चिल्ड्रन ऑफ हेवन
>> Tuesday, October 14, 2008
शाळेतल्या मैत्रिणीचे बूट तिला खूप आवडत असतात. तिला नवे बूट घेतल्यावर "जुने काय केले' हा तिचा प्रश्न असतो! ते भंगारात दिले म्हटल्यावर ती जवळजवळ चिडतेच! "का?' हा प्रश्न विचारते. ......
जुने मला दिले असते तर, हा विचार तिच्या मनात येतो खरा; पण ती बोलून दाखवत नाही. तेवढा स्वाभिमान तिच्याकडे आहे. दोघी वर्गाकडे चालू लागतात. नव्या बुटातले तिचे पाय थिरकत आहेत, तर भावाच्या जुन्या बुटातले तिचे पाय नाइलाजानं, सवयीचे होऊ बघताहेत...
ती सात वर्षांची आहे आणि तिचा भाऊ नऊ वर्षांचा. तिचे दुरुस्तीला नेलेले बूट तो हरवतो; पण रडवेले होतात दोघंही. आईला सांगू नकोस म्हणून तो पुन्हा ते शोधायला पळतो. ती आईनं वाळत घातलेले दोरीवरचे कपडे काढून घरात जाता जाता दाराशी असणारे सगळ्यांचे बूट बघते. त्यात तिचे बूट नाहीत. क्षणार्धात ही चिमुरडी रंग, भाषा आणि देशधर्माची बंधनं तोडून आपलीशी वाटायला लागते. फक्त चेहरा सोडून बाकी नखनिशांत झाकलेली जोहरा जणू आपलीच लहान बहीण असावीशी वाटते, ही चित्रपटमाध्यमाची ताकद दिग्दर्शक मजिद मजिदीच्या स्क्रीनमुळे सहज अनुभवता येते.
""आईबाबा गरीब आहेत. तू बाबांना मी बूट हरवल्याचे सांगशील तर ते मला मारतील. मी माराला भीत नाही; पण त्यांच्याकडे तुला बूट आणायला पैसे नाहीत ही साधी गोष्टही तुला समजू नये?'' भावाचे शब्द तिला गप्प बसवतात. तिचा एकच क्लोजअप तिची प्रगल्भता दर्शविण्यासाठी पुरेसा ठरतो. तिचा भाऊ अली तिला गप्प बसण्यासाठी एक मोठी पेन्सिल देतो. स्वतःचे बूट घालण्याचं सुचवतो. योगायोगानं तिची शाळा सकाळची आहे आणि त्याची दुपारची. त्याचे बूट तिनं घालायचे आणि शाळा सुटली रे सुटली की पळतपळत येऊन घराच्या गल्लीच्या तोंडाशी ते अदलाबदल करायचे. मग ती हलतडुलत घराच्या दिशेनं येणार आणि तो सुसाट वेगाने शाळेकडे पळणार... छोट्याशा गोष्टीतून बहीणभावांचं एकमेकांशी असणारं सुंदर प्रेमाचं नातं उलगडत जातं. एकमेकांवर प्रेमही आहे आणि घरच्या परिस्थितीचं भानही. त्यामुळे चित्रपटाच्या सुरवातीलाच त्यांच्याशी भावनिक नातं जोडून बसलेला प्रेक्षक त्याच्यासमोर जणू पळत त्याच्या शाळेपर्यंत जातो आणि त्याला शिक्षा होणार नाही ना, या काळजीत पडतो आणि तिच्याबरोबर धावत येताना ती नीट पोचेल ना, या चिंतेतही असतो!
पहिल्या दिवशी तो घरी येतो तेव्हा ती भांडी घासत असते. तिनं आईला सांगितलं तर नसेल, या चिंतेत तो आहे. तिला याचा राग येतो. मी एकदा नाही म्हटलं म्हणजे नाही सांगणार, असं ठणकावून ती सांगते. पण त्याचे फुटबॉल खेळून घाणेरडे झालेले बूट घालायची तिला लाज वाटते. ती दोघं मिळून मग ते बूट स्वच्छ धुतात. साबणाच्या पाण्याचे फुगे करून उडवतात. संपूर्ण चित्रपटात त्यांचं बालपण दिसावं असा हा एवढाच सीन. एरवी घरच्या परिस्थितीनं त्यांना बरंच प्रगल्भ करून टाकलंय.बालपण हरवलं तरी त्यांची निरागसता कायम आहे. टीव्हीवरच्या जाहिरातीतल्या बुटांकडे त्यांचं लक्ष जातं. क्षणभर ते हरवून जातात; पण पावसामुळे तो सिग्नलच कट होतो. बुटांच्या जागी कोरडी खरखर सुरू होते. जणू कल्पनेतले बूटही त्यांच्या नशिबी नसावेत!
शाळेत चाचणी परीक्षेत तिचं संपूर्ण लक्ष घड्याळाकडे आहे. आपला भाऊ वाट बघतोय. त्याला बूट द्यायचेत, या कल्पनेनं ती अस्वस्थ आहे. झटपट पेपर लिहिते. वेळेपूर्वीच देऊन टाकते आणि धावत सुटते. रस्त्यातल्या नालीवरून उडी मारते आणि वाहत्या पाण्यात एक बूट पडतो. झालंच की मग! आता त्या वाहत्या पाण्यातून बूट पुढे पळतोय, त्यामागं तो पकडायला जोहरा पळतेय आणि ती दोघं क्षणभरही नजरेआड होऊ नये म्हणून चित्रपट बघणारा प्रेक्षकही जीव मुठीत धरून तिच्यामागं पळतोय. तिकडे जसा बुटाचा वाहण्याचा वेग वाढतो, तसा तिचा पळण्याचाही वेग वाढतो आणि प्रेक्षकांच्या हृदयाच्या ठोक्यांचाही! एका छोट्या पुलाखाली तो बूट शेवटी अडकतो आणि मग मात्र तिचं अवसान संपतं. तिला रडू फुटतं. बुटाचं दुःख आहे की भावाची बोलणी ऐकावी लागतील त्याचं दुःख आहे? तिचं रडणं ऐकून शेजारचा दुकानदार तो काढून देतो. ती नाराजी भावाकडे व्यक्त करते. रडते. तो घरी आल्यावर त्याला शाळेत बक्षीस मिळालेलं पेन तिला देतो. ती खूष होते. "मी आईला काहीच सांगितलं नाही' म्हणते. तो म्हणतो ""मला खात्री होती, तू शहाणी आहेस!''
आपल्याला हा सीन आवडतो. डोळ्यांत पाणीही येतं. त्याचं कारण कळत नाही. आपल्याला त्यांच्या गरिबीचं दुःख व्हावं असं त्यात काहीही नाही. आनंदाश्रू असण्यासारखंही त्या सीनमध्ये काही नाही. मग दिग्दर्शक आपल्या डोळ्यांतून हे पाणी कुठल्या ताकदीच्या बळावर काढतो? हे दृश्य बघत असताना आपण आपल्याच घरच्या छोट्यांना बघतोय असं वाटतं आणि आपला मुलगा, भाची, पुतण्या किंवा नातवंडाचं बोलणं ऐकून अकारण डोळ्यांत पाणी यावं, तसं काहीसं होत असावं.
तिला शाळेत एका मुलीचे बूट आवडतात. ती तिचं घर शोधते, भावाला दाखवते; पण तिचे आंधळे वडील बघून दोघंही मान खाली घालून घरी येतात. तिचे बूट चांगले आहेत तरीही परिस्थिती मात्र आपल्यापेक्षाही गंभीर आहे, हा त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव स्पष्ट वाचता येतो.
वडिलांबरोबर सुटीच्या दिवशी काम करायला अली शहरात जातो. काम मिळवतो आणि सायकलवरून घरी परतताना वडिलांच्या स्वप्नरंजनात सामील होतो. आपण सगळ्या गोष्टी घेऊ म्हटल्यावर "आधी जोहराला बूट आणा' सांगायला तो विसरत नाही. मात्र उतारावर जोरात येत असलेल्या त्यांच्या सायकलचे ब्रेक लागत नाहीत आणि दोघंही आपल्या स्वप्नांसकट गडगडत खाली येतात! बुटांच्या मागे असलेला अली एका पळण्याच्या शर्यतीत भाग घेतो. कारण त्याचं तिसरं बक्षीस बुटांची एक जोडी आहे. पहिली दोन- खरं तर त्याकडे त्याचं लक्षच नाहीये. लक्ष्य एकच, तिसरं बक्षीस! "पण कशावरून तू तिसरा येशील?' बहिणीला शंका आहे. "मला माहित्येय, मी तिसराच येणार!' त्याला खात्री आहे. शर्यत सुरू होते. पळताना त्याला जोहराची वाक्यं आठवतात. पळणारी- बूट वेळेवर पोचवता यावेत म्हणून जिवाच्या आकांताने पळणारी जोहरा आठवते. तो एवढ्या जोरात पळतो, की पहिलाच येतो! खाली कोसळतो. शिक्षक उचलून घेतात. मी तिसरा आलोय का? एवढं एकच वाक्य तो बोलतो. पण पहिला आल्याचं कळल्यावर कमालीचा दुःखी होतो. फोटोसाठी मान खाली घालून उभा राहतो. "वर बघ' असं फोटोग्राफर सांगतो तर बघतो, तेव्हा त्याचे डोळे भरून आलेले आहेत.मान खाली घालून तो घरी येतो. जोहराला कळतं, त्याचे बूट जुनेच आहेत. रडणाऱ्या लहान भावाला बघायला ती आत पळते. तो संपूर्ण फाटलेले बूट काढून फेकतो. पायाला फोड आलेले आहेत. शांतपणे पाय पाण्यात सोडून बसतो.
दरम्यान, त्याच्या वडिलांचा एक सायकलवरचा शॉट दिसतो. कॅरियरला बुटांचे नवे दोन जोड अडकवले आहेत!आपण मनोमन दिग्दर्शकाला धन्यवाद देतो. वडील शेवटी मुलांना बूट घेतात असं दाखवल्यामुळे नाही, तर फक्त एवढंच दाखवून पुढचे बाळबोध शॉट्स दाखवण्याचं टाळल्याबद्दल.
बुटांसारख्या छोट्याशा विषयावरची कथा घडते तेहरानमध्ये. दिग्दर्शक - कलाकार सगळे इराणी. भाषाही पर्शियन. इंग्रजी उपशीर्षकांच्या साह्याने चित्रपट बघावा लागतो; पण त्यानं काहीही अडत नाही. चित्रपट हे माध्यम कायमच भाषा, संस्कृती आणि देशांच्या पलीकडचं आहे आणि यामुळेच इराणची ती दोन्ही भावंडं सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन आपल्या कुटुंबातली कधी होतात, ते आपलं आपल्यालाही कळत नाही. देश-धर्माच्या कृत्रिम सीमा कधीच विरून जातात आणि उरते ती फक्त अली, जोहरा आणि आपण यांना समान धाग्यात गुंफणारी मनुष्यत्वाची विशुद्ध भावना.
-प्रसाद नामजोशी
(सकाळच्या सप्तरंग पुरवणीमधील point of view या सदरामधून. )
4 comments:
Prasad ji,
Farach sundar chitrapat tumhi dolyasamor jivant kelaat :)
thanks a lot
Really u have described it very well... only the thing... Johra recognizes her lost shoes with one of her schoolmates... n then follows her to find out her home. but when these siblings go to that place.. they find that girls' father was blind... so they return back....
सुंदर.
Post a Comment