भय इथले...

>> Friday, October 17, 2008



हॉलिवूडमध्ये भयपटांचं पेव फुटलंय. वादिम पेरेलमनने दिग्दर्शित केलेला "द लाईफ बिफोर हर आईज' हा चित्रपट याच पंक्तीतला असला तरी हॉलिवूडपटांची चौकट मोडून काढत नाही. हा चित्रपट म्हणजे चाणाक्ष प्रेक्षकांना घातलेलं एक कोडं आहे, म्हणूनच शेवट कथानकाशी सुसंगत नसूनही चित्रपट वेगळा ठरतो.


वादीम पेरेलमनने दिग्दर्शित केलेला "द लाईफ बिफोर हर आईज' जमला की फसला, याचं उत्तर फसला, असं देऊन मोकळं होणं सहज शक्‍य आहे; पण मला वाटतं ते शंभर टक्के बरोबर तर होणार नाहीच, वर न्याय्यही होणार नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्याचा शेवट हा या प्रकारातल्या संकेतांपेक्षा इतका वेगळा आहे, की त्याच्या जमण्या-फसण्याविषयीचा माझा निष्कर्ष हा सर्वांना मान्य असणंच संभवत नाही. प्रेक्षकांमध्ये तो दोन तट पाडणार अन्‌ त्यातून "शेवट योग्य होता का नव्हता' इथपासून "जो होता तो काय होता' इथपर्यंत वाद होण्याची शक्‍यता.
मला वाटतं, आपली थोडी घाई होतेय. एकदम चित्रपटाच्या अंतिम परिणामाविषयी अन्‌ शेवटाविषयी बोलण्यापेक्षा, हा चित्रपट नक्की काय, कशाविषयी आहे, हे पाहणं गरजेचं आहे.
हॉलिवूडबद्दल आपल्याकडच्या उच्चभ्रू मंडळींच्या अन्‌ चित्रपट पंडितांच्या मनात अनास्था आहे, हे तर आपण जाणतोच. ती असण्याचं खरं तर फार कारण नाही, कारण आपल्या चित्रपटगृहातून दिसणारं हॉलिवूड हे बरचसं नफ्याला वाहिलेलं अन्‌ कल्पनाशक्ती बोथट झालेलं असलं, तरी अमेरिकन चित्रपट पाहण्याचा थिएटर्स हा एकमेव मार्ग नव्हे. आज डीव्हीडी लायब्ररींपासून डीव्हीडी पायरसीपर्यंत अनेक मार्गांनी हे चित्रपट आपल्याकडे पोचू शकतात. यातल्याच कुठल्यातरी मार्गावर भेटणारा सिनेमा म्हणून "लाईफ बिफोर हर आईज'कडे पाहता येईल.
अमेरिकन समाजाला झपाटणाऱ्या भुतांची संख्या सध्या बरीच वाढताना दिसते आहे. गेल्या शतकातल्या वॉटरगेट, व्हिएतनाम युद्ध यांसारख्या भुतांबरोबरच 9/11 सारखी या शतकातली भुतंही आता जमायला लागली आहेत. कोलम्बाईन हत्याकांड हे त्यातलंच एक भूत. दोन मुलांनी कोलम्बाईन शाळेत बेछूट गोळीबार करून अनेकांचे जीव घेतले आणि त्यांच्या सुखवस्तू देशात सामाजिक असुरक्षिततेचं एक नवीन परिमाण रूढ झालं. पुढे साहित्य, चित्रपट यांसारख्या माध्यमातून कोलम्बाईन शाळा जिवंत राहिली. मायकेल मूरने गन कन्ट्रोल कायद्यासंबंधात काढलेला ऑस्करविजेता माहितीपट "बोलिंग फॉर कोलम्बाईन' आणि गस व्हान सान्तचा गोळीबाराच्या घटनेआधीची पंधरा-वीस मिनिटं वेगवेगळ्या पात्रांच्या नजरांतून दाखवणारा "एलिफन्ट' ही कोलम्बाईन कलाशाखेची दोन महत्त्वाची उदाहरणं. "द लाईफ बिफोर हर आईज' ही याच शाखेतली या एप्रिलमधली निर्मिती.
पेरेलमनच्या आधीच्या चित्रपटात म्हणजे "हाऊस ऑफ सॅन्ड ऍन्ड फॉग' मध्ये थ्रिलरचे घटक असणारी; पण थ्रिलरच्या वळणावर न जाणारी अपरिहार्य शोकांतिका होती. इथेही साधारण तोच प्रकार आहे, म्हणजे थ्रिलरचे घटक आहेत, शोकांतिका आहे; पण निवेदनशैलीने इथे एक महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, जी हाऊसमध्ये दिसली नव्हती.
डायना या प्रमुख व्यक्तिरेखेची दोन रूपं इथे आपल्याला दिसतात. एक डायना (इव्हा रेचेलवूड) हायस्कूलमध्ये आहे. तिची मोरीन (इव्हा अम्युरी) ही जिवलग मैत्रीण आहे. शाळेत जेव्हा कालम्बाईन थाटात गोळीबार केला जातो तेव्हाही या दोघी एकत्रच असतात. त्यांच्याच वर्गातला माथेफिरू मुलगा त्यांच्यावर बंदूक रोखतो आणि त्यांना संधी देतो, कोणी मरायचं हे ठरवण्याची.
दुसरी डायना (उमा थर्मन) आहे. या डायनाचं पंधरा वर्षांनंतरचं रूप! घटनेला पंधरा वर्षं होऊनही त्या धक्‍क्‍यातून डायना सावरलेली नाही. पूर्वीची बंडखोर डायना आता शांत झाली आहे. तिला एक मुलगी आहे. थोड्या मोठ्या वयाच्या विद्वान प्रोफेसरशी तिचं लग्नं झालंय. ती स्वतःही शिक्षिका आहे. मात्र शाळेतली ती भयंकर घटना डायना विसरलेली नाही. आता तर या दुर्दैवी घटनेचा स्मरणदिवसही जवळ आलेला. डायनाच्या डोक्‍यावरचा तणाव अशा परिस्थितीत वाढत जातो आणि तिला भास व्हायला लागतात. तिचं मेहनतीने उभारलेलं आयुष्य उसवलं जायला लागतं.
"लाईफ बिफोर हर आईज'ची पटकथा ही दोन्ही डायनांना सारखं महत्त्व देऊन उलगडते पंधरा वर्षांच्या कालावधीच्या मागे-पुढे करत. सामान्यतः चित्रपटांना एक ठराविक वर्तमानकाळ असतो, जिथे घडणारी गोष्ट ही प्रमुख मानली जाते. या वर्तमानातल्या घटनेचा संबंध हा भूतकाळाशी किंवा भविष्यकाळाशी लागू शकतो; पण तो भाग हा दुय्यम महत्त्वाचा असतो, जो फ्लॅश बॅक किंवा फ्लॅश फॉरवर्ड या सर्वमान्य निवेदन संकल्पनांमधून दाखवला जातो. या चित्रपटाचा विशेष हा, की त्याचा वर्तमानकाळ हा काही केल्या ठरत नाही. म्हणजे ही शाळेतल्या बंडखोर डायनाची गोष्ट आहे जी तिच्या पुढल्या आयुष्याचा संदर्भ देते आहे, की विवाहित डायनाची गोष्ट आहे, जी तिच्या भूतकाळाचा संदर्भ देते, हे बराच काळ स्पष्ट होत नाही. याचा दुसरा परिणाम असा होतो, की सतत मागे पुढे गोष्ट जाण्याने आपण या व्यक्तिरेखांशीदेखील पुरेसे समरस होऊ शकत नाही.
चित्रपट जसजसा पुढे जातो तेव्हा लक्षात येतं, की ही मांडणी अपघाती नाही. तिच्या रचनेमागे दिग्दर्शकाचा काही हेतू आहे. त्याने विचार करणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक कोडं तयार केलंय, जे त्याला शेवट ओळखून दाखवण्याचं आव्हान देतंय. मात्र इथे एक गोम आहे.
चित्रपटातून पूर्णपणे येणारा आशय, हा त्याच्या शेवटाशी म्हटला तर सुसंगत आहे, म्हटला तर नाही. आहे अशासाठी, की जर चित्रपटाकडे कोडं म्हणून पाहिलं, तर त्याचं उत्तर म्हणून हा शेवट चालू शकतो. तो सर्वांनाच समाधान देणार नाही, मात्र एक वैचारिक कसरत म्हणून तो पटण्यासारखा आहे आणि चाणाक्ष प्रेक्षकांच्या तो कदाचित आधीही लक्षात येऊ शकतो, खास करून जर त्यांनी चित्रपटाच्या नावाकडे अधिक लक्ष पुरवलं तर.
सुसंगत नाही अशासाठी, की शेवट वगळता उरलेला चित्रपट, हा कोलम्बाईनसारख्या दुर्घटनेतून वाचलेल्या व्यक्तींचं प्रातिनिधिक चित्रण म्हणून चांगला आहे. त्यांचं आयुष्य या घटनेनं कायमचं झाकोळलं जाणं, गेलेल्याबद्दल त्यांना वाटणारं दुःख; पण त्याचबरोबर स्वतः जगल्याबद्दल वाटणारी अपराधी भावना, त्यातून उद्‌भवणारे मानसशास्त्रीय प्रश्‍न... अशा सर्व बाजूंनी चित्रपट डायनाच्या व्यक्तिरेखेकडे पाहतो. मात्र शेवट हा या चित्रणाला द्यायला हवा तितका न्याय देत नाही. केवळ प्रेक्षकांचीच नाही, तर आपल्या आशयसंपन्नतेचीही फसवणूक करतो.
"द लाईफ बिफोर हर आईज'विषयी कोणत्याही एका बाजूने पूर्णपणे सकारात्मक बोलणं शक्‍य होणार नाही, कारण आशयापासून ते छायाचित्रणापर्यंत आणि दिग्दर्शनापासून ते अभिनयापर्यंत अनेक घटक त्याच्या परिणामाला पूरक असले, तरी दृष्टिकोनामधला दोष हा इथे लपणारा नाही. मात्र केवळ दृष्टिकोनातला गोंधळ हा या इतर सर्व बाजूंना रद्द ठरवण्याइतका ठळक आहे, असंही मी म्हणणार नाही.
हॉलिवूडच्या चौकटीत राहून अन्‌ व्यावसायिक गरजेकडे लक्ष देऊनही जे वेगळे प्रयोग केले जातात, ते विशेष महत्त्वाचे असतात. कारण ते स्वतःसाठी खास जाणकार प्रेक्षक असण्याची अपेक्षा करत नाहीत. आपला प्रयोग हा सामान्य प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवूनच करतात, अन्‌ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोचेल असंच या प्रयोगाचं स्वरूप ठेवण्याचा हे दिग्दर्शक प्रयत्न करतात. तयार रसिकांपर्यंत पोचण्यापेक्षा सामान्य माणसांपर्यंत पोचणं हे अनेकदा अधिक कठीण असतं. "द लाईफ बिफोर हर आईज' जमला का फसला, याचं उत्तर एका शब्दात देऊन प्रश्‍न निकालात काढणं गैर आहे ते याचसाठी. त्यापेक्षा तो मला वैयक्तिकदृष्ट्या आवडला की नाही, असा प्रश्‍न जर मी विचारला तर त्याचं उत्तर अधिक सकारात्मक येणं शक्‍य आहे. मला स्वतःला हा चित्रपट आवडला. त्यातल्या प्रयोगासाठीही अन्‌ आशयासाठीही. शेवटामुळे येणाऱ्या विसंगतीकडे मी सध्या तरी दुर्लक्ष करेन.

- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP