`मार्जिन कॉल` ः `अर्थ`पूर्ण चित्रपट

>> Monday, October 17, 2011


`ग्रीड, फॉर ए लॅक ऑफ ए बेटर वर्ड, इज गुड` 

- गॉर्डन गेक्को, वॉल स्ट्रीट.
चित्रपट माध्यमाबद्दल जे अनेक गैरसमज असतात, त्यातला हे केवळ दृश्य माध्यम आहे, हा एक प्रमुख गैरसमज. प्रेक्षकांहून अधिक दिग्दर्शकांमध्ये असणारा. त्यामुळे मग आशयावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा कथानक फिरतं ठेवण्यावर दृश्यचमत्कृती साधण्यावर अनेकांचा भर असतो. गरजेपेक्षा अधिक स्थळं वापरणं, पात्रांना फिरवत ठेवणं, नको तेव्हा नको ते फ्लॅशबॅक वापरणं इत्यादी खेळ या दिग्दर्शकांना गरजेचे वाटतात. (आपल्याकडे तर नाचगाण्यांनी या तथाकथित दृश्यप्रेमाला अधिकच धुमारे फुटतात.) खरं सांगायचं तर दिग्दर्शकाला आपल्याला प्रेक्षकांपर्यंत काय पोहोचवायचं हे माहीत असेल, तर हे दृश्यप्रेम अनावश्यक असतं. चित्रपटात दृश्याइतकंच महत्त्व ध्वनीला असतं, आणि प्रगल्भ आशय मांडायचा तर संवादाचं महत्त्व कोणीच नाकारू शकत नाही. चित्रपटांमधून व्यक्त होणा-या आशयात जमीन अस्मानाचा फरक पडला तो मूकपटांचा काळ गेल्यावर, हे आपण विसरू शकत नाही. अर्थात, याचा अर्थ दृश्य भाग अनावश्यक आहे असा नाही, मात्र विषयानुरूप समतोल आवश्यक.
यामुळेच चांगला दिग्दर्शक हा मर्यादित स्थळ काळात कधीकधी एकाच जागी, काही तासांत कथानक घडवायलाही मागे पुढे पाहात नाही. अनेक उत्तम नाटकांची चित्रपटरुपांतरं या न्यायाने पडद्यावर आली आहेत. मात्र केवळ नाट्यरुपांतरंच असं मात्र नव्हे. उदाहरणच द्यायचं, तर यंदाच्या मामि चित्रपट महोत्सवातल्या `मार्जिन कॉल`  चित्रपटाचं देता येईल. साधारण छत्तीसेक तासाच्या कालावधीत वॉल स्ट्रीटवरल्या एका मोठ्या थोरल्या ब्रोकरेज कंपनीत हा चित्रपट घडतो. कॅमेराही इमारत सोडून बाहेर जात नाही असं नाही, मात्र जातो तो क्वचित आणि तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रसंगात. त्याचा प्रमुख भर हा इमारतीत घडणा-या नाट्यावरच आहे. हे नाट्यदेखील बरंचसं संवादी आहे. उत्तम छायाचित्रणाची साथ असूनही चित्रपट नको त्या चमत्कारात प्रेक्षकाला गुंतवू इच्छित नाही. त्याचं वैशिष्ट्य हे तो जी परिस्थिती मांडतो आहे त्या परिस्थितीत, त्या परिस्थितीत अडकलेल्या व्यक्तिरेखांत आणि या प्रसंगापुरती या व्यक्तिरेखांची बाजू मांडणा-या संवादात आहे. गंमत म्हणजे चित्रपट आपल्यापुढे दोन बाजू ठेवत नाही. स्टॉक ब्रोकर्स आणि त्यांचे (अंधारात असणारे) क्लायन्ट्स या दोन्ही बाजू आपल्याला स्पष्टपणे दिसत नाहीत. दिसणारी बाजू एकच आहे, मात्र तिचं आपल्याला दिसणं, हे आपसूकच दुस-या बाजूबद्दल सुचवणारं आहे.
ब-याचशा सामाजिक उलथापालथ घडविणा-या, वा तत्सम इतर महत्त्वाच्या घटनांवर आधारित चित्रपट हे दोन प्रकारात विभागलेले दिसतात. काही चित्रपट हे त्या घटनांचा आढावा घेतात, विश्लेषण करतात तर इतर काही या घटनांची पार्श्वभूमी गृहीत धरून, त्यातल्या काही विशिष्ट जागांकडे तपशीलात पाहातात. उदा. ९/११ दरम्यानच्या घटनांकडे पाहायचं तर सिरिआनासारखा चित्रपट प्रत्यक्ष घटनेकडे निर्देष न करता सत्ताधारी उद्योगपती आणि दहशतवादी यांच्या दृष्टचक्राकडे बोट दाखवितो, `वर्ल्ड ट्रेड सेंटर`सारखा चित्रपट प्रत्यक्ष घटनांकडे पाहतो, तर `युनायटेड ९३`  त्याहून जवळ जाऊन एका विमानप्रवासाकडे बारकाईने लक्ष पुरवतो, जे विमान हल्ल्याच्या नियोजित स्थळापर्यंतही पोहोचू शकलं नाही.
फिनान्शिअल क्रायसिस या मार्जिन कॉलच्याच विषयासंबंधी बोलायचं झालं तर त्याचीही अशी दोन उदाहरणं देता येतील. वॉल स्ट्रीट (१९८७) मधे स्टॉक एक्स्चेंजने पैशाला आणलेल्या कृत्रिम फुगवट्याकडे नजर टाकली होती, तर रिअल इस्टेट एजन्सीमधे दोन दिवसांच्या कालावधीत घडणा-या `ग्लेनगॅरी ग्लेन रॉस` (१९९२)ने आर्थिक अस्थिरतेकडे इशारा केला होता. दोन्ही चित्रपटांचा एकमेकांशी थेट संबंध नसला तरी एका कालावधीतल्या गोंधळलेल्या अर्थकारणाचाच संदर्भ दोन्ही चित्रपटांना होता.
नाटककार डेव्हिड मॅमेटच्या नाटकाचं रुपांतर असणारा `ग्लेनगॅरी ग्लेन रॉस` हा मार्जिन कॉल पाहाताना चटकन आठवतो. याचं काऱण दोन्ही चित्रपटात केव्हिन स्पेसीची असणारी महत्त्वाची भूमिका इतकंच नाही. मार्जिन कॉलची प्रकृती अन् मांडणी देखील बरीचशी नाटकासाऱखीच आहे. खूप काही घडवणारं कथानक नसून व्यक्तिरेखा आणि विचारांना या दोन्ही चित्रपटात महत्त्व आहे. अर्थात इथल्या संवादाना मॅमेटच्या संवादाइतकी धार नाही. तशी अपेक्षा करणंही चूक ठरेल. तरीही पटकथा आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदा-या जे.सी कॅन्डर यांनी सफाईनं पार पाडल्या आहेत.
ग्लेनगरीमधे रिअल इस्टेट फर्ममधे काम करणा-या सर्व पातळ्यांवरल्या लोकांची जंत्री होती, इथे ती ब्रोकरेज कंपनीत काम करणा-यांची आहे. तिथल्याप्रमाणेच  इथलीही कास्ट पुरेशी स्टार स्टडेड आहे. जेरमी आयन्स, केविन स्पेसी, स्टॅनली टुकी, पॉल बेटनी, डेमी मूर, झॅलरी क्विन्टो हे सारे हॉलीवूडचे चित्रपट पाहणा-यांना परिचयाचे आहेत. मार्जिन कॉल पाहाताना मात्र आपण हॉलीवूड स्टार्सची कामं पाहात असल्याचा भास होत नाही. मार्जिन कॉल हा थ्रिलर नाही, कारण यात दिसणा-या घटना या सत्य परिस्थितीवर आधारित आहेत.ते सत्य घटनांचं नाट्यरूप नसलं, तरी स्टॉक मार्केट क्रॅशची त्याला असलेली पार्श्वभूमी काल्पनिक नक्कीच नव्हे. मात्र असं असूनही थ्रिलर चित्रपटात पाहायला मिळणारी एक प्रकारची अर्जन्सी, पुढे काय होणार याबद्दलचं कुतूहल तो पाहताना वाटत राहतं. या वाटण्याचा वापर चित्रपट प्रेक्षकांना मॅनीप्युलेट करण्यासाठी वापरत नाहीस ही त्याची जमेची बाजू.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच अमेरिकन जॉब मार्केटमधील वातावरण दिसायला लागतं. वॉल स्ट्रीटवरल्या इन्व्हेसमेण्ट बँकेतलया अनेक कर्मचा-यांना बाहेर पडावं लागणार असतं. त्यातलाच एक असतो रिस्क अँनालिस्ट एरिक (स्टॅनली टुकी). एरिकने सुपूर्द केलेल्या कागदपत्रांचा आढावा घेताना पीटर सलीवन (झॅकरी पिंटो) च्या लक्षात येतं, की कंपनी एका प्रचंड आर्थिक संकटात सापडली आहे, आणि काही मार्ग काढायचा तर आपल्या वरच्या लोकांना तत्काळ सांगितलं पाहिजे. त्याच्या वरच्या पायरीवरल्या विल इमरसन (पॉल बेटनी) पासून सुरू झालेली ही मालिका थेट टॉप बॉस असणा-या जॉन टल्ड (जेरमी आयन्स)पर्यंत पोहोचते आणि कंपनीला या ना त्या मार्गाने वाचविण्याचे प्रयत्न सुरू होतात.
या चित्रपटाच्या पटकथेतलं एक मोठं आव्हान म्हणजे स्टॉक मार्केटमधले किचकट तपशील वगळून गोष्ट कळेलशी ठेवणं. कथानक बरंचसं बोर्डरूम्समधे घडत असल्याने अन्  कंपनींच्या अडचणीवरला तोडगा हाच या संभाषणाचा हेतू असल्याने काम अधिकच कठीण. बहुदा त्यामुळेच चित्रपटातलं प्रत्येक पात्र दुस-याला साध्या भाषेत बोलण्याची सूचना करीत राहतं. असं सोपं बोलत राहिल्याने आणि खूप तपशीलात न जाता अडचण आणि उपाय या दोन्ही गोष्टी प्रातिनिधीक ठेवल्याने, जॉन टल्ड असणा-या मोठ्या बोर्ड मीटिंगसारख्या एखाद्या प्रसंगाचा अपवाद वगळता चित्रपट सहज समजतो. अन् जेव्हा बोलणं खरंच गुंतागुंतीचं होतं तेव्हाही आपण मथितार्थ समजून घेऊ शकतो.
अशा चित्रपटांत, जिथे प्रेक्षकांना सहजपणे आयडेन्टिफाय होता येईल अशी पात्र नसताना, चित्रपट प्रेक्षकांचा प्रतिनिधी म्हणून कोणाला वापरतो याला महत्त्व येतं. मार्जिन कॉल्समधे अशी दोन पात्र आहेत. पहिला आहे तो ज्याला या प्रकरणातील अडचण प्रथम जाणवते, तो पीटर. पीटर या उद्योगातला असला तरी मुरलेला नाही.
निर्ढावलेला नाही. त्याचा दृष्टीकोन हा त्रयस्थ आहे. तो प्रेक्षकाला कथानकात प्रवेश मिळवून देतो. दुसरा अँन्कर आहे तो सॅम (केविन स्पेसी) हा य़ा निष्ठूर उद्योगात असूनही आपली माणूसकी विसरलेला नाही. आपल्या कृतीची जबाबदारी म्हणून तो राजीनामा देण्याची तयारी ठेवतो. आणि अखेर कोट्यानी रुपये मिळत असतानाही आपल्याला पैशाची गरज आहे हेदेखील खालच्या मानेने मान्य करतो. सॅमला जाणवणारा भावनिक,मानसिक धक्का हा प्रेक्षकापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे या व्यक्तिरेखेला चित्रपटाचं भावनिक केंद्र म्हणता येईल. पीटर आणि सॅम हा चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला अपरिचित अशा विश्वाशी आपली ओळख करून देतात.
मार्जिन कॉल भारतात प्रदर्शित होईल की नाही हे माहीत नाही, मात्र अशा प्रकारचे चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्याक़डे वितरकांच्या अर्थनीतीमुळे केवळ ब्लॉकबस्टर चित्रपटांना खुला प्रवेश आहे. त्यामुळे अमेरिकेत व्यावसायिक चित्रपटाला समांतर असलेल्या आशयप्रधान चित्रपटाशी आपला परिचय नाही.
असे चित्रपट पाहून तो होण्याची शक्यता तयार होते. अर्थात सध्या चित्रपट प्रदर्शित होणं हा काही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग नाही. हे पुन्हा वेगळं सांगायला नको !
- गणेश मतकरी.

4 comments:

aativas October 18, 2011 at 2:22 AM  

मी खर तर चित्रपट फारसे पहात नाही - ते मला 'जमत' नाही. पण तुम्ही लिहिलेली परीक्षण वाचायला लागल्यापासून नव्या गोष्टी कळायला लागल्या या माध्यमाबाबत.

Abhijit Bathe October 31, 2011 at 7:31 PM  

Have'nt seen the movie but saw the trailer when I went for 'Drive'. It said something on the lines of 'as good as Glengerry Glen Ross' - Is it?

VIND December 3, 2011 at 8:28 AM  

can you write about

http://www.imdb.com/title/tt0905372/

some of them say 1982 film was more good than this one

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP