निळी छटा अपरिहार्य...
>> Tuesday, August 5, 2008
कित्येकदा आपल्या आयुष्यातल्या अभावांची आपल्याला जाणच नसते. दुखऱ्या नसेला स्पर्श होईस्तोवर आपल्याला इथंही दुखतं आहे, हे समजतच नसतं. त्या दुखण्याला आपल्या असण्यात सामावून घेत निमूट विनातक्रार वाट चालत असतो आपण. एखादं वळण मात्र असं येतं, की सगळ्या सगळ्या गाळलेल्या जागा चरचरून समोर उभ्या ठाकतात. वाट अडवतात. प्रश्न विचारतात. तिथून पुढचं आयुष्य साधं-सोपं-सरधोपट उरत नाही मग. वाट तर उरतेच, पण सोबत दरेक पावलापाशी एक लख्ख बोचही उरते. दुखावते. सुखावतेही. या जागांचं ऋणी असावं की शाप द्यावेत त्यांना? हा ज्याच्या त्याचा निर्णय. आपापल्या वकुबानं आणि जबाबदारीनं घेण्याचा.
अशाच एका वळणाची गोष्ट सांगतो 'मिस्टर ऍण्ड मिसेस अय्यर'.म्हटलं तर ती एक सरळसोट प्रेमकथा आहे - जाहिरातीत म्हटलं आहे तशी विध्वंसाच्या इत्यादी पार्श्वभूमीवरची. आणि तुम्हांला दिसलंच, तर असं एक वळण - जे आपल्यापैकी कुणालाही गाफील गाठू शकतंच.
एखाच्या शांत-निवांत तळ्यासारखं सावलीला पहुडलेलं सुखी आयुष्य तिचं. सुसंस्कृत तमिळ ब्राह्मणाचं धार्मिक कुटुंब, उच्चशिक्षण, स्वजातीत लग्न, काळजी घेणारं सासर, ल्हानगं लेकरू - सगळं कसं चित्रासारखं. कुठे कसला उणिवेचा डाग नाही. माहेरच्या एका मुक्कामानंतर लेकाला घेऊन सासरी निघालेली ती. एकटीच. लांबचा प्रवास. आईबापांनी कुण्या एका फोटोग्राफरची तोंडओळख काढून त्याला तिला जुजबी मदत करायची विनंती केलेली. अर्धा प्रवास तसं सगळं योजल्यासारखं नीट पार पडतंही. तसंच होतं, तर तिला तिच्या त्या सहप्रवाश्याचं नावही कळतं ना. आयुष्य तसंच विनाओरखड्याचं निवांत चालू राहतं. कसल्याही खळबळीविना. पण तसं व्हायचं नसलेलं.
मधेच बस थांबते आणि गावात दंगली पेटल्याचं कळतं. रस्ता बंद. कर्फ्यू लागलेला. माथेफिरूंच्या झुंडी मोकाट सुटलेल्या. बसमधून बाहेर पडणंही धोक्याचं. अशात तिचा सहप्रवासी तिला सांगतो - 'मला जावं लागेल. मी - मी मुस्लिम आहे.' अरे देवा! मी पाणी प्यायले त्याच्या हातचं. आता? बुडाला की माझा धर्म... ही तिची पहिली प्रतिक्रिया. त्याच्यापासून तिरस्कारानं दूर सरकण्यात झालेली. पण बसमधल्या एका म्हाताऱ्या मुस्लिम जोडप्याला ओढून नेताना पाहून ती हबकते, की सोबतीच्या आशेनं का होईना - तिच्यातली माणुसकी डोकं वर काढते कुणाला ठाऊक. 'नाव काय तुमचं?' या एका हिंदू माथेफिरूनं दरडावून विचारलेल्या प्रश्नाला तिच्या तोंडून अभावित उत्तर जातं - 'अय्यर. मिस्टर ऍण्ड मिसेस अय्यर.'
आता सगळेच संदर्भ बदललेले.
इथवर अपर्णा सेननं आपल्याला बसमधल्या इतर अनेक प्रवाश्यांची ओझरती ओळख करून दिलेली. काही उत्साही तरुण मंडळी. रोमॆण्टिक. काही बाटल्या आणि पत्ते घेऊन मजा करणारे सद्गृहस्थ. काही फाळणीत पोळून निघालेले शिख व्यापारी. काही हनीमूनर्स. आणि ते मुस्लिम आजी-आजोबांचं जोडपंही. सगळीच माणसं. थोडी काळी. थोडी पांढरी. तुमच्याआमच्यासारखीच. ती तशी नसती, तर त्या ज्यू तरुणानं 'ते - ते मुस्लिम आहेत'असं म्हणून त्या म्हाताऱ्या जोडप्याचा बळी का चढवला असता? पण त्यालाही स्वत:च्या जिवाची चिंता आहेच. त्याबद्दल त्याला दोषी ठरवणारे आपण कोण? आपल्यावर अशी वेळ आली, तर आपण नक्की कसे वागू हे छातीठोकपणे सांगता यायचं नाहीच आपल्याला...
असे अनेक संमिश्र संदर्भ पेरले गेलेले. असल्या विद्वेषी हिंस्रपणाला आपल्या रुटीनचा एक भाग बनवून टाकणारे वृत्तपत्रीय मथळे या ना त्या निमित्तानं दाखवत राहते अपर्णा सेन. कुठे मासिकाचं एखादं पान, कुठे चिक्कीला गुंडाळून आलेला बातमीचा तुकडा. बसबाहेर सापडलेली त्या मुस्लिम म्हाताऱ्याची कवळी. मुद्दाम पाहिले नाहीत, तर लक्षातही येऊ नयेत, पण असावेत सगळीकडेच...
या संदर्भांच्या पार्श्वभूमीवर एका प्रवासापुरते एकत्र आलेले ते दोघं. कर्फ्यू. धुमसती दंगल. प्रवास अशक्यच. हातात लहान मूल. राहायला जागा नाही कुठेच. त्याची सोबत-मदत तर हवी आहे, थोडी त्याच्या जिवाचीही चिंता आहे. पण तो मुस्लिम आहे म्हणून होणारी अभावित चिडचिडही. कुठून यात येऊन पडलो, असा थोडा बालिश वैतागही. तो मात्र शांत. आतून संतापानं-असुरक्षिततेनं धुमसणारा. पण तिच्या मूलपणाची जाणीव असणारा. बिनबोलता तिला जपणारा. त्याच्यातला कलावंत एकीकडे या सगळ्यातलं वाहतं जीवन टिपतो आहे. अस्वस्थ होतो आहे. बसमधे काढलेल्या त्या रात्रीनंतर तो कॅमेरा घेऊन बाहेर पडतो, तेव्हा त्यानं टिपलेल्या फ्रेम्स आयुष्याचं हे संमिश्र रुपडं अबोलपणे दाखवत राहतात. नदीच्या पाण्यातली म्हाताऱ्याच्या चष्म्याची तुटकी केस. थकून चाकावर डोकं टेकून झोपलेला ट्रक ड्रायव्हर. गाडीच्या आरश्यात पाहून मिशी कातरणारे कुणी एक सद्गृहस्थ. खोळंबलेली रहदारी. वाहतं पाणी. कोवळं ऊन. अव्याहत.
आता मिस्टर अय्यर यांना नाव निभावणं भाग आहे. औटघटकेच्या या लेकराची नि बायकोची जबाबदारीही.
आता त्यांच्यात घडतं ते काहीसं कवितेच्या प्रदेशातलं.
फॉरेस्ट बंगलोमधली ताजीतवानी संध्याकाळ. भोवताली पसरलेलं जंगल. उन्हातलं जंगल टिपणारा तो आणि त्याच्यावर विश्वासून मोकळी-ढाकळी झालेली ती. त्याच्या कॅमेऱ्याला डोळे लावून ऊन निरखणारी तिची एक निरागस मुद्रा त्यानं टिपलेली. आणि मग अशा अनेक मुद्रा तिच्या. हसऱ्या. संकोची. लटक्या रागातल्या... त्याच्या कॅमेऱ्यात बंद.
दिवसा गावात परतून तिनं सुखरूप असल्याचा घरी केलेला फोन आणि बसमॅनेजर म्हणून फोनवर अभिनय करायची त्याला केलेली विनंती.
'आम्हांला सांगा नं कसं जमलं तुमचं लग्न...' या कोवळ्या पोरींच्या उत्सुक प्रश्नावर त्यांच्यात पसरलेली अवघडलेली शांतता. आणि ओठांवर लाजवट स्मित खेळवत तिनं दिलेलं उत्तर. चकित तो. पण तिचं उत्तर निभावत किर्र जंगलातल्या मधुचंद्राचे तुटक तपशील देणारा.
ठिबकत्या दवाचा आवाज ऐकत संध्याकाळी बंगलोच्या व्हरांड्यात त्या दोघांनी मारलेल्या गप्पा. दंगलीच्या त्याच्या भयचकित आठवणी आणि हिंदू स्त्रियांच्या भालप्रदेशावरच्या रक्तबिंदूचं त्याला असलेलं अनाकलनीय आकर्षणही. दोघांनी मिळून कॅमेऱ्यात पकडलेली स्वप्नील हरणं. आणि त्याच कॅमेऱ्याच्या भिंगातून हतबलपणे निरखलेला कुण्या अभागी दंगलग्रस्ताचा जाता जीवही.
रक्ताच्या त्या चिळकांडीनं आणि माणसाच्या इतक्या सहजस्वस्त मरणानं मुळापासून ढवळून निघालेली ती. त्याच्या मिठीत विसावलेली. त्याचा हात घट्ट धरून झोपी जाणारी.
त्या रात्री अपर्णा सेनचा कॅमेरा त्या दोघांच्या निरागस जवळिकीचे तपशील चितारतो. ती फक्त एक भ्यालेली लहानशी मुलगी आहे. आणि तो तिचा सखा. बस. रात्र सरते. उमलत्या सकाळीसोबत तिला जाग येते आणि कॅमेरा हलकेच मागे येतो. क्लोज अप्स पुसले जातात आणि आपल्याला एक दूरस्थ चित्र दिसत जातं. आता पदरा-कुंकवाचं भान असलेली एक विवाहित स्त्री आहे ती. आरश्यापाशी जाऊन केस नीटनेटके करताना हलकेच टिकली आरश्याला चिकटवून थोडी सैलावते ती फक्त. लहानसं दृश हे, पण किती किती संदर्भ जागे करून जाणारं... तिच्या चौकटीतल्या विवाहित आयुष्याचे आणि त्याला मोहवणाऱ्या त्या कुंकवाच्या आकर्षणांचे...
परतीचा प्रवास सुरळीत सुरू. 'आता कुठे जाणार मग?' वरवर सहजपणा दाखवत तिनं त्याला केलेली पृच्छा. आणि त्यानं कुठल्याश्या जंगलाचं नाव सांगितल्यावर 'एकटाच जाणारेस?' हा स्वत:च्याही नकळत तिच्या तोंडून बाहेर पडलेला नाईलाज प्रश्न.
इथवर सगळं स्वप्नील-धूसर. पण तो तिच्या नजरेत नजर गुंतवून थेट उत्तर देतो - 'तू येणार नसलीस, तर एकटाच.'
हसत हसत रेषेपल्याड राखलेले सगळे सगळे बंध एकाएकी कधी नव्हे इतके निकट आलेले.
तिच्या 'मीनाक्षां'चा त्यानं हलकेच बोटांनी गिरवलेला आकार. त्यानं उष्टावलेलं पाणी तिनं सहज पिणं. सोबतीचा जवळ येणारा शेवट जाणवून त्याच्या खांद्यावर विसावणं. अंतरं मिटलेली आहेत आणि नाहीतही...
तिच्याकडे सहज पाठ फिरवून चालता होतो तो.
वळण संपलं.
त्यानं टिपलेला हा प्रवास मात्र तिच्या मुठीत दिल्यावाचून राहवत नाहीच त्याला.
त्यावर भरल्या नजरेनं तिनं 'मिस्टर अय्यर'ना दिलेला निरोप आणि तिच्या नजरेत धूसरलेली त्याची पाठ.
अपर्णा सेनचा कॅमेरा आता स्थिरावतो तो त्याच्या खऱ्या नावाच्या पाटीवर.
प्रवासापुरतं घेतलेलं नाव संपलं. वळणही संपलं.
त्याचे पडसाद मात्र अभंग उरतील. त्या दोघांच्याच नाही, आपल्याही आयुष्यात. विषाची चव चाखली आहे आता ओठांनी. निळी छटा अपरिहार्य...
- मेघना भुस्कुटे
3 comments:
Nice post on nice movie! One of my favourite movies. Btw, I recommend you to watch and write on 'Children of Heaven' by Majid Majidi.
@Dhananjay
Thanks. I will try to write on 'Children of heven'.
eka atishay chan cinemache sundar shabd-chitran !!
Dhanyavad...
Post a Comment