ड्राईव्ह - समांतर सूडकथा

>> Tuesday, October 4, 2011





Drive - operate and control the direction and speed of a motor vehicle


- propel or carry along by force in specified direction


- compel to act in a peculiar way, especially one that is undesirable or inappropriate


( Oxford dictionary)


काही दिवसांपूर्वी मी एका चित्रपट रसास्वादविषयक अभ्यासवर्गात समांतर चित्रपटांविषयी बोलत होतो. त्यादरम्यान मी दाखविलेल्या काही व्हिडीओ क्लिप्समधील एक गोविंद निहलानींच्या `अर्धसत्य` चित्रपटाची होती. दाखविलेला प्रसंग होता, तो इन्स्पेक्टर नायक, रामा शेट्टी या गुंडाला अटक करण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो, हा. लेक्चरनंतर उपस्थितांमधून एक प्रश्न आला, तो असा. `अर्धसत्यमधला आशय हा जवळपास व्यावसायिक चित्रपटांसारखाच वाटत होता, म्हणजे आदर्शवादी, धडाकेबाज नायक, राजकीय संपर्क असणारा उर्मट खलनायक, खलनायकाने नायकाचा डाव उलवटवणं वैगैरे. मग तो कलात्मक, किंवा समांतर चित्रपट कसा म्हणता येईल? ` प्रश्न चांगला होता, तो का पडला हेदेखील समजण्यासारखं होतं, त्याचं उत्तर मात्र तितकं सोपं नव्हतं.
ब-याचदा केवळ आशय, कथासूत्र या गोष्टी चित्रपटाचं व्यावसायिक वा प्रायोगिक असणं ठरवत नाहीत. तर चित्रपटाची एकूण मांडणी, त्यातल्या व्यक्तिचित्रणाचे तपशील, दिग्दर्शनातले बारकावे, मूळ संकल्पना आणि ती पडद्यावर उतरवताना मिळणारं यश, सांकेतिक व्यावसायिक हाताळणीला दिलेली बगल, अशा अनेक गोष्टी चित्रपटाची प्रकृती ठरवण्याला जबाबदार असू शकतात. त्यामुळेच अनेकदा उघड उघड व्यावसायिक विषय हाताळणा-या चित्रपटालाही त्याच्या कलात्मक हाताळणीसाठी वेगळं काढता येतं.
या प्रकारच्या चित्रपटाचं त्यामानाने हल्लीचं उदाहरण कोणतं या विचारात मी असताना योगायोगानेच निकलस विन्डिन्ग रेफ्न या डेनिश दिग्दर्शकाचा `ड्राईव्ह` पाहण्याची संधी चालून आली. `ड्राईव्ह` हा मूळात आपल्या वितरकांच्या ब्ल़ॉकबस्टर छापाच्या आवडीनिवडीत बसण्याची शक्यता नसल्याने, वर त्याला कॅन चित्रपट महोत्सवात दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळाल्याने आपल्या चित्रपटगृहात तो लागण्याची आशा मी सोडून दिली होती. पण बहुदा त्याच्या वरवरच्या व्यावसायिक विषयाने आणि गाड्यांशी संबंधित नावामुळे तो आपल्याकडे अपघाताने आणला गेला असावा.
ड्राईव्हचं नाव हे फसवं आहे. आणि त्याचे केवळ गाडी चालवण्यापलीकडले अर्थही संभवतात, हे मी वर लिहिलेल्या Oxford dictionaryमधल्या अर्थावरून स्पष्ट होईलच. चित्रपट हे सारेच अर्थ आपल्या कथनात वापरतो. त्यात गाड्या आहेत, उत्तम चित्रित केलेले कार चेजेस देखील आहेत; मात्र हा `ट्रान्स्पोर्टर` किंवा `गॉन इन सिक्स्टी सेकन्ड्स`च्या धर्तीचा चित्रपट नव्हे. तो तसा नाही यात अर्थातच वाईट काहीच नाही.
त्याचं वेगळं असणं हे त्याच्या पोस्टरवरूनही स्पष्टं व्हावं. प्रोटॅगनिस्ट रायन गाजलिन्गचा चेहरा असणारा हा पोस्टर ही अ‍ॅक्शन फिल्म असल्याचा निर्देष कुठेही करीत नाही. फोटो गाडीत काढला असल्याचं समोरच्या स्टीअरीन्ग व्हीलच्या अर्धवर्तुळावरून स्पष्ट होतं, मात्र त्याव्यतिरिक्त अ‍ॅक्शन चाहत्यांना गुंतवणारं काहीही इथे दिसून येत नाही. चित्रकर्त्यांच्या प्रामाणिकपणाचाच हा पुरावा म्हणता येईल.
निओ न्वार चित्रपटांच्या परंपरेत बसण्याजोगा इथला नायक. या नायकाचं नाव आपल्याला सांगितलं जात नाही. केवळ त्याच्या कामाकडे निर्देश करणारं ड्रायव्हर हेच नाव चित्रपटभर वापरलं जातं. ड्रायव्हरचा भूतकाळ रहस्यमय असावा, मात्र तो नेमका काय, हे चित्रपट स्पष्ट करीत नाही. त्याचं आपल्याला दिसणारं वागणंही काही कमी रहस्यमय नाही. तो एका गराजमध्ये नोकरी करतो आणि त्याबरोबरच हॉलीवूड चित्रपटांसाठी स्टन्ट ड्रायव्हर म्हणूनही काम करतो. याबरोबरच त्याचा आणखीही एक व्यवसाय आहे. तो म्हणजे चोर दरोडेखोरांसाठी गेटअवे कार ड्राईव्ह करण्याचा. दरोड्यानंतर लुटारू आणि लुटलेला माल यांना सुखरूपपणे पोलिसांपासून दूर पोहोचविण्यात त्याचा हातखंडा आहे. मात्र हे करताना तो `ट्रान्स्पोर्टर` च्या नायकासारखा आगाऊपणा करीत नाही. स्वतःचा अन् आपल्या सहप्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी त्याचे काही नियम आहेत. जे तो काटेकोरपणे पाळतो. त्याच्या कामाची शैली चित्रपट पहिल्याच प्रसंगात आपल्याला दाखवून देतो.

शांतता, छायाप्रकाशाचा खेळ , संगीत , वास्तववादी धर्तीने उलगडणारी दृश्य आणि अनपेक्षित छायाचित्रण शैली यांमधून ड्राईव्ह लगेचंच आपला ताबा घेतो. इथल्या छायाचित्रणाला लय आहे, वाढत जाणारा वेग आहे. केवळ स्टन्ट्स दाखवणं वा दृश्य चमत्कृतीवर भर देणं इथे दिसत नाही, तर ड्रायव्हरचं व्यक्तिगत विश्व प्रेक्षकापर्यंत पोहोचविण्यात महत्त्व दिलेलं लक्षात येतं. त्यासाठी गाडीदेखील बाहेरून जितकी दिसते, त्याहून अधिक आतून दिसते. अंधारं वातावरण, उजेडाचे कवडसे, ड्रायव्हरचा चेहरा याला अधिक महत्त्व येतं. त्या जोडीला ड्रायव्हर आणि गाडीचे पॉईन्ट ऑफ व्ह्यू शॉट्स आणि आकाशातून शहराच्या संदर्भाने दाखविलेले टॉप अँगल्स यांनाही स्थान मिळतं. शो ऑफऐवजी सावधपणा दिसतो. इफेक्टसऐवजी वातावरण निर्मिती.
एकदा का ड्रायव्हर अन् त्याचा व्यवसाय दाखविला की मग मात्र चित्रपट सरसकटपणे कारचेज वापरत नाही. मोजक्या पण नेमक्या जागी मात्र ते जरूर येतात.
सांकेतिक कारचेज असणा-या चित्रपटांचा दुसरा अलिखित संकेत म्हणजे नायिकांचा सेक्स सिम्बॉल म्हणून वापर. इथे तेदेखील नाही. आयरीनची (कॅरी मलीगन, अँन एज्युकेशन, नेव्हर लेट मी गो) व्यक्तिरेखा ही जवळजवळ नायकाच्या प्लेटोनिक संबंधासारखी वापरली जाते. या भूमिकेसाठी खास स्क्रीन प्रेझेन्स असलेली महत्त्वाची तरुण अभिनेत्री घेण्याचंही तेच कारण आहे. आयरीन कायम पार्श्वभूमीला राहते, मात्र ही पार्श्वभूमी चित्रपटाला दिशा आणून देण्याला जबाबदार ठरते.
ड्रायव्हरची आयरीन अन् तिच्या मुलाशी मैत्री होते. तिचा नवरा तुरुंगात असल्याचं त्याला ठाऊक असतं, मात्र त्याने काही फरक पडणार नसतो. स्टॅन्डर्ड ( ऑस्कर आयझॅक) तुरुंगातून सुटतो आणि गुंतागुंत वाढते. स्टॅण्डर्डला संकटातून सोडवण्यासाठी ड्रायव्हर त्याला एका छोट्या कामात मदत करायचं ठरवतो. मात्र वरवर साधं वाटणारं काम भलतंच धोकादायक निघतं. आता प्रश्न केवळ प्रेमाचा वा मैत्रीचा उरत नाही, जीवन मरणाचा होतो.
मी मघा म्हटल्याप्रमाणे या चित्रपटाचा विषयही व्यावसायिक चित्रपटाला साजेसा आहे, हे तर खरंच, मात्र त्याची हाताळणी ही पूर्णपणे वेगळी आहे. २००५मधल्या जेम्स सॅलीस यांच्या कादंबरीवर तो आधारलेला आहे, अन् वरवर पाहाता तो निओ न्वार या वर्गात सहजपणे बसू शकतो. मात्र मी त्याला एका वर्गात बसवणं टाळेन. त्यातल्या व्यक्तिचित्रणाचा किंवा सूडनाट्याचा भाग न्वार शैलीचा असला, तरी ड्रायव्हर आणि आयरीन यांच्यातलं जवळजवळ काव्यात्म पातळीवर जाणारं नातं हे कलात्मक प्रेमकथेसारखं आहे. न्वार नायकांचा आवाज, दृष्टिकोन अथवा निवेदन हे फार ठाशीव असतं. इथला ड्रायव्हर हा मितभाषी आहे, बुजराच म्हणाना. त्याचं गप्प राहाणं, चेह-यावरचे भाव, हलकी स्मितरेषा, अन् एखाद दुसरं रोजच्या बोलण्यातलं वाक्य यातून ही व्यक्तिरेखा पूर्णपणे उभी राहते. पण याचा अर्थ, तो प्रेमकथेपुढे इतर गोष्टी दुय्यम मानतो असं नाही. एकदा का गोष्टी बिनसायला लागल्या की ड्रायव्हरचं व्यक्तिमत्त्व जणू बदलतं अन् आपल्या जवळच्या व्यक्तीला वाचविण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. चित्रपटाचा हा उत्तरार्धातला भाग प्रत्येकाला पाहावेल याची खात्री नाही. टेरेन्टीनो किंवा गास्पार नोए यांच्या चित्रपटांवर पोसलेल्या प्रेक्षकांसाठी मात्र हा भाग सर्वात मोठा पे ऑफ ठरावा. इररिव्हर्सिबलमधल्या फायर हायड्रन्ट प्रसंगाची आठवण करून देणारा लिफ्टमधला प्रसंग किंवा मोटेलमधल्या खोलीतलं हत्याकांड यासारखे काही अतिशय हार्डकोअर प्रसंग ड्राईव्हमधे सहज आणि उपरे न वाटता येतात.
एकाच वेळी प्रेमकथा, थ्रिलर, वेस्टर्न, न्वार अशा विविध डगरींवर पाय ठेवणारा हा चित्रपट सबटेक्सकडेदेखील दुर्लक्ष करीत नाही. गाडीला केवळ अ‍ॅक्शनला वाव देणारा घटक न मानता तिचा मेटॅफोरीकल पातळीवर जाणारा वापर इथे दिसतो. सुटकेचं साधन, उपजीवीकेची सोय, प्रेमाची सुरुवात, सूडाचा मार्ग आणि शापित धनाचं वसतिस्थान अशा वेगवेगळ्या रूपात इथे `गाडी` आपल्याला भेटते. इथल्या प्रत्येक पात्राची झालं गेलं विसरून नवा डाव मांडण्याची इच्छा, पापाचं परिमार्जन अन् मोक्षाचा लागलेला वेध यातूनही चित्रपट आपला आशय अधिक समृद्ध करीत जातो. इथलं आयरीनचं पात्र हे इतर सर्वांच्या रक्तरंजीत भूत अन् वर्तमानापलीकडे जाणारं, उज्ज्वल भविष्याची आशा दाखविणारं आहे. तिचं आटोक्याबाहेर राहाणं हीच या पात्रांची शोकांतिका.
ड्राईव्हरचं वेगळं असणं हे सर्वांच्याच चटकन लक्षात येतं, मात्र व्यावसायिक चित्रपटाची सवय झालेला प्रेक्षक या वेगळेपणाला बिचकण्याची शक्यता असते. तसं न करता हा वेगळेपणा पूर्वनियोजित अन् आवश्यक मानला, तर या चित्रपटाकडून काय घेण्यासारखं आहे, हे सहज लक्षात येईल.

- गणेश मतकरी.

14 comments:

Unknown October 4, 2011 at 2:41 AM  

अर्धवट लेख आहे असे वाटत आहे.
बाकी बघावा असा विचार करतोय,

ganesh October 4, 2011 at 5:55 AM  

there was a problem with positing. now its proper. still; ,third meaning of Drive is incomplete. but rest of it is complete.

हेरंब October 4, 2011 at 7:58 AM  

लवकरच बघणार.. मग पुन्हा कमेंटतो.

Suhrud Javadekar October 4, 2011 at 7:28 PM  

As usual,very well written...liked the 'Ardhsatya' analogy...'Drive' is a near perfect mix of mainstream and parallel cinema...ideally this is what all films should be, I think...the psychology of the driver fascinated me...he's both ruthless and tender...

Vishalkumar October 4, 2011 at 11:51 PM  

नमस्कार गणेशजी,
नेहमी प्रमाणे आणखी एका दर्जेदार सिनेमाची ओळख करुन दिल्याबद्दल आभार. आपल्या ब्लॉग वर दिलेले चित्रपट शोधुन पाहण्यात सध्या वेळ मजेत जातोय, आनंद तर मिळतोच आहे, पण बरच काहीतरी नवीनही गवसतय.
तरी एक प्रश्न होता, समांतर सिनेमा आणि व्यावसायिक सिनेमा हा भेद फक्त भारतीय सिनेमातच आढळतो की इतर देशातील सिनेमातही हा असा फरक केला जातो?

ganesh October 5, 2011 at 4:03 AM  

Thanks suhrud, vishal. Vishal, in the countries where cinema has developed in a very conventional manner, there is a counter cinema which is designed for a limited audience .it usually caters to particular tastes , is usually low budget and is mostly honest expression of the filmmaker. American independant cinema ( aka indie films) is most important example of this. Drive is from this category . Many other countries have cinema for masses as well as minority but there may not be specific distinction. Lot of european audience is used to see a variety of cinema and have no need for such distinction.

Suhrud Javadekar October 5, 2011 at 7:29 PM  

So Ganesh, is it true that Europe doesn't have any 'parallel' cinema? Also isn't it true that mainstream cinema is for 'masses' and parallel cinema for 'classes'?

ganesh October 5, 2011 at 8:29 PM  

some of the countries. for example, france has lot of main stream as well as parallel, though i am not sure if they have a term. a general popular term is art house cinema, but thats not a very country specific term. also, its true that commercial cinema is for masses , simply because it caters to most tastes. i don't believe in 'classes' ,as i don't believe in cultural elite. anyone who is interested enough should appreciate the other cinema, though as everyone can't , so i will say its for a limited ,or select audience.

Pradip Patil October 8, 2011 at 9:42 PM  

A daring film,brilliantly made.Ryan Gosling is amazing.Top notch in every department. Ganesh why don't you write in detail about every aspect of the film once in a while? I would love to read an article about the visual style of this film. It was amazing..
Or do let me know if there are some other articles.

Abhijit Bathe October 31, 2011 at 7:43 PM  

ड्राईव्ह मधला सगळ्यात आवडणारा प्रसंग म्हणजे पहिला चेस. उशीर करणारा चोर फायनली गाडीत येतो आणि गॉस्लिंग सुटणार असं वाटत असताना तो शांतपणे गाडी बाजुला घेऊन पोलिस येण्याची आणि जाण्याची शांत वाट बघत बसतो तो. Somehow Inglorious Basterds च्या पहिल्या सीन ची आठवण झाली - patience was the key.

BTW - someone sued the producer here for misleading promos! :))

Priyaranjan Anand Marathe January 21, 2012 at 7:05 PM  

http://www.iforeye.blogspot.com/2012/01/more-on-drive-film-appreciation-session.html

Hey Ganesh, need to watch the movie once again. Thanks for writing.

simply nitin May 31, 2012 at 11:52 PM  

मी सिनेमा आधी पहिला आणि तुमचा ब्लोग नंतर वाचाल. प्रामाणिक पणे चित्रपटाचे कथानक अगदी सामान्य आहे ते संथ टेकिंग करून उगाच काहीतरी दाखवण्याच आव आणते. चित्रपटातला रक्तपात अगदीच unnecessary वाटतो. generally अंडर प्ले केला कि great अक्टिंग आणि slow taking असले कि intelactula सिनेमा असण्याच भ्रम लोकांना पडतो. with all due respect to your cinema knowledge, i think you have overrated this film.

simply nitin May 31, 2012 at 11:52 PM  
This comment has been removed by the author.
Vivek Kulkarni June 14, 2012 at 8:50 AM  

मला चित्रपटापेक्षा निकलसचा चित्रपटासाठी ड्राईव ही कादंबरी त्याचा दृष्टीकोन सांगण्यासाठी निवडणं महत्वाचं वाटतं. खूप वर्षापूर्वी सायको चित्रपट बनवण्यासाठी हिचकोकने हेच केले होते. मला हॉलीवूडवाल्यांचे नेहमीच यासाठी कौतुक वाटत आले आहे. ते सामान्य वाटणाऱ्या कथा-कादंबरीना अतिशय उच्च दर्जाचा चित्रपट तयार करून खूप उंचीवर नेऊन ठेवतात.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP