`धोबी घाट`- बाहेरच्यांची मुंबई

>> Sunday, January 30, 2011

`धोबी घाट`बद्दल त्याच्या प्रदर्शनापासून एक संभ्रमाचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतं. खरं तर तसं असण्याला कारण नाही. हा चित्रपट वेगळा आहे, असणार, हे आपल्याला अपेक्षित तर होतंच. त्याच्या पूर्वप्रसिद्धीपासून ते `धोबी घाट` या वरकरणी चमत्कारिक नावापर्यंत सर्वच बाबतीत त्याचा हा वेगळेपणा अधोरेखित कऱण्यात येत होता. त्यामुळे आता प्रदर्शनानंतर तोच वेगळेपणा ही बातमी होऊ शकत नाही. त्यातून तो वेगळा आहे म्हणजे काय? तो अगम्य आहे, कळायला कठीण आहे का ? तर अजिबात नाही. प्रेक्षकांनी अकारण बिचकायचं ठरवलं नाही, तर तो सहज पचण्याजोगा, आव़डण्याजोगा आणि (निदान काही एका प्रमाणात) पटण्याजोगादेखील आहे. मी `काही एका प्रमाणात` म्हणण्याचं कारण म्हणजे मला स्वतःला तो पूर्णपणे पटलेला नाही. मात्र माझं न पटणं हे त्याच्या स्वरूपाशी, आशयाशी वा व्यक्तिचित्रणाशी संबंधित नसून पटकथेतल्या एका अक्षम्य गोंधळाशी संबंधित आहे. मात्र त्याकडे आपण नंतर वळू.
तर धोबी घाट वेगळा कसा, तर तो आपल्या चित्रपटांच्या कोणत्याच संकेतांना जुमानत नाही. गाणी टाळणं किंवा मध्यांतर न घेणं, हे तसं त्यामानाने वरवरचे बदल आहेत, आणि हल्ली आपले बरेच चित्रपट बाहेरदेशीच्या महोत्सवात हजेरी लावत असल्याने ते रूढ होणं हे स्वाभाविक आहे. अर्थात इंग्रजी चित्रपटांना नसणारी मध्यान्तरं घेणा-या आपल्या चित्रप्रदर्शन संस्कृतीमध्ये मध्यान्तर गाळून दाखविण्याचा धीटपणा हा धोबीघाटला असणा-या स्टार सपोर्टमुळेच येऊ शकतो, हे मी वेगळं सांगायची गरज नाही. तर या प्रकारचे कलात्मक चित्रपटांशी नातं सांगणारे बदल इथे जरूर आहेत,पण त्याहून अधिक मूलभूत स्वरूपाचे बदलही आहेत. आपल्या चित्रपटांना पटकथेत गुंतागुंत आणण्याची खूप भीती वाटते. पात्रांची ओळख ढोबळ गुणावगुण दाखविणा-या प्रसंगापासून करणं, नायक नायिकेच्या घटस्फोटा-नंतरच्या गोष्टीची सुरूवातही त्यांच्या प्रथम भेटीपासून करणं, प्रेक्षकांना विचार करायला न लावता जी ती गोष्ट नको इतकी स्पष्टपणे मांडत राहणं, व्यक्तिचित्रणात वैशिष्ट्यपूर्णतेपेक्षा परिचित ढाचे पसंत करणं अशा काही अलिखित नियमांनी आपला सिनेमा झपाटला आहे.
हे ज्या त्या गोष्टीची बाळबोध प्रस्तावना करत राहणं आणि प्रेक्षकाला अपेक्षित धाटणीचं काहीबाही दाखवत राहणं धोबी घाट मुळातच टाळतो आणि एकदम मुख्य घटनांनाच हात घालतो. त्याची व्यक्तिरेखांची ओळख करून देण्याची पद्धतही चांगली आहे. यात जी प्रमुख पात्रं आहेत, म्हणजे चित्रकार अरूण (आमिर खान), शाय (मोनिका डोग्रा) ही आपलं परदेशातलं करियर होल्डवर ठेऊन मुंबईतल्या लहान उद्योगांचा अभ्यास करायला आलेली तरुणी, मुन्ना (प्रतीक बब्बर) हा अरूण अन् शाय या दोघांकडेही जाणारा धोबी आणि केवळ व्हिडिओ चित्रिकरणात दिसणारी यास्मिन (क्रिती मल्होत्रा) ही एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. मात्र त्यांना जोडणारे धागे चित्रपट चटकन स्पष्ट करत नाही. तो सुरूवात करतो, ती कथानकात अप्रत्यक्ष सहभाग असणा-या यास्मीनवरून, अन् प्रेक्षकाला हळूहळू गुंतवत नेतो.
`धोबी घाट` हा डॉक्युमेन्टरी किंवा डॉक्युड्रामासारखा असल्याचं मी अनेकांकडून ऐकलं, अनेक समीक्षणात वाचलं आहे. हे विधान मुळात कुठून आलं (वा चित्रकर्त्यांनीच ते पसरवलं) याची मला माहिती नाही, मात्र त्यात फारसा अर्थ नाही हे खरं. हा चित्रपट दोन डिसिप्लीन्सचं मिश्रण आहे. आपल्या दृश्य भागात, अन् व्यक्तिचित्रणात तो वास्तववादी आहे. -पण वास्तववाद म्हणजे डॉक्युमेन्टरी नव्हे. मुंबईचं उत्तम चित्रण, व्यक्तिरेखांचे तपशील हे तो मन लावून जितके ख-यासारखे रंगवता येतील तितके रंगवतो. त्यामुळे ही पात्रं त्यांची पार्श्वभूमी असणारं शहर हे आपल्यापुरता खरं होतं. याउलट कथानकात मात्रं तो पूर्णपणे नाट्यपूर्ण आहे. यातले योगायोग, पात्रांमधली बनणारी-तुटणारी नाती, रोमॅन्टीक अँगल हे सारं जमवून आणलेलं आहे. याचा अर्थ ते दर्जेदार नाही असा नाही, मात्र हे ख-या आयुष्याचं प्रतिबिंब नाही. लेखिका-दिग्दर्शिका किरण रावने आपल्या सोयीनुसार या गोष्टी घडवून आणल्याचं आपल्याला दिसतं. प्रत्यक्ष आयुष्याचा हा आभास आहे, इतकंच.
या चित्रपटात प्रामुख्याने दोन कथानकं आहेत, ती जोडलेली आहेत, मात्र ती जोडलेली असण्याची गरज नाही इतकं हे जोडकाम क्षीण आहे. चित्रपटाचं नाव धोबी घाट असल्याने अन् मुन्ना ही धोब्याची व्यक्तिरेखा असल्याने सामान्यतः तो अन् शाय यांची मैत्री हे इथलं प्रमुख कथानक असल्याचं मानलं जातं. माझ्या मते हे योग्य नाही. अरुणची गोष्ट हीच इथली मुख्य गोष्ट आहे. हे अनेक बाबतीत स्पष्ट होणारं आहे. एकतर शोकांत शेवट असणारी अरुण-यास्मिनची गोष्ट ही मुन्ना-शाय प्रकरणाहून अधिक वजनदार आहे. या भूमिकेसाठी स्टार स्टेटस असणारा नट घेण्याची दिग्दर्शिकेला गरज वाटली यावरूनही ते स्पष्ट होतं. चित्रपट सुरू होतो, तो याच गोष्टीवरून अन् संपतो तो देखील अरूणकडे निर्देष करूनच. यातल्या घटना अधिक ठळक, प्रेक्षकाला अधिक प्रमाणात गुंतवून ठेवणा-या अन् त्याचं कुतूहल वाढवत नेणा-या आहेत. अरूण हा एकलकोंडा, विक्षिप्त चित्रकार आहे. तो घर बदलतो, तेव्हा नव्या घरात त्याला काही व्हिडिओ टेप्स मिळतात. ही व्हिडिओरूपी पत्रं असतात. त्या घरात पूर्वी राहणा-या यास्मीन नामक तरूणीने आपल्या घरच्यांना उद्देशून बनवलेली. या पत्रात तिच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दलचा मजकूर तर येतोच, वर तिने मुंबई संदर्भात केलेली काही छान निरीक्षणं (बोलण्यात अन् दृश्यभागातही) येतात. अरूण या टेप्सनी भारल्यासारखा होतो. यास्मीन अन् तो यांच्यात एक नातं तयार होतं, जे एकतर्फी असूनही त्याच्यापुरतं खरं आहे. त्याच्या एरवीच्या आयुष्यातल्या नात्यांहूनही अधिक खरं. अरूणमध्ये रस असलेली शाय ही तिच्या अन् अरुणच्या घरी येजा करणा-या मुन्ना नामक धोब्याला मधे घालून अरूणच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नातून मुन्नाशी तिची चांगली मैत्री होते. पण ही मैत्री पुढल्या टप्प्यांवर जाईल का, हा प्रश्न मुन्ना अन् प्रेक्षक या सर्वांनाच पडलेला राहतो.
मघा मी ज्या पटकथेतल्या गोंधळाचा उल्लेख केला, तो यातल्या अरूणच्या गोष्टीसंदर्भात. मी अर्थातंच फार तपशीलात जाणार नाही, पण थोडक्यात हा मु्द्दा मांडणं आवश्यक आहे. अरुणच्या कथानकात काळाला महत्त्व आहे. त्याचं यास्मीनबरोबर गुंतत जाणं, हे त्याने या टेप्स सतत पाहत राहण्यावर, अन् आपल्या कामातून त्या इन्टरप्रिट करण्याचे मार्ग शोधण्यावर अवलंबून आहे. चित्रपटात दिसतं, की किमान महिनाभर अन् कदाचित त्याहूनही अधित काळ त्याने घरी या टेप्सबरोबर काढला. पण त्याने टेप्स केवळ तुकड्या-तुकड्यात अन् अंतराअंतराने पाहिल्या. तसं झालं नाही, तर अरूणला चित्रपटाच्या अखेर बसणारा धक्का बसणार नाही. मात्र जवळजवळ व्यसनी माणसाप्रमाणे टेप्सच्या अधीन झालेला अरूण या टेप्स तुकड्यामध्ये पाहील अन् शेवट पाहायला महिनाभर काढेल हे संभवत नाही. टेप्स केवळ तीन आहेत. अरूणने जर सकाळपासून रात्रीपर्यंत सलग बसून त्या पाहून टाकल्या, तर चित्रपटाच्या टाईमलाईनची वाट लागते. तिला मुद्दाच उरत नाही. `धोबी घाट` मधला हा मोठाच गोंधळ. माझ्या समजुतीप्रमाणे `लेक हाऊस` किंवा तो ज्या कोरिअन चित्रपटावर आधारित होता, त्यावर अरूणचं कथानक बेतलेलं आहे. मात्र त्यात घराच्या नव्या मालकापर्यंत पोचवणारा मजकूर हा ख-याखु-या (पण कालप्रवास करू शकणा-या) पत्रांच्या सहाय्याने पोचणारा आहे. ही क्लृप्ती जरी अनैसर्गिक असली, तरी त्यामुळे नव्या मालकाला मिळणारी माहिती तुटक अन् अंतराअंतराने मिळण्याला एक स्पष्टीकरण देऊ करते. `धोबी घाट`चा रिअँलिझम या प्रकारची युक्ती नाकारतो, मात्र त्याला समांतर असा वास्तववादी उपाय काढू शकत नाही.
धोबी घाटचं नाव अन् त्याचा आशय हा त्याच्याभोवतीच्या वलयात, अन् संमिश्र मतप्रदर्शनात भर घालणारा आहे. प्रेमकथांपलीकडे जाऊन पाहायचं तर यातल्या सर्व पात्रांप्रमाणेच मुंबईबाहेरून येऊन या शहरात स्थायिक होणा-या लोकांच्या दृष्टीतून केलेलं मुंबईचं चित्रण असा या चित्रपटाचा अर्थ लागू शकतो. त्यांना ही जागा जशी दिसते तशी चित्रपट आपल्याला दाखवतो. ती तशी त्रासदायक आहे. आरामाला वाव नाही. राहण्याची व्यवस्था फार बरी नाही. गर्दी आहे, पण तरीही ती त्यांना दोन वेळचं खायला देते. तिला स्वतःचं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना आता या जागेची सवय झाली आहे. त्यांच्या आयुष्याचाही एक भाग झाली आहे. मुंबईतल्या जुन्या कामकरी वस्त्यांमधला एक धोबीघाट, हा या दृष्टिकोनाचं प्रतीक म्हणून चित्रपटाच्या शीर्षकात आपली जागा घेताना दिसतो. मुंबई डायरीज हे अधोशीर्षक अधिक ढोबळ स्वरूपात योग्य आहे. पण धोबीघाट अधिक चपखल अन् प्रेक्षकांना विचारात पाडणारं, चित्रपटाच्या एकूण वृत्तीबरोबर जाणारं आहे.
एकेकाळी गाजलेले पण पुढे बदलत्या काळाबरोबर हद्दपार झालेले सिनेमे आज मल्टीप्लेक्स कल्चरमधून पुन्हा डोकं वर काढताना दिसताहेत. धोबी घाट हे त्यातलं एक महत्त्वाचं नाव आहे. तो परिपूर्ण नक्कीच नाही, पण त्याला असलेलं स्थलकालाचं भान हे त्याचं नाव लक्षात राहायला पुरेसं आहे. अन् आजवर कलाबाह्य कारणांसाठी चर्चेत असलेल्या `किरण राव` या त्याच्या दिग्दर्शिकेचंही!
- गणेश मतकरी.

11 comments:

Anonymous,  January 31, 2011 at 12:32 AM  

इतका चांगला ब्लॉग आज प्रथमच वाचण्यात आला याबद्दल आनंद आणि खेद दोन्ही वाटत आहे...आनंद यासाठी की चित्रपटविषयक इतके व्यवस्थीत विश्लेषण वाचायला मिळणे ही आमची एक गरज आहे तर खेद यासाठी की आम्ही यापासून इतके दिवस वंचित राहिलो म्हणून...असो

सुभे का भूला का काय ते वगैरे वगैरे....

धोबी घाटाला चांगलाच धुतलाय तुम्ही (चांगल्या अर्थाने) तुमच्यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट पाहायची इच्छा झाली...यातच सर्व काय ते समजा.... :)

Unknown February 1, 2011 at 9:18 AM  

far chan .. mala eikayala kamee yet asalene tar lekh far mahatvacha vatala..aata cinema janivechya pataleevar pahu shaken..thanks..

prasad namjoshi February 2, 2011 at 12:16 AM  

छान लिहिलं आहेस गणेश. आवडलं.कदाचित कथेवर काम करताना दिग्दर्शिकेला चित्रपट मुन्नाचा करायचा असेल पण पात्रनिवड होऊन चित्रिकरण आणि संकलनानंतर तो अरूणचा झाला असावा...चित्रपट क्षेत्रात काहीतरी वेगळं करू इच्छिणा-या भविष्यातल्या दिग्दर्शकांना धोबीघाट बघून थोडीशी अधिक हिंमत आली असावी असं मला वाटतं...

ganesh February 2, 2011 at 3:02 AM  

thanks neeteen. prasad , mala to munnacha karaycha hota asa watat nahi. the strength of the film is aruns story, its been tried in other films and they know it works .though actually it has nothing to do with mumbai. they wanted to portray it as a progressive film (which ,to an extent ,it is) but they also didnt want fans of khan to expect something more commercial.. so they underplayed his presence since the beginning.

sushama February 2, 2011 at 8:31 AM  

I liked the film and ur blog too.but i don't completely agree with ur point related to Arun watching tapes slowly and not at stretch.though u have a point. but....Arun seems to be slowly imbibing Yasmin's world.he tries to see things from her perspective and also as seen in the frames of the tapes with Yasmin in it....sketches simple things seen through her eyes.hence the long time taken to see tapes.
one thing I felt was bit weak is Munna's-Prateek's language. though the character is well written and executed by the actor his language seems too sofisticated.when he has specific past geographical location,religion economic status and specific present residential area and specifisc age he seems to have lost the लहेजा of his own language too quickly.Yet its not influenced by the people he hangs out with.as compared to others I found this casting also bit inappropriate. though it fits in with munna's ambition to be an actor.

ganesh February 2, 2011 at 10:47 AM  

i dont think there is any doubt that arun watches the tapes slowly. because 1. the entire munna ,shay relationship develops inbetween.end of aruns story corresponds with end of munnas story too. that they are parallel is confirmed by crossovers of shay in both stories.2. the shock of death is felt more because he is almost in a platonic relationship with the girl. in one day ,he wont be involved so much. 3. we see how he first sees the tapes,then kittu gidwanis comment suggests infatuation, then he starts working on sketches, shay observes his work from the building across, shay comments on hs changing mood, he tells someone mostly kittu gidwani on the phone about the work,we see at least one painting ready. so is not at a stretch.
and i will accept that he will keep seeing them again and again,but the first viewing has to be entire. not in bits.
i agree with your other points.

Anushree Vartak. अनुश्री वर्तक February 15, 2011 at 12:39 AM  

@ganesh

his watching tapes slowly did not bother me much..and it is necessary to keep the tracks parallel..
pan overall impactful nahi vatala..like ravan, it was just a visual treat..jyanna paaus ani mumbai hi don patra awadtaat tyanchyasathi..
ata lake house baghayla hava..
ani 127 hours !

Anonymous,  February 22, 2011 at 9:05 AM  

"चित्रपटात दिसतं, की किमान महिनाभर अन् कदाचित त्याहूनही अधित काळ त्याने घरी या टेप्सबरोबर काढला. पण त्याने टेप्स केवळ तुकड्या-तुकड्यात अन् अंतराअंतराने पाहिल्या. तसं झालं नाही, तर अरूणला चित्रपटाच्या अखेर बसणारा धक्का बसणार नाही. मात्र जवळजवळ व्यसनी माणसाप्रमाणे टेप्सच्या अधीन झालेला अरूण या टेप्स तुकड्यामध्ये पाहील अन् शेवट पाहायला महिनाभर काढेल हे संभवत नाही. टेप्स केवळ तीन आहेत. अरूणने जर सकाळपासून रात्रीपर्यंत सलग बसून त्या पाहून टाकल्या, तर चित्रपटाच्या टाईमलाईनची वाट लागते. तिला मुद्दाच उरत नाही."


हे लक्षातच नाही आलं माझ्या...
:o
आता परत पहावा लागणार...

ganesh February 24, 2011 at 9:52 PM  

@ anushree, his watching tapes slowly is absolutely necessary for the relationship to develop. by relationship , i obviously mean his getting engrossed in all aspects of the girl in the video. problem is the so called twist ending . its actually a catch 22 situation. if he doesnt get interested , the end of the tape wont affect him,and if he gets involved, he will see the tapes all at ones, and the timeline has a problem.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP