देशांतही या व्यवस्थेला काही प्रमाणात भ्रष्ट व्हायला वेळ लागला नाही. मधल्या काळात आलेले `ट्रायल बाय ज्युरी` किंवा `द ज्युरर` (आपल्याकडचा खौफ) सारखे चित्रपट पाहता हेच लक्षात येते की, मनात आलं तर ज्युरींचा निर्णय फिरवता येतो. या फिरवण्याचा मूळ ट्वेल्व्ह अँग्री मेनमध्येही होता. पण त्याचा रोख हा मुळात सत्यशोधनावर होता. पुढल्या काळातल्या चित्रपटांत आणि अनेकदा प्रत्यक्षातही हा रोख बदलत गेला.
हा झालेला बदल किती मोठ्या प्रमाणात आहे, याचा थोडा अंदाज `रनअवे ज्युरी` हा चित्रपट पाहून यायला हरकत नाही. जॉन ग्रिशम हा आपल्याकडेही लोकप्रिय समजला जाणारा लेखक आहे. त्याच्या कादंब-या कायदेविषयक थ्रिलर असतात. म्हणजे कायद्याच्या अमुक अंगाचा त्यात संदर्भ असतो. मात्र, तो फार खोलात शिरत नाही. ए टाइम टू किल, द फर्म, पेलिकन ब्रीफ, द क्लायन्ट, रेनमेकर अशा त्याच्या अनेक चटपटीत कादंब-यांची तितकीच चटपटीत रुपांतरं पडद्यावर येऊन गेलेली आहेत. रनअवे ज्युरी त्याला अपवाद नाही.
ही कादंबरी त्याच्या अधिक दर्जेदार कादंब-यातली एक आहे. त्यातलं रहस्य तर चांगले आहेच; पण ज्युरीशी संबंधित अनेक तपशील त्यातल्य़ा कायदेविषयक भागाला वजन आणून देतात. उदाहरणार्थ यातली एक महत्त्वाची व्यक्तिरेखा ही ज्युरी कन्सल्टंट आहे. म्हणजे काय प्रकारची ज्युरी आपल्या बाजूने निकाल देईल, यासंबंधी ती आपल्या पक्षकाराला मार्गदर्शन करते. केवळ वरवरच्या मार्गदर्शनाने ती थांबत नाही, तर खटला हाताबाहेर जाण्याची चिन्हं दिसताच, कायदा हातात घ्यायलाही तो मागेपुढे पाहत नाही. या व्यक्तिरेखेसारख्या गोष्टी अमेरिकन व्यवस्थेच्या सद्य परिस्थितीवर अचूक बोट ठेवताना दिसतात.
रनअवे ज्युरी ही कादंबरी आणि चित्रपट, यात एक महत्त्वाचा फरक आहे. कादंबरीतला खटला हा सिगारेट कंपन्यांच्या विरोधातला आहे, तर चित्रपटातले आरोपी आहेत बंदुकांचे व्यापारी. धूम्रपान विरोध किंवा गन कंट्रोल, हे दोन्ही विषय सामाजिक महत्त्वाचे आहेत आणि अनेक वर्षे या मृत्यूच्या व्यापा-यांना लगाम घालण्याचे प्रयत्नही चालू आहेत. विषयात हा महत्त्वाचा बदल करण्याचे कारण फार स्पष्ट नाही, पण मला वाटतं धूम्रपानाचा शारीरिक हानीशी संबंध हा अजूनही टक्के सिद्ध झालेला नाही. याउलट शस्त्राने ओढवणारा मृत्यू, हा अधिक थेट आणि पटण्यासारखा आहे, हे असेल. प्रेक्षकांत बंदुका बाळगणा-यांहून स्मोकर्सची संख्या जास्त असेल, हेही आहेच.
तर चित्रपटातला खटला आहे, तो एका विधवेने भरलेला, तिच्या नव-याच्या एका मनोरूग्णाच्या हातून झालेल्या मृत्यूनंतर. या मनोरुग्णाने वापरलेली बंदुक तयार करणारी कंपनी आरोपीच्या पिंज-यात आहे. गन कंपनीने आपल्या वकिलाबरोबरच एक नावाजलेला ज्युरी कन्सल्टंट उभा केला आहे. रॅन्कीन फिच (जीन हॅकमन), तर विधवेची बाजू सांभाळतो आहे सरळमार्गी वकील वेन्डेल रोर (डस्टीन हॉफमन). या सरळसरळ सत्प्रवृत्ती विरुद्ध दुष्प्रवृत्ती, अशा लढ्यात वेगळीच बाजू आहे ती एका ज्युररची. निक इस्टर (जॉन क्युझॅक) हा ज्युरर आणि त्याची मैत्रीण मार्ली (राकेल वाईज) यांचं एक वेगळेच कारस्थान आहे. मार्ली दोन्हीही बाजूंपुढे प्रस्ताव मांडते की, ज्युरी आमच्या खिशात आहे अन् ठराविक रकमेसाठी आम्ही तुमच्या बाजूने निकाल लावून देऊ. निक ज्युरीला हळूहळू आपल्या मैत्रीत घ्यायला लागतो आणि पुढली व्यूहरचना ठरवायला लागतो.
रोर आणि फिच यांच्या पांढ-या-काळ्या व्यक्तिरेखांमधील निक आणि मार्लीची ढवळाढवळ संघर्षाला वेगळे वळण लावते. न्याय विकत घेणं शक्य असेल आणि सर्वात अधिक पैसे मोजणा-याकडे तो जाणार असेल, तर अन्याय झालेल्या सज्जन माणसांनी जावं कुठे, हा प्रश्न चित्रपट विचारतो. (हा प्रश्न अर्थातच केवळ ज्युरी सिस्टिमला लागू नाही, तर एकूणच न्याय व्यवस्थेला आहे.) या प्रश्नाचं उत्तर चित्रपट सोप्या रीतीने देऊन आनंदीआनंद घडवतो, ही गोष्ट वेगळी.
रनअवे ज्युरी हा ब-याच प्रमाणांत परिणामकारक ठरतो तो त्यातल्या नटमंडळींमुळे हे उघड आहे. हॅकमन आणि हॉफमन यांना पहिल्यांदाच समोरासमोर आणणारा हा चित्रपट आहे आणि केवळ या दोघांच्या कामासाठी तो पाहायला हरकत नाही, इतके ते जमलेले आहेत. कोर्टाच्या वॉशरूममध्ये होणारा या दोघांच्या वादाचा प्रसंग तर खास उल्लेखनीयच. जॉन क्युझॅक आणि राकेल वाईज यांच्या कामगिरीबद्दल तक्रार असायचे कारण नाही;पण तरीही एक तक्रार आहे.
कादंबरीचं यश हे प्रामुख्याने यातल्या निकने घेतलेल्या ज्युरीच्या ताब्यावर आधारलेलं आहे. कादंबरीत आपल्याला खरेच वाटते की, निक आणि मार्लीने पैसे मिळविण्याचा हा उत्तम मार्ग निवडलाय आणि अधिक पैसे मोजणा-या खलनायकांच्या बाजूने हा निर्णय लागण्याची शक्यता आहे. चित्रपटात जॉन क्युझॅकमुळे हे शक्य होत नाही. कुझॅक आपल्या सर्व चित्रपटांत सज्जन माणसाच्या प्रेक्षकांचा प्रतिनिधी असणा-या भूमिका करतो. ( आता या सरळमार्गी प्रामाणिक भूमिकांची प्रेक्षकांना इतकी सवय झाली आहे की, आयडेन्टिटी या मनोविश्लेषणात्मक रहस्यपटात त्याला आणि रे लिओटाला केवळ त्यांच्या अनुक्रमे स्वच्छ आणि भ्रष्ट प्रतिमांसाठी घेतले गेलं होते.)
त्यामुळे निक आणि मार्ली खरोखर फिंचच्या बाजूने निकाल देतील, अशी शक्यताच तयार होऊ शकत नाही. साहजिकच तो आपल्या बाजूने व्यवस्थित व्यक्तिरेखा उभी करतो;पण चित्रपटातलं रहस्य त्यामुळे ब-याच प्रमाणात कमी होतं. कदाचित या भूमिकेसाठी ज्युड लॉसारखा सरळ आणि खल या दोन्हीही भूमिकांमध्ये येऊन गेलेला नट असता तर बरं झालं असतं. आणखी एक गोष्ट अशी की, निक आणि मार्ली शेवटी भले दाखविले गेले, तरी त्यांचा कायदा वाकवण्याचा प्रयत्न पूर्णतः समर्थनीय होत नाही. पुस्तकात अशा व्यक्तिरेखा चालून जातात, पण एकदा का चित्रपटाच्या प्रचंड प्रेक्षकसंख्येसमोर अशा व्यक्तिरेखांना मूर्त रूप मिळालं की, त्याच्या सामाजिक परिणामांचा विचार होण्याची निकड तयार होते आणि ज्युरीशी खेळणारा नायक हा आजच्या समाजापुढे चांगला आदर्श नाही.
`रनअवे ज्युरी` एक निराळा विषय मांडत असला, तरी दिग्दर्शक गॅऱी फ्लेडर यांनी त्यातला आशय अधिक टोकदार करण्याक़डे विशेष लक्ष पुरविलेलं नाही. नेहमीच्या पॉपकॉर्न एन्टरटेनरचे सर्व गुण-दोष त्यातही आहेत. विषय थेट पोहोचविण्यापेक्षा चटकदार, नाट्यपूर्ण संवाद, थोडी अँक्शन,ढोबळ खलप्रवृत्ती, सर्व सांधणारा आनंदी शेवट अशी शैलीबाज कलाकुसर करण्याकडेच त्यांनी खूप लक्ष पुरविले आहे. त्यामुळे चित्रपट चांगला वाटला, तरी पसरट वाटतो. ट्वेल्व्ह अँग्री मेनमधील प्रेक्षकांपर्यंत काही पोहोचविण्याची नड इथे दिसत नाही. असं तर नाही, की ज्युरी व्यवस्थेच्या चांगल्या संकल्पनेत कालपरत्त्वे होत गेलेला बदल आणि आलेली भ्रष्टता दाखविणारे हे दोन प्रातिनिधिक चित्रपट, चित्रकर्त्यांच्या नजरेत आणि हेतूमध्ये हळूहळू होत जाणा-या बदलाचे प्रतिनिधित्त्व करताहेत?
- गणेश मतकरी.
6 comments:
पात्रनिवड, पटकथा, संवाद या सगळ्यांच्या दृष्टीने 12 Angry Men हा एक अत्युत्कृष्ट चित्रपट आहे. त्या तुलनेत रनअवे ज्युरी फारच सामान्य वाटला मला. अर्थात ग्रिशमचं मूळ पुस्तक चित्रपटापेक्षा खूप चांगलं आहे हे माझं वैयक्तिक मत.
या लेखात सर्वात दाद देण्यासारखी गोष्ट म्हणजे हा परिच्छेद.
>>चर्चा सुरू झाल्यावर वातावरण तापल्याचं अधिक कोंदटल्याचं दाखविण्याकरीता त्यांनी ज्युरी रूम पुढल्या प्रवेशांमध्ये अधिकाधिक अरुंद वाटत गेलेली भासविण्याचं ठरविलं. त्याकरीता त्यांनी नंतरच्या भागात अधिक फोकल लेन्थच्या कॅमेरा लेन्सेस वापरल्या. ज्यामुळे पार्श्वभूमी पात्रांच्या अधिक जवळ येत गेल्याचा आभास तयार झाला. त्याचबरोबर कॅमेरा अँगल वापरतानाही, पहिल्या एकतृतियांश चित्रपटात कॅमेरा दृश्यपातळीच्या वर ठेवला. मधल्या एकतृतियांश भागात दृश्यपातळीवर ठेवला, तर शेवटच्या भागात दृश्यपातळीखाली.<<
12 Angry Men इतक्या वेळा बघूनही हे तपशील लक्षात आले नव्हते. कोंदट, अंधारं वातावरण, हवेतला उष्मा आणि त्या अनुषंगाने दाखवली गेलेली ज्युरींचं घुसमट आणि निर्णय घेतानाचं मानसिक द्वंद्व वगैरे लक्षात आलं होतं. परंतु कॅमेरा अँगलचं तुम्ही सांगितलेलं निरीक्षण बेफाटच !!! दर वेळी तुमचे लेख नवीन तपशील उद्धृत करतात आणि चित्रपट बघण्याची एक वेगळीच दृष्टी देतात.
I'm feel myself so lucky to read your blog. Keep on !!!
Correction : I* feel myself so lucky to read your blog. Keep on !!!
रनअवे ज्युरी मलाही अगदीच सामान्य वाटला होता. 12 Angry Men बघितलेला नाही, पण आता बघेन म्हणतो.
thanks heramb, pan he nirikshan specifically maza nahi. as mentioned in the article ,the director himself has mentioned it in his book. Its an interesting detail and confirms the careful planning of the filmmakers.
I agree that runaway jury is not a great film. and even i liked the book better. what i found interesting is the contrast between the attude of the filmmakers,which is mentioned in the last para.
mandar, 12 angry men is a must see. in fact you will get an official dvd in the market if u want to see.
I will like to add one more point about 12 Angry Men,when votes are 6 to 6 rain starts and they illuminate light and come to know fan starts after start of light,it suggest that somethings are not the way they look,they might be too easy but they have to be decoded with different aspects.And talking about rain it also suggest now something that will relieve everyone is done.
मी पिक्चर पाहिलेला नाही, पण पुस्तक वाचलंय. आणि ते निर्विवादपणे उत्तम आहे. आता एकदा पिक्चर ही पाहीन.
Post a Comment