दैव देतं!

>> Monday, October 20, 2008


माणसाला आयुष्यात नशिबाची साथ असणं किती पदोपदी आवश्‍यक आहे, हे "मॅच पॉईंट' चित्रपट अगदी सुरवातीलाच एका चपखल उदाहरणाने दाखवून देतो. टेनिसच्या मॅचमध्ये असे क्षण येतात, की बॉल नेटला लागून उडतो. आणि त्या क्षणी तो नेटच्या कोणत्याही बाजूला पडण्याची शक्‍यता असते. तुमचं नशीब जोरावर असेल, तर तो पलीकडे पडतो आणि तुम्ही जिंकता. किंवा तो अलीकडे पडतो आणि तुम्ही हरता. आयुष्यातली हार-जीतदेखील अशीच पूर्णतः दैवावर अवलंबून असते, असं "मॅच पॉईंट' सांगतो. म्हणजे केवळ नशिबावर नाही, त्यासाठी लागणारे प्रयत्न हे आवश्‍यकच आहेत; पण तेवढेच पुरेसे नाहीत असं इथं सांगितलं जातं, आणि दिग्दर्शक "वुडी ऍलन' ते ज्या प्रकारे आपल्यासमोर मांडतो, त्यानं आपल्याला एक उत्तम चित्रपट पाहिल्याचं समाधान तर मिळतंच, वर वुडी ऍलन मध्यंतरीच्या काळात बेताची कामगिरी करूनही थोर दिग्दर्शक का मानला जातो, हेही लक्षात येतं.
"मॅच पॉईंट'ला वुडी ऍलनचा चित्रपट म्हटलं की लगेचच आपल्या मनात काही अपेक्षा तयार होतात. ऍनी हॉल (1977), मॅनहॅटन (1979), हॅना ऍन्ड हर सिस्टर्स (1986) आणि क्राईम ऍन्ड निसडी मीनर्स (1989) यांसारख्या त्याच्या गाजलेल्या चित्रपटांमधून त्याने एक विशिष्ट शैली ठरवल्याचं दिसतं. तसंच त्याच्या बहुतेक चित्रपटांत असणारी त्याची स्वतःची व्यक्तिरेखा ही त्याच्या खऱ्या आयुष्यातल्या व्यक्तिमत्त्वाचं आणि दृष्टिकोनाचं प्रतिनिधित्व करताना दिसते. (अलीकडच्या काळात वयपरत्वे त्याला मोठ्या वयाच्या भूमिका कराव्या लागल्या, तरी त्याचा आवाज हा त्याच्या नायकांमध्ये जाणवण्यासारखा आहे. "एनिथिंग एल्स'(2003) सारख्या चित्रपटात हे प्रकर्षाने दिसून येतं.) ऍलनचे चित्रपट प्रामुख्यानं घडतात ते न्यूयॉर्कमधल्या सुखवस्तू उच्च मध्यमवर्गीयांमध्ये. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या या वर्गाच्या मानसिक आणि म्हटलं तर वरवरच्या पण त्यांचं जीवन व्यापून राहणाऱ्या अडचणी वुडी ऍलनच्या चित्रपटांचा प्रमुख भाग असतात.
लैंगिक अपराधगंड, कलात्मक असमाधान, प्रेमात अपयश आणि न्यूयॉर्क शहराबद्दलचं अतीव प्रेम इथं कायम पाहायला मिळतं. मूळच्या स्टॅन्ड अप कॉमिक असणाऱ्या वुडी ऍलनच्या चित्रपटांचा पाया हा विनोदाचा असतो, पण तो गडागडा हसवणारा नाही, तर मंदस्मित करत अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा. अशा ट्रेडमार्क शैलीनं हा दिग्दर्शक ओळखला जात असल्यानं "मॅच पॉईंट'देखील याच प्रकारात बसणारा असेल, अशी आपण कल्पना करतो. मात्र इथे ती सपशेल खोटी ठरते. अनेक बाबतींत तो या दिग्दर्शकाच्या इतर चित्रपटांहून वेगळा आहे.
तो विनोदी नाही, जवळजवळ पूर्णपणे गंभीर आहे. उच्च मध्यमवर्गीयांऐवजी तो एका श्रीमंत कुटुंबात घडतो आणि न्यूयॉर्कऐवजी लंडनमध्ये. यातल्या व्यक्तिरेखांचे प्रश्न हे अधिक खरे आणि आपल्या मानसिकतेवर थेट प्रकाश टाकणारे आहेत आणि वुडी ऍलनचा आवाज असणारी ओळखीची व्यक्तिरेखा इथे पूर्णपणे गायब आहे. प्रेमकथेचा अंश असूनही हा रोमान्स नाही, चित्रपट शेवटाकडे एका गुन्ह्याकडे आणि त्याच्या उत्कंठावर्धक तपासाकडे जात असला तरी सांकेतिक अर्थानं हा रहस्यपट किंवा थ्रिलर नाही. याची रचना, त्याचा शेवट धरला तर अतिशय आधुनिक आहे. आणि लोक विसरत चाललेल्या वुडी ऍलनला या चित्रपटानं पुन्हा मुख्य धारेत बसवलं आहे.

नाव "मॅच पॉईंट' असलं, आणि सुरवात टेनिसमधल्या उदाहरणानं केली असली, तरी एकूण चित्रपटाचा टेनिस खेळाशी काही संबंध नाही. त्याचा नायक हा टेनिस कोच आहे इतकंच. क्रिस (जोनथन रिस-मेयर्स) हा गरिबीतून वर आलेला आणि मोठं होण्याची स्वप्नं पाहणारा तरुण आहे. व्यावसायिक टेनिस सोडून लंडनमधल्या एका श्रीमंती क्‍लबमधे नोकरी धरून संधीची वाट पाहणारा. त्याची ओळख टॉम ह्यूइट (मॅथ्यू गुडी)शी होते आणि आपल्या आवडीनिवडी जुळतात हे पाहिल्यावर टॉम त्याला ऑपेरा पाहायला आमंत्रित करतो. लवकरच टॉमची बहीण क्‍लोई (एमिली मॉर्टिमर) क्रिसच्या प्रेमात पडते, आणि या श्रीमंत घरात तो लवकरच जावई म्हणून घुसणार, अशी चिन्हं दिसू लागतात. क्रिसला क्‍लोई आवडत असली, तरी तो तिच्या प्रेमात आकंठ वगैरे बुडालेला नसतो; पण त्याच्या दृष्टीनं हा परिस्थिती सुधारण्याचा एकमेव मार्ग असतो. प्रश्न उभा राहतो तो त्याची भेट नोला (स्कार्लेट जोहान्सन) या टॉमच्या प्रेयसीशी झाल्यावर. तो तिच्याकडे ताबडतोब आकर्षित होतो, आणि हे आकर्षण वाढतच जातं. क्रिसप्रमाणेच नोलाही टॉमशी लग्न करून आर्थिक अडचणींवर मात करण्याच्या योजना आखत असल्यानं, क्रिसला उत्तेजन देत नाही. मात्र लवकरच परिस्थिती बदलते. क्रिसचं क्‍लोईशी लग्न होतं; पण टॉम मात्र घरच्यांच्या पसंतीची दुसरी वधू शोधतो. हताश झालेल्या नोलाची एकदा क्रिसशी गाठ पडते, आणि प्रकरण मागील पानावरून पुढे चालू राहतं.
या चित्रपटात विशेष म्हणण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. पहिली म्हणजे व्यक्तिरेखा. यातली कोणतीच व्यक्तिरेखा स्वच्छ, चांगली म्हणावीशी नाही. तरीही त्यांची समाजातली जी जागा आहे, त्या जागी त्या तशाच वागतील याबद्दल शंका घ्यायला जागा नाही. एका परीनं हे सर्वच जण सामाजिक गुन्हेगारीला खतपाणी घालणारे आहेत, पण ही गुन्हेगारी आज आपण जणू गृहीतच धरून चालतो, त्यामुळे ही पात्रं वरकरणी आपल्याला सज्जनदेखील वाटू शकतात. नायकाचादेखील अपवाद न करता.
नायक क्रिसला समाजात वरचं स्थान मिळवायचंय. त्यासाठी तो प्रेमाचं नाटक करून क्‍लोईला फसवतो. नोलाबरोबरचं प्रेमप्रकरण सर्वांच्या नकळत सुरू ठेवतो. क्‍लोईला एका सुप्त पातळीवर क्रिसची चलबिचल जाणवते; पण तिचे वडील इतके श्रीमंत आहेत, की त्यांच्या जोरावर ती नवरा विकत घ्यायला मागेपुढे पाहत नाही. वडिलांनाही मुलीच्या समाधानासाठी हे करायला काहीच वाटत नाही. क्‍लोईच्या आईला क्रिस चालतो, पण टॉमची मैत्रीण नोला तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासाठी चालत नाही. टॉमही नोलाला झुलवत ठेवून दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवतो आणि घरच्यांच्या मागे लपून नोलाला नकार देतो. नोलादेखील क्रिसपेक्षा फार वेगळी नाही. याचा अर्थ, यातलं प्रत्येक पात्र हे केवळ स्वार्थाचा विचार करतं, आणि त्यात त्यांना काहीच वाटत नाही. एका परीनं आजच्या उच्चभ्रू समाजाची किडलेली मूल्यं इथं आपल्यापुढे येतात.
"मॅच पॉईंट'मध्ये लग्नबाह्य संबंधाचं चित्रणही एरवी पाहायला मिळतं त्याहून वेगळं करण्यात आलंय. क्रिसचं नोलाच्या अधिकाधिक आहारी जाणं, घरी असमाधानी असणं, ऑफिसात दुर्लक्ष करणं, हे प्रामुख्याने दिसतं ते क्रिसच्या बदलत जाणाऱ्या दिनक्रमावरून. हे प्रसंग छोटे, तुकड्यातुकड्यात येणारे आहेत. एरवी प्रेम आणि बदफैलीपणा जसा संवादी केला जातो, तसा इथं होत नाही.
स्वतः क्रिसची व्यक्तिरेखादेखील खास आहे. हा वाईट माणूस नाही, पण त्यानं जे ठरवलंय ते पार पाडण्यासाठी जे काय करावं लागेल ते तो करेल. क्‍लोईचा घरच्यांवर प्रभाव पाडण्यासाठी ऑपेरा ऐकणं आणि डोस्टोव्हस्की वाचणं, हे तो जितक्‍या गंभीरपणे करतो, तितक्‍याच गंभीरपणे तो अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शस्त्रही उचलतो. जे घडतंय त्यावर जणू त्याचा इलाज चालत नाही. शेक्‍सपिअरच्या शोकांतिकांच्या नायकांप्रमाणे हाही महत्त्वाकांक्षेचा बळी आहे. तो हवं ते मिळवेल जरूर, पण त्यासाठी द्यावी लागणारी किंमत त्याला आयुष्यभर सुखानं झोपू देणार नाही. आपलं वागणं जस्टिफाय करण्यासाठी तो तत्त्वशास्त्राला राबवेल; परंतु मनातून तो स्वतःला कधीच माफ करणार नाही. क्रिसची भूमिका हा मॅच पॉईंटचा कणा आहे, आणि "बेन्ड इट लाईक बेकहेम' मधल्या जोनथन रिस मेयर्सनं ती अतिशय परिणामकारक उभी केली आहे.
"मॅच पॉईंट' आपल्याकडे प्रदर्शित झाला नाही. वुडी ऍलनचे चित्रपट आपल्याकडे क्वचितच येतात; त्यातून हा वेगळा असला, तरी आपल्याकडल्या व्यावसायिक वितरणाच्या ब्लॉकबस्टरी गणितात बसणारा नाही. मात्र चांगल्या चित्रपटांच्या शोधात असणाऱ्या रसिकांनी आवर्जून पाहावा, असाच हा चित्रपट आहे.

- गणेश मतकरी

3 comments:

Raj October 20, 2008 at 7:28 AM  

सुंदर चित्रपट आहे, वुडी ऍलनचे जवळपास सर्वच असतात तसे. हा भारतात दाखवला नाही हे ऐकून नवल वाटले.

ganesh October 20, 2008 at 8:24 AM  

we rarely get to see a woody allen in theatres. beauty of match point is that its not a typical allen film and it almost looked like he is rediscovering himself at this point . scoop and cassandra's dream were disappointments though.

Abhijit Bathe November 3, 2008 at 2:59 PM  

Woody Allen is full of himself and I love him for it. Saw 'Match Point' in a flight from Amsterdam to I guess Chicago or Detroit and found it mildly amusing. It has got nothing one expects from a Woody Allen movie, still it was a good movie. Nothing great. A typical english class conflict. Man they are so obsessed with subtle nuances! (e.g. Remains of the Day, Howards End as far as these class nuances are concerned or for that matter Gosford Park). Match Point only seemed like a modern version of it though (I mean period wise), otherwise other mentioned ones were far superior.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP