हत्ती आणि आंधळे

>> Wednesday, March 12, 2008

चित्रपट आणि हिंसाचार यांचा संबंध नेहमीच जोडला जातो. पण कोणत्याही हिंसेमागे एखादंच कारण असू शकत नाही. त्यामागच्या अनेक गोष्टी या सहज स्पष्ट न होणाऱ्या असतात. हिंसेसारख्या भयानक प्रश्नाला चित्रपटांना जबाबदार धरणं हे सोपं उत्तर आहे. पण अशा सोप्या उत्तरांमधून खरे सामाजिक प्रश्न कधीच सुटत नाहीत. 1999 मध्ये कोलम्बाईन हायस्कूलमध्ये त्याच शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि तेरा जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी शिकागो सन टाइम्सचे ज्येष्ठ समीक्षक रॉजर एबर्ट यांच्या प्रतिक्रियेसाठी एक वार्ताहर येऊन थडकला. या प्रकारच्या हत्याकांडांना चित्रपटात दाखवलेला हिंसाचारच जबाबदार नाही का? अशा छापाच्या त्याच्या प्रश्नाला एबर्टनी दिलेले उत्तर नकारात्मक होतं आणि त्यांनी मांडलेली थिअरी विचार करण्याजोगी. त्यांचं म्हणणं होतं, की अशा वाढत चाललेल्या हिंसाचाराला चित्रपटाहून अधिक मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे तो वाढता वृत्त उद्योग. जेव्हा एखादा माथेफिरू या प्रकारचं हिंसासत्र पसरवतो तेव्हा हे बातम्यांनी व्यापलेले आणि चोवीस तास काहींना काही दाखवून "टीआरपी' वाढवण्याचा प्रयत्न करणारे चॅनेल्स ही बातमी उचलून सतत सर्व चॅनेलवर दाखवत राहतात, त्याविषयी बोलतात, चर्चा घडवतात. बातमीला एखादं "कॅची टायटल' देतात. मुलांसंबंधित लोकांच्या मुलाखती घेतात, आपली व्हॅन्स घेऊन घटनास्थळाशी दबा धरून बसतात, आतल्या बंदूकवाल्याचं किंवा त्याच्या बळींचं जिवंत वा मृतावस्थेत दर्शन होईल म्हणून. ही या मंडळींना मिळणारी लोकप्रियता या वाढत्या हिंसाचाराला अधिक ग्लॅमर आणून देते, असं एबर्ट यांचं म्हणणं आहे, आणि विचार केला तर आपल्यालाही ते पटण्यासारखं आहे. केस इन पॉइंट म्हणून कोलम्बाईन हत्याकांडाशी साधर्म्यी असणाऱ्या दिग्दर्शक गस व्हान सान्त यांच्या "एलिफन्ट' चित्रपटाचं, आणि त्यातल्या हिंसाचाराचं उदाहरण घेऊ. गेल्या वर्षी आलेल्या पॉल ग्रीन ग्रासच्या "युनायटेड 93' चित्रपटात 9/11 मधल्या अपहृत विमानाची गोष्ट जशी घडली तशी दाखवण्यात आली होती. कोणत्याही चिकटवलेल्या नाट्यपूर्णतेचा आधार न घेता किंवा दिग्दर्शकीय टिप्पणी न करता 2000 मध्ये आलेल्या "एलिफन्ट'चा सूरदेखील याच प्रकारचा आहे. गस व्हान सांतच्या डेथ चित्रत्रयीचा (जेरी, एलिफन्ट आणि लास्ट डेज) हा दुसरा भाग. याच्या निर्मितीची सुरवात झाली, ती कोलम्बाईन हत्याकांडावर आधारित टेलिफिल्म म्हणून, मात्र पुढे याचे तपशील बदलून वॉट हायस्कूल नावाच्या कल्पित शाळेत हे कथानक घडवण्यात आलं. चित्रपट घडतो, तो प्रामुख्याने या शोकान्त घटनेच्या दिवशी. जॉन मॅकफारलॅन्ड (जॉन रॉबिन्सन) आपल्या मद्याच्या अमलाखाली असणाऱ्या वडिलांना शाळेबाहेर सोडून गाडीच्या चाव्या शाळेच्या ऑफिसमध्ये डिपॉझिट करतो आणि पात्रपरिचयाला सुरवात होते. चित्रपट अत्यंत शांतपणे अनेक विद्यार्थ्यांची आपल्याशी ओळख करून देतो. ही ओळख करून देण्याची पद्धती खास आहे. सर्व घटना घडतात, त्या ऍलेक्स (ऍलेक्स फ्रॉस्ट) आणि एरिक (एरिक ड्यूलेन) हे विविध हत्यारांनिशी शाळेत शिरण्याआधीच्या काही वेळात चित्रपट हा विशिष्ट कालावधी घेतो आणि अनेक विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून तो पुन्हा पुन्हा घडवतो. उदाहरणार्थ, या कालावधीत जॉन आणि फोटोग्राफीचा विद्यार्थी इलिआस (इलिआस मॅककॉनेल) यांची कॉरिडॉरमध्ये घडणारी एक भेट आहे, ज्या भेटीत अलिआस जॉनचा फोटो काढतो. भेटीदरम्यान मागून एक चष्मा लावलेली मुलगी पळत जाताना आपल्याला दिसते. ही भेट चित्रपटात तीन वेळा येते. एकदा कॅमेरा जॉनच्या मागावर असतो, दुसऱ्यांदा इलिआसच्या, तर तिसऱ्यांदा त्या मुलीच्या. या स्ट्रॅटेजीमुळे आपल्याला चित्रपटात होणाऱ्या समांतर घटनाक्रमाकडे नीट लक्ष पुरवता येते. या सर्व मंडळींच्या घरगुती आणि शालेय जीवनाचे, त्याबरोबरच त्यांच्या एकमेकांबरोबरच्या संबंधांचे तपशीलही वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या तोंडून आल्याने आपल्यापुढे एखाद्या कोलाजसारखं तुकड्यातुकड्यांत हे चित्र उलगडत जातं. वर सांगितलेल्या भेटीनंतर काही मिनिटांतच मुख्य घटना घडत असल्याने हा चित्रपटाचा एक भावनिक केंद्रबिंदू ठरतो, असं म्हटलं तरी चालेल. आता महत्त्वाच्या दोन गोष्टी. पहिली म्हणजे ऍलेक्स आणि एरिकच्या वागण्यामागे दिग्दर्शकाच्या मते काय कारण असावं? आणि या विशिष्ट चित्रपटातला हिंसाचार पडद्यावर येताना कसा येतो? हे दोन प्रश्न चित्रपटांच्या दर्जाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. पहिल्याचं उत्तर हे स्पष्ट नाही. म्हणजे दिग्दर्शकाला ते स्पष्टपणे जाणवलेलं नाही, असं नसून ते स्पष्ट नाही हेच त्याला जाणवलेलं आहे. चित्रपटात भूतकाळातल्या काही दृष्यांमधून या दोघांच्या आयुष्याची थोडी माहिती येते. म्हणजे दोघं टीव्हीवर प्रक्षोभक कार्यक्रम पाहतात, हिंसक व्हिडिओ गेम्स खेळतात, त्यांना वर्गातली काही मुलं त्रास देतात, दोघं घरच्यांच्या नकळत बंदुका कुरिअरने ऑर्डर करतात, वगैरे. त्याखेरीज इतरांच्या बोलण्यातूनही त्यांच्या त्यांच्या पालकांची असुरक्षितता, जनरेशन गॅप, सामाजिक परिस्थितीच्या पडछाया वगैरे दिसून येतात. यातल्या काही गोष्टींचा ऍलेक्स आणि एरिकवर परिणाम होतो हे उघड आहे. मात्र, या गोष्टी त्यांच्या पिढीतल्या सर्वांनाच लागू आहेत. म्हणजे अनेक जण रक्तरंजित व्हिडिओ गेम्स खेळतात किंवा टीव्हीवर तर सतत सेन्सेशनल बातम्या चालूच असतात. मग या मुलांमध्येच असं काय आहे, जे त्यांना शस्त्र उचलायला प्रवृत्त करतं? "एलिफन्ट' हे आपल्याला सांगत नाही. तो हिंसा या विषयाचा अनेक छोट्या-छोट्या तुकड्यांत अभ्यास करतो; मात्र तरीही या विषयाचं पूर्ण चित्र आपल्यापुढे मांडणं अशक्य आहे, हे आपल्याला सांगतो. "एलिफन्ट' या थेट संबंध नसलेल्या नावाचा अर्थही माझ्या मते या कल्पनेशीच जोडलेला आहे. हत्ती आणि पाच आंधळ्यांच्या गोष्टीतल्या प्रमाणे हत्ती हे हिंसेचे प्रतीक आहे आणि तिचं कारण शोधणारे आपण, हे त्या आंधळ्यांप्रमाणे फार संकुचितपणे एखाददुसऱ्या मुद्द्यावरून तिचं स्वरूप जोखण्याचा प्रयत्न करतो आहोत. जर हे स्वरूप कळायचं, तर डोळ्यांवरच्या पट्ट्या काढणं आवश्यक आहे, असं हा चित्रपट सुचवतो. आता प्रश्न उरतो तो प्रत्यक्ष हिंसेच्या चित्रणाचा. काही चित्रपटांमध्ये हिंसा, किंवा ती घडवणारे यांचं चित्र आकर्षकपणे रंगविण्यात येतं (पहा - टेरेन्टीनोचा कोणताही चित्रपट) आणि त्या प्रकारच्या चित्रपटांच्या बाबतीत खरोखरच असं म्हणता येईल, की त्यांचा तरुण मनावर अमुक एक परिणाम होत असेल. इथे मात्र संपूर्ण चित्रपटासाठी एक ग्रामर वापरण्यात आलं आहे, जे चित्रपटाच्या अखेरीला येणाऱ्या हत्याकांडाचाही केवळ त्रयस्थपणे केलेल्या निवेदनाचं रूप आणून देतं. इथे कॅमेरा हा एक निरीक्षक आहे आणि तो कुठेही शैलीदार होण्याचा प्रयत्न करत नाही. तो केवळ व्यक्तिरेखांचा माग ठेवतो आणि झाल्या घटनांचा साक्षीदार होतो. बराच चित्रपट हा या मुलांच्या शाळेतल्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यात खर्ची होतो, जिथे कॅमेरा हा कोणताही प्रयोग न करता केवळ एक विशिष्ट अंतर राखून त्यांच्या मागे मागे फिरतो. हा प्रवास विशेष काही न करताही आपल्याला या विद्यार्थ्यांच्या शालेय अनुभवाच्या अधिक जवळ घेऊन जातो आणि काहीसा तरल स्वप्नवत अनुभवही देतो. या प्रकारचं संकलनाला कमी महत्त्व देणारं दीर्घ शॉट् स वापरून केलेलं चित्रीकरण सध्या दुर्मिळ आहे. त्यामुळे हा या चित्रपटाचा विशेष आहे. चित्रपटाच्या अनुभवाचा वेगळेपणा अखेरच्या घटनेतही कायम राहतो. इथे या गोळीबाराशी कोणतीही भावना जोडली जात नाही, जी प्रेक्षकाला बंदूकधारी व्यक्तींच्या विरोधात वा बाजूने बोलायला लावेल. गोळ्या उडणं आणि माणसं मरणं यांच्यातला एक प्रकारचा निर्विकारपणा, हा घडवून आणलेल्या नाट्यमयतेहून अधिक परिणामकारक ठरणारा आहे. झाला प्रकार मुळातच इतका सुन्न करणारा आहे, की त्यावर सोपं स्पष्टीकरण मिळण्याची आशा ठेवणं हेच फोल आहे, असं दिग्दर्शक गस व्हान सान्त यांना म्हणायचंय. जे गेले ते का गेले आणि वाचले ते का वाचले, यामागे कोणतंही कारण नाही. हा अनिश्चितपणाच पडद्यावर पकडण्याचा "एलिफन्ट' हा प्रयत्न आहे. संकुचित विचार नको .हिंसाचार आणि चित्रपट यांचा संबंध जोडू पाहणारा एक मोठा वर्ग आहे. मात्र, हा संबंध प्रखरपणे असल्याचा आभास झाला तरी प्रत्यक्षात आहे असं समजणं हे एक सोपं उत्तर आहे. सोप्या उत्तरामधून खरे सामाजिक प्रश्न कधीच सुटत नाहीत. ते सोडवायचे तर आपल्या मानसिकतेचा मूलभूत विचार करणं आवश्यक आहे. तसं झालं तरच हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीचा अर्थ आपल्याला नक्की कळला असं म्हणता येईल.
- गणेश मतकरी

1 comments:

Meghana Bhuskute March 15, 2008 at 1:14 AM  

किती नेमकं आणि शैलीचा आव न आणता केलेलं रसग्रहण आहे हे. हे लिहिल्याबद्दल आणि छापल्याबद्दल - सगळ्याच संबंधितांचे मनापासून आभार. प्लीज कंटिन्यू धिस..

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP