हार्डकोअर थ्रिलर

>> Saturday, October 11, 2008


काही दिवसांपूर्वी आपल्याकडे एखाद दोन चित्रपटगृहांत मर्यादित खेळांसाठी १३ झमेटी हा फ्रेंच चित्रपट लागून गेला. तेव्हा मला थोडं कौतुक वाटलं, ते वितरकांच्या धाडसाचं. मुळातच आपल्याकडे सबटायटल्ड चित्रपटांच्या प्रेक्षकांची वानवा असताना उघडच हिंसाचार दाखविणारा अन वादग्रस्त ठरण्याची शक्यता असलेला चित्रपट आणणं, हे धाडस नाही तर काय ? मात्र आपल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट, अन् जोडीला लावलेला सिटी ऑफ गॉड या दोघांकडेही शांततेने दुर्लक्ष केलं.वेगळं काही पाहण्याची तयारी नसणं, हा तसा आपल्या प्रेक्षकांचा स्थायीभावच आहे.
गेला बाब्लुआनी या दिग्दर्शकाचा १३ झमेटी हा पहिला चित्रपट. पहिला वाटू नये इतका सराईत. मात्र सकारात्मक अर्थाने. मी मघा म्हटल्याप्रमाणे इथे हिंसाचार जरूर आहे, पण तो दृश्य पातळीवर भडकपणा आल्याने अंगावर येणारा नाही. शिवाय प्रत्यक्ष हिंसेपेक्षा इथे अधिक परिणामकारक ठरतो, तो दिग्दर्शकाने तयार केलेला ताण, जो काही प्रसंगात असह्य होण्याइतकी ताकद बाळगतो.
सामान्यतः चित्रपट सुरुवातीपासून शेवटापर्यंत सातत्याने अधिकाधिक गतिमान होत जातात आणि शेवट हा या चढ्या गतीचा अत्युच्च बिंदू असतो. झमेटी मात्र या काळ आणि वेगाच्या गणिताला फाटा देतो. रचनेच्या दृष्टीने त्याचे तीन भाग पडतात. मात्र, गती तणाव आणि प्रेक्षकांना गुंतवण्याची शक्यता या तीनही पातळ्यांवर सर्वाधिक परिणामकारक ठरतो, तो अखेरचा नव्हे, तर मधला भाग. गंमतीची गोष्ट म्हणजे, चित्रपटाच्या सुरुवातीवरूनच तो लवकरच घेणार असलेल्या भरधाव वेगाची कल्पना तर येत नाहीच, वर आपण थ्रिलर न पाहता, सामाजिक प्रश्नावर आधारित काही तरी पाहत नाही ना, अशी शंका येऊ शकते.
त्याची सुरुवात होते, ती आर्थिक अडचणीत असलेल्या नायकापासून, फ्रान्समध्ये राहणारा जॉर्जीअन निर्वासित सॅबेस्टीअन (जॉर्ज बाब्लुआनी, म्हणजेच दिग्दर्शकाचा धाकटा भाऊ) हा पैसे मिळविण्यासाठी पडेल ते काम करतो. सध्या तो एका घराच्या छपराची डागडुजी करून देण्याचा उद्योग करतोय. या कामाने पुढच्या काही दिवसांचा प्रश्न तरी सुटावा अशी त्याची अपेक्षा आहे. मात्र काम अर्धवट झालं असतानाच घरमालकाचा मृत्यू होतो. आणि सॅबेस्टीअनची परिस्थिती आणखी बिकट होते. अशावेळी अचानक त्याच्यापुढे एक संधी चालून येते. मृत्यूपूर्वी घरमालक कसल्याशा खेळात सहभागी होणार असतो, जो कदाचित त्याला मालामाल करून सोडेल. सॅबेस्टीअन तुटपुंज्या माहितीच्या जोरावर आडबाजूच्या एका बंगल्यात पोचतो, अन् खेळण्याची तयारी दाखवितो. मात्र हा खेळ असतो मृत्यूचा. तेरा माणसांना खेळाव्या लागणा-या या खेळात कोण जगेल यावर बोली लागणार असते. अन् अनेक श्रीमंत असमी या अभागी खेळाडूंच्या जीवाचा जुगार हसतहसत खेळणार असतात. जो सर्वांना पुरून उरेल त्यालाही मोठी रक्कम मिळणार असं आश्वासन जरूर असतं. पण हे जिवंत राहणं तेरातल्या एकाच्याच नशिबी येणार असतं.
१३ झमेटीमधला खेळ मी अधिक तपशिलात सांगणार नाही, पण तो पिस्तुलाच्या एका गोळीने आयुष्याचा जुगार मांडणा-या रशियन रुलेचीच एक आवृत्ती आहे, असं म्हटलं तरी पुरे. असे प्रसंग चित्रपटात तेव्हाच यशस्वी होतात, जेव्हा आपल्याला नायक कोण आहे, ते माहिती असूनही पुढे काय होणार याचा अंदाज बांधता येत नाही. इथे श्वास रोखून बसलेल्या प्रेक्षकाला चित्रपट पूर्णपणे वेठीला धरतो,अन आपल्या नियमांनी त्याला पूर्णपणे कह्यात आणतो.

सॅबेस्टीअनचं निर्वासित असणं,गरीबी,खेळात बळी जायला तेरा जण उपलब्ध असल्याचं चित्रण या सगळ्यांमधून एक सामाजिक पार्श्वभूमी जरूर तयार होते. पण त्यामुळे मी याला सोशल थ्रिलर म्हणणार नाही. हा हार्डकोअर थ्रिलरच आहे. मात्र त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण विषयाबरोबर त्यातल्या एका उपसूत्राचा उल्लेख मात्र हवा, नियती आणि तिने घेतलेल्या चमत्कारिक वळणांचा बेसावध माणसावर होणारा परिणाम हे इथलं उपसूत्र. हे इथल्या घरमालकाच्या मृत्यूपासून ते चित्रपटातल्या अखेरच्या प्रसंगापर्यंत वेळोवेळी कथानकामध्ये डोकावताना दिसतं.
मागे आल्फ्रेड हिचकॉकने सायको चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट करण्याचा निर्णय घेण्यामागे एक महत्त्वाचं कारण होतं,ते म्हणजे यातल्या सर्वात गाजलेल्या प्रसंगाच्या, म्हणजे शॉवर सीनच्या संकल्पनेतलं रक्ताचं चित्रण. या रंगसंगतीने भडकपणा काढून दृश्ययोजनेता रेखीवपणा जसाच्या तसा ठेवला. १३ झमेटीमध्येही रंग न वापरण्यामागे त्याच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रसंगातलं रक्ताचं प्रमाण हे कारण असू शकतं.जरी ते प्रमाण हे सायकोच्या आसपास येण्यातलं नाही. या एकूणच चित्रपटाचं छायाचित्रण आणि दृश्यसंकल्पना अतिशय नेमक्या आणि प्रभावी आहेत. हिंसेला भडकपणा न आणून देता सूचक मांडणीचा वापर करणा-या. एकच उदाहरण घ्यायचं तर खेळ सुरू होण्याची सूचना असणा-या लाईट बल्बचं देता येईल. सहभागी खेळाडू आणि लाईट बल्ब यांच्यावर पुढेमागे फिरणारा कॅमेरा, हे दिग्दर्शकाच्या माध्यमावर असलेल्या पकडीचा पुरावा देणारं उदाहरण आहे.
सध्या हा चित्रपट युटीव्हीच्या वर्ल्ड मुव्हीज चॅनलवर कधीकधी पाहायला मिळतो. मात्र शक्य तर याची ट्रेलर न पाहिली तर बरं. कारण प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी यातला असा भाग ट्रेलर दाखवते, जो कथेच्या ओघात येणंच खरंतर योग्य. अर्थात तसं ते प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत लागू पडणारं विधान आहे. मात्र गुंतागुंत नसलेल्या आणि मर्यादित टप्प्यांनी पटकथा पुढे नेणा-या १३ झमेटीबाबत अधिकच.
-गणेश मतकरी

1 comments:

हेरंब September 15, 2011 at 1:34 PM  

अत्यंत भयानक चित्रपट आहे हा. नायकाच्या मनावरचा ताण आपण शब्दशः अनुभवू शकतो !!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP