एक अदभुत परीकथा

>> Monday, March 3, 2008


सर्व वयोगटांतल्या प्रेक्षकांना आवडणारे चमत्कृतीपूर्ण परीकथांचे चित्रपट हॉलिवूडला नवे नाहीत. अनावश्यक अदभुत प्रसंगांची रेलचेल, स्पेशल इफेक्ट्स यांचं अवडंबर न माजवता कथेशी प्रामाणिक राहणारा परीकथेवरचा चित्रपट म्हणजे पॅन्स लॅबिरीन्थ. 2007 मध्ये ऑस्करपर्यंत पोचलेला हा चित्रपट आवर्जून बघावा असा आहे. परीकथा केवळ मुलांसाठी असतात, हा एक गैरसमज आहे. मुलांना आवडण्यासारखं त्यात बरंच काही जरूर असतं. थेट भाष्य, अदभुत रम्यता आणि मुलांची करमणूक होईल अशा साहसप्रधान गोष्टींची त्यात रेलचेलही असते; पण उत्तम परीकथा ही केवळ मुलांपर्यंत न पोचता सर्व वयाच्या वाचकांबरोबर संवाद साधते. प्रत्येक वयाच्या लोकांना त्यातून घेण्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्याचा मूलभूत आशय, प्रतीकात्मकता, कथेची लय, काव्य अशा अनेकविध पैलूंनी चांगल्या परीकथा प्रगल्भ झालेल्या आपल्याला दिसून येतात. काही काही वेळा तर असंही दिसून येतं, की काही कथांची दृश्यात्मकता इतकी प्रभावी आणि टोकाची असते, की मुलांपर्यंत नेतानाही त्या सौम्य कराव्या लागतात किंवा मग अद् भुताच्या पडद्यामागे त्यातल्या सटकणाऱ्या गोष्टी लपवाव्या लागतात. त्यामुळे खरं तर परीकथा तिच्या सर्व शक्तीनिशी पोचायची तर ऐकणारा, वाचणारा समजत्या वयाचा असणंच उपयुक्त ठरतं. पारंपरिक कथा, हॅन्स ऍन्डरसन किंवा ग्रिम बंधूंच्या गोष्टी किंवा ऍलिस इन वंडरलॅंड किंवा विझर्ड ऑफ ओझसारख्या अद् भुताचा पाया असलेल्या साहित्यकृती या केवळ मुलांसाठी समजणं, हा या कथांवर आणि त्यांच्या कर्त्यांवरही अन्याय होईल. त्यांच्याकडे कलाकृती म्हणूनच पहायला हवं आणि त्यातल्या आशयाचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करायला हवा. अशाच एका परीकथेवरचा चित्रपट नुकताच पाहण्यात आला. चित्रपटाचं नाव "पॅन्स लॅबिरीन्थ'. नाव आधीपासून ऐकलेलं होतं, ते 2007च्या इंग्रजीतर चित्रपटांच्या ऑस्कर नामांकनात. हे ऑस्कर तो मिळवू शकला नाही, पण खुल्या स्पर्धेत मात्र त्याने छायाचित्रण, कला दिग्दर्शन आणि रंगभूषा, अशी तीन पारितोषिकं पटकावली. लॅबिरीन्थचा जीव हा मुळात परीकथेचा आहे. ही परीकथा स्वतंत्र आहे, कशावरही आधारित नाही. दिग्दर्शकाने तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपण बालप्रेक्षकांसाठी काही दाखवतोय असा ठेवलेला नाही. गिलेर्मो डेल टोरोचा चित्रपट हा चित्रप्रकाराला प्रामाणिक नसून कथेला प्रामाणिक आहे. अगदी पूर्णपणे. त्यामुळे कथेतल्या अधिक गंभीर घटकांना म्हणजे क्रौर्य, गूढता, वात्सल्य यांसारख्या घटकांना तो त्यातल्या अद् भुत चमत्कृतीपूर्ण घटकांइतकंच महत्त्व देतो. परिणामी, चित्रपट अमुक प्रेक्षकांसाठी अशा वर्गात बसवला जात नाही, तर स्वतःचा असा वेगळा चित्रप्रकार तयार करतो. किंबहुना हॉलिवूडमध्ये एरवी काम करत असलेल्या डेल टोरोने क्रोनिकल्स ऑफ नार्निया या यशस्वी ठरलेल्या गोड गोड चित्रपटाचं दिग्दर्शन नाकारून लॅबिरीन्थ स्वीकारला यामागेही कारण हेच असावं, की हॉलिवूडच्या बॉक्स ऑफिस गणितात न बसणारं, अधिक प्रामाणिक असं काही करण्याची मुभा त्याला या मेक्सिकन निर्मितीत मिळू शकली. पॅन्स लॅबिरीन्थ ही एका राजकन्येने आपल्या महालात परतण्यासाठी शौर्याने पुऱ्या केलेल्या तीन कठीण कामगिऱ्यांची गोष्ट आहे. तशीच ती फॅसिस्ट राजवटीविरोधात लढा देणाऱ्या नक्षलवाद्यांची गोष्ट आहे, तशीच ती आईच्या प्रेमासाठी कोणत्याही संकटाला तोंड देण्याची तयारी असणाऱ्या मुलीची गोष्ट आहे; तशीच ती क्रूरकर्मा सैन्याधिकाऱ्याने चालवलेल्या जुलूमशाहीची गोष्ट आहे. ती सुखान्त आहे तशीच शोकान्तदेखील आहे. ती प्रेक्षकांना बरं वाटावं म्हणून कोणतीही तडजोड करत नाही, मात्र या कथेच्या मांडणीतच एक तडजोड लपलेली आहे. स्पेनमध्ये घडणाऱ्या या चित्रपटांची नायिका आहे छोटी ऑफेलिआ (आयवाना बक्रेरो). साल 1944. ऑफेलिआच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे आणि तिच्या आईला नाइलाजाने दुसरं लग्न करावं लागलं आहे, ते कॅप्टन विडालशी (सर्गेई लोपेज). विडाल एका निर्जन जागी छावणी ठोकून बंडखोरांना निपटून काढण्याचा प्रयत्न करतोय. विडाल, ऑफेलिआ आणि तिच्या दिवस भरत आलेल्या गरोदर आईला छावणीत बोलावून घेतो, तो आपल्या मुलाचा जन्म आपल्या देखरेखीखाली व्हावा म्हणून. त्याला कर्तव्य आहे, ते केवळ होऊ घातलेल्या मुलाशी. मुलाची आई जगली अथवा नाही हे त्याच्या लेखी गौण आहे. ऑफेलिआला छावणीजवळ प्राचीन दगडी बांधकाम सापडतं. या जागेकडे लॉबिरीन्थकडे ती आकर्षित होते. मध्यरात्री इथेच तिला एक गंधर्व (खरं तर पॅन, पण पॅनचं थेट मराठीकरण होणं कठीण.) भेटतो. हा तिला सांगतो, की जमिनीखाली एक अद् भुत जग वसलंय आणि तिच्या शरीरातला आत्मा हा या जगाच्या राज्यकन्येचा आहे. या दुनियेचा राजा, आपली लेक परतण्याची वाट पाहत कधीचा थांबलाय, पण परतण्याआधी ऑफेलियाला एका परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागेल. तिला तीन कामं करावी लागतील आणि ती तिने केली तरंच ती आपल्या जमिनीखालच्या महालात परतू शकेल. ऑफेलिआ ही कामं करण्याचं ठरवते, पण छावणीवरचं वातावरण दिवसेंदिवस खराबच होत जातं. आईची तब्येतही खालावायला लागते. या बिघडत चाललेल्या वास्तवासमोर मग अद् भुतता मागे पडायला लागते. पॅन्स लॅबिरीन्थची खासियत ही, की तो वास्तव आणि अद् भुत यांच्यातली सरमिसळ अत्यंत प्रभावी आणि अर्थपूर्ण करतो. विडालच्या कारवाया, नक्षलवाद्यांचा लढा हा सर्व भाग दिग्दर्शकाने पूर्णतः थेट कॅमेरासमोर घडणारा आहे. हा टोकाचा गडदपणा आशयासाठी आवश्यक आहे. तो कमी पडला तर चित्रपटाचा शेवट हळवा वाटण्याची शक्यता आहे. चित्रपटाचा दुसरा अद् भुतिकेचा पऱ्या, गंधर्व, राक्षस, राजमहाल यांनी सजलेला भागही तुल्यबळ आहे. मात्र, हा भागही सामान्यतः मुलांची आवडनिवड लक्षात घेऊन केल्यासारखा नाही. शिवाय अद् भुत हे केवळ त्याच्या दृश्यरूपात नाही तर संकल्पनेनंच आहे. उदाहरणार्थ एका कामगिरीवर ऑफेलिआचा भेटणारा पेल मॅन नावाचा राक्षस हा भयावह बनतो. तो केवळ स्पेशल इफेक्ट्सच्या जोरावर नाही तर मुळात तो जसा कल्पिला गेला आहे त्यावर. याच्या दिसण्यातला प्रमुख वेगळेपणा म्हणजे त्याचा नेत्रहीन चेहरा. पेल मॅन निद्रिस्त असताना काहीसा निरुपद्रवी वाटतो, पण त्याचं स्वस्थ बसून राहणं, समोर एका बशीत ठेवलेले डोळे, लांब लांब नखं असणारे हात, हे भीतीचं वातावरण आपसूक तयार करतात. तो जागा झाल्यावर त्याचं रूप बदलतं ते फार वेगळ्या पद्धतीने. पहिली गोष्ट तो करतो, ती त्याच्या दोन्ही तळहातांना असणाऱ्या खाचांमध्ये बशीतले डोळे घुसवणं. ते करताच हे डोळे जिवंत होऊन पहायला लागतात. मग राक्षस हे डोळे हातात उचलतो आणि बोटं पसरून चेहऱ्यापुढे धरतो. आता त्याचं रूप संपूर्ण पालटतं, तेही केवळ डोळ्यांची जागा आणि एखाद्या मुखवट्याप्रमाणे बनलेले हात यामुळे. इथे इफेक्ट्स आहेत ते प्रामुख्याने रंगभूषेतले; संगणकीय क्वचित. केवळ याच प्रसंगात नाही, तर एकूणच. गोष्टीतल्या चमत्कृतींचा इथला वापर जसा जेवढ्यास तेवढा आहे, तसाच स्पेशल इफेक्ट्सचाही. किंबहुना इथे ते परिणामकारक होतात तेही थोडक्या वापरामुळे. ज्या प्रसंगात ते आहेत, तिथे ते दर्जा सांभाळून सजवलेले आहेत. मात्र, अनेकदा त्यांची गरजच पडत नाही. लॅबिरीन्थचा शेवट मला फार आवडला. आवडण्याचं कारण म्हणजे तो कोणत्या अर्थाने पहावा याची मुभा आपल्याला आहे. दिग्दर्शक तो सुखान्त आहे, की शोकान्त याविषयी इतकेच काही सुचवतो, पण अखेर निवड करणं हे तो आपल्यावर सोडतो. मात्र, तो आवडण्याचं हेच एकमेव कारण नाही. खरं कारण हे, की दोन पातळ्यांवर घडत असूनही हा शेवट कथेच्या चौकटीच्या लॉजिकमध्ये चपखल बसणारा आहे आणि सर्व व्यक्तिरेखांचे आलेख त्यांच्या नैसर्गिक जडणघडणीप्रमाणे उत्कर्षबिंदूपर्यंत नेणारा आहे. तो कुठेही फसवत नाही आणि कायम प्रेक्षकाला विश्वासात घेतो. या दिग्दर्शकाचे क्रोनोस, ब्लेड 2 आणि हेलबॉय हे तीन चित्रपट मी याआधी पाहिलेले आहेत. इथे त्याची दिग्दर्शक म्हणून झालेली वाढ कमालीची आहे आणि यापुढे तो काय करेल हे पाहणं महत्त्वाचं झालं आहे. वाईट एवढंच की इतका महत्त्वाचा चित्रपट ऑस्करप्राप्त ठरला नाही. पण ऍकेडमीने केलेल्या अन्यायाची ही काही पहिली घटना नाही. शेवटचीही नसेल.

- गणेश मतकरी (साप्ताहिक स‌काळमधून)

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP