मॉसिए वर्दू (१९४७) - गडद चॅप्लीन

>> Sunday, October 9, 2011

`फॉर थर्टी इयर्स, आय वॉज अ‍ॅन ऑनेस्ट बॅँक क्लर्क. अन्टिल द डिप्रेशन ऑफ १९३०, इन विच इयर आय फाऊन्ड मायसेल्फ अनएम्प्लॉईड. इट वॉज देन आय बीकेम ऑक्युपाइड इन लिक्वि़डेटिंग मेम्बर्स ऑफ द ऑपॉझिट सेक्स`   -हेन्री वर्दू 
दुर्दैवाने आपल्याकडे चार्ली चॅप्लीनला आजही विनोदाशीच जोडलेलं दिसतं. एक उत्तम दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून त्याचं कौतुक झालेलं जसं दिसत नाही, तसंच त्याच्या पुढल्या काळातल्या म्हणजे `ग्रेट डिक्टेटर` नंतरच्या चित्रपटांविषयी देखील कोणी फार बोलत नाही. त्याच्या सुरुवातीच्या शॉर्ट फिल्म्स सोडल्या तर त्याच्या पूर्ण लांबीच्या चित्रपटामधे ब-याचदा गंभीर आशय हा विनोदाच्या बरोबरीने मांडला जातो, हे तर खरंच आहे. सिटी लाईट्स, मॉर्डन टाइम्स, गोल्ड रश यांचा विचार आजही आपण केवळ त्यातल्या स्लॅप स्टीक विनोदासाठी करणं हे वेडेपणाचं होईल. एक मात्र खरं की मूकपटांच्या काळात अ‍ॅक्शनला आपोआप मिळणा-या प्राधान्यामुळे अन् चॅप्लीनच्या या शैलीवर असलेल्या अंगभूत प्रभुत्वामुळे त्यातला विनोद हा लक्षवेधी नक्कीच होता. मात्र या चित्रपटांना विनोदाचा स्टॅम्प लावून त्यांच्या एकूण आशयाला डावलणं हे योग्य नाही.
चॅप्लीनच्या चित्रपटांनी बोलायला सुरुवात उशीरा केली, आणि त्याने फार बोलपट बनविले नाहीत, मात्र त्याच्या बोलपटांनी कोणाची भीडभाड न ठेवता मतप्रदर्शनाला लागलीच सुरुवात केली. डिक्टेटरच्या नाझीविरोधी कथानकाने त्यावर सहजासहजी आक्षेप निघाले नाहीत, मात्र `मॉसिए वर्दू` (१९४७) पासून मात्र चॅप्लीन वादग्रस्त ठरायला सुरुवात झाली. वर्दूनंतरचे लाईमलाईट (१९५२) आणि ए किंग इन न्यू यार्क (१९५०) हे अमेरिकन जनतेपासून अनेक वर्षं दूर ठेवले गेले. वर्दू आणि किंग इन न्यू यॉर्कमधल्या राजकीय टीका स्वरूपाच्या आशयाने सामान्य नागरिक आणि समीक्षक या सा-यांनीच चॅप्लीनवर टीकेची झोड उठवली. जेम्स एजीसारखे मोजके समीक्षक सोडले, तर तात्कालिन अमेरिकन समाज चॅप्लीनवर उलटला आणि पुढली अनेक वर्षं हे गढूळ वातावरण तसंच राहीलं.
युरोपात या चित्रपटांचंही यथायोग्य स्वागत झालं, मात्र आपण सर्वसाधारणपणे अमेरिकेचा कित्ता गिरवत असल्याने आपण या चित्रपटांपासून दूर राहिलो आणि चॅप्लीनचा जगन्मान्य विनोद हाच आपण लक्षात ठेवला. चॅप्लीनला बदनाम करणा-या अन् पुढे अमेरिकेतून बहिष्कृत करणा-या वादळाची सुरुवात, ही मॉसिए वर्दूपासून झाली.
चॅप्लीनची गरीब, बेघर, समाजाचं प्रतिनिधित्व करणारी ट्रॅम्पची व्यक्तिरेखा ही ग्रेट डिक्टेटरआधीच्या चित्रपटांमध्ये गाजलेली होती. डिक्टेटरमधे गरीब न्हावी अन् हिटलरसदृश्य हुकूमशहा ही पात्र असल्याने ट्रॅम्पला जागा नव्हती, मात्र इथला न्हावी हा बराचसा ट्रॅम्पच्याच प्रकारचा होता. गरीबी, साधेपणा, प्रामाणिकपणा, आदर्शवाद ही त्या व्यक्तिरेखेची वैशिष्ट्यं इथेही होती. वर्दूमधे मात्र चॅप्लिनने ट्रॅम्पला पूर्णपणे हद्दपार केलं. `मॉसिए वर्दू` मधली चॅप्लिनची व्यक्तिरेखा होती एका खुन्याची. श्रीमंत बायकांशी लग्न करणं, त्यांचा पैसा हडप करणं आणि नंतर त्यांची विल्हेवाट लावणं हा वर्दूचा उद्योग. आणि `उद्योग` हाच शब्द योग्य. कारण वर्दूच्या दृष्टीने हा खरोखरंच एक उद्योग, एक धंदा आहे. जागतिक मंदीने त्याला आपल्या कारकुनी नोकरीमधून बाहेर पडावं लागलंय. दुसरी कोणतीही कला अंगात नसलेल्या, अन् नोकरी मिळण्याची शक्यता नसलेल्या वर्दूने आपलं कुटुंब पोसण्यासाठी हा एकमेव मार्ग निवडला आहे. आपल्या गुन्ह्याला रंगसफेदी करणारं तत्त्वज्ञान रचलं आहे. त्याच्या नजरेत तो स्वतः गुन्हेगार नसून या परिस्थितीला जबाबदार असणारा समाज हाच गुन्हेगार आहे. जिवंत राहण्यासाठी नाईलाजाने केलेल्या गुन्ह्यापेक्षा, राजकीय पाठिंबा असणारी युद्धं अधिक भीषण असल्याचा त्याचा युक्तीवाद आहे. तत्कालिन राजकीय अन् सामाजिक परिस्थितीला मॉसिए वर्दू एका उपहासात्मक नजरेतून पाहतो. वर्दूचा दृष्टिकोन चुकीचा असल्याचं प्रेक्षकाला स्पष्ट कळलं, तरी चित्रपटाचा युक्तीवाद तो पूर्णपणे खोडून काढू शकत नाही. युद्धावर टीका करणारा वर्दू जेव्हा, `वन मर्डर मेक्स ए व्हिलन, मिलिअन्स, ए हीरो. नंबर्स सॅन्क्टीफाय` असं म्हणतो, तेव्हा आपण ते खोटं आहे असं, केवळ शब्दच्छल आहे, असं ठामपणे सांगू शकत नाही.
गंमतीची गोष्ट म्हणजे, काही विशिष्ट युक्तीवादासाठी ही कथा रचल्याचा आभास आणणारा वर्दू मुळात सत्य घटनेवर आधारित आहे. फ्रेन्च सिरिअल वाईफ - किलर हेन्री लान्ड्रू याच्या गुन्हेगारी कारकिर्दीचा आराखडा चित्रपटात वापरला गेला आहे. मुळात हा चित्रपट बनविण्याची कल्पना ऑर्सन वेल्सची होती. विलिअम रॅन्डॉल्फ हर्स्टच्या आयुष्याचा आराखडा सिटीझन केनमधे काही वेगळा आशय मांडण्यासाठी करून हात पोळलेल्या वेल्सची ही कल्पनाही, साधारण त्याच जातीची म्हणावी लागेल. इथे मात्र चॅप्लीनने ही कल्पना विकत घेऊन स्वतःच त्याच्या संहितेवर काम करायचं ठरवलं. अर्थात, इथेही दिग्दर्शकाचे हात पोळले गेलेच.
मॉसिए वर्दूमधे दिग्दर्शकाला काही रॅडिकल स्वरूपाची वेगळी मतं मांडण्याची संधी असली, तरी पूर्ण चित्रपट गंभीर नाही. मुळात त्याची टॅगलाईनच `ए कॉमेडी ऑफ मर्डर्स` अशी आहे. मात्र इथे एक गोष्ट अडचणीची आहे, आणि ती म्हणजे स्वतः वर्दू चॅप्लीनने साकारूनही ही व्यक्तिरेखा किती विनोद करू शकेल याला मर्यादा आहेत. जेव्हा जमेल तेव्हा चॅप्लीन हे करतो. उदाहऱणार्थ त्याच्या लॉटरीविजेत्या `लकी` बायकोला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न, किंवा घर विकत घेण्यासाठी आलेलं गि-हाईक श्रीमंत विधवा असल्याचं कळताच तिला प्रेमात पाडण्यासाठी सुरू होणारे अतिरेकी प्रेमालाप इत्यादी. मात्र वेळोवेळी वर्दूला गंभीर होणं भाग पडतं. अशा वेळी चित्रपट विनोदाची मदार दुय्यम व्यक्तिरेखेवर सोपवतो, किंवा पूर्ण गंभीर होतो.
यातले काही गंभीर प्रसंग हे चित्रपटातल्या सर्वात उत्कंठावर्धक प्रसंगांपैकी म्हणावे लागतील. वाईनमार्फत विषप्रयोगासंबंधातले दोन प्रसंग, ज्यात वर्दू एका सावजाला जीवदान देतो, तर दुस-याला अनपेक्षितपणे मारतो, त्यातल्या रहस्यासाठी आणि व्यक्तिचित्रणातल्या बारकाव्यांसाठी उल्लेखनीय ठरावेत.
चॅप्लीनचं दिग्दर्शन हे छायाचित्रणाच्या दृष्टीने कधीच खास चमत्कृतीपूर्ण वा खास लक्षवेधी नसतं. विनोदाला लॉन्गशॉट आणि भावदृश्यांना क्लोजअप असे दोनच नियम तो वापरत असल्याचं मानलं जातं. मात्र हे नियम प्रामुख्याने त्याच्या शॉर्ट फिल्म्स अन् मूकपटांना लागू आहेत. या काळातले त्याचे चित्रपट हे सेट पिसेस अन् ते प्रभावी होण्यासाठी लागणारं नेपथ्य याभोवती गुंफले जात. संहिता ही पूर्णार्थाने तयार नसे, अन् सतत बदलली जाई. त्यामुळे निर्मितीलाही लागे. मूकपटांच्या काळात शक्य असणारी ही गोष्ट बोलपटांच्या आर्थिक गणितात बसेना, आणि प्लानिंग आवश्यक बनलं.  `मॉसिए वर्दू` ही त्याची पूर्णपणे संहितेवरून केलेली आणि इम्प्रोवायजेशन टाळणारी प्रथम निर्मिती मानली जाते. स्वतंत्रपणे हास्यकारक बारकाव्यांपेक्षा आशयाच्या मांडणीला अधिक महत्त्व दिल्याचं इथे जाणवतं, ते त्यामुळेच.
वर्दूच्या आशयाची भयानकता आहे, ती या प्रकारची व्यक्तिरेखा तर्कशुद्ध, प्रेक्षकाला पटण्याजोगी होण्यात. या चित्रपटात ती तशी होते, अन् त्या काळात अमेरिकेत देशप्रेमाचे अन् समाजवादविरोधी वारे वाहत नसते, तर तिथेही त्याचं स्वागत झालं असतं. गंमत म्हणजे  आजकाल या प्रकारचे चित्रपट तिथे सरसकट पाहिले जातात, बनविले जातात, नावाजले जातात.  `थॅन्क यू फॉर स्मोकिंग`  किंवा अगदीच मॉसिए वर्दूची पुढली पायरी मानली जाणं शक्य असणारा, युद्धाला व्यापाराचं स्वरूप देणारा  `लॉर्ड ऑफ वॉर `  हे समीक्षकांनी तारीफ केलेले आजचे चित्रपट आहेत, हे आपण विसरून चालणार नाही. त्याच न्यायाने आज अमेरिकेतही एके काळचा वादग्रस्त `मॉसिए वर्दू`  मास्टरपीस मानला जातो यात आश्चर्य नाही.
- गणेश मतकरी

5 comments:

lalit October 10, 2011 at 9:31 AM  

चार्ली चॅप्लीन ची हि ओळख माहीतच नव्हती
करून दिल्या बद्दल आभार .

sushama October 10, 2011 at 11:02 AM  

एक 'हटके' चॅप्लिन.it is an example of Politics/economics affecting art and vice versa.same with 'king in New York'which is still relevant.

mayuresh shaligram October 12, 2011 at 10:29 AM  

अप्रतिम लेख. सर कृपया आपण notebook चे दिग्दर्शक Nick cassavetes ह्यांच्या My sisters keeper (2009) ह्या अतिसुंदर चित्रपटाविषयी जरूर लिहावे हि विनंती .

Anonymous,  October 16, 2011 at 4:53 AM  

तुमचा लेख वाचून पिक्चर आवर्जून पाहिला. अर्थात आवडला. चित्रपटाचा मिड पॉईंट ग्रेट आहे. एक तास ते एक तास पाच मिनीटं...

धन्यवाद

ganesh October 18, 2011 at 11:48 AM  

Thanks all for the comments. Mayuresh, i have not seen the film you mention. But will try to see it.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP