हल्कचा पुनर्जन्म

>> Sunday, August 3, 2008

सुपरहिरो या संकल्पनेतलंच एक अविभाज्य अंग म्हणजे दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व. या दुभंगण्याचं प्रमाण जरूर वेगवेगळं असेल, पण त्याचं अस्तित्व अन्‌ या नायकांना एरवीच्या जगात वावरण्यासाठी असणारं त्याचं महत्त्व हे वादातीत. मला वाटतं एक्‍स मेन मालिकेतली सुपरनायक- नायिकांची गर्दी या स्प्लिट पर्सनॅलिटी प्रकरणातून काही प्रमाणात मुक्त. मात्र, इतरांसाठी हे डिपार्टमेंट फार महत्त्वाचं. साहजिकच या नायकांवर आधारित चित्रपटांमध्ये हे व्यक्तिमत्त्व विभाजन लक्षात घेण्याजोगं. अभिनेत्यांनाही ते अधिक आव्हानात्मक. कारण बहुधा एका ठायी वसलेली ही दोन व्यक्तिमत्त्वं (वा आभास) केवळ एकमेकांपेक्षा वेगळीच नाही, तर पूर्णपणे विरुद्ध म्हणजेच सुपरमॅन देखणा/शक्तिशाली तर क्‍लार्क केन्ट वेंधळा/घाबरट, बॅटमॅन आपल्या भूतकाळातल्या मानसिक जखमा घेऊन गुन्हेगारांशी चारहात करणारा, तर ब्रूस वेन आपल्या श्रीमंतीचा दिखावा करत मुलींमागे फिरणारा. इतरांसाठीही हे काही प्रमाणात खरं. गमतीची गोष्ट म्हणजे हे आव्हान डी. सी. कॉमिक्‍सच्या नायकांना अधिक लागू पडतं अन्‌ मार्व्हलच्या नायकांना कमी. कारण डी.सी.च्या मुख्य नायकाचा चेहरा हा दोन्ही रूपांत फार बदलत नाही. बॅटमॅनसारखा नायक मुखवटा जरूर घालतो. मात्र, त्यातूनही त्याचा चेहरा अदृश्‍य होत नाही. मार्व्हलच्या स्पायडरमॅन, आयर्न मॅनसारख्या नायकांचा चेहरा हा महानायक बनताच मुखवट्याआड जातो अन्‌ मग मूळ अभिनेता इथे असण्या-नसण्याने फरत पडत नाही. मार्व्हलच्याच इनक्रिडीबल हल्कमध्ये तर हे आव्हान अधिकच कमी होतं. कारण इथला नायक हा पूर्णतःच नाहीसा होतो अन्‌ त्याजागी येते त्याची संगणकीय प्रतकृती. २००३ मध्ये दिग्दर्शक ऍन्गलीने घेतलेला हा अभिनेत्याऐवजी प्रतकृती वापरण्याचा निर्णय २००८ च्या आवृत्तीत दिग्दर्शक लुईस लेटेरीअर बदलू पाहत नाही. ही एक गोष्ट सोडता इतर बाबतीत मात्र तो चित्रपट विसरून जायचाच मार्व्हलचा इरादा दिसतो. इनक्रिडीबल हल्क आणि इतर सुपरहिरो यांमध्ये फरक आहे. हल्क हा पूर्णपणे ऍन्टीहिरो आहे. तो हल्क तर अपघाताने झालाच आहे, वर हल्क म्हणून तो कोणाचं भलं वगैरे करू शकत नाही. कारण या राक्षसी अवतारात असताना त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही. ब्रूस बॅनर या मानवी अवतारातली त्याची विचार करण्याची क्षमता, बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी तो महाकाय हल्क होताच परागंदा होतात आणि साधारण नासधूस करणं हा एक कलमी कार्यक्रम त्याच्यापुढे उरतो. शिवाय इतर सुपरहिरोंप्रमाणे तो हवा तेव्हा वेगळ्या रूपातही जाऊ शकत नाही. ब्रूसचं उत्तेजित होणं, हे त्याला हल्क बनवायला पुरेसं ठरणारं असतं. त्यामुळे सुपरपॉवर हे ब्रूससाठी वरदान तर नाहीच, वर जवळपास तो एक आजार आहे. ऍन्ग लीने आपला मूळ "हल्क' बनवतेवेळी ही बॅनर आणि हल्कमधली गुंतागुंत लक्षात घेतली होती आणि त्यावर चित्रपटाची संकल्पना केंद्रित केली होती. हल्कची ओरिजीन मांडतानाही त्याने सांकेतिक वळणांनी न जाता बॅनरच्या वडिलांनाच गुन्हेगार ठरवलं होतं आणि पालक/ मुलांमधल्या विसंवादाला उपसूत्र असल्यासारखं वापरलं होतं. बॅनर (एरिक बाना) आणि नायिका बेटी (जेनिफर कॉनेली) या दोघांची आपल्या वडिलांबरोबरची तणावपूर्ण नाती हा पटकथेचा महत्त्वाचा घटक होता. या सगळ्याने झालं काय, की नेहमीच्या सुपरहिरोपट - प्रेक्षकांना आणि हल्कच्या फॅन्सना जे अपेक्षित होतं, ते पुरेशा प्रमाणात न देता चित्रपटाने एक प्रौढांसाठी असणारी, जवळजवळ प्रतकारक दंतकथा उभी केली. त्यातून शेवटचा भाग तर इतका गोंधळाचा झाला, की अनेकांना शेवट नीटसा कळला नाही. तात्पर्य म्हणजे मार्व्हलचा एक लोकप्रिय नायक प्रेक्षकांनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकला आणि संबंधित निर्माते हतबुद्ध झाले. पुढे सीक्वल आलं तर नाहीच, वर ते येणार की नाही असा संभ्रम तयार झाला. खरं तर ऍन्ग लीचा प्रयोग हा चांगला आणि वैशिष्ट्यपूर्ण होता आणि चित्रकर्त्यांनी त्याचा टोन अधिक सोपा करतानाही त्याच्या मूळ युक्तिवादाला ठेवलं असतं, तर सुुपरहिरोपटांमध्ये हळूहळू एक नवा प्रवाह येऊ शकला असता. मात्र, इथे मूळ चित्रपट पुसून टाकायचं ठरलं आणि त्याचा परिणाम म्हणून २००८चा इनक्रिडीबल हल्क अवतरला. नव्या ओरीजिनसह, चाहत्यांना अधिक पटेलशा स्वरूपात आणि मानसिक द्वंद्वाला दुय्यम पातळीवर ठेवून ऍक्‍शनला प्राधान्य देत. यंदा आयर्न मॅन आणि हल्क या दोन चित्रपटांनी नायक म्हणून दोन अनपेक्षित अभिनेत्यांना प्रमुख भूमिका देऊ केल्या आहेत. आयर्न मॅनमधल्या रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर आणि इथला एड नॉर्टन हे नावाजले आहेत गंभीर अभिनेते म्हणून आणि सुपरहिरोपटांत ते पाहायला मिळतील (तेही नायक म्हणून) असं कुणालाही वाटलं नसतं. नाही म्हणायला दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वांना नॉर्टन फार नवीन नाही. प्रायमल फिअर आणि फाईट क्‍लब नंतरचा हा त्याचा तिसरा यशस्वी प्रयत्न. नव्या हल्कने जरी जन्मकथा बदलली, तरी परंपरेप्रमाणे तो तिच्यावर फार वेळा काढत नाही, उलट आधी एक चित्रपट येऊन गेल्यासारखा आभास निर्माण करत (पहा "स्पायडरमॅन-२') जवळजवळ रिकॅप असल्यासारखी ही ओरिजीन मांडतो. ही सोडली तर चित्रपटाचा आकार हा "चेज' चित्रपटासारखा म्हणता येईल. म्हणजे बॅनरचं पळणं आणि खलनायक मंडळींचं अधिकाधिक जवळ येत जाणं. प्रामुख्याने नायक अन्‌ खलनायक यांमधले तीन झगडे आपल्याला पाहायला मिळतात. यातला पहिला सर्वांत वेगळा, कारण तो घडतो ब्राझीलमधल्या प्रचंड झोपडपट्टीत. जर इथे सुरवातीला दिसणारं दृश्‍य जर संगणकीय नसून खरं असेल (आणि ते वाटतंही खरं) तर आपली धारावी या वस्तीसमोर छोटीशी वसाहत वाटावी. इथला बराच भाग आपल्यासमोर हल्क नसून बॅनर आहे आणि संगणकीय चमत्कारांना फारशी जागा नाही. याउलट तिसरा आणि अखेरचा झगडा प्रभावी असला, तरी अधिक स्पष्टपणे खोटा वाटणारा, अनेक शॉट्‌ससाठी संगणकाची मदत घेणारा आणि पारंपरिक वळणाचा. मात्र, स्पेशल इफेक्‍ट्‌सची आवड असणाऱ्यांना हा शेवट आवडून जाईल. बेटी (इथे लिव टायलर) आणि तिचे वडील (इथे विलिअम हर्ट) ही पात्रं २००३ प्रमाणेच इथेही असली तरी इथे त्यांच्या नात्याला समांतर नातं बॅनरच्या बाजूने येत नाही. त्यामुळे या नात्याला थीमसारखं वापरलं जाता, त्याला नायिका आणि तिचे दुष्ट वडील हा सांकेतिक आकार येतो. इथला दुसरा आणि अधिक ठळक खलनायक असणारा ब्लॉन्स्की मात्र टिम रॉथसारख्या नावाजलेल्या अभिनेत्याने उभा करूनही फार लक्षात राहत नाही. डॉ. ब्रूस बॅनर आणि त्यांचा ताबा सुटताच आकाराला येणारा हल्क या कल्पनेला उघडच डॉ. जेकील ऍन्ड मि. हाईड या कल्पनेचा आधार आहे. तसंच हल्कच्या राक्षसी वागण्यावर उतारा ठरणारी त्याची बेटीबरोबरची हळुवार वागणूक ही ब्यूटी ऍन्ड द बीस्टची आठवण करून देणारी. या दोन गाजलेल्या कल्पनांचा वापर आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोचेलसा स्पष्ट स्वरूपात मांडणं हे इनक्रिडीबल हल्कमध्ये जमवलेलं आहे आणि ते त्याच्या एकूण परिणामाला पूरक ठरतं. एकूण पाहता हा नवा हल्क अधिक सोपा. आर्थिक गणिताला प्राधान्य देऊन रचलेला असला आणि आशयाशी काही प्रमाणात तडजोड ही त्यात गृहीत धरलेली असली, तरी तो दर्जाशी तडजोड करत नाही. वेगळी वाट निवडत नसला, तरी जुन्या वाटेवरूनचा प्रवास अधिक सुकर होईल, याची काळजी घेतो. चित्रकर्त्यांनी आपल्या सोयीसाठी काढलेला हा मध्यममार्ग असला, तरी या मार्गावरून हल्क लांबचा पल्ला गाठेल, असा विश्‍वास तयार करतो.

- गणेश मतकरी

0 comments:

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP