आतल्या आवाजाची हाक
>> Wednesday, March 19, 2008
शेवटी माणसाचा आतला आवाजच प्रभावी ठरतो हे वैश्विक सत्य "मायकेल क्लेटन' आपल्याला सांगतो. प्रत्येक माणसात एक चांगला आणि एक वाईट माणूस दडून बसलेला असतो. या दोघांचाही आतल्या आत कुठे तरी सतत संघर्ष सुरू असतो. त्यामुळेच एका नामांकित कायदेविषयक कंपनीत "फिक्सर' म्हणून काही क्लिष्ट प्रकरणे कोर्टाबाहेर मांडवली करून मिटवण्यात माहीर असलेल्या मायकेल क्लेटनची कथा ही आपल्यापैकी कुणाचीही असू शकते. ठिकाणं आणि संदर्भ बदलले तरी माणसामध्ये वास करणारा नायक आणि खलनायक जगाच्या पाठीवर तोच असतो. फक्त यातला कोण कुणावर मात करतो हे महत्त्वाचं ठरतं. वैयक्तिक आयुष्यात अपयशी ठरलेल्या, जुगाराच्या नादी लागलेल्या, मांडवली करण्याच्या नोकरीला कंटाळलेल्या आणि शेवटी आपल्या आतल्या आवाजाची हाक ऐकून सामान्य माणसांच्या जीवाशी खेळणाऱ्या एका बलाढ्य कार्पोरेट कंपनीला धडा शिकवणाऱ्या मध्यमवयीन वकिलाची व्यक्तिरेखा जॉर्ज क्लुनीने आपल्या संयत अभिनयाने अविस्मरणीय केली आहे....
कार्पोरेट कंपन्यांच्या व्यावसायिक नीतिमत्तेने कुठली पातळी गाठली आहे, याची अनेक उदाहरणे अधूनमधून पुढे येत असतात. आपली व्यावसायिक इप्सिते साध्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कृष्णकृत्ये करण्यापासून आपल्या धंद्याच्या आड येणाऱ्याचा काटा काढण्यापर्यंत आणि सर्वसामान्य माणसाला कस्पटाहून कमी लेखण्यापासून न्यायव्यवस्थेला विकत घेण्यापर्यंत व्हाईट कॉलर गुंडगिरीचा धुमाकूळ सुरू आहे. पैशांचा माज ही त्यामागची मानसिकता. पैसे फेकून आपण कुणाचेही तोंड बंद करू शकतो, कुणालाही वाकवू शकतो या माजातून मग काही प्रकरणांची कोर्टाबाहेर मांडवली करायची, माणसं फोडायची, माणसांना आपसात लढवायचे, त्यांना वापरायचे, गरज संपली की फेकून द्यायचं किंवा संपवायचही. "यू नॉर्थ' या कंपनीच्या एका प्रकरणात मांडवली करण्याची जबाबदारी टाकलेला मायकेल क्लेटन (जॉर्ज क्लुनी) कंपनीची संचालक असलेल्या केरेन क्राऊडर (टिल्डा स्विन्टन) या बाईला मात्र पुरून उरतो....
कृषी उत्पादनांची निर्मिती करणारी "यू नॉर्थ' कंपनी सोडत असलेली रसायने कॅन्सरला कारणीभूत ठरतात. यासंबंधीच्या एका दाव्याकडे गेल्या आठ वर्षांपासून सर्वांचे लक्ष लागले आहे. या दाव्याचा कोर्टाबाहेरच निक्काल लावण्यासाठी कंपनीने कोट्यवधी डॉलर ओतले आहेत. या प्रकरणात कंपनीच दोषी आहे, न्यायालयातही ते सिद्ध होऊ शकतं आणि तसं झालं तर कंपनीच्या रेप्युटेशनला जबर धक्का बसेल. त्यामुळे फिर्यादींना वाट्टेल तेवढ्या डॉलरना विकत घेऊन या खटल्याची कोर्टाबाहेरच वासलात लावायचा विडा कंपनीच्या संचालिकेने उचलला आहे. गेली काही वर्षे मायकेल क्लेटनचा मित्र आर्थर एडन्स (टॉम विल्किन्सन) त्याच्यावर काम करीत असतो. त्यालाही कंपनीचा अमानवी चेहरा दिसला आहे. तो सध्या मानसिक आरोग्य हरवून बसला आहे. त्यामुळे त्याच्या जागी मांडवली करण्याची जबाबदारी मायकेल क्लेटनवर टाकण्यात येते. दरम्यान, कंपनीच्या गुपितांची एक फाईल एडन्सच्या बॅगेत कंपनीच्या संचालिका, क्राऊडर बाईंना सापडते आणि जिच्यासाठी काम करण्याची जबाबदारी एडन्सवर आहे, त्या "यू नॉर्थ'विरुद्धच कागदपत्रे गोळा करण्याचे काम तो करीत असल्याचे बाईंच्या लक्षात येते. तो कोणतेही सहकार्य करण्यास तयार होत नसल्याने मग क्राऊडरबाई त्याचा काटा काढतात आणि त्याचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचं चित्र उभं करतात. दरम्यानच्या काळात "यू नॉर्थ'च्या काळ्या कारवायांचे आणखी काही पुरावे क्लेटनला सापडतात आणि एडन्सचा मृत्यू ही आत्महत्या नसल्याचेही त्याला कळून चुकते. क्राऊडरबाई आता क्लेटनलाच संपविण्याची सुपारी देतात. तिकडे क्लेटनच्या गाडीत लावलेल्या बॉम्बचा स्फोट होतो, पण क्लेटन दत्त म्हणून त्यांच्यापुढे उभा राहतो. आता बाईंपुढे एकच पर्याय, त्या त्याला त्याची किंमत विचारतात. मांडवली होते, पण... क्लेटन बाईंना एक शिवी हासडतो आणि..
मोठमोठी प्रकरण मांडवली करून मिटवणारा, पण स्वतःच्या आयुष्यात तडजोड करणे न जमलेला आणि शेवटी मात्र आपल्या आतल्या आवाजाला कौल देणारा जॉर्ज क्लुनीचा क्लेटन आपल्याला आपल्यातलाच वाटतो. सभ्यतेचा आणि व्यावसायिक नीतिमूल्यांचा मुखवटा घालून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गुंडगिरी करणाऱ्या क्राऊडर बाईंची टिल्डा स्विन्टन या अभिनेत्रीने साकारलेली व्यक्तिरेखा अशीच लक्षात राहते. आपल्या आतल्या आवाजाला हाक देऊन व्हाईट कॉलर माफियांविरुद्ध उभा ठाकलेल्या आर्थर एडन्सची टॉम विल्किन्सनने उभी केलेली व्यक्तिरेखाही दीर्घकाळ स्मरणात राहते. थोडक्यात, आपला आतला आवाज ऐकायचा असेल, तर "मायकेल क्लेटन'ला भेटलेच पाहिजे.
-सिद्धार्थ ताराबाई ("सकाळ'मधून)
1 comments:
"...ठिकाणं आणि संदर्भ बदलले तरी माणसामध्ये वास करणारा नायक आणि खलनायक जगाच्या पाठीवर तोच असतो. फक्त यातला कोण कुणावर मात करतो हे महत्त्वाचं ठरतं..."
Very well said...
Post a Comment