‘पिना’ - तिस-या मितीतला उन्माद
>> Monday, October 24, 2011
कलावंत व्यक्त होण्यासाठी कोणतं माध्यम अन् तंत्र निवडतो, हे त्याच्या प्रतिभेच्या आविष्कारासाठी फार महत्त्वाचं ठरतं. तेदेखील अगदी मूलभूत पातळीवर! आपण जेव्हा हा आविष्कार पाहतो, तेव्हा कलावंताने केलेली निवड योग्य आहे अथवा नाही, हे आपल्याला कोणीही न सांगता आपसूक कळतं. आणि ती निवड योग्य असल्यास आपण त्या कलाकृतीला मनापासून दादही देतो. ‘मुंबई अॅकेडमी ऑफ मूव्हिंग इमेज’(मामि)च्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकताच पाहायला मिळालेल्या ‘पिना’ या जर्मन माहितीपटाने अशा अचूक निवड करणाऱ्या दोन कलावंतांची ओळख करून दिली. पहिली होती- २००९ मध्ये निदानानंतर पाचच दिवसांत कॅन्सरचा बळी ठरलेली जर्मन नर्तकी, नृत्यशिक्षिका, कोरिओग्राफर पिना बॉश आणि दुसरा होता- ‘न्यू जर्मन सिनेमा’मध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणारा पूर्वपरिचित दिग्दर्शक विम वेन्डर्स.
‘पिना’ला डॉक्युमेंटरी म्हणणे हे तंत्रशुद्ध व्याख्येत बसणारं आहे. म्हणजे हा कथाप्रधान, कल्पित घटनांवर आधारीत चित्रपट नव्हे, तर पिना बॉशच्या कामाकडे प्रत्ययकारी पद्धतीने पाहणारं, त्याची नोंद घेणारं व्हिडीओ डॉक्युमेंट आहे. मात्र, एकदा हा बाह्य़ाकार गृहीत धरला, की त्याचं सांकेतिक माहितीपटांशी असणारं साम्य संपुष्टात येतं. मग आकार घेतो तो एक अनुभव.. पडदा आणि प्रेक्षकांमधलं अंतर पुसून टाकणारा, आपल्याला या नृत्याविष्काराचा प्रत्यक्ष साक्षीदार बनविणारा!
सामान्यत: माहितीपट हे ज्या व्यक्तिमत्त्वावर आधारीत असतात, त्याच्या कार्याचा तपशिलात आढावा घेणं पसंत करतात. म्हणजे त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, कार्याची सुरुवात, कामातले अन् आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे, सन्मान या साऱ्यांच्या उल्लेखातून ते त्या व्यक्तीला एक संदर्भाची चौकट देण्याचा प्रयत्न करतात. ज्या व्यक्तींच्या मुलाखती असतात- त्यांची ओळख करून दिली जाते. त्यांचा चरित्रनायकाशी संबंध जोडला जातो. या सगळ्यातून त्या व्यक्तीचं आयुष्य अथवा माहितीपटाचा फोकस असणारा जीवनकाल स्पष्ट व्हावा, असा हेतू असतो. दिग्दर्शक विम वेन्डर्स या दृष्टिकोनालाच बाजूला सारतो आणि पिनाच्या नृत्यकलेलाच केंद्रस्थान देऊ करतो.
‘पिना’च्या निर्मितीच्या वेळी जर पिना हयात असती तर या माहितीपटाकडे कदाचित थोडय़ा वेगळ्या अंगाने पाहिलं गेलं असतं. पिनाच्या स्वत:च्या कामाकडे पाहण्याला, बोलण्याला तर जागा मिळाली असतीच, वर कदाचित तिचं व्यक्तिगत आयुष्यही त्यात डोकावलं असतं. दुर्दैवाने झालं असं की, चित्रपटाची जमवाजमव सुरू असतानाच पिनाला मृत्यू आला. माहितीपटाचं काम थांबलं. मात्र, पिनाच्या नृत्यसंस्थेतल्या- ‘टान्झथिअटर वुपरताल’मधल्या तिच्या शिष्यांनी, सहकाऱ्यांनी, चमूने वेन्डर्सला काम न थांबविण्याची विनंती केली आणि हा अनपेक्षित माहितीपट तयार झाला. चित्रपटातल्या नामनिर्देशाप्रमाणेच पाहायचं तर ही फिल्म ‘पिना’विषयी नसून, ‘पिना’साठी आहे. तिच्या आविष्कारांतला उन्माद तिच्या चाहत्यांबरोबरच जगभरातल्या इतर रसिकांपर्यंत पोहोचविणारी ही आदरांजली आहे.
पिनाची नृत्यं ही कोणत्याही अभिजात नृत्यप्रकाराशी जोडलेली नाहीत; जरी बॅलेसारख्या परंपरांचा तिच्यावर प्रभाव असला, तरीही. जर्मन एक्स्प्रेशनिझमच्या प्रभावाखाली चित्रकलेपासून वास्तुशास्त्रापर्यंत जी अनेक क्षेत्रं आली, त्यात नृत्यदेखील होतं. संकेतांना न जुमानता व्यक्त होण्याला महत्त्व देणाऱ्या या शैलीतल्या कामासाठी नावाजलेले कर्ट जूस हे पिनाचे गुरू होते. त्यामुळे पिनाच्या नृत्यरचनांमध्येही या शैलीची झाक दिसली तर आश्चर्य नाही. मात्र, त्याहीपलीकडे जाऊन पाहिलं तर या कामात नृत्याबरोबरच नाटय़देखील जाणवण्यासारखं आहे. स्त्री-पुरुषांमधल्या नात्याविषयीचं भाष्य, पॉवर प्ले, व्यक्ती आणि समूहाचा वेगवेगळ्या पातळ्यांवरला अभ्यास, त्याचबरोबर नवरसांमधल्या प्रत्येकाचा सूचक नाही, तर ठाशीव, थेट वापर इथे करण्यात आलेला दिसतो. तिच्या नृत्यांना कथानक नसलं तरी त्यात प्रसंगानुरूप रचनेला येणारं महत्त्व आहे, विचारांना विशिष्ट दिशा आहे, केवळ लय अन् सौंदर्य यापलीकडे जाणारं काहीतरी आहे; जे पिना आपल्या चमूकडून प्रत्यक्षात उतरवू शकते.
वेन्डर्सचा प्रयत्न आहे तो हे सारं आपल्या फिल्ममध्ये टिपण्याचा. नृत्यामध्ये अवकाशाला खूप महत्त्व असतं. नर्तकांनी व्यापलेली जागा, प्रत्येक नर्तकाला असणारा इतर नर्तकांचा, प्रेक्षकांचा अन् परफॉर्मिग स्पेसचा संदर्भ याकडे दुर्लक्ष करणं शक्य नाही. विम वेन्डर्स जेव्हा हे जसंच्या तसं आपल्या कॅमेऱ्यात पकडायचं अन् प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं ठरवतो, तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की, हा अनुभव शक्य तितका जिवंत ठेवण्यासाठी सादरीकरणाचं तंत्र कोणतं वापरावं? वेन्डर्सने या प्रश्नाला शोधलेलं थ्री-डी सादरीकरणाचं उत्तर हे प्रेरक आणि अगदी योग्य आहे.
थ्री-डी हे अनावश्यक, केवळ व्यावसायिक स्वरूपाचं तंत्रज्ञान असल्याची तक्रार आपल्या नित्य कानावर पडते. काही प्रमाणात ती योग्यदेखील आहे. खासकरून जेव्हा साध्या, द्विमिती संकल्पना असणाऱ्या चित्रपटांना केवळ अधिक नफा मिळविण्याच्या हेतूने तिसरी मिती लावली जाते, तेव्हा पडद्यावरला परिणाम हा असमाधानकारक असतो. व्यावसायिक चित्रपटांतही केवळ मनोरंजनाचा हेतू गृहीत धरूनही गंभीरपणे आणि थ्री-डीचे फायदे-तोटे लक्षात घेऊन केलेलं काम दर्जेदार असतं, हे पिक्झारचे काही चित्रपट अन् कॅमेरॉनचा ‘अवतार’ यांनी सिद्ध केलेलं आहे. मात्र, फॅन्टसी विषय पकडणाऱ्या अन् पडद्यावरून प्रेक्षकांच्या दिशेने वस्तू फेकणाऱ्या थ्री-डीपेक्षा या चित्रणातल्या अवकाशाची खोली दाखविण्याच्या शक्यतेचा उत्तम वापर काही फिल्म्सनी अलीकडे सुरू केलेला आहे. लाइव्ह परफॉर्मन्सचा दर्जा छायाचित्रणात पकडता येणाऱ्या कॉन्सर्ट फिल्म्स या थ्री-डी चित्रणात नव्याने पुढे येतायत. विम वेन्डर्सला आपल्या चित्रपटासाठी हे तंत्र वापरण्याची स्फूर्ती ‘यू-२’ या बॅण्डच्या कॉन्सर्ट फिल्मवरून सुचली. मात्र, इथे रंगभूमीचा वापर अधिक कलात्मक असल्याने तंत्राचा उपयोगही अधिक अर्थपूर्ण अन् आवश्यक वाटणारा झाला आहे. इतका, की हा माहितीपट एकदा चित्रपटगृहात पाहिल्यावर तो छोटय़ा पडद्यावर किंवा थ्री-डीशिवाय पाहण्याची कल्पनाही सहन होऊ नये.
वेन्डर्स प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या प्रकारांत आपला विषय पकडतो. पिनाच्या नृत्यप्रयोगांमधले चार महत्त्वाचे प्रयोग त्याने या फिल्मसाठी निवडले आहेत. आणि या प्रयोगातल्या महत्त्वाच्या जागा तो प्रेक्षकांना जणू प्रत्यक्ष प्रयोगाच्या ठिकाणी उपस्थित असल्याच्या थाटात दाखवतो. मात्र, प्रेक्षागृह हे जवळपास खऱ्यासारखं- कधी रिकाम्या खुच्र्या, तर कधी त्यावरल्या प्रेक्षकांसह दाखवलं जातं. चित्रपट असल्याचा फायदा म्हणजे ही चौकट दाखवून दिल्यावर गरजेप्रमाणे कॅमेरा नर्तकांच्या जवळ जाऊन नृत्याला अधिकाधिक परिणामकारक पद्धतीने दाखवू शकतो.
या नृत्यप्रयोगांत पिनाची प्रयोगशील वृत्ती दिसते. ‘राईट ऑफ स्प्रिंग’मधलं रंगमंचावर पसरलेल्या मातीत केलेलं जोरकस नृत्य, ‘कॅफेम्युलर’मधले डोळे मिटून स्वैर वावरणारे नर्तक आणि सर्वत्र पसरलेल्या टेबल-खुच्र्या त्यांच्या वाटेतून बाजूला सरकवणारे काळे सूट, ‘कॉन्टाक्टॉफ’मधली खुच्र्याची शर्यत आणि व्हॉलमॉण्डमध्ये रंगमंचाचा बराच भाग अडविणाऱ्या प्रचंड खडकाच्या आजूबाजूला पावसात धुमाकूळ घालणारे नर्तक.. यातलं सारंच आपल्याला थक्क करून सोडणारं, पिनाच्या प्रेमात पाडणारं आहे. प्रत्यक्ष फिल्ममधलं तिचं दर्शन अगदी थोडकं असूनही आपल्याला तिच्या जवळ नेणारं आहे.
हा भाग सोडता उरलेला वेळ दिग्दर्शक स्वतंत्र नर्तकांच्या पिनाबद्दलच्या निरीक्षणाला अन् त्यांच्या स्वतंत्र सादरीकरणांना देतो. हा बराचसा भाग निसर्ग, फॅक्टरी, बोगदा, स्विमिंग पूल अशा आपल्या परिचयाच्या जागांची पाश्र्वभूमी घेऊन येतो. मात्र, समोर घडणारं नृत्य या नेहमीच्या दृश्यचौकटींना अलौकिक करून सोडतं.
वेन्डर्स जशी पिनाची पाश्र्वभूमी संदर्भासहित स्पष्ट करीत नाही, तशीच समोरच्या नर्तकांचीही. त्यातले बहुतेक सारे निनावीच राहतात. कारण या माहितीपटाच्या अलिखित नियमाप्रमाणे महत्त्व आहे ते नृत्याला, सादरीकरणाला, व्यक्त होण्याला! व्यक्तींना, स्थळांना नाही.
‘पिना’ संपता संपता एक नर्तकी म्हणते की, ‘पिना ही आम्हा साऱ्यांच्याच व्यक्तिमत्त्वाचाच भाग होती; किंवा त्याउलट- म्हणजे आम्हीच तिचे अंश होतो.’ जणू आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व हरवून एकमेकांशी अन् नृत्याशी एकरूप झालेल्या या वेडय़ा माणसांची ‘पिना’ विम वेन्डर्सच्या या कलाकृतीमधून अविस्मरणीय झाली आहे. ‘अद्भुत’ हे विशेषण वापरता येईल असा माहितीपट विरळा; पण ‘पिना’बद्दल हे एकच विशेषण चपखल बसणारं आहे.
- गणेश मतकरी (लोकसत्तामधून)

0 comments:
Post a Comment