आजचा थ्रिलर
>> Sunday, March 30, 2008
इंटरनेटच्या महाजालाचे जितके फायदे तितकेच किंवा त्याहूनही अधिक तोटे आहेत, हे म्हणणं कदाचित सर्वांना पटणार नाही; पण हे विधान सत्याच्या बरंच जवळ आहे. माहितीची मुबलक उपलब्धता, संपर्क साधण्यात आलेली सहजता आणि जगाची सार्वत्रिक तोंडओळख होत राहणं या महाजालाचे फायदे म्हटले, तर तोटे हे तुलनादेखील होणार नाही इतके अस्वस्थ करणारे आहेत. नेटच्या अस्तित्वानं जगातल्या सर्व सेन्सॉरशिपला एक मोठं टाळं लावलं आहे. आज या माध्यमाच्या आधारे कोणीही काही पाहू शकतो आणि त्याला वयाची मर्यादा नाही. गुन्हेगारीला इंटरनेटनं जोराचा हात दिला आहे. चॅटरूम्सच्या आधारे आपली ओळख लपवून मैत्री वाढवणं सोपं झालं आहे आणि फसवणुकीचं एक मोठं दालन इच्छुक गुन्हेगारांपुढं उघडलेलं आहे. थोडक्यात म्हणजे इंटरनेट ही सर्व बंधनांपासून, सर्व नियमांपासून, सर्व कायद्यांपासून मुक्त अशा स्वैराचारी जगाची गुरुकिल्ली आहे, असं म्हटलं तरी चालेल. "हार्ड कॅन्डी' चित्रपट इंटरनेटच्या अस्वस्थ वर्तमानाची पार्श्वभूमी वापरतो. त्यातून पुढे येणारे मुद्दे हे समाजाच्या सर्व थरांत पसरलेल्या गुन्हेगारीची चाहूल देणारे आहेत आणि यातल्या व्यक्तिरेखाही या सामाजिक मूल्यांमध्ये होणाऱ्या ऱ्हासाचं प्रतिनिधित्व करतात. असं असूनही हा चित्रपट थेट सामाजिक भाष्य करत नाही वा कसला संदेश दिल्याचा आव आणत नाही. तो आहे एक स्मार्ट थ्रिलर आणि एका दुपारी दोन व्यक्तींमध्ये घडणारं नाट्य मांडण्यापलीकडं तो आपला आवाका जाऊ देत नाही. मात्र, यातली दोन प्रमुख पात्रं ही मात्र नेहमीच्या थ्रिलर्समध्ये सापडणारी नाहीत. कॅन्डीला सुरवात होते संगणकाच्या पडद्यावरच्या संभाषणातून. यात सहभागी दोन व्यक्ती एका भेटीची जागा ठरवतात. जागा तशी निरुपद्रवी. वर्दळ असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये ही भेट होते. या भेटीत आपल्याला दिसतं, की दोघांच्या वयात खूपच अंतर आहे. मुलगी आहे चौदा वर्षांची हेली (एलन पेज), तर पुरुष आहे तिशी-बत्तिशीचा जेफ (पॅट्रिक विल्सन). दोघांची ही पहिलीच भेट आहे. हेली आपल्या शाळकरी उत्साहात जेफबरोबर माफक फ्लर्ट करतेय; पण जेफ वाटतो तितका निरुपद्रवी नसावा. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो फॅशन फोटोग्राफर आहे आणि वरवर अगदी साळसूदही. मात्र, बोलताना तो हेलीला हलकेच जाळ्यात ओढण्याचा प्रयत्नही करतोय. लवकरच या प्रयत्नात तो यशस्वी होतो आणि दोघं जेफच्या शानदार गाडीतून त्याच्या अद्ययावत घराचा रस्ता धरतात. त्याच्या घरचं वातावरण, भिंतीवरले फॅशन फोटो, जेफनं पुढं केलेलं मद्य याचा अमल हळूहळू हेलीवर चढताना दिसतो; पण नाही म्हणायला ती एक सावधगिरी घेते. जेफला म्हणते, की "आम्हाला सांगितलंय दुसऱ्यांनी बनवलेलं पेय घेत जाऊ नका.' जेफचा सल्ला स्वीकारून मग ती स्वतःच मद्य तयार करते. जेफ आपला कार्यभाग साधण्याच्या नवीन युक्त्या काढायला लागतो. मात्र, त्याला फार वेळ मिळत नाही. हेलीच्या हातचं पेय घेतल्यावर लवकरच त्याची शुद्ध हरपते आणि पुन्हा भानावर येतो तो एका खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत. आता बाजू उलटलेली असते. शिकार आणि शिकारी यांच्यात अदलाबदल झालेली असते. हार्ड कॅन्डी चित्रपट हा पूर्णपणे दोन पात्रांत घडतो. त्यात प्रत्यक्ष ऍक्शनचा भागही मर्यादित आहे. अधिक भाग आहे तो संवादांचा. जेफमधली पिडोफिलिआची किंवा अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याची विकृती आणि त्यावर चौदा वर्षांच्या मुलीनं काढलेला थेट मार्ग याभोवती हे कथानक फिरतं. एकाच घरात मर्यादित काळात घडणाऱ्या या चित्रपटाचा आकार हा उघडच नाटकाचा आहे; पण तो लपवण्याचा दिग्दर्शक डेव्हिड स्लेड याचा प्रयत्न नाही. कथाविषय जर पुरेसा पकड घेणारा असेल तर केवळ चित्रपट माध्यमापायी विविध स्थळांचा वापर करण्याचं बंधन हे विदेशी चित्रपटांमध्ये मानलं जात नाही. त्यामुळे अनेकदा नाटकांची किंवा नाटकाला चालतील अशा विषयांची चित्रपट रूपांतरं त्याच्याकडं पाहायला मिळतात. शॅफरच्या नाटकावरला "स्लूथ' किंवा रोमन पोलान्स्कीचा "डेथ अँड द मेडन' ही या प्रकारच्या चित्रपटांचीच उदाहरणं आहेत. डेथ अँड द मेडन आणि हार्ड कॅन्डी चित्रपटांमध्ये एक मोठं साम्य आहे आणि ते म्हणजे प्रेक्षकाला आपण कोणती बाजू घ्यावी, याबद्दल तयार होणारा संभ्रम. रचनेच्या बाबतीतही एक अधिक पात्र, हा अपवाद वगळता दोन्ही चित्रपट समांतर जाऊ शकतील असे आहेत. "डेथ'मध्ये एका पावसाळी रात्री नवऱ्याबरोबर आलेला पाहुणा (बेन किंग्जली) पाहून बायकोचं (सिगर्नी विव्हर) डोकं फिरतं. या पाहुण्यानंच आपल्यावर एके काळी अत्याचार केल्याची आठवण जागी होते आणि पाहुणा हे सगळं नाकारत असताना त्याला जेरबंद करून ती बदला घेण्याचं ठरवते. हतबल नवरा काही करू शकत नाही. पाहुणा खरंच अत्याचारी आहे का, हा इथं पडणारा पहिला प्रश्न, तर तो दोषी असला तरीही त्याला नायिकेनं परस्पर ठोठावलेला मृत्युदंड बरोबर आहे का, हा दुसरा. हे दोन प्रश्न "डेथ अँड द मेडन'मध्ये आपली सहानुभूती बदलती ठेवतात. हार्ड कॅन्डीमध्येही काहीसं हेच होतं. हेलीने जेफला बांधून ठेवल्यावर आपल्यापुढं अनेक प्रश्न उपस्थित होतात. जेफनं प्रत्यक्षतात हेलीला काही केलेलं नाही. एका बाजूनं असं म्हणता येईल, की तिनं काही करण्याआधीच जेफला पकडलं; पण दुसऱ्या बाजूने जेफ खरंच निरुपद्रवी असण्याची शक्žयता नाही का? पुन्हा हेलीनं जेफला बरं करण्याचा काढलेला उपाय आपल्याला (खास करून पुरुष प्रेक्षकांना) दचकवणारा तर आहेच शिवाय हेलीचा नक्की हेतूही थोडा गोंधळाचा आहे. ती खरोखरच जेफच्या हातून पूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा माग घेतेय, त्याच्या त्या दुपारच्या वागणुकीचा जाब विचारतेय, का तीही एका विकृतीची शिकार आहे? तिनं स्वतःबद्दल सांगितलेली सर्व माहिती खोटी असण्याची शक्यता तर तिनं आपल्या तोंडूनच सांगितली आहे. हेलीच्या वागणुकीबद्दल अधिक शंका निर्माण करतात ते जेफनं काढलेले अल्पवयीन मुलींचे फोटो. हे प्रत्यक्षात कधीच दाखवले जात नाहीत. हेली म्हणते, की या फोटोंमध्ये जेफची विकृती दिसते. जेफच्या मते असं काही नाही. या फोटोंचा मुद्दाही आपली भूमिका झुलवत ठेवतो. हार्ड कॅन्डीमध्ये मला वाटलेली एक त्रुटी आहे, की यात जवळजवळ सर्व वेळ परिस्थितीवर हेलीचंच वर्चस्व दिसतं. खरं तर हे प्रत्यक्षात कठीण आहेच शिवाय थ्रिलरमध्ये जर हे वर्चस्व बदलतं ठेवलं तर अधिक उत्कंठावर्धक ठरू शकतं. असं असूनही इथं जेफ हा कायम हेलीपुढं हरलेला राहतो आणि पारडं उलटण्याची शक्यताही जाणवत नाही. दिग्दर्शक स्लेड आपल्या जाहिरात क्षेत्रातल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून चित्रपट गतिमान ठेवतो आणि तो शब्दबंबाळ वाटू देत नाही. दृश्य गतीबद्दल, फेड आऊट् स, एक्स्ट्रीम क्लोज अप्स अशा विविध युक्त्या इथं दृश्यांना वेधक बनवत राहतात. सामान्यतः दोन पात्रांवर चित्रपट पेलणं कठीण; पण इथं ते प्रामुख्यानं शक्य होतं. एलेन पेजच्या हेलीच्या भूमिकेमुळे. तिचं सुरवातीचं भाबडेपण आणि पुढलं बदलत जाणारं रूप चित्रपटाचा पूर्णपणे ताबा घेतं.हार्ड कॅन्डीला आजच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे असं मी म्हटलं ते केवळ त्याच्या कल्पित विषयासाठी नाही. त्याला काही सत्यघटनांचा आधार असल्याचं मानलं जातं. जपानमध्ये काही विद्यार्थिनींनी काही जणांवर हल्ले केल्याच्या घटना मध्यंतरी घडल्या. त्या मुलींना या व्यक्ती पिडोफाईल असल्याचा संशय होता आणि काहीच हालचाल न करण्यापेक्षा अन्यायाविरुद्ध पावलं उचलणं त्यांना योग्य वाटलं. त्यांनी उचललेलं पाऊल हे कायद्याला मान्य असणार नाही; पण ते पूर्णतः चूक म्हणायला मी तरी धजावणार नाही. शेवटी आपला दृष्टिकोन हा ज्यानं त्यानं ठरवायचा असतो. हार्ड कॅन्डी भिन्न दृष्टिकोनांचा चित्रपट आहे. मात्र, अगदी तो आपल्या अस्वस्थ वर्तमानातला, आजचा आहे, हे आपण विसरून चालणार नाही.
3 comments:
हा लेख 'साप्ताहिक सकाळ'मधे प्रकाशित झालेला नाही का? काहीच कारण नाही.. एक कुतुहल फक्त. सुरेख लेख.
hi meghana,
ha prakashit zalay. gelya varshi.brilliant actress allen page is seen again in this years JUNO.i think that article is put on these pages.
सिनेमा पाहिला आवडलाही, पेजने जबरदस्त ऍक्टींग केलीय.. पण कितीही झालं तरी शेवट थोडा नाही पटला.. जेफ तो निर्णय घेईल असं प्रत्यक्षात वाटत नाही..
Post a Comment