सुसंवाद
>> Monday, March 17, 2008
आपल्या प्रेक्षकांना वितरकांच्या कृपेने वेगळे इंग्रजी चित्रपट पाहायला मिळणं दुस्तर झालेलं आहे. त्यातल्या त्यात मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग ज्या चित्रपटांना उपलब्ध होईल, असेच चित्रपट आपल्याकडे आणण्याची स्पर्धा या वितरकांमध्ये सुरू असते. त्यामुळे अधिकाधिक भव्य, झगमगीत, स्टारकास्ट असणारे, परंतु वैचारिक खाद्य देण्याची क्षमता नसणारे चित्रपट आपल्या मल्टीप्लेक्सेसना हजेरी लावताना दिसतात. साहजिकच या यशस्वी पण चाकोरीबद्ध निर्मितीहून वेगळं काही पाहायचं तर डीव्हीडी लायब्रऱ्यांचे दरवाजे ठोठावणं आलं. असेच दरवाजे ठोठावताना एक उत्तम चित्रपट पाहण्यात आला. रिचर्ड लिंकलेटरचा "बीफोर सनसेट'. जाणकारांना माहीत असेल, की हा "बीफोर सनराईज' चित्रपटाचा दुसरा भाग आहे. पण आशयाच्या दृष्टिकोनातून पाहायचं तर दोन्ही चित्रपट इतके चपखल बसणारे, की त्यांना एकाच चित्रपटाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्धही म्हणायला हरकत नाही. सनसेटचा आणखी विशेष हा, की याच्या निर्मितीमागे आर्थिक यशाचा मोह नसून, केवळ सर्जनशील कारणं आहेत. मूळचा चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर प्रचंड धंदा करून गेला नसल्याने स्टुडिओंना याच्या नफ्यातोट्याच्या गणितात अडकायचं कारण नव्हतं. त्यामुळे केवळ कलात्मक दृष्टिकोनातून कथा पुढे नेणं, एवढाच लिंकलेटरच्या स्वतंत्र प्रयत्नांमागला हेतू आहे. अर्थात कथा अशी फारशी नसल्याने काही विचार, हेच म्हणणं अधिक योग्य. ढोबळमानाने पाहायचं तर सनराईज-सनसेटची गणना रोमॅंटिक कॉमेडी या प्रकारात करावी लागेल. पण ते फारच ढोबळमानाने. म्हणजे यात एकमेकांच्या प्रेमात पडलेलं एक जोडपं आहे आणि चित्रपट फार गंभीर नाही, एवढंच. बाकी पाहायचं तर हे एक वेगळंच प्रकरण आहे. खासकरून उत्तरार्धाच्या बाबतीत. आजकालच्या लोकप्रिय चित्रपटांचा कोणताही विशेष येथे पाहायला मिळणार नाही. इफेक्ट्स नाहीत, गुंतागुंतीची पटकथा नाही, हिंसाचार नावालाही नाही. चतुर चित्रीकरण निश्चित आहे, पण ते वेगळ्या प्रकारचं- स्वतःकडे अजिबातच लक्ष वेधून न घेणारं. मग प्रश्न पडेल, की यातली कोणतीच गोष्ट इथे नाही, तर आहे काय? याचं उत्तर म्हणजे "संवाद'. हे दोन्ही चित्रपट नायक-नायिकेच्या संवादांची एक मालिका आहे. मात्र हे संवाद अत्यंत साधे, रोजच्या बोलण्यासारखे आहेत. त्यात अनेक विषय गमतीदार निरीक्षण, विक्षिप्त दृष्टिकोन, आयुष्यातले अनुभव, समोरच्या विषयीचं वाटणं, हे सगळं येतं; मात्र कुठेही कृत्रिमता येत नाही. हे जे चाललंय हे दिग्दर्शकाने ठरवून दिल्याप्रमाणे घडतंय, असं कुठेही वाटत नाही. उलट या व्यक्तिरेखा उत्स्फूर्तपणे जे आणि जसं बोलतील तेच इथे ऐकायला मिळतं. या दोघांमधला संवाद हा या पात्रांप्रमाणेच प्रेक्षकांच्या जीवनाचाही एक भाग बनून जातो. या दोन व्यक्तींमध्ये आपण कधी गुंतून जातो, हे आपल्यालाही कळत नाही. जर हे दोन्ही एकाच प्रकारचे चित्रपट असतील, तर ती केवळ एकाच चित्रपटाची पुनरावृत्ती नाही का, असा एक प्रश्न कोणालाही पडू शकेल. तर नाही. "बीफोर सनराईज'मध्ये नायक जेसी (इथन हॉक) आणि नायिका सीलीन (जुली डेल्घी) पुष्कळच तरुण आहेत. विशीतले. ऑस्ट्रियामधल्या एका ट्रेनमध्ये त्यांची भेट होते. गप्पा होतात. अमेरिकेचं विमान पकडण्यासाठी तो व्हिएन्नाला निघालाय. मग ठरतं, की तिनंही त्याच्याबरोबर व्हिएन्नाला उतरायचं, अन् त्याच्या विमानाची वेळ होईपर्यंत दोघांनी बरोबर राहायचं. गोष्ट म्हणाल तर एवढीच. एका दिवसाच्या दुपारपासून पुढल्या पहाटेपर्यंत चित्रपट या दोघांबरोबर व्हिएन्नात घालवतो. चित्रपटाच्या शेवटी दोघं ठरवतात, की सहा महिन्यांनी पुन्हा तिथंच भेटायचं. "बीफोर सनसेट' हा उत्तरार्ध सर्वच बाबतींत रिअल टाईममध्ये घडतो, असं म्हणायला हरकत नाही. तो घडतो मूळ घटनेनंतर सुमारे नऊ वर्षांनी, आणि प्रत्यक्षात तो प्रदर्शितही झालाय. मूळ चित्रपटानंतर जवळपास त्याच कालावधीनंतर इथे सुरवातीलाच आपल्याला कळतं, की सहा महिन्यांनंतर ठरलेली भेट झालीच नाही. पुढे जेसीने आपल्या सेलिनबरोबरच्या दिवसावर "धिस टाईम' नावाचं बेस्ट सेलर पुस्तक लिहिलं, आणि सध्या तो फ्रान्समध्ये त्याच्या प्रमोशनल टूरवर आलेला आहे. इथे पुन्हा त्याची भेट होते ती सेलिनशी. मात्र आता त्यांच्याकडे एक रात्रही नाही. विमान पकडायचा जेमतेम तासभर बाकी आहे. मग त्याच वेळाचा सदुपयोग करण्याचं ठरवून दोघं बाहेर पडतात. कॅमेरा त्यांच्याच गतीने त्यांच्याबरोबर फिरतो, रेंगाळतो. सनराईजचा भर होता तो प्रेमकथेवर. सनसेटचा भर आहे तो निसटलेल्या संधींवर. नऊ वर्षांपूर्वीच्या त्या रात्रीनंतर ही दोघं बदलून गेली आहेत. आणि आता त्यांना इतर कोणाबरोबरच समाधान मिळू शकणार नाही. आज दोघांची परिस्थितीही वेगळी आहे. त्याचं लग्न होऊन त्याला चार वर्षांचा मुलगा आहे. ती अनेकांबरोबर राहूनही कोणातच गुंतलेली नाही. मात्र आजही ते जणू एकमेकांचेच आहेत. सनसेटमधल्या संवादांत विषयांचं वैविध्य कमी असेल, पण भावनांची धार अधिक आहे. गेलेली नऊ वर्षे वाचवता आली असती का, हा प्रश्न त्याच्या केंद्रस्थानी आहे. आयुष्यात हुकलेल्या संधीबाबत असे जर-तरचे प्रश्न, आपल्या सर्वांनाच पडतात. त्या दृष्टीने पाहायला गेलं, तर सनसेट हा आपल्या मनाला अधिक जवळचा आहे. या चित्रपटाला त्याच्या कलाकारांनी सर्वतोपरीने जिवंत केलंय, असंच म्हणायला हवं. कारण सनसेटच्या पटकथा-संवादांतही लिंकलेटरबरोबर सहभाग आहे, तो त्याच्या दोन्ही प्रमुख कलाकारांचा. त्यांचं वागणं- बोलणं अधिक स्वाभाविक व्हायलाही त्यांच्या या ऍक्टिव्ह सहभागाची मदत झाली असेल. संवादांचा आलेख इथे फार छान जमला आहे. जेसी आणि सेलिन एकमेकांना भेटल्यावर आधी बरंच अवांतर बोलतात, तरीही त्यांच्या मनातलं एकमेकांविषयी वाटणं उघड दिसत असतं. पुढे पुढे गप्पा अधिकाधिक थेट होतात, आवाजात चढ-उतार येतात आणि भावनांतही. लिंकलेटरचा, आजच्या पिढीची भाषा या विषयाचा गाढा अभ्यास असणार. लोकांचं एरवीचं वागणं, बोलणं, त्यांच्या डोक्यात चालणारे विचार, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, तडजोडी, त्यांच्या मनातली गुपितं यांना त्याच्या सर्व चित्रपटांत स्थान दिसतं. 1991 मधल्या त्याच्या "स्लॅकर' या पहिल्या चित्रपटातही अमेरिकन संस्कृतीचा एक तुकडाच त्याने प्रेक्षकांना दाखवला होता. स्लॅकरला अजिबातच गोष्ट नव्हती. लोकांविषयीची निरीक्षणं दिसणारे छोटे छोटे अनेक तुकडे इथे वैशिष्ट्यपूर्ण रीतीने सांधण्यात आले होते. हा चित्रपटही त्या वर्षीच्या उत्तम चित्रपटातला एक समजला जातो. बीफोर सनराईज - बीफोर सनसेटसारखे चित्रपट कदाचित सर्वच प्रेक्षकांना आवडतील असं नाही; पण एक विशिष्ट प्रेक्षकवर्ग ते पाहायला निश्चित उत्सुक असेल. त्यामुळे आता वितरकांनाही अशा चित्रपटांचं मर्यादित प्रमाणात का होईना, वितरण करायला काय हरकत आहे? प्रेक्षकांची आवडही अखेर त्यांना जे पाहायला मिळेल त्यावरूनच ठरत असते. मग पॉपकॉर्न मनोरंजनापलीकडे नेणारं काही त्यांना पाहायला मिळालं तर ते चांगलंच नाही का?
3 comments:
सुरेख. सिनेमाबद्दल लिहिताना सिनेमा परत एकदा शब्दांत मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणं सोपं असतं, पण त्यातली गंमत नेमक्या भाषेत उलगडून सांगणं कठीण. अभिनंदन. जमलं आहे नेहमीप्रमाणेच परत एकदा तुम्हाला.
हे माझेही अतिशय आवडते चित्रपट. खूप चांगली आठवण करून दिलीत. धन्यवाद.
Pharach avadale he dohni hi chitrapat ...kharach dusara bhag pharach sundar ahe ...nisatalelya sandhichi aathavn karun denara .
Post a Comment