ब्लू- अथांग निळाई

>> Friday, October 3, 2008



स्वातंत्र्य समता आणि बंधुता या फ्रान्सच्या घोषवाक्‍याच्या संदर्भानं प्रसिद्ध पोलिश दिग्दर्शक क्रिस्तॉफ किस्लोवस्की यांनी ब्लू, व्हाईट आणि रेड ही चित्रत्रयी तयार केली. "ब्लू' या चित्रपटातून ज्युलीची वैयक्तिक पातळीवरची स्वातंत्र्याची कल्पना आणि तिला शोधत येणारा तिचा भूतकाळ तिच्या दुःखाच्या जखमांवर फुंकर घालत आपल्यापुढे उलगडला जातो. ........


असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाट माथे निळ्या राऊळांचे
निळाईत भिजे माझी पापणी

क्रिस्तॉफ किस्लोवस्कीचा "ब्लू' हा चित्रपट बघताना ग्रेसांच्या कवितेची आठवण झाली. पहिल्यांदा जेव्हा ह्या ओळी वाचल्या होत्या तेव्हा त्या कळल्या नव्हत्या. आज तरी कळल्या आहेत का? कुणास ठाऊक! पण तेव्हाही आणि आजही ह्या ओळींमध्ये काहीतरी जादू आहे आणि आपल्याला ती जादू उमगत नसली तरी आवडते आहे, हे मात्र जाणवत राहतं. मला वाटतं, काही कलाकृती अशाच असतात. संपूर्ण कळत नाही. काही तरी वेगळं आहे याची जाणीव मात्र होत असते आणि जे दिसतंय त्यातून निर्मात्याला काय बरं सांगायचं असेल, प्रश्‍नाच्या गुंगीत स्वतःला गुरफटून घेण्यातही एक मजा असते. ग्रेसांच्या या कवितेसारखीच "ब्लू' या चित्रपटाच्या निळाईत माझी पापणी हलकेच बुडून जाते.

निळ्याशार धुक्‍याच्या वाटेत एक कार जातेय आणि एका क्षणात त्या गाडीचा अपघात होतो. ज्युलीचा नवरा आणि पाच वर्षांची मुलगी ठार होतात. बेशुद्ध पडलेल्या ज्युलीला हे हॉस्पिटलमध्ये काही दिवसांनी कळतं. सर्वस्व संपलेली ज्युली गोळ्यांचा जादा डोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करते; पण तो सफल होत नाही. ज्या झटक्‍यात ती तोंडात गोळ्या ओतते तेवढ्याच वेगाने त्या तोंडातून बाहेर फेकल्या जातात.

ज्युली दुःखात आहे; पण ते ती व्यक्त करीत नाही. नवरा पॅट्रिक मोठा संगीतकार आहे आणि एका मोठ्या सिंफनीच्या कंपोझिशनवर तो काम करीत होता. त्याच्या सुरावटींचं नोटेशन ज्युलीच करते अशीही एक अफवा आजूबाजूला आहे. ज्युलीला यापासून दूर जायचंय. ती घराची विल्हेवाट लावते, नवऱ्याच्या नोटेशन्स तयार करते. निळ्या रंगाच्या त्याच्या स्टडी रुममध्ये आता फक्त निळ्या लोलकांचं एक झुंबर उरलेलंय. तिच्या पर्समध्ये मुलीचा एक सॉलीपॉपही सापडतो. निळसर चंदेरी कागद बाजूला सारून ती त्याच्याकडे बघते; पण लगेच मोठ्या निश्‍चयानं तो कचाकच चावून खाऊन टाकते. आता तिला कुठल्याच आठवणी नको आहेत. नवऱ्याचा मदतनीस ऑलिव्हिअर याला ती घरात बोलावते. त्याचं तिच्यावर खूप प्रेम आहे. एक रात्र ती दोघं एकत्र काढतात. सकाळी ती त्याला सांगते, "मी इतर चारचौघींसारखीच आहे. तुला माझी आठवण येण्याचं आता काही कारण नाही, तू इथून निघालास की दार ओढून घे'- त्याला काही कळायच्या आत ती घर सोडून निघून गेलेली आहे!


ज्युलीला सुटका हवी आहे. स्वातंत्र्य हवं आहे. सुटका भूतकाळापासून, स्वातंत्र्य इतरांपासून. स्वतःचं वेगळं, स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी ती माहेरच्या नावानं एक फ्लॅट घेते आणि पूर्वायुष्य विसरून नव्यानं जगायला सुरवात करते. जुन्या आयुष्यातलं फक्त निळं झुंबरच तिनं सोबत आणलंय. ती आपल्या आईला भेटायला जाते आणि तिला सांगते, की आठवणी, प्रेम, नवरा, घर हे सगळं मी तोडून टाकलंय. आता मला ते बंधन नकोय. काहीही न करणे एवढीच एक करण्यासारखी गोष्ट माझ्याजवळ उरलीये! नव्या फ्लॅटमध्ये नवी माणसं तिला भेटतात; पण तिला तिचा भूतकाळही शोधत येत असतो. अपघाताच्या ठिकाणी सापडलेली तिची साखळी परत करायला तिचा माग काढत अँटनी नावाचा तरुण येतो. तिला शोधत ऑलिव्हिअरही येतो आणि घराशेजारच्या कॉफी शॉपमध्ये ती जेव्हा जाते तेव्हा बाहेरच्या फुटपाथवर बासरी वाजवत बसणारा एक माणूस नेहमी तिच्याच नवऱ्यानं रचलेली सुरावट वाजवत असतो! ती अँटोनीला साखळी पुन्हा देऊन टाकते. ऑलिव्हिअरला परतीसाठी नकार देते, तर बासरीवाला ही मीच तयार केलेली सुरावट आहे असं सांगतो! टीव्हीवर तिच्या नवऱ्याची अर्धवट रचना ऑलिव्हिअर पूर्ण करणार असल्याची बातमी येते आणि त्याच्याकडे तिला ओढत घेऊन जाते. ती ज्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती त्याच वास्तवाकडे नियती तिला पुन्हा घेऊन जाते. नवऱ्याच्या मिस्ट्रेसच्या आणि तिच्या होणाऱ्या मुलाच्या नावे ती सगळी इस्टेट करते आणि ऑलिव्हिअरकडे राहायला जाते.

भूतकाळापासून ज्युलीला स्वातंत्र्य हवं आहे; पण ते तिला मिळत नाही. किस्लोवस्कीच्या म्हणण्यानुसार "ब्लू'मध्ये सामाजिक व राजकीय स्वातंत्र्याविषयी चर्चा नसून व्यक्तीचं किंवा जीवनाचं स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. स्वतःकडे काही नसण्यात एक स्वातंत्र्य आहे आणि स्वतःकडचं सर्वस्व गमावण्यात देखील स्वातंत्र्य आहे आणि या स्वातंत्र्याचा निळा रंग चित्रपटात सूचक म्हणून वारंवार येतो. अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे जाताना वास्तवापासून लांब पळता येत नाही. अन्यथा वास्तवच तुमचा पाठलाग करत तुमच्यापर्यंत पोचतं, असं काहीसं सुचवायचंय.

शेवटी ज्युली ऑलिव्हिअरकडे जाते तेव्हा निळ्या झुंबराचे लोलक दिसतात आणि एकमेकांत रमलेली ती दोघं, गळ्यातली साखळी बघताना अँटोनी, स्वतःत हरवलेली आई, नवऱ्याच्या प्रेयसीच्या सोनोग्राफिक इमेजेसमधलं बाळ, अपार्टमेंटमध्ये राहताना भेटलेली नाईट क्‍लबमध्ये काम करणारी ल्यूसी अशा सर्व प्रतिमा एकामागे एक दिसतात आणि या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या ज्युलीच्या डोळ्यांतल्या बाहुलीचा एक्‍स्ट्रीम क्‍लोजअप पडदाभर दिसतो आणि चित्रपट संपतो.

अत्यंत बारकाईनं रचलेले चित्रपटाचे सीन्स बघताना पुनःपुन्हा त्यातली तरलता शोधण्याचा मी प्रयत्न करतो आणि पुन्हा त्यातच बुडून जातो. मला वाटतं हीच या चित्रपटाची ताकद आहे. स्वातंत्र्याची निळाई रंगात, प्रकाशाच्या कवडशांत, धुक्‍यात सूचकतेनं येत राहते आणि निळाई सांगणारा ग्रेस पुन्हा पुन्हा आठवतो. किस्लोवस्कीच्या "ब्लू'ला ग्रेसच्या निळाईनं भागावं की ज्युलीच्या निळ्या झुंबराला धुक्‍याच्या निळ्या धुळीनं गुणावं हे गणित सुटत नाही! ब्लूच्या निमित्तानं निळाईचं गुपित अधिकच गूढ होत जातं आणि मला पुढल्या ओळी आठवतात.

निळ्याशार मंदार पाऊलवाटा
धुक्‍याची निळी धूळ लागे कुणा
तुला प्रार्थनेचा किती अर्ध्य देऊ
निळा अस्तकाही नारायणा


-प्रसाद नामजोशी
(सकाळच्या सप्तरंग पुरवणीमधील point of view या सदरामधून. ई-सकाळवर या सदरातील लेख सप्तरंगमध्ये वाचता येतील.)

4 comments:

Jaswandi October 5, 2008 at 10:41 AM  

mastch!
prasad namjoshi kharach mast lihitat!

Meghana Bhuskute October 10, 2008 at 3:12 AM  

Yeah. Faar sundar lihita tumhi, Prasad. Mi tumache Saptarang'madhale lekh aawarjoon waachate.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP